१० बेपर्वाई (युवराज कथा) १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
संध्याकाळपासून पाऊस वेड्यासारखा पडत होता.आता रात्रीचे बारा वाजले होते .नदी नाले रस्ते भरभरून वाहत होते .शांती सदन सोसायटीमध्येही चारी बाजूनी पावसाचे पाणी साचू लागले होते .ही इमारत बांधून दोन वर्षे झाली होती .पूर्वी या शहरात पाच मजल्यांपर्यंतच इमारती बांधायला परवानगी होती .तीन वर्षांपूर्वी बारा मजल्यापर्यंत इमारतींना परवानगी देण्यात आली .त्यानंतरची ही पहिलीच इमारत .पूर्वी शहर लहान होते .चाळी किंवा बंगले असे शहराचे स्वरूप होते .हळूहळू शहराचा विस्तार होऊ लागला .फ्लॅट सिस्टीम आली.सहकारी सोसायट्यांच्या मार्फत अनेक मजली इमारती बांधण्यास सुरुवात झाली .पूर्वी विशेष बिल्डर्स नव्हते .आता बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशा संस्थांचे पेव फुटले .शहराच्या आसपासच्या जमिनी खरेदी करायच्या त्यावर अनेक मजली इमारती बांधयच्या व अश्या फ्लॅट्सची विक्री करायची असा एक मोठा धंदा उपलब्ध झाला.
पूर्वी बिल्डर्स थोडे होते त्यांचे कामाच्या दर्जाकडे लक्ष असे .आपण केलेले काम टिकाऊ स्वरूपाचे असावे आपले नाव उत्कृष्ट बिल्डर्स म्हणून सर्वांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा असे.पैसा मिळवावा परंतु तो योग्य मार्गाने मिळवावा असे त्यांचे धोरण होते .या शहरात तरी असे बिल्डर्स होते . पूर्वी माऊथ पब्लिसिटीला महत्त्व होते .हल्ली निरनिराळ्या प्रकारच्या जाहिराती देऊन ग्राहक आकृष्ट करून घ्यायचे अशी पद्धत सुरू झाली होती.स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फ्लॅट्स स्वस्तात द्यायचे मग त्याचे आयुष्य कितीही असो अशी पद्धत सुरू झाली होती .किंबहुना पंचवीस तीस वर्षे इमारत टिकली म्हणजे खूप झाले असा समज पसरविण्यात आला होता .भपका, दिखाऊपणा, जाहिराती,याला कामाच्या दर्जापेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले होते.या चक्करमध्ये ही शांती सदन इमारत बांधलेली होती .
बिल्डर्स इमारतीचे काम बऱ्याच वेळा बर्यापैकी मजबूत करीत असत . परंतू इतर कामांमध्ये पैसा वाचवण्याचा प्रयत्न करीत .इमारत बऱ्यापैकी मजबूत बांधीत .इमारत पडली तर अनेक कायदेशीर गोष्टींना तोंड द्यावे लागेल .परंतू प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशन,कम्पाउंड वॉल,पार्किंग एरिया,बाथरूम टॉयलेट इत्यादीचे वॉटर प्रुफिंग ,इत्यादीकडे दुर्लक्ष करीत. कमी दर्जाचा माल वापरीत.यातील निकृष्ट कामासाठी क्वचितच कुणी बिल्डर्सला कायदेशीररित्या जाब विचारायला जात असे .एखादा गेला तरी तो विशेष यशस्वी होण्याची शक्यता नसे.
शांति सदन इमारतही बहुधा अशा स्टाइलने बांधली गेली असावी .या इमारतीची कंपाऊंड वॉल दहा फूट उंच होती .त्याचा हेतू आजूबाजूने कोणीही भिंतीवर चढून आत येऊ नये असा होता. भिंतीवर काचाही लावलेल्या होत्या .पावसाचे साठणारे पाणी बाहेर निघून जावे म्हणून दोन कोपऱ्यात ड्रेनेज व्यवस्था केलेली होती .तिथे पाईप बसवून ते सार्वजनिक ड्रेनेजला जोडलेले होते .
तर धुँवाधार पाऊस पडत होता .पखालीने पाणी ओतावे असा सारखा पाऊस पडत होता .इमारतींवर व आसपास पडणारे पाणी त्या ड्रेनेजमधून जात होतेच परंतु बाहेरून येणारे पाणीही सोसायटीच्या कंम्पाउंडमध्ये शिरून सोसायटीच्या ड्रेनेजमधून जात होते .सोसायटीच्या इमारतीभोवती हळूहळू पाणी साचू लागले होते .जोडलेले पाइप पाणी वाहून नेण्यास समर्थ नव्हते .येणाऱ्या पाण्यापेक्षा त्यांची वाहन क्षमता कमी होती.या इमारतीच्या सीमाभिंतीपलीकडे(कंपाऊंड वॉल ) भिंतीच्या आधाराने काही झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. आसपास काही इमारतींचे बांधकाम चालू होते.तिथे काम करणारे हे मजूर होते .काही मजूर स्थानिक होते तर काही परराज्यातील होते .आडव्या उभ्या पावसात हे मजूर आपल्या झोपड्यांमध्ये झोपले होते .रात्रीचे दोन वाजले होते .सीमाभिंतीच्या आत साठणारे पाणी हळहळू पाच फुटांपर्यंत वाढले.एकाएकी पाण्याचा दाब वाढल्यामुळे एका बाजूची भिंत कोसळली आणि एकच हा:हा:कार उडाला.
दहा फुटाची भिंत एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि त्याखाली झोपड्यातून झोपलेले मजूर त्यांच्या स्त्रिया मुले गाडली गेली.जे जागच्या जागी मेले ते सुदैवी म्हणावे लागतील.परंतु ज्यांचे हात पाय तुटले, मोडले, डोके फुटले,कायमचे अपंग झाले त्यांचे हाल अपरिमित झाले.आणि पुढेही होणार होते .अर्थात काहीजण त्या अपघातातून वाचलेही.
या संकटात वीजही गेली .सर्वत्र भयाण काळोख आणि वरून धुँवाधार पाऊस आणि झोपडपट्टीमधील सर्वांचा आरडाओरडा असा एकच गलबला झाला होता .कुणी तरी पोलिसांना व फायर ब्रिगेडला कळविले .मोटारींच्या हेडलाईटच्या प्रकाशात रेस्क्यू ऑपरेशनला संकटग्रस्तांच्या विमोचनाला सुरुवात झाली.झोपडय़ा मोडल्या .झोपड्यातील सामान दबले भिजले आणि फुकट गेले.झोपड्यांतील निर्वासितांना कुठल्या तरी शाळेमध्ये तात्पुरती जागा दिली गेली.जखमीना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले .नगरसेवक राजकीय पुढारी इत्यादी दुसऱ्या दिवशी सकाळी गोळा झाले.वर्तमानपत्राचे वार्ताहर नेहमीप्रमाणे रात्रीच थोड्याच वेळात हजर झाले होते .
वर्तमानपत्रातून सोसायटी विरुद्ध, सोसायटीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरविरुद्ध, एकच हाकाटी उठली .बिल्डरविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला .बिल्डरची पोलीस चौकशी सुरू झाली .
बिल्डरने,पाऊसच अतोनात पडत होता .आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता .अस्मानी संकट होते .ढगफुटी झाली होती त्याला आपण काय करणार ?मी केलेले बांधकाम मजबूत होते .अस्मानी संकटापुढे कुणाचाही इलाज नाही .मी दोषी नाही अशी आपली बाजू मांडली .नेहमीप्रमाणे इकडे तिकडे दाबादाबी केली .बिल्डरचे अनेक वेळा राजकीय पुढाऱ्यांबरोबर साटेलोटे असते.बिल्डर्समध्येही स्पर्धा असते.नेहमीप्रमाणे बाजूने व विरोधी असे दोन पक्ष असतातच. स्थानिक लोकप्रतिनिधी सभा, विधिमंडळ, इत्यादी ठिकाणी आवाज उठविला जातो.वर्तमानपत्रात रकाने भरून उलटसुलट लिहिले जाते .आणि काही दिवसांनी मामला थंड होतो .हळू हळू सर्व विसरून जातात .दोषी पैशांच्या जोरावर सुटतात .ज्यांच्यावर दीर्घकालीन किंवा अल्पकालीन परिणाम झाला अश्या गरीब लोकांकडे कुणीही लक्ष देत नाही .असा आपला नेहमींचा सर्वसाधारण अनुभव आहे .
परंतु या वेळी काहीतरी वेगळे व्हायचे होते .ही भिंत पडल्यामुळे कित्येक अश्राप जीव नाहक मेले ,जखमी झाले किंवा जन्माचे जायबंदी झाले.ही केस शामरावांकडे आली .एकदा केस शामरावांकडे आली कि तिथे मागे पुढे काही चालायचे नाही हे सगळ्यांना माहीत होते. धनिकांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वजण हे पुरेपूर ओळखून होते.बिल्डरचे धाबे दणाणले .त्याच्यावर वरदहस्त असलेला राजकारणीही चपापला .बिल्डरचा दोष नाही. अस्मानी संकट होते.अश्या प्रकारे बिल्डरची पाठराखण करणारी वर्तमानपत्रेहि सजग झाली.
शामरावांनी प्रथम बिल्डरला अटक करण्याचे ठरविले.बिल्डरने नामांकित वकील नेमला .अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला .त्याला अटकपूर्व जामीन मिळू नये तो पोलीस कस्टडीत यावा म्हणजे खरे काय ते बाहेर पडेल हे शामराव जाणून होते .बिल्डरला अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी सरकारी केस मांडण्यासाठी युवराजांची मदत आवश्यक होती.
शामराव लगेच सरकारी वकिलांना घेऊन युवराजांकडे गेले.युवराज व शामराव या दोघांचाही तसा दबदबा होता .सरकारी वकील युवराजांची मदत घेण्याला लगेच तयार झाले .युवराजांनी सर्व हकीगत वर्तमानपत्रातून वाचलेली होतीच .आतापर्यंत गोळा केलेली सर्व माहिती शामरावांनी युवराजांना दिली. बिल्डरला सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या निरनिराळ्या मार्गांनी करता येऊ नयेत म्हणून त्याला पोलिस कस्टडीत घेणे अत्यावश्यक होते .
अटकपूर्व जामिनाची केस कोर्टासमोर आली .
बिल्डरच्या वकिलाने पुढीलप्रमाणे अार्ग्युमेंट केले .आपली बाजू मांडली .
त्या दिवशी पाऊस किती पडला याची सरकारी आकडेवारी कोर्टासमोर मांडली.शहरात पाणी किती तुंबले, किती अपघात झाले, किती इमारती कोसळल्या,किती रेल्वे रद्द कराव्या लागल्या, किती बसेस पाण्यामुळे आपल्या फेऱ्या करू शकल्या नाहीत, इत्यादीची सरकारी आकडेवारी दिली.भिंत पडली ही नैसर्गिक प्रकोपामुळे झालेली घटना होती त्यासाठी बिल्डरला जबाबदार धरता येणार नाही.तो निर्दोष आहे .त्याला निष्कारण यामध्ये अडकविण्यात येत आहे . सबब त्याला अटकपूर्व जामीन मिळावा .त्याला अटक केल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल .त्याची बाजारातील पत कमी होईल.भविष्यकाळात त्याच्याकडे सर्वजण निष्कारण संशयाने पाहतील .त्यामुळे त्याला वर्तमान काळात व भविष्यकाळात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.असा बिल्डरच्या वकिलांच्या बोलण्याचा एकूण गाभा होता .
युवराज व सरकारी वकील यांनी एकत्रितरित्या पुढीलप्रमाणे आपली बाजू मांडली.
जरी शहरात पाणी तुंबले असले तरी जिथे शांतीनिकेतन आहे त्या परिसरात पाणी तुंबले नाही .त्या परिसरात चांगला उतार असल्यामुळे पाणी वाहून जाते .जर ड्रेनेज व्यवस्थित असते तर सोसायटीच्या इमारती सभोवती पाणी तुंबले नसते .जर भिंत पुरेशी मजबूत असती तर ती एवढ्याश्या पाण्याच्या जोराने पडली नसती .जर सोसायटी बाहेर चर खणून वाहत्या पाण्याला जागा करून दिली असती तर ते पाणी सोसायटीमध्ये शिरले नसते .भिंतीचे बांधकाम कच्चे असावे .वाळू सिमेंट लोखंड इत्यादीचे मिश्रण योग्य नसावे .तज्ज्ञांकडून त्याची पाहणी केली पाहिजे .बिल्डर धनदांडगा असल्यामुळे त्याचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे तो चौकशीवर अयोग्य प्रकारे निरनिराळ्या मार्गांनी दबाव आणू शकतो .चौकशी योग्य मार्गाने जाण्यासाठी यामध्ये जे मृत्यू पावले अपंग झाले आणि बेघर झाले त्या सर्वांना न्याय मिळण्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक आहे .म्हणजेच पोलीस कोणत्याही दबावाशिवाय योग्य प्रकारे चौकशी करू शकतील .
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायाधीशाने अटकपूर्व जामीन नाकारला .
शामरावांनी झोपडपट्टीतील एका सुशिक्षित तरुणाकडून युवराजांना वकीलपत्र दिले.आता युवराज कायदेशीररित्या या सर्व प्रकाराची चौकशी करू शकणार होते.झोपडपट्टीवासियांची बाजू कोर्टात मांडू शकणार होते.बिल्डरकडून भक्कम नुकसानभरपाई मिळवू शकणार होते . वेळप्रसंगी बिल्डरला जबरदस्त दंड व कारावासही होऊ शकला असता .
बिल्डरला अटक करण्यासाठी लगेच वॉरंट काढण्यात आले .बिल्डरला पोलीस कस्टडी देण्यात आली .
युवराज व शामराव दोघांनीही हातात हात घालून चौकशीला सुरुवात केली .
(क्रमशः)
१०/९/२०१९©प्रभाकर पटवर्धन