Get it on Google Play
Download on the App Store

६ मॉलमधील खून (युवराज कथा) २-४

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )

मॉलवरील हक्क सोडून दिल्याचे कागद सेफमध्ये होते का? आणि ते चोरण्यासाठी दिनेश आला होता का?आणि ते करीत असताना राजेशचा खून झाला का?राजेशचा  मृत्यू झाला तर आईनंतर दिनेश  मॉलचा मालक होणार होता का ?

मॉलचा मॅनेजर रमाकांत सर्व मॉलवर,कामावर,देखरेख करीत असे.त्याला सर्व कामांची माहिती होती .आर्थिक व्यवहारही तो सांभाळत असे . रमाकांतकडे एवढ्यात मालकांचे  कुणाशी भांडण झाले का म्हणून विचारता.तो म्हणाला.

मालक अत्यंत  कडक स्वभावाचे होते.तीन गुरखे रखवालदार म्हणून आहेत .प्रत्येकाची ड्युटी आठ आठ तास अाहे.सकाळी मालक आल्यावर दुकान उघडण्यासाठी डय़ुटीवर असलेला गुरखा मदत करतो. आज सकाळी ड्युटी रामसिंगची होती. तो आज कुठे दिसत नाही .मालकानी स्वतःच दुकान उघडलेले दिसते.या गुरख्याची नाईट ड्युटी असताना त्याला एकदा मालकानी खूपच झापला होता. गुरखा आपली ड्युटी बरोबर बजावीत आहे की नाही हे पाहण्यासाठी मालक केव्हा केव्हा रात्रीचे अकस्मात येत असत.आठ दिवसांपूर्वी हा रामसिंग रात्रीचा दुकानासमोर झोपलेला आढळून आला .त्यावेळी मालकांनी त्याला पुन्हा असे आढळल्यास नोकरीवरून काढून टाकीन म्हणून दम दिला होता.रामसिंग जरा भडक डोक्याचा आहे .त्यावेळी त्याने काहीतरी उलट उत्तरे दिली होती .

एवढ्यात रामसिंग कसली तरी पुडी घेऊन आला.त्याला विचारता तो म्हणाला .आज फुलवाल्याने फुलपुडी न दिल्यामुळे मालकांनी मला फुले व हार आणण्यासाठी पाठविले होते .ती मी  घेऊन येत आहे.इतका उशीर का झाला असे विचारता त्याने माझी सायकल पंक्चर झाली .पंक्चर काढून येईपर्यंत  इतका उशीर झाला म्हणून सांगितले.हा खरेच बोलत आहे का ते पाहण्यासाठी शामरावानी एका पोलिसाला पिटाळले .तो खरेच बोलत होता.

पुढे मॅनेजर म्हणाला काही दिवसांपूर्वी दिनेशशेठ दुकानात मालकांना भेटण्यासाठी आले होते.कारण माहीत नाही परंतु मालकांचे व त्यांचे खूप भांडण झाले.दोघेही जोरजोरात ओरडत होते.

राजेश व दिनेश यांचे कोणत्या गोष्टीवरून भांडण झाले ते पाहण्यासाठी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज पाहणे आवश्यक होते .

केबिनमधील सीसीटीव्ही रेकॉर्ड पाहता काल रात्रीच कुणीतरी सीसीटीव्ही बंद केलेला आढळून आला .त्यामुळे सकाळपासून इथे काय घडले ते कळण्याचा मार्गच खुंटला होता.

राजेशचा मुलगा मनोहरजवळ चौकशी करता त्याने चार दिवसांपूर्वी बाबांचे शेजाऱ्याशी माधवरावांशी कडाक्याचे भांडण झाले होते म्हणून सांगितले . कारण विचारता सोसायटीमध्ये आमच्या पार्कींगच्या जागेवर  ते त्यांची स्कूटर उभी करतात आणि मोटार पार्क करताना आम्हाला नेहमी त्रास होतो .त्यांना पुन्हा पुन्हा सांगूनही ते ऐकत नाहीत . माधवराव रात्री थोडी दारू घेतात त्यावेळी त्यांनी दारू घेतलेली असल्यामुळे जरा जास्तच कडाक्याचे भांडण झाले असा समारोप केला .

राजेशचे प्रेत पोस्टमार्टेम रिपोर्टसाठी पाठविण्यात आले होते.रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण कळणार होते.

राजेशच्या खिशात मॉलच्या व  सेफच्या  चाव्या होत्या.सेफ व्यवस्थित बंद केलेली आढळून आली.वरवर पाहता तरी त्यातून काही चोरीला गेलेले आढळून आले नाही .मॅनेजर जवळ चौकशी करता काल दुकान बंद करताना एकूण कॅश दोन लाख रुपये होती .सेफमध्ये दोन लाख रुपये नव्हते. केवळ पंचवीस हजार रुपये सापडले.  चोराने चोरीच्या उद्देशाने खून करून नंतर पैसे चोरले असतील अशी एक शक्यता होती .किंवा  चोर चोरी करताना सापडल्यामुळे त्याने खून केला अशीही एक शक्यता होती . कदाचीत चोर ओळखीचा असावा म्हणून त्याने ठार मारले असावे .शक्यता अनेक होत्या .

जर चोर व राजेश यांची हातापायी झाली असती तर केबिनमधील सामान अस्ताव्यस्त झाले असते तसे काही दिसत नव्हते .

युवराजाना फाईल चाळताचाळता त्या फाईलमध्ये थोडी गफलत आढळली.कागदपत्र तारीखवार लावलेले नसून कसे तरी लावलेले होते. कुणीतरी त्या फायलीतील काही कागद चोरले असावेत त्या गडबडीमध्ये कागद  खाली पडले असावेत आणि नंतर घाईघाईने ते तसेच फाइलमध्ये लावले असावेत असा संशय घेण्याला जागा होती .

टेबलावर कोणत्यातरी पेयाचे दोन ग्लास आढळून आले.त्या ग्लासवरील ठसे तसेच केबिनमध्ये सापडलेले सर्व ठसे यांचे वर्गीकरण करून त्यातून काही शोध लागतो का ते पाहावयाला शामरावांनी ठसेतज्ञाला सांगितले होते.

सर्व नोकरांचे हाताचे ठसे घेण्यात आले.

त्याचप्रमाणे मॅनेजर रमाकांतच्याही हाताचे ठसे घेण्यात आले.

टेबलावर काचेखाली एक चिठी सापडली .त्यावर  ~मी माझ्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे त्यासाठी कुणालाही दोषी धरू नये असा मजकूर होता .~ती चिठी व सर्वांच्या हस्ताक्षराचे नमुने हस्ताक्षर तज्ञांकडे तपासासाठी पाठविण्यात आले .

मनोहरला बाबा काही गंभीर आजाराने आजारी होते का असे विचारता तो  नाही निदान त्याला तरी माहित नाही असे म्हणाला .

युवराजांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा पत्ता व फोन नंबर घेतला.

एकंदरीत केस तशी गुंतागुंतीची वाटत होती .

गुरखा, राजेशचा भाऊ दिनेश, फाइलमधील कागद चोरणारी अज्ञात व्यक्ती, सेफमधील कॅश चोर,सोसायटीतील शेजारी ,सकाळी सकाळी राजेशला भेटायला आलेली अज्ञात व्यक्ती ,यांच्यापैकी कुणीही किंवा आणखी कुणीतरी अज्ञात व्यक्ती खुनी असावी असा अंदाज करता येत होता .

कोणत्याच निष्कर्षांवर येणे शक्य नव्हते.ठसे तज्ञ, हस्ताक्षर तज्ञ, पोस्टमार्टेम डॉक्टर,इत्यादींच्या रिपोर्टवर व फॅमिली डॉक्टर काय म्हणतात त्यावरही बरेच काही अवलंबून होते .सीसीटीव्ही जाणकार माणसाशिवाय कुणीही बंद केला नव्हता .खुनी राजेशच्या चांगला ओळखीचा असावा. त्याचप्रमाणे त्याला दुकानातील सर्व माहिती असावी.असा एक स्थूल अंदाज करता येत होता .

किंवा यातील काहीच नसून कदाचित ती  आत्महत्या असण्याचाही संभव होता .

(क्रमशः)

१४/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन