Get it on Google Play
Download on the App Store

१ अपहरण (युवराज कथा) १-२

(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

आज बरेच दिवसांनी युवराज विजया व संदेश हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी एकत्र आले होते .कामातून वेळ मिळेल तेव्हा तिघेही एकत्र जेवणासाठी कुठेतरी जात असत.कामाच्या ताणापासून मुक्त होण्यासाठी युवराजांजवळ जे अनेक उपाय होते, त्यातील हा एक होता.  

जेव्हा जेव्हा ते असे एकत्र येत त्यावेळी "स्ट्रिक्टली नो बिझनेस टॉक"व्यवसायासंबंधी चकार शब्दही उच्चारायचा नाही  हे धोरण सगळ्यांकडून आपोआप आचरणात आणले जात असे.हसतखेळत गप्पा मारीत त्यांचे जेवण चालले होते.एवढ्यात हॉटेलच्या एका कोपऱ्यात काहीतरी गोंधळ सुरू झाला .स्वाभाविक रेस्टॉरंटमधील सर्वांचेच लक्ष त्या आरडाओरडीकडे व गोंधळाकडे गेले .वेटरला एक तरुण काहीतरी अद्वातद्वा बोलत होता .वेटर शांतपणे खाली मान घालून ऐकत होता.ग्राहकांपैकी कुणीही काहीही बोलले तरी उलट उत्तर द्यायचे नाही अशी त्याची शिकवण होती . वाटल्यास व्यवस्थापकाकडे तक्रार करावी तो काय करायचे ते ठरवील.असे त्या हॉटेलचे धोरण होते .कांही गुंडाना, मस्तवाल तरुणांना ,राजकीय आश्रय असलेल्या गुंडांना, राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांना,निष्कारण मुजोरी करण्याची सवय असते .दारूच्या अमलाखाली असेल तर आणखीच आरडाओरडा सुरू होतो .अश्या  घटना हॉटेलला नव्या नव्हत्या.उलट उत्तर दिल्यास प्रकरण चिघळून त्याचा सर्वांनाच त्रास होण्याचा संभव असतो. हॉटेलच्या व्यवसायावरही परिणाम होण्याचा संभव असतो .अश्या  वेळी शांत राहणे ,दमाने घेणे ,योग्य ठरते. तो तरुण  गप्प न बसता आणखी चढ्या आवाजात बोलू लागला .त्या तरुणाने वेटरच्या कॉलरला हात घातला .तो बहुधा वेटरला ठोसा मारणार एवढ्यात एका कोपऱ्यातून हा सर्व गोंधळ ऐकत असलेला एक मध्यमवयीन गृहस्थ उठून तिथे गेला .त्याने त्या तरुणाला गप्प बसण्यास सुचविले .जर गप्प बसला नाहीस तर मी माझा सुप्रसिद्ध ठोसा तुला मारीन असा दम त्या तरुणाला दिला.एवढेच बोलून तो थांबला नाही तर त्याने आपली मूठ रागाने घट्ट मिटली.तो एके काळचा नामांकित बॉक्सर असावा .त्या गृहस्थांच्या आवाजात अशी काही जरब होती,नजरेत असा काही दरारा होता  की तो तरुण वरमला.हा गृहस्थ बोलल्याप्रमाणे करील,आणि आपल्याला त्याचा सामना करता येणार नाही ,याची त्याला खात्री पटली .त्याने वेटरची कॉलर सोडून दिली .बिलाचे पैसे टेबलावर फेकले आणि तो व त्याचे सवंगडी  रागारागाने अद्वातद्वा बोलत हॉटेल सोडून निघून गेले .

युवराज हा सर्व गोंधळ शांतपणे पाहात होते .त्या मध्यमवयीन इसमाचे युवराज यांना कौतुक वाटत होते.एवढ्यात त्यांच्या टेबलवर वेटरने एक चिठी  आणून ठेवली . चिठीत पुढील मजकूर होता . 

~माझ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे .मी संकटात आहे .मला तुमची भेट हवी आहे .मी तुम्हाला कुठे भेटावे हे कळवावे.~त्यांनी त्याच चिठीवर एक नाव खरडले व ती चिठी परत नेऊन देण्यास सांगितले.ती चिठी वेटर कुणाला देतो याकडे युवराज लक्ष ठेवून होते.वेटरने ती चिठी वेटरला वाचविणाऱ्या गृहस्थाच्या टेबलावर नेऊन ठेविली.ज्या गृहस्थाबद्दल युवराजांना  कुतूहल निर्माण झाले होते तोच तो चिठी पाठविणारा  निघाल्यामुळे युवराजांचे कुतूहल आणखी वाढले . संदेशने त्यांना ही काय गडबड आहे म्हणून खुणेने विचारले ?त्यावर त्यांनी थोडक्यात सर्व हकिगत सांगितली .उद्या त्याला महात्मा गांधी रोडवर नेहरू गार्डनमध्ये बोलाविले आहे म्हणून सांगितले .

दुसऱ्या दिवशी युवराज वेषांतर करून तिथे गेले.युवराज सर्वत्र बारीक लक्ष देऊन पहात होते. आपल्यावर किंवा ते ज्या गृहस्थाना भेटणार होते, त्यांच्यावर कुणाची पाळत नाही ना हे त्यांना पाहायचे होते .कुणीही पाळत ठेवून नाही याची खात्री पटल्यावर ते ,ज्या बाकावर तो गृहस्थ बसला होता तिथे त्याच्या शेजारी बसले. युवराजांचे वेषांतर इतके बेमालूम होते की त्याने युवराजांना ओळखले नाही.युवराजांनी आपली ओळख दिल्यावर त्याने पुढील हकीगत सांगितली.

तो इंजिनिअर म्हणून पाणबुडीवर काम करीत आहे.हल्ली तो सुटीवर आहे .त्याला एका अज्ञात इसमाचा  दोन दिवसांपूर्वी फोन आला .मी सांगितल्याप्रमाणे जर तू वागला नाहीस तर त्याचे वाईट परिणाम होतील  असा त्याने दम दिला .जर मी त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो नाही तर तो नक्कीच माझा काहीतरी घात  करील असे त्याच्या बोलण्यावरून वाटते.मी त्याच्या धमकीला घाबरत नाही .तो समोरासमोर येईल तर मी त्याला लोळवीन.मी कुटुंबवत्सल माणूस आहे .माझी पत्नी व मुलगी माझा जीव की प्राण आहेत.ते माझ्या मुलीचा काहीतरी घात करतील असे मला वाटते .या माझ्या कमकुवतपणावर नेमके बोट ठेवून ते माझ्याकडून काहीतरी राष्ट्रविघातक काम करून घेतील अशी मला भीती वाटते. 

पुढे तो म्हणाला ,फोन करणाऱ्याला त्याच्यासाठी मी काय करावे असे विचारता त्याने उद्या सांगेन असे सांगितले.दुसऱ्या दिवशी त्याचा फोन पुन्हा आला .तो माझ्याजवळ  एक लहानशी वस्तू देणार आहे. त्या लहान वस्तूंचे  बटण दाबून मी ती वस्तू  इंजिन रुममध्ये ठेवायची आहे.यापेक्षा मला आणखी काही करावे लागणार नाही असे त्यांचे सांगणे आहे .यात मला धोका दिसत आहे .मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही  तर ते माझ्या एकुलत्या एक मुलीचा घात करतील असाही दम त्यांनी मला दिला आहे .मला सुरुवातीला वाटणारी भीती खरी ठरली आहे .माझी सुटी अजून दहा दिवस आहे .सुटी संपण्याच्या आदल्या दिवशी ते मला ती लहानशी वस्तू आणून देणार आहेत.त्यामुळे पाणबुडीला काहीतरी धोका वाटतो .मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागलो नाही तर माझ्या मुलीला धोका आहे . मी पोलिसांतही जाऊ शकत नाही तसे करू नका तुमच्या मुलीला धोका संभवतो,असा दम त्यांनी मला दिला आहे. तुमचे नाव मी बरेच ऐकले आहे तरी मी आता काय करू ?एवढे बोलून तो गृहस्थ थांबला.

युवराज म्हणाले एक दोन दिवसांत त्याचा फोन तुम्हाला नक्की येईल .तुम्ही त्याला त्याच्या बोलण्याप्रमाणे वागण्यास तयार आहे परंतु मला माझी किंमत पाहिजे असे सांगा .तो जेव्हा तुम्हाला तुमची किंमत विचारील तेव्हा पन्नास लाख रुपये असा आकडा सांगा .त्याचप्रमाणे मला अगोदर सर्व रक्कम पाहिजे असेही सांगा . त्याची भेट पाहिजे असेही सांगा.माझी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतील .तुमच्या फोनवरील बोलणेही आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत ऐकत राहू .तो किंवा त्याचा माणूस तुम्हाला भेटला की आपले अर्धे काम होईल.पुढे काय करायचे ते आम्ही तुम्हाला कळवत जाऊ .घाबरू नका काळजी करू नका असे म्हणून युवराजांनी त्याला आश्वस्त केले .एरवी निडर असणारा तो गृहस्थ आपल्या मुलीसाठी व्याकूळ झाला होता .

आपल्यावर कुणी लक्ष ठेवीत असला तरी त्याला पुढे माग लागू नये  याची काळजी युवराज घेत होते .परत येताना ते एका हॉटेलात शिरले.तेथील वॉशरुममध्ये जाऊन त्यांनी आपले मूळ रूप धारण केले आणि नंतरच ते बाहेर पडले.एवढी काळजी घेण्याचे कारण जरी एखादा सुधाकरवर लक्ष ठेवून असला ,आणि त्यामुळे वेषांतरित  युवराजांवर लक्ष ठेवून असला तरी त्याला पुढे माग लागू नये हा होता.

युवराजानी संदेशला बोलवून त्याला सर्व हकीगत सांगितली .त्यांनी संदेशला सुधाकरना (त्या गृहस्थाचे नाव सुधाकर होते )भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व त्यांच्या फोनवरील  संभाषणावर लक्ष ठेवण्यास सांगितले .त्यातून आपल्याला काही तरी धागा मिळेल .असा त्यांचा अंदाज होता .त्याचप्रमाणे त्यांनी शामरावांच्या कानावरही सर्व हकीगत घालून ठेवली.तुम्ही त्या टोळीला संशय येईल असे काही करू नका म्हणूनही सांगितले .

एखादा मोठा आंतरराष्ट्रीय कट उघडकीला येईल आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांबरोबरच त्यांना मदत करणारे स्थानिक गुन्हेगारही सापडतील असे पुढे युवराज म्हणाले .

दुसऱ्याच दिवशी संदेशचा फोन आला.तो म्हणाला,तीन चारदा सुधाकरला त्या अज्ञात इसमाचा  फोन आला. सुधाकरला दमात घेऊन तो त्याला घाबरवून सोडत आहे .दर वेळी तो वेगवेगळ्या सिमकार्डवरून बोलत आहे .फोन कुठून येतो ते ट्रेस करणे शक्य नाही .सुधाकरला भेटण्यासाठी कुणीही आलेले नाही .

त्याच दिवशी सुधाकरचा युवराजांना फोन आला.

*त्याची एकुलती एक दहा वर्षांची मुलगी पळविण्यात आली होती.*

*ती मुलगी त्या टोळीच्या ताब्यात काम होईपर्यंत राहणार होती.*

* काम झाल्यावरच मुलगी परत येणार होती.*

*  त्या टोळीने सुधाकरला असाही दम दिला होता  की जर पोलिसांची मदत घ्याल तर मुलीच्या जिवाला  धोका पोहोचेल .*

(क्रमशः )

२४/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन