Get it on Google Play
Download on the App Store

११ पाषाणहृदयी (युवराज कथा) १-२

(ही कथा काल्पनिक आहे वास्तवाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

स्वप्न नावाची ही एक नवीन कॉलनी अलीकडेच अस्तित्वात आली होती.येथे पंचवीस तीस टुमदार बंगले होते .सुधाकर पंतांच्या(जाधव ) समोरच लव व कुश (राणे)यांचा रामायण बंगला होता.  सकाळ झाली होती. आठ वाजले होते .सुधाकरपंत झाडांना पाणी घालीत असताना मधून मधून समोरच्या बंगल्याकडे पाहात होते .समोरच्या बंगल्यात काही हालचाल दिसत नव्हती .त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत होती .दररोज या वेळेला लवकुश यांची मुले शाळेत जाण्यासाठी तयार होऊन बाहेर येत असत. लव व कुश हे दोघे सख्खे भाऊ एकत्रच राहात असत .भावा भावांमधील  प्रेम वाखाणण्यासारखे होते.जावा जावामधील एकीही वाखाणण्यासारखी होती. साडेआठ वाजता मुलांची शाळेची बस येत असे.साडेआठ वाजले बस आली दोन तीनदा हॉर्न वाजवून बस निघून गेली.आता मात्र सुधाकरपंतांना काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले .लव व कुश कुठे बाहेर जाणार आहोत असे बोलले नव्हते .आज ऑफिसलाही सुटी नव्हती . त्यांच्या बंगल्याची एक किल्ली सुधाकरपंतांकडे ठेवलेली असे.जाधव व राणे कुटुंबीयांचे एकमेकांकडे जाणे येणे होते .लव व कुश काकूना व सुधाकरपंतांना आई वडिलांसारख्या मान देत.त्यामुळेच त्यांच्याकडे विश्वासाने एक जादा किल्ली सोपविलेली होती. सहसा त्या किल्लीचा वापर करण्याची वेळ येत नसे . इमर्जन्सीच्या वेळी त्याचा उपयोग होई .

सुधाकरपंत रामायण बंगल्याचे फाटक उघडून पोर्चमधील पायऱ्या चढून  दरवाज्याजवळ गेले.आतून काही हालचाल येते का त्याचा त्यांनी कानोसा घेतला.काहीच हालचाल एेकू आली नाही . दरवाज्यावरील बेल त्यांनी दोन तीनदा वाजविली तरीही कुणी दरवाजा उघडायला आले नाही .दरवाजाला सेल्फ लॉक होते त्यामुळे आत कुणी आहे की नाही ते कळत नव्हते .त्यांनी एक दोनदा दरवाजा ठोठावला.आतून काहीही प्रतिसाद आला नाही .दोघांच्याही दोन्ही मोटारी पोर्चमध्ये  होत्या.त्यावरून मंडळी बहुधा बाहेर  गेली नव्हती असा अंदाज करता येत होता .

त्यांनी स्वतःजवळील किल्लीचा वापर करण्याचे ठरविले .त्याअगोदर त्यांनी लव कुश यांचे नंबरवर फोन करून प्रतिसाद येतो का ते पाहिले. काहीही प्रतिसाद आला नाही.मोबाईल उचलत नाही म्हणून कट होईपर्यंत त्यांनी प्रयत्न केला.शेवटी किल्ली घेऊन ते रामायण बंगल्याकडे निघाले .तेवढ्यात त्यांना शेजारच्या बंगल्यातील मधुकरराव दिसले .त्यांना त्यांनी बंगल्यातून कुणीही प्रतिसाद देत नाही .दोन्ही मोटारी बाहेरच उभ्या आहेत वगैरे  सांगितले.दोघांनीही किल्ली लावून दरवाजा उघडण्या अगोदर बंगल्याला एक चक्कर मारली.कुठेही काही हालचाल दिसली नाही .

दरवाजा उघडून दोघेही आत गेले.सर्वत्र सामसूम होती .बेडरूम्स सताड उघड्या होत्या .लव व कुश यांच्या बायका आणि प्रत्येकाची दोन दोन मुले अशी आठ प्रेते तीन बेडरूममध्ये पडलेली होती .कुणाच्याही अंगावर जखम दिसत नव्हती .सर्व शांत झोपले आहेत असे वाटत होते .नाकाजवळ बोट धरून कुणाचा श्वास चालू आहे का तेही पाहाण्यात आले .जिवंतपणाची कोणतीही खूण दिसत नव्हती .

सुधाकरपंतानी पोलिसांना फोन लावला.थोड्याच वेळात पोलिसांची गाडी आली .पाठोपाठ रुग्णवाहिकाही आली.सुधाकरपंतानी पोलिसांना थोडक्यात त्यांनी काय केले व काय पाहिले ते सांगितले.पोलिसांनी पोलीसस्टेशनला फोन केल्यावर थोड्याच वेळात शामरावही तिथे आले.एकाच वेळी आठ प्रेते असे म्हटल्यावर सर्वांचीच धांदल उडाली .

पंचनामा करून प्रेते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली. घरातील अनेक संभाव्य जागांचे ठसे घेण्यात आले.स्वयंपाकघरात उरलेले अन्न दूध इत्यादींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले .टेबलावर आठ ग्लास होते.त्यातून बहुधा सर्वानी दूध घेतले असावे असे ग्लासात उरलेल्या द्रव पदार्थावरून वाटत होते . वॉशबेसिन वर आणखी एक  ग्लास होता .त्यावरील  ठसे घेण्यात आले.सर्व ग्लास त्यातील अवशेषांसह प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

शवविच्छेदनाचे अहवाल त्याचबरोबर प्रयोगशाळेतील अहवाल यातून मृत्यूचे कारण कळणार होते.

आत्महत्या की खून ही मुख्य समस्या होती .

आत्महत्या असली तर आत्महत्येचे कारण कळणे आवश्यक होते.त्याशिवाय केस व्यवस्थित सुटली असे म्हणता येणार नव्हते.

खून असल्यास खून कुणी केला खुनाचे कारण काय या सर्व गोष्टीचा तपास करावा लागणार होता .    

ही बातमी कळल्याबरोबर निरनिराळ्या वर्तमानपत्रांचे वार्ताहर गोळा झाले .त्यांना बाहेरच थोपविण्यात आले .त्यांना जुजबी माहिती देऊन निरोप देण्यात आला .

शामराव सर्व खोल्या फिरून  निरीक्षण करीत होते.त्यांना काही प्रश्नांची उकल होत होती तर काही प्रश्नांची उकल होत नव्हती .पर्याय अनेक होते.अग्रक्रम लावणे आवश्यक होते. शामरावानी युवराजांना बोलावण्याचे ठरवले.युवराजांची अंत:प्रेरणा,संदेशचे गुन्हेगारविश्वात असलेले मजबूत जाळे,व त्याचे कुशल गुप्तहेर यांचा उपयोग गुन्हेगारापर्यंत  पोचण्यासाठी नेहमीच होत असे.शामराव व युवराज यांच्या चर्चेतूनही काही गोष्टी स्पष्ट होत असत .

युवराज व शामराव दोघांनीही संपूर्ण बंगल्याची पाहणी केली .त्यातून पुढील अंदाज करण्यात आले .

१ मृत्यू विषबाधेने झाले असावेत परंतु विषाचा कोणताही बाह्य परिणाम दिसत नाही

२ शरीर काळे निळे पडणे, ओठ काळे पडणे,चेहरा वक्र होणे,तोंडातून रक्त येणे, उलटय़ा होणे, बुबुळे बाहेर येणे, यातील काहीच परिणाम दिसला नाही . साधारणपणे विषाचे अशा प्रकारचे कुठेचेना कुठचे परिणाम होतात . हे एक नवीन विष असण्याचा संभव आहे .

३   शवविच्छेदन अहवालानंतरच  मृत्यूचे कारण निश्चितपणे काय ते कळेल.

४  घरात कुठेही जबरदस्तीच्या खुणा दिसत नाहीत.विष संम्मतीने किंवा नकळत घेतले असावे.

५ आत्महत्येची केस असण्याचा संभव आहे . 

६ जर एखाद्या बाहेरील व्यक्तीने याना विष प्रयोग केलाअसेल तर ती व्यक्ती ओळखीची  असली पाहिजे .

७ टेबलावर आठ ग्लास होते.ते प्रयोगशाळांमध्ये परीक्षणासाठी पाठवले आहेत. त्यात बहुधा विष सापडण्याचा संभव आहे .

८ आणखी एक ग्लास वॉश बेसिनवर सापडला तोही स्वतंत्र तपासणीसाठी पाठविला आहे .तो तिथे कसा आला ते कळले तर खून असल्यास खुनी कोण त्याचा उलगडा होण्याचा संभव आहे .

९ बंगल्याबाहेर फिरतांना एक काचेची बाटली सैपाकघरातील खिडकी बाहेर पडलेली आढळून आली.त्यावर काहीही लेबल नव्हते . तीही तपासासाठी पाठविली आहे कदाचित त्यातून विष आणले गेले असेल .

संदेशही दोघांबरोबर सर्वत्र हिंडत होता .निरनिराळ्या ठिकाणचे ठसे शामरावांच्या टीमने गोळा केले होते .

युवराजानी संदेशला पुढील माहिती गोळा करण्यास सांगितले .

१ लव व कुश यांचे किंवा त्यांच्या घराण्याचे कुणाशी भांडण होते का ?

२ यांच्या मृत्यूमुळे कुणाचा फायदा होण्याचा संभव होता का?

३ यांच्या घराण्याचा गेल्या एक दोन पिढ्यांचा इतिहास कळला तर केस उलगडण्यासाठी मदत होईल तरी ती माहिती काढणे.

४ पोलिसांनी घरातील सगळ्यांचे मोबाईल जप्त केले होते.त्यातील गेल्या काही दिवसातील कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध करून घेणे.त्या संभाषणातून आत्महत्या की खून हे कळण्याचा संभव आहे .आत्महत्या असतील तर त्यातून आत्महत्येचे कारण कदाचित कळेल.   खून असतील तर खुनाचे कारण व त्यातून खुली इसमापर्यंत पोचणे शक्य होईल .

युवराजांनी नंतर शेजारच्या सुधाकरपंताना बोलवून घेतले . त्यांच्याकडून राणे यांच्या घराण्याबद्दल बरीच माहिती मिळाली .

रामराव व लक्ष्मणराव हे दोघे सख्खे बंधू .रामराव आता या जगात नाहीत .लक्ष्मणराव आहेत.रामरावांना दोन मुलगे लव व कुश .लव इन्शुरन्स कंपनीमध्ये तर कुश गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहेत.(आता होते असे म्हणूया.)लव व कुश यांच्या पत्नीही नोकरी करतात.लव व कुश यांची त्यांच्या गावाला औरंगाबादजवळ बरीच मोठी इस्टेट आहे.नवीन समृद्धी महामार्ग त्यांच्या इस्टेटी मधून जात आहे .त्यांना सरकारकडून त्यांच्या जमिनीची किंमत म्हणून चार कोटी रुपये मिळाले आहेत .महाराष्ट्राची समृद्धी होईल तेव्हा होवो परंतु लव व कुश यांची समृद्धी झाली आहे.त्या दोघांचे दोन फ्लॅट गावात शेजारी शेजारी आहेत .मधला दरवाजा उघडला की एकच फ्लॅट होतो. तिथेही दोघे भाऊ गुण्या गोविंदाने रहात होते. सरकारला विकलेल्या जमिनीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी हा नवीन प्रशस्त बंगला बांधला.अजून त्यांनी गावातील फ्लॅट विकलेले नाहीत .चांगली नोकरी भरपूर पैसा गुण्यागोविंदाने राहणारे भाऊ व जावा, अशी सर्व समृद्धी असताना त्यांना आत्महत्या करण्याचे काहीच कारण नाही .त्यांचा खूनच झाला असला पाहिजे .खुनाचे वरकरणी कारण तरी पैसा हेच दिसत आहे .

लव व कुश यांचे काका लक्ष्मणराव गावातच राहतात . लक्ष्मणरावांना एकच मुलगा त्याचे नाव राहुल .राहुल एका औषधी कंपनीत प्रयोगशाळेत काम करतो .

सुधाकरपंतांकडून राणे कुटुंबियांची बरीच माहिती मिळाली होती .पैसा हे कदाचित खुनाचे कारण असण्याचा संभव होता .

रामराव व लक्ष्मणराव यांची जास्त माहिती ,त्यांचे परस्पर संबंध, त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील जमिनीचे वाटप झाले आहे का आणि कोणती जमीन कुणाच्या नावावर आहे ,त्याबद्दल जास्त माहिती गोळा करणे आवश्यक होते .

संदेशवर युवराजांनी इतर अनेक गोष्टींबरोबरच तीही जबाबदारी सोपविली. 

दोन दिवसांमध्ये शवविच्छेदनाचा अहवाल आला .मृत्यूचे कारण विष हेच होते .विषाचे नाव प्रयोगशाळेला देता आले नाही.हे एखादे नवीन विष असावे असा प्रयोगशाळेचा अंदाज होता.हे विष रंगहीन रुचीहीन वासहीन असावे .त्यामुळे घेणार्‍याला त्याचा काहीही सुगावा लागत नाही.हे विष घेतलेली व्यक्ती गाढ झोपते व त्यातच काहीही वेदना न होता त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. असाही अंदाज प्रयोगशाळेने केला होता .

जो ग्लास वॉशबेसिनवर ठेवण्यात आला होता त्यावरील ठसे कुणातरी अज्ञात इसमाचे होते.

कदाचित तो खुनी असण्याचा संभव होता .

जी बाटली बाहेर बागेत सापडली होती तिच्यातही विष होते.शवविच्छेदनात पोटात सापडलेले विष व बाटलीतील विष हे एकाच प्रकारचे होते.बाटलीवर ठसे आढळले नाहीत .

खुनी इसमाने त्या बाटलीतील विष दुधामध्ये मिसळले असावे व नंतर ती बाटली खिडकीतून बाहेर फेकून दिली असावी .असा एक अंदाज करता येत होता .

बागेत पावलांचे बुटांचे  चपलांचे अनेक ठसे मिळाले होते .त्यातूनही कदाचित काही उलगडा होऊ शकला असता .

संदेश आता काय माहिती अाणतो त्यावरती खून झाला की आत्महत्या व  आत्महत्या झाली असल्यास खुनी कोण याचा उलगडा होण्याचा संभव होता .

(क्रमशः)

९/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन