८ हत्त्या (युवराज कथा) २-३
(ही गोष्ट काल्पनिक आहे जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
पोलिसांनी बऱ्याच वर्तमानपत्रात जयरामचा फोटो व त्याच्याबद्दल कुणाला माहिती असल्यास पोलिसांना भेटावे माहिती देणार्यास त्यांनी दहा हजार रुपये बक्षीसही जाहीर केले होते .
वर्तमानपत्रात फोटो प्रसिद्ध झाला त्या दिवशी संध्याकाळी एकजण पोलीस चौकीमध्ये आला .त्याने ही व्यक्ती आमच्या शेजाऱ्याकडे नेहमी येत असते असे सांगितले .त्याची मुलगी सुनंदा व हा जयराम यांचे प्रेम प्रकरण आहे असेही त्याने सांगितले.
ही माहिती शामरावांनी लगेच युवराजांना कळविली .
युवराजांनी प्रथम पोलिसांनी केलेला पंचनामा व घेतलेले सर्व फोटो यांचे व्यवस्थित सूक्ष्म निरीक्षण केले .त्यांना त्यातून पुढील गोष्टी आढळून आल्या .
१) जयराम जिवंत असताना इमारतीवरून खाली पडलेला नसावा कारण जर तसे असते तर त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला असता.फोटोंमध्ये कुठेही रक्ताचे डाग दिसत नाहीत .
२) जर तो इमारतीवरून खाली पडला असता तर जमिनीमध्ये जास्त खोल खड्डा पडला असता . ओल्या जमिनीवर त्याचा साधा ठसा उमटलेला होता.त्यावरून त्याला वरून ढकलण्यात आलेले नसावे तर बाहेरून कुठून तरी त्याला इथे आणून ठेवले गेले असावे.
३)प्रत्यक्षात जर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मजल्यावर दारुपार्टी झाली असती तर तिथून जयरामला खाली ढकलून देणे सोपे होते. उचलून खाली आणून ठेवणे कठीण होते.तेव्हा दारू पार्टी इमारतीच्या मजल्यावर झालेली नसावी.
४)जर इमारतीवरून तो पडला असता किंवा त्याला ढकलण्यात आले असते तर चपला अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्या असत्या .निरनिराळ्या बाजूंनी घेतलेल्या दोन तीन फोटोमध्ये मृताच्या पायाजवळ चपला व्यवस्थित ठेवलेल्या दिसून येत होत्या त्याअर्थी त्याला बाहेरूनच कुणीतरी आणून इथे ठेवले असावे.
५) प्रेत जिथे पडले होते त्या जागेपासून पत्र्याच्या दरवाज्यापर्यंत जी पावले उमटलेली होती त्यावरून तीन चार जणांनी प्रेत धरून ते येथे आणून टाकले असावे असे वाटत होते .जयरामला इथे आणून ठेविले त्या वेळी तो मेला असेल किंवा नसेल ते नक्की सांगता येणार नव्हते कदाचित तो बेशुद्धही असू शकेल . पोलिसांची व इतरांची पावले अस्ताव्यस्त सर्वत्र उमटलेली होती परंतु चार जणांची पावले प्रेताच्या जागेपर्यंत व नंतर परत अशी उमटलेली आढळून आली .
६)शवविच्छेदनाच्या अहवालातील मृताच्या पोटातील अवशेषांचा विचार करता असे आढळून येत होते की जयराम मृत्यूपूर्वी पोटभर जेवलेला असावा. त्याला जेवणातून किंवा दारुतून किंवा आणखी अन्य मार्गाने विषप्रयोग झालेला असावा .
७) या सर्व पुराव्यावरून असे अनुमान काढता येत होते की नव्याण्णव टक्के जयरामचा मृत्यू बाहेर कुठे तरी झाला .तो दारूही बाहेर कुठेतरी प्याला.त्याला विषप्रयोगही बाहेर कुठे तरी झाला . मृत्यूनंतर त्याला या बांधकाम परिसरात आणून ठेवले असावे .
संदेशला निरनिराळे फोटो दाखवून युवराजानी त्यांचा हा अंदाज संदेशला सांगितला.नंतर युवराजांनी संदेशने कोणत्या प्रकारे चौकशी करावी हेही सांगितले
१)रखवालदाराची (वॉचमनची )चौकशी अवश्य कर . परंतु जास्त लक्ष जयरामचे मित्र मैत्रिणी व शेजारी यांच्यावर केंद्रित कर.नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा नावाच्या एका मुलीशी त्याचे प्रेम प्रकरण होते .तिच्या शेजाऱ्यांकडेही चौकशी करावी त्यांच्यापासूनच तुला बरीच उपयुक्त माहिती मिळू शकेल . रखवालदार दोषी असेल असे वाटत नाही .
२)जर जयराम त्या दिवशी रिक्षातून सुनंदाकडे गेला असेल तर त्याच्या घराजवळच्या रिक्षा स्टॅंडवर चौकशी कर.तुला कदाचित रिक्षावाला मिळेल आणि आपल्याला जयराम सुनंदाच्या माहेरी गेल्याचा पुरावाही मिळेल.
३)सुनंदाच्या भावाच्या मित्रांची चौकशी कर .त्यातील एखाद्याचा किंवा अनेकांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे का तेही पाहा .
४) जयरामच्या न सापडलेल्या मोबाइलचा नंबर तुला माहिती आहेच तुझ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडील अंतस्थ व्यक्तींकडून जर गेल्या आठ पंधरा दिवसातील संभाषण मिळू शकले तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल .
५)जयरामचा मोबाइल मिळाला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील .तो मिळविण्याचा प्रयत्न कर .मोबाईलचा नंबर तुला माहीत आहेच जरी तो स्वीचऑफ असला तरीही तो कुठे आहे ते शोधून काढणे शक्य होते का ते पाहा .
६)आणखी एक शक्यता आहे. आपण त्या दृष्टिकोनातूनही तपास केला पाहिजे .जयरामचे कुणाशी भांडण किंवा वैर होते का? आणि असल्यास त्याच्याकडून जयरामची हत्या झाली का हेही पाहणे आवश्यक आहे.
नाहीतर आपण त्याची मैत्रीण सुनंदा एवढ्याच दृष्टिकोनातून तपास करू आणि सत्यापासून दूर जाऊ.
वरील सूचना देऊन युवराजांनी संदेशला निरोप दिला .
संदेशने प्रथम आपले लक्ष रखवालदारावर केंद्रित केले.रखवालदारासंबंधी माहिती काढता असे कळले की हा रखवालदार अत्यंत प्रामाणिक आहे .तो रात्री खरीच गस्त घालीत असतो.तो दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही .तो असताना इमारतीच्या कोणत्याही भागात दारू पार्टी होणे शक्य नाही .तो असताना येथे जयरामला कसे आणून ठेवता आले तेच आश्चर्य आहे.इमारतीच्या मागच्या बाजूला फेरी मारण्यासाठी रखवालदार गेलेला असताना घाईघाईने प्रेत आणून ठेवले गेले असावे .
तरीही संदेशने रखवालदाराजवळ चौकशी केली त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.त्याचप्रमाणे इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यांवर फेरफटका मारून तिथे काही संशयास्पद आढळते का तेही पाहिले.तिथे त्याला काहीही संशयास्पद आढळले नाही .
रखवालदार कोणत्याही प्रकारे दोषी असू शकत नाही असे आढळल्यावर त्याने आपला मोर्चा जयरामच्या मित्र मैत्रिणी शेजारी यांच्याकडे वळविला .त्याचप्रमाणे मोबाइलच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जयरामच्या संवादाचे रेकॉर्डिंग मिळते का तेही पाहण्याचे ठरविले .आपले दोन तीन सहाय्यक त्याने या कामावर पाठविले .
संदेशचा मोबाइल तज्ञ मित्र होता.त्याच्या मार्फत मोबाइल कुठे आहे ते शोधता येते का तेही पाहण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला.
जयरामचे कुणाशी वैर किंवा भांडण होते का या दृष्टीकोणातूनही त्याने तपास केला परंतु तसे भांडण किंवा वैर त्याला आढळून आले नाही .
सहाय्यकांकडून मिळालेली माहिती, त्याचप्रमाणे त्याने स्वतः गोळा केलेली माहिती, एकत्रित करून त्याने त्याचा युवराजांना पुढील प्रमाणे रिपोर्ट दिला .
(क्रमशः)
२८/८/२०१९©प्रभाकर पटवर्धन