Get it on Google Play
Download on the App Store

४ लालसा (युवराज कथा) २-२

(ही कथा काल्पनिक आहे कुठेही  साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

संदेश व त्याची टीम अमरावती येथे लगेच कारने निघाले .ज्या हॉटेलात निरंजन थांबला होता किंवा थांबणार होता त्याच हॉटेलात त्यांनी दोन खोल्या बुक केल्या होत्या .त्या हॉटेलात गेल्यावर त्यानी आपल्या चौकशीला हॉटेलपासूनच सुरुवात केली.स्वागतकक्षामधील दोन तीन जणांजवळ निरनिराळ्या वेळी चौकशी केल्यावर त्यांना पुढील माहिती मिळाली .

त्या दिवशी निरंजन हॉटेलात थांबणार होते .त्यांची बॅग घेऊन रूमबॉय त्यांच्या खोलीकडे निघालाही होता.परंतु तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ अमरावतीमधील प्रसिद्ध पुढारी वसंतराव आले व त्यांनी  त्याला दादा म्हणून हाक मारली.दोघांचेही म्हणजेच वसंतराव व निरंजन यांचे थोडा वेळ बोलणे झाले."स्वतःचे घर येथे असताना हॉटेलात उतरणे योग्य नाही आमच्या घरीच आपण आले पाहिजे "असा वसंतरावांच्या बोलण्याचा आशय होता .वसंतराव आग्रह करून त्यांना त्यांच्या मोटारीतून आपल्या घरी घेऊन गेले .निरंजनसाहेबांची मोटार वसंतरावांच्या ड्रायव्हरने त्यांच्या पाठोपाठ नेली.

आता निरंजनचा तपास वसंतरावांकडे लागला असता.त्यांच्या घरी भेट देण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. 

त्यांच्या घरी  चौकशी करता निरंजन वसंतरावांच्या घरी फक्त दोन दिवस होते .त्यांचे आदरातिथ्य रॉयल गेस्ट म्हणून व्यवस्थित होत होते .नंतर काय बिनसले ते माहीत नाही परंतु त्यांना फार्महाऊसवर नेण्यात आले. निरंजन आता वसंतरावांच्या  फार्म हाऊसवर आहे असे कळले .जास्त चौकशी करता फार्म हाऊसवर त्यांना जवळजवळ बंदीवासात ठेवलेले आहे असेही  कळले .फक्त नेहमीच्याच कर्मचार्‍यांना  आत येण्या जाण्याची परवानगी आहे .कुणीही नवीन व्यक्ती आत जाण्याचा प्रयत्न करू लागल्यास त्याला बाहेरच थांबविण्यात येते.अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत निरंजन वसंतरावांच्या कैदेत आहेत असे कळले .संदेशला आता निरंजनची भेट कशी होणार असा प्रश्न पडला .वसंतराव व मोहनराव यांच्याबद्दलची सर्व माहिती गोळा करण्याचे काम  संदेशची माणसे करीत होती.वसंतरावांच्या घरच्या सुरक्षारक्षकाला गाठून त्याला भरपूर पैसे देऊन त्यांनी  निरंजन, वसंतरावांच्या बंगल्यात गेले व तेथून पुन्हा बाहेर पडले याचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले होते .

फार्म हाऊसवरील एका कर्मचाऱ्याला भरपूर पैसे देऊन त्याच्या ऐवजी कामगार बनून  संदेश फार्महाऊसमध्ये घुसला .त्याच्या शर्टला लावलेला छुपा स्पाय कॅमेरा फार्महाऊसचे  चित्रण करीत होता .फार्महाऊसमध्ये  सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले होते .त्यात होत असणाऱ्या  चित्रणातून कोणताही संशय येऊ न देता संदेशला सर्व कामगिरी पार पाडायची होती .

त्याने अत्यंत चतुराईने ती कामगिरी पार पाडली .त्याचे निरंजनशी बोलणेही झाले .निर्मलाने दिलेले पत्रही त्याने निरंजनला दिले .संदेश कशासाठी तेथे आला आहे ते त्यामुळे निरंजनच्या लक्षात आले .संदेश आपला माणूस आहे हेही निरंजनला कळले .निरंजनची विश्वासार्हताही पटली .दोन दिवसांत आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडून संदेशने युवराजांना पुढील प्रमाणे मेल पाठविली .

वसंतरावांनी अत्यंत गोड गोड बोलून निरंजनवर जणूकाही मोहिनी घातली होती.त्याचा हॉटेलातच थांबण्याचा निश्चय होता .तो मोडून काढून त्याला ते आपल्या घरी घेऊन गेले .निर्मला काळजी करील म्हणून निरंजन आपण हॉटेलातून बोलत आहोत असे सांगत होता .त्याला समजावण्याचा पटविण्याचा वसंतराव व मोहनराव या दोघांनीही प्रयत्न केला.पाच पंचवीस लाखांमध्ये निरंजनला पटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता .निरंजन दोन कोटींच्या खाली येण्याला तयार नव्हता .निरंजन ऐकत नाही आपल्याच मुद्द्याला चिकटून बसतो असे पाहिल्यावर त्यांनी आपले खरे दात दाखविण्याला सुरुवात केली . निरंजनचा मोबाइल काढून घेण्यात आला .बंदोबस्तात त्याला फार्महाऊसवर नेण्यात आले.कागदावर सही केल्याशिवाय तुझी सुटका नाही म्हणून त्याला सांगण्यात आले . सही केली नाही तर तुझ्या जिवाला धोका संभवतो अशी त्याला धमकीही देण्यात आली .त्या जमिनीशी आणि त्याचप्रमाणे इतर मालमत्तेशी त्याचा कोणताही संबंध नाही अशा प्रकारच्या कायदेशीर कागदांवर सही केल्याशिवाय त्याला सोडण्यात येणार नाही म्हणून दम देण्यात आला .

निरंजन जवळजवळ कैदेत आहे.वसंतराव मोहनराव आलटूनपालटून रोज येऊन त्याला समजाविण्याचा प्रयत्न करीत असतात.त्याला मानसिक दृष्टया दुर्बल करून त्याची सही घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .बाहेरच्या जगाशी संबंध पूर्णपणे तुटल्यामुळे निरंजन मानसिकदृष्ट्या खचलेला आहे.मी  (संदेश) येथे आल्यामुळे त्याला जरा उभारी आली आहे .त्याला सोडवून आणणे मला शक्य दिसत नाही . बहुराष्ट्रीय कंपनीशी दोघांचीही बोलणी चालू आहेत अजून कराराला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही .

या सविस्तर मेल बरोबरच संदेशने पुढील सीसीटीव्ही फुटेज युवराजांना पाठविले .

हॉटेलमधील वसंतराव व निरंजन यांचे स्वागतकक्षातील  संभाषण व वसंतराव आग्रह करून निरंजनला घेऊन जातात तो भाग

वसंतरावांच्या घरी निरंजन जात असतांना भाग .

वसंतरावांच्या घरातून पुन्हा बाहेर पडत असतानाचा भाग 

फार्म हाऊसमधील निरनिराळ्या प्रसंगातील फुटेज

हे सीसीटीव्हीत कैद झालेले सर्व प्रसंग वसंतरावांना व मोहनरावांनासुद्धा अडकविण्यास पुरेसे आहेत.

अर्थातच हे महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी संदेशला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला .

ही सर्व माहिती व सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे युवराजांना उभारी आली .त्यांनी मी वसंतरावांना व मोहनरावाना कायदेशीर  नोटीस पाठवीत आहे.ती नोटीस वसंतरावांवर बजावून, तू निरंजनला बरोबर घेवूनच ये म्हणून  संदेशला सांगितले .नोटीस वाचताच वकिलांचा सल्ला घेऊन  किंवा त्याशिवाय ते निरंजनची लगेच सुटका करतील.

युवराजांनी पुढील स्वरूपाची नोटीस वसंतराव व मोहनराव यांना  पाठविली.

~   तुम्ही माझे अशील निरंजन यांना ते हॉटेलात उतरत असताना आपल्याबरोबर जबरदस्तीने नेले.त्यांना आपण आपल्या फार्महाऊसवर कैद करून ठेवले आहे.त्यांचा मोबाईलही काढून घेण्यात आला आहे .त्यांचा बाह्य जगाशी संपर्क तुम्ही तोडला आहे. माझ्या अशिलाच्या हिताच्या विरोधी अशा काही कागदपत्रांवर तुम्हाला त्यांची सही जबरदस्तीने घ्यायची आहे .

वरील गोष्टींचा पुरावा म्हणून मी उपयुक्त सीसीटीव्ही फुटेज यासोबत जोडले आहे.जर मी कोर्ट व पोलिस यामध्ये गेलो तर आपल्याला ते अतिशय जड जाईल.अपहरण, व्यक्तीच्या मनाविरुद्ध बंदिवास, सक्तीने त्यांच्याकडून कागदपत्रांवर सही घेण्याचा प्रयत्न , त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे, त्याच्या खुनाचा प्रयत्न, असे अनेक फौजदारी गुन्हे तुमच्यावर लागू शकतात . तेव्हा ही नोटीस मिळताच आपण ताबडतोब निरंजनची  मुक्तता करावी .ही नोटीस घेऊन येणाऱ्या माणसाच्या,संदेशच्या हवाली त्याला करावे अशी आपल्याला विनंती आहे. आपल्याला जमिनी संदर्भात व इतर मालमत्तेच्या संदर्भात जे काही बोलावयाचे आहे ते आपल्या  वकिलांच्या मार्फत माझ्याशी बोलावे .मी निरंजनचा कायदेशीर वकील आहे .बहुराष्ट्रीय कंपनीला विकत असलेल्या जमिनीसंदर्भातच काय परंतु आपल्या इतर सर्व इस्टेटीमध्येही निरंजनचा वाटा आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे .~असा  सज्जड दमही युवराजांनी दिला होता . 

संदेश ही नोटीस घेऊन वसंतरावांना भेटण्यास गेला.सोबत त्याने उल्लेख केलेले सीसीटीव्ही फुटेजही त्यांना दिले .ती कायदेशीर नोटीस व सीसीटीव्ही फुटेज पाहून वस़तराव चमकलेच .हे फूटेज युवराजाना मुंबईत बसून कसे मिळाले ते त्यांना कळेना.जर युवराज पोलिसांमध्ये गेले तर ते आपल्याला फारच जड पडेल. विरोधी पक्ष याचा फायदा उठवील.येत्या निवडणुकीत आपल्याला ते फार महाग पडेल.याशिवाय कायदेशीर गोष्टींना आपल्याला तोंड  द्यावे लागेल .अपहरण ,एखाद्याच्या मर्जीविरुद्ध त्याला बंदिवासात ठेवणे, त्यांच्या मर्जीविरुद्ध कागदपत्रांवर सही घेण्याचा प्रयत्न करणे ,त्याला ठार मारण्याची धमकी देणे , हे सर्व गंभीर फौजदारी गुन्हे आहेत .कदाचित आपल्याला अटक होऊन जामीनाशिवाय तुरुंगात राहावे लागेल. वगेरे सर्व गंभीर गोष्टींची त्यांना कल्पना आली .

त्यांनी ताबडतोब निरंजनची मुक्तता केली .त्याचा मोबाइल व इतर चीजवस्तू त्याला परत करण्यात आली .वसंतराव व मोहनरावांनी निरंजनची पुन्हा पुन्हा माफी मागितली.आमचा तसा काही उद्देश नव्हता अशी वरती सारवासारवही त्यांनी केली . निरंजनला घेऊन संदेशची टीम विजयी मुद्रेने मुंबईत परतली.

वसंतराव व मोहनराव यांनी त्यांच्या बाजूने बोलणी करण्यासाठी एका नामांकित वकिलांची नियुक्ती केली.त्या वकिलांनी निरंजनचा फ्लॅट व फाइव्ह स्टार हॉटेल यांमध्येही अमरावतीकरांचा वाटा आहे असा दावा करण्याचा प्रयत्न केला.परंतु भागवतरावांनी त्यावेळीच फ्लॅट व दोन कोटी रुपये निरंजनच्या आईच्या नावाने कायदेशीररित्या ठेविले होते .त्यामुळे त्यावरती त्या दोघांचा दावा सांगण्याचा प्रयत्न फुकट गेला.

मात्र वसंतराव व मोहनराव हे दोघेही अौरस पुत्र असल्यामुळे त्यांना संपत्तीबाबत काही अडचण येऊ शकेल याची भगवंतरावाना कल्पना नव्हती .त्यांची सर्व संपत्ती त्या दोघांनाच मिळेल अशी त्यांना खात्री होती .निरंजनच्या आईशी कायदेशीर लग्न झालेले नसल्यामुळे त्यांना मात्र अडचण निर्माण  होईल यासाठी त्यांनी वेळीच कायदेशीर व्यवस्था केली होती .प्रत्यक्षात निरंजन त्यांच्या संपूर्ण संपत्तीत वाटा मागू शकत होता.फक्त डीएनए टेस्ट देऊन त्याने तो भगवंतराव यांचाच मुलगा आहे हे सिद्ध करण्याची गरज होती.अर्थात दिवाणी कोर्टात केस खितपत पडली असती .काय निकाल लागला असता ते आताच सांगता येत नव्हते .मात्र डोक्याला ताप ,निष्कारण पैसा खर्च होणे व राजकीयदृष्ट्या तोटा झाला असता . 

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तडजोड करणे हिताचे ठरेल हे त्यांच्या वकिलाने त्यांना समजावून सांगितले . शेवटी निरंजनचा ती जमीन(बहुराष्ट्रीय कंपनीला जी विकणार होते ती ) सोडून इतर मालमत्तेमध्ये काहीही वाटा नाही असा कायदेशीर कागद करण्यात आला.

ती जमीन बहुराष्ट्रीय कंपनीला किंवा इतर कुणालाही  विकल्यानंतर त्यातील एक तृतीयांश निरंजनला मिळावा असे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले .

लवकरच ती जमीन ठरल्याप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपनीने सहा कोटी रुपयांना विकत घेतली .

त्यातील दोन कोटी रुपये निरंजनला त्याच्या म्हणण्याप्रमाणे मिळाले .प्रत्यक्षात निरंजन एक कोटीपर्यंत तडजोड करण्यास मानसिकदृष्ट्या तयार होता .कोर्ट कचेरी वकिलांवर पैसा खर्च करणे कोर्टाच्या  तारखा पडल्यावर वारंवार अमरावतीच्या खेपा त्यामुळे आनुषंगिक होणारा खर्च व त्रास हे निरंजनला नको होते .त्यामुळे प्रत्यक्षात तो एक कोटी ते दीड कोटीपर्यंत तडजोड करण्यास तयार होता .

अमरावतीकरांना जमिनीचा सर्वच पैसा स्वतःला ठेवण्याचा मोह निर्माण झाल्यामुळे,व निरंजनचा त्या पैशातील आपला वाटा आपल्याला मिळालाच पाहिजे असा आग्रह असल्यामुळे,या सर्व ओढाताणीला सुरुवात झाली .

कोणीही एकाने पैशाची लालसा ठेवली नसती तर काही प्रसंगच उद्भवला नसता.

अमरावतीकरांचा वेळप्रसंगी निरंजनला ठार मारण्याचा मनसुबा होता.

सुदैवाने ते त्या टोकापर्यंत गेले नाहीत. 

किंवा असेही म्हणता येईल की निर्मला वेळीच युवराजकडे आली व युवराज तेथे वेळीच पोहोचले.

अन्यथा निरंजनचा प्राण गेला असता व  अमरावतीकर तुरुंगात सडत पडले असते.तिन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली असती .

*निर्मला वेळीच युवराजांकडे गेल्यामुळे व सर्व केस युवराजांच्या समर्थ हातात गेल्यामुळे  ती व्यवस्थित सुटली .*

*पोलिसांच्या कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय ही केस सुटली *

*निरंजन मालामाल झाला*

*युवराजांना भक्कम रकमेचा चेक मिळाला हे सांगण्याची गरज नाहीच .*

(समाप्त)

१८/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन