Get it on Google Play
Download on the App Store

सात

"आई, होणाऱ्या सुनेसाठी अंगठी बनवून घे", प्रशांत म्हणाला. पोहे आणि चहा यांचा फडशा पाडून तो निघाला होता.

आई साशंक होती पण हसत म्हणाली – “बाळा, हे लफडी करण्याचं वय नाही रे. सोळा सतरा वय असताना ठीक आहे तू पंचवीशीचा घोडा झाला आहेस. करिअर महत्वाचं रे”

प्रशांतने आईचा हात धरला- "व्यक्ती साठीला आली कि जास्त हुशार होते आणि होणाऱ्या सुनेसाठी अंगठी आधीच बनवून ठेवते."

प्राचीशी बोलण्याच्या सगळ्या युक्त्या फसल्या तेव्हा प्रशांत थेट तिच्या घरी गेला.

दार उघडताच प्राचीने विचारले- "अरे प्रशांत, अचानक? बोल काय काम आहे?

प्रशांत किंचित हसला, किंचित लाजला, थोडासा संकोचला,

मग म्हणाला- "अगं, मी आत्ताच तुला भेटायला आलोय इथूनच जवळून जात होतो."

प्राचीने दार पूर्णपणे उघडले - "आत ये. आई हा प्रशांत. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकायचो. वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये होतो. प्रशांत इथेच आला होता म्हणून घरी आला. प्रशांत, तू चहा घेशील की कॉफी?"

प्रशांत खुर्चीवर बसत म्हणाला- "कॉफी."

प्राचीच्या आई बाबांशी बोलता बोलता बराच वेळ झाला. आई प्रशांतला तिच्या बागकामाबद्दल सांगत होती आणि वडील आपल्या दारूचे किस्से सांगत होते. केवळ दारू प्यायल्याने या बिल्डींग मधले  लोक मला वाईट मानतात, असे ते सांगत होते. मात्र ते सच्चे दर्दी असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उंची दारुंची चांगली माहिती आहे. आजपर्यंत दारू पिऊन त्यांनी कधी तमाशा केला नाही किंवा भांडण केले नाही.

प्राची मध्ये मध्ये तिच्या रूम मध्ये जात होती आणि मग परत येत होती. अनेक वेळा प्रशांतला वाटले की प्राची त्याला आपल्या खोलीत घेऊन जाईल, पण तसं काही झालं नाही.

प्रशांतने दोनदा व्हॉट्सअॅपवर मेसेज केला - "प्राची, काय करूया?"

पण तिने तो मेसेज पाहिला सुद्धा नाही. ती तिची रोजची कामं करत राहिली, क्रिकेट मॅचबद्दल बोलत राहिली. आई बाबांशी गप्पा मारत राहिली. शेवटी प्रचंड वैतागलेल्या प्रशांतने जाण्याची अनुमती मागितली. पण प्राचीची आई जेवल्याशिवाय जायचं नाही यावर ठाम होती.

प्रशांतला प्राचीचे वागणे समजलेच नाही. ती त्याला तिच्या खोलीत घेऊन गेल्यावर वेगळे बोलणार नाही, मग इथे बसून काय उपयोग होणार होता. तो थोडाच टाईमपास करायला आला होता! फोन बंद, कॉल, मेसेज नाही आणि काही झालेच नाही असा आव प्राची आणत होती.

दुपारच्या जेवणानंतर प्रशांत तिथून निघून गेला.