Get it on Google Play
Download on the App Store

७ मॉलमधील खून (युवराज कथा) ३-४

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )

.खुनी राजेशच्या चांगला ओळखीचा असावा. त्याचप्रमाणे त्याला दुकानातील सर्व माहिती असावी.असा एक स्थूल अंदाज करता येत होता .

किंवा यातील काहीच नसून कदाचित ती  आत्महत्या असण्याचाही संभव होता .

युवराजानी आपल्या मनाशी सर्व गोष्टींचा एकदा आढावा घेतला व संदेशला या केसशी संबंधित सर्व लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले . विशेषतः गुरखा रामसिंग, मॅनेजर रमाकांत,राजेशचा भाऊ दिनेश, राजेशचे शेजारी माधवराव, हे खुनाच्या  दिवशी सकाळी साडेआठ ते साडेनऊ कुठे होते  त्याची चौकशी करण्यास,त्यांची अॅलिबी चेक करण्यास  सांगितले . जर पैसे मॅनेजर रमांकांत  गुरखा रामसिंग किंवा माधवराव यानी चोरले असतील तर ते कुठे तरी जास्त खर्च करताना आढळतील तेव्हा त्यावरही लक्ष ठेवण्यास सांगितले .

संदेशच्या नशिबाने मॉलसमोरचा दुकानदाराने त्या दिवशी लवकर दुकान उघडले होते . नेहमी हा दुकानदार दहा वाजता दुकान उघडत असे परंतु आज त्याने काही कारणाने साडेआठलाच दुकान उघडले होते.राजेश आल्यावर रामसिंगने त्याला आज फुलवाल्याने फुलाचा पुडा दिला नाही असे सांगितले .तेव्हा राजेशने पैसे देऊन रामसिंगला फुलाचा पुडा आणण्यासाठी पाठविले हे सर्व त्या दुकानदाराने ऐकले होते .पहाले होते. रामसिंगने फुलांचा पुडा केव्हा घेतला, सायकल पंक्चरला केव्हा टाकली, याचा सर्व तपशील संदेशने गोळा केला .त्यात रामसिंग पूर्णपणे निर्दोष आढळला .तो सर्व वेळ दुकानाबाहेर होता .

राजेशचा भाऊ दिनेश याची चौकशी करता तो त्या दिवशी शहरातच नव्हता .काही मालाची खरेदी करण्यासाठी तो परगावी गेला होता  असे आढळून आले .तेव्हा दिनेशही अपराधी ठरत नव्हता.

माधवरावांकडे त्या दिवशी काही पाहुणे आले होते.त्यांच्या सरबराईमध्ये माधवराव व्यस्त होते.तेव्हा तेही खुनाच्या वेळी तिथे असणे शक्य नव्हते .

रामसिंग दिनेश व माधवराव यांची अॅलिबी फार पक्की होती.

दोन दिवसांमध्ये ठसेतज्ञाचा हस्ताक्षरतज्ञाचा व पोस्टमार्टेम हे सर्व रिपोर्ट आले.हे रिपोर्ट पुढीलप्रमाणे होते .

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण गळफास हेच होते .राजेशच्या पोटातील व्हिसेरामध्ये गुंगी आणणाऱ्या औषधाचे अंश आढळून आले .

गुंगी आणणारे औषध राजेशला जबरदस्तीने किंवा नकळत  देऊन नंतर त्याला कुणीतरी फाशी दिले असावे , असा एक तर्क करता येत होता .अशीही एक शक्यता होती की  त्यानेच गुंगीच्या अंमलामध्ये फास लावून घेतला.  नक्की काय झाले हे जास्त चौकशी शिवाय सांगणे शक्य नव्हते .

ठसे तज्ज्ञांच्या अहवालानुसार राजेश व रमाकांत यांचे ठसे ऑफिसमध्ये सर्वत्र आढळून आले.ते तसे आढळून येणारच होते याशिवाय आणखी कुणाचे ठसे आढळून आले नाहीत .

दोन्ही ग्लासांवर कोणतेही ठसे आढळले नाहीत.त्याअर्थी कुणीतरी ते ग्लास नंतर पुसून ठेवले असावेत असा अंदाज सहज करता येत होता .

दोन्ही ग्लासातील अवशेषांचा अभ्यास करता एका ग्लासातील अवशेषात गुंगीचे औषध सापडले तर दुसर्‍या ग्लासात केवळ सरबत होते.त्यावरून असा निष्कर्ष काढता येत होता की जो कुणी पाहुणा आला होता त्याने राजेशच्या नकळत त्याच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध टाकले .तो बेशुद्धावस्थेत असतानाच त्याला फासावर लटकाविले .नंतर ग्लासवरचे ठसे पुसून टाकले . 

तो पाहुणा कोण होता? अनाहूत होता की ओळखीचा होता ?त्याचा राजेशला मारण्याचा उद्देश कोणता होता ?त्याच्या मृत्यूमुळे कुणाचा फायदा होणार होता का ?कुणी मॉलच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफर केली होती का? आणि ती उघडकीला येऊ नये म्हणून त्याचा खून करण्यात आला का?तो पाहुणा नसून कोणीतरी मॉलमधीलच नोकर होता का ? ज्याने खून केला त्याचाच वैयक्तिक फायदा होता की त्याला कुणीतरी सुपारी दिली होती ?

असे असंख्य प्रश्न उभे रहात होते.

खुनी सापडल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळणार होती .किंवा कदाचित या प्रश्नांची उत्तरे शोधीत असताना आपण खुन्यापर्यंत पोचणार होतो .

युवराजांचे विचारचक्र जोरात चालत होते .खुनी माणसाला,त्या व्यक्तीला अापण स्पर्श केला असेही त्यांना वाटत होते.मात्र त्याच्यावर नक्की बोट ठेवता येत नव्हते.  

संभाव्य आरोपींच्या लिस्टमधून रामसिंग माधवराव व दिनेश हे त्यांची पक्की अॅलिबी असल्यामुळे सुटले होते.

खुनी व्यक्ती राजेशच्या  चांगल्या ओळखीची असावी यात कोणताही संशय नव्हता.एखादी अनोळखी मारेकरी व्यक्ती शटर वर करून आत घुसू शकली असती .त्याने पुन्हा शटर लगेच खाली केल्यावर बाहेरच्या लोकांना काहीही कळणारही नव्हते.परंतु अशा व्यक्तीसोबत राजेशने सरबत नक्कीच घेतले नसते.त्याने आरडाओरडा केला असता .धोका असल्याचे इमर्जन्सीचे बटण दाबले असते. 

सेफमध्ये ठेवलेल्या फाइलमधील काही कागद कुणीतरी चोरल्याचा दाट संशय होता. त्या कागदामुळे ती चोरणारी व्यक्ती गोत्यात येण्याचा संभव होता.

त्या व्यक्तीनेच कदाचित पैसे चोरले असण्याचा संभव होता .

युवराजानी विचार केला आणि संदेशला फोन लावला.मॅनेजर रमाकांत त्या दिवशी सकाळी साडेआठ ते साडेनऊ नक्की कुठे होता ते त्याने शोधले का? ते विचारले.

(क्रमशः)

१५/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन