Get it on Google Play
Download on the App Store

१ ब्लॅकमेल (युवराज कथा) १-२

सुनीता आतबाहेर सारख्या येरझारा घालीत होती . घन:श्याम अर्ध्या तासात येतो म्हणून सांगून रात्रीचे दहा वाजता बाहेर गेला होता.आता रात्रीचे बारा वाजले होते .अजून त्याचा पत्ता नव्हता .फोन केला तर ते त्याला काही वेळा आवडत नसे .त्यामुळे ती त्याला फोन करण्याचे टाळत असे.गॅलरीत येऊन एकवार लांबवर रस्त्याकडे दोन्ही बाजूला पाहून तिने शेवटी फोन करण्याचे ठरविले .फोन केल्यावर रिंग वाजत होती आणि तो उचलत नव्हता.तेवढ्यात तिच्या लक्षात आले की फोन घरातच वाजत आहे.श्याम फोन बरोबर नेण्याला विसरला होता. आता तिच्या हातात येरझारा घालणे व वाट पाहणे याशिवाय काहीही नव्हते . एवढ्या रात्री त्याच्या मित्रांना फोन करून विचारणेही तिला ठीक वाटत नव्हते .सकाळचे सहा वाजले तरी तो आला नव्हता .तिने त्याचा फोन घेऊन त्याच्या जवळच्या मित्रांकडे फोन करून बघितला.त्यातल्या कोणत्याच मित्राकडे तो गेला नव्हता .शेवटी तिने पोलिस स्टेशनला जायचे ठरविले .

जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन तिने मिसिंगची तक्रार नोंदविली .पोलिस स्टेशनमध्ये तक्रार लिहून घेतली खरी परंतु तिकडे कुणीच विशेष गंभीरपणे  पाहिले नाही .पडला असेल कुठे तरी लोळत असा कुणीतरी रिमार्क मारला.शुद्धीवर आल्यावर घरी येईल असे आणखी कुणीतरी म्हणाले .तिला जरा रागच आला .ती काही झोपडपट्टीमधल्या एखाद्या बाईसारखी दिसत नव्हती.त्याचा असा उल्लेख करणे तिला झोंबले .तिचा नवरा घन:श्याम एका सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला होता.तो सुशिक्षित होता. सुनीता बारावीपर्यंत शिकलेली होती.तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती . थोड्या रागातच ती पोलिस स्टेशनमधून बाहेर पडली.पोलिस स्टेशनमधील सर्व घोळ उरकून बाहेर पडेपर्यंत सकाळचे नऊ वाजले होते .

घरी परत येत असताना तिला वाटेत एक पाटी दिसली ."संदेश डिटेक्टिव्ह एजन्सी" अशी ती पाटी होती.पाटीवर पुढे कंसात (आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील)असे लिहलेले होते.थोडा वेळ घुटमळून तिने त्या एजन्सीमध्ये जाण्याचे ठरविले .घरी एकदा फोन करून तिने श्याम आला आहे की नाही याची मुलीजवळ चौकशी केली .तो अजूनही आलेला नाही असे मुलीने सांगितल्यावर संदेशकडे जाण्याचे तिने ठरविले .संदेशचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर होते तिथे जाऊन तिने दरवाज्यावरील बेल वाजविली .दरवाज्यावरील पाटीवर< वेळ दहा ते पाच आणि तेवढीच गरज असेल तर केव्हाही> असे लिहिलेले होते .संदेशचे ऑफिस व घर एकाच ठिकाणी होते.आत्ता सकाळचे साडेनऊ वाजलेले होते.

थोड्याच वेळात कुणीतरी दरवाजा उघडला आणि तिला बसण्यास सांगितले .दहा मिनिटांत संदेश आला .तोपर्यंत तिची सारखी चुळबुळ चालली होती .घन:श्याम असा रात्रीचा बेपत्ता अजूनपर्यंततरी कधी झाला नव्हता .वेळेच्या बाबतीत तो विशेष काटेकोर होता .त्याच्यावर काही तरी संकट कोसळले असेल असे तिला वाटत होते .गेले काही दिवस तो अस्वस्थ होता .मधून मधून त्याचा सारखा कुणाला तरी फोन चालत असे .टू रूम किचन फ्लॅटमधून ती आता एका मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आली होती.गेल्या काही महिन्यात त्यांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारली होती .श्यामला कुठूनतरी बाहेरून पैसे मिळतात असा तिला संशय होता .कदाचित तो ऑफिसमध्ये पैसे खात तर नसेल ना असाही तिला संशय होता .तिने त्याला दोन चारदा इतके पैसे तू कुठून मिळवतो असे विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याने त्यावर काही उत्तर न देता तू काळजी करू नको असे उत्तर दिले होते .तिला अशा अचानक आलेल्या श्रीमंतीची धास्ती वाटत होती .घन:श्याम कुठच्या तरी बेकायदेशीर कारभारात गुंतलेला असावा असे तिला वाटत होते .

संदेशने आल्याबरोबर तिला काय समस्या आहे सर्व काही स्पष्टपणे सांगा तुम्ही सांगितलेली सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल.असे सांगितले .त्याचबरोबर इंटरकॉमवरून दोन चहा पाठवण्यास सांगितले .

चहा प्यायल्यावर सुनीताला जरा तरतरी आली .अडखळत अडखळत तिने बोलण्याला सुरुवात केली .तिला पुनः पुनः प्रश्न विचारून संदेशने सर्व माहिती व्यवस्थित काढून घेतली.तिने सांगितलेल्या सर्व माहितीचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे होता .

काल रात्री तिचा नवरा घनश्याम त्याला फोन आल्यामुळे लगेच बाहेर गेला. त्याने अर्ध्या तासात परत येतो म्हणून सांगितले होते .तो सकाळपर्यंत परत आला नाही .तिने त्याच्या मित्रांना फोन करून चौकशी केली .त्यातल्या कुणाही मित्राकडे तो नव्हता .त्याचा मोबाइल तो घरी विसरून गेला होता .गेले काही महिने तो अस्वस्थ दिसत असे.विचारल्यावर तो विशेष काही नाही तू काळजी करू नकोस असे सांगत असे.तो कुठल्या तरी संकटात सापडलेला तर नाहीना असे तिला वाटत होते .तिने पोलिस स्टेशनला जाऊन मिसिंगची तक्रार नोंदविलेली आहे . तिचा नवरा सरकारी ऑफिसमध्ये साधा क्लार्क होता .तरीही गेल्या सहा महिन्यात त्यांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारली होती.

संदेशने तिच्याकडून घन:श्यामचा एक फोटो मागितला .तिने त्याचे दोन तीन फोटो लगेच  संदेशच्या मोबाइलवर पाठविले.संदेशने तिला घन:श्यामचा घरी राहिलेला मोबाइल कुणालाही देऊ नका म्हणून सांगितले.किंचित विचार करून तो म्हणाला मी तुमच्याबरोबर घरी येतो .त्याचा मोबाईल तुम्ही मला द्या .त्यातून मला बरीच माहिती मिळू शकेल .कदाचित आपल्याला त्यामुळे घन:श्यामचा तपासही लागेल .संदेशने लगेच मोटार काढली .तिला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले.ती स्कूटरवर आली होती .येथे स्कूटर ठेवून संदेशबरोबर जाण्यापेक्षा तिने संदेशला  आपल्या मागोमाग येण्याचे सुचविले .

घनश्यामचा अलिशान फ्लॅट बघितल्यावर आणि त्याचबरोबर त्याची आतील सजावट पाहिल्याबरोबर या घन:श्यामला कुठे तरी मोठे घबाड मिळाले असले पाहिजे याची संदेशला खात्री पटली .सहा महिन्यांपूर्वी तो एका सामान्य फ्लॅटमध्ये राहत होता .आणि आता एका अलिशान फ्लॅटमध्ये राहात होता .गैरमार्गाने पैसा मिळविल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही हे कुणीही म्हणाले असते .

सुनीताला आश्वस्त करून, मला काही कळले तर तुम्हाला कळवितो म्हणून सांगून, घन:श्याम घरी आल्यास मला लगेच कळवा असे सांगून, घन:श्यामचा मोबाइल घेऊन, तो तसाच युवराजांच्या ऑफिसमध्ये आला .युवराजांना त्याने थोडक्यात सर्व हकीकत सांगितली . इतक्या अल्प काळात घन:श्यामला भरपूर पैसा मिळाला तेव्हा तो कुणाला तरी ब्लॅकमेल करीत असावा,किंवा कोणत्यातरी रॅकेटमध्ये गुंतलेला असावा, किंवा त्याला एखादी मोठी लॉटरी लागलेली असावी, याशिवाय एवढा पैसा संभवत नाही.सुदैवाने घन:श्यामच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्ड सुविधा चालू होती .त्याचे संभाषण व्यवस्थित ऐकता आले.घन:श्यामने गेल्या महिन्यातच फोन बदललेला असल्यामुळे केवळ गेल्या महिन्यातीलच   संभाषण कळू शकले.

संदेशने फोन करून घन:श्यामच्या फोनवरील महत्वाचे कॉन्टॅक्ट नंबर्स आपल्या एक्स्चेंजमधील मित्राला कळविले.जेवढी माहिती मिळविता येईल तेवढी मिळविण्यास सांगितले .त्याचप्रमाणे सुनीताला फोन करून त्याचा जुना मोबाइल घरी आहे की कुणाला दिला असे विचारले.सुदैवाने तो फोन कुणाला दिलेला नव्हता किंवा एक्सचेंजही केला नव्हता .संदेशने सुनीताला तो फोन ऑफिसमध्ये पोचवण्यास सांगितले .

युवराजांजवळ चर्चा केल्यानंतर पुढील निष्कर्ष काढण्यात आला.

घन:श्यामला अशी काही तरी माहिती मिळाली असली पाहिजे की जी उघड केल्यास कुणाचे तरी प्रचंड नुकसान होईल .

ती माहिती उघड करीन अशी धमकी घन:श्याम त्या व्यक्तीला देत असला पाहिजे .

भीतीपोटी ती व्यक्ती घन:श्यामला वेळोवेळी मोठ्या रकमा देत असली पाहिजे .

अश्या  मिळणाऱ्या पैशामुळेच घन:श्याम अकस्मात गेल्या सहा महिन्यात श्रीमंत झाला असावा.

घन:श्यामला दूर केल्याशिवाय त्याचे हे सारखे जळूप्रमाणे  रक्त पिणे थांबणार नाही याची खात्री पटल्यामुळे त्या व्यक्तीने घन:श्यामला दूर केले असले पाहिजे अशा निष्कर्षावर दोघेही आले.

घन:श्याम एका विशिष्ट नंबरवर फोन करून मी माहिती उघड करीन. मला  एवढी रक्कम पाहिजे असे सांगत असे .मोबाइलवरील संभाषणावरून ही माहिती मिळाली .त्या बाईच्या घरी जावून तो ती रक्कम वसूल करीत असे .ती बाई कोण हे नंबरवरून शोधणे सहज शक्य होते .परंतु यामागे कोणते रहस्य दडले आहे ते उलगडणे कठीण होते .

रहस्य उलगडण्यापेक्षा  आत्ताच्या परिस्थितीत श्यामला शोधणे जास्त महत्त्वाचे होते.

युवराजांनी इ.शामरावांना फोन लावला .सकाळपासून कुठे एखादी मिसिंग बॉडी मिळाल्याची माहिती त्यांनी विचारली .त्यासाठी त्यांना अर्थातच थोडक्यात सर्व हकीकत सांगावी लागली .सकाळपासून पुरुषांच्या तीन व बाईच्या दोन बॉडीज मिळाल्याचे त्यानी सांगितले.

आम्ही ओळखण्यासाठी येतो असे सांगून युवराज लगेच शामरावांकडे निघाले .तिघेही शवशीतगृहामध्ये पोचले.तीनही पुरुषांची प्रेते पाहिल्यानंतर त्यामध्ये घन:श्याम आढळला नाही.इथे घन:श्याम आढळेल अशी त्यांची अपेक्षा होती.घन:श्याम अजून बहुधा जिवंत असावा किंवा त्याची अन्य काही वेगळी वाट लावली असावी असा अंदाज तिघांनीही केला.  

गेल्या सहा महिन्यांमध्ये  छाया नावाच्या एका बाईला श्याम वारंवार फोन करीत असे असे आढळून आले होते .छाया हिचा पत्ताही मिळाला होता.तिची एकदम जाऊन चौकशी करण्यापेक्षा अगोदर तिची सर्व माहिती बाहेरून काढावी असे ठरविण्यात आले .

(क्रमशः)

१६/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन