चार
ती संध्याकाळ होळीच्या ज्वालांसारखी लाल आणि पिवळसर भासत होती.
बाईक चालवता चालवता प्रशांत गुणगुणत निघाला होता
तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं
तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला भिजू द्या
माझं काळीज प्रेमानं नाचतंय गाणं वाजू द्या
गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या
तो अमर सोलंकी च्या चाळी जवळ पोहचला.
अमर आणि अमरचे चार पंटर संपूर्ण तुरेल पाखाडी भागात बदनाम होते. अमरला त्याच्या खोलीत सोफ्यावर अजगरा सारखं पडून राहायची सवय लागली होती पण त्याला सर्व ठिकाणांची इथ्यंभूत खबर होती. गांजाच्या धुरात त्याच्या खोलीत लुकलुकणारे लाल, हिरवे आणि निळे बल्ब त्यांच्या खोलीत बियर बारचा फील आणायचे.
हॉल मध्ये भिंत व्यापून टाकेल असा साईबाबांचा फोटो होता. अमरचे वडील मोठे भक्त होते. त्यांची आठवण म्हणून अमरने तो फोटो खोलीत तसाच ठेवला होता. अमरची आई लहानपणीच वारली होती. एकुलत्या एक अमरला त्याच्या वडिलांनी एकट्यानी वाढवला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात अमर एकटा पडला आणि व्यसनी बनला. प्रशांत आत जाईपर्यंत सूर्य मावळला होता आणि अंधार झाला.
प्रशांत अमरच्या बाजूला बसला आणि त्याने सिगारेटचे झुरके घ्यायला सुरुवात केली. पाचही जण प्रशांतकडे बघत होते. प्रशांत मध्ये आज जी उर्जा त्यांना दिसली ती त्यांनी याआधी कधीच पाहिली नव्हती.
अमर कुतुहलाने म्हणाला - "काय भावा? आज सेटिंग झाली काय बाबुरावची?” प्रशांत हसला.
त्याच्या डोळ्यात बघत अमर म्हणाला- “जतिन पण आला होता. तू त्याचा पत्ता कट केलास न?"
प्रशांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि तात्विकपणे म्हणाला
“नाही रे..असं काही नाही. जतीन आणि प्राची यांच्यामध्ये मी कधीच आलो नाही. मी प्राचीचा मित्र आहे आणि’ प्राची माझी मैत्रीण आहे. मी प्राचीला तसं कधीच बोललो नाही, जतीन बद्दल मी विचारलं पण नाही.
मग अमरने थेट प्रश्न विचारला- “मग तु काय तिची गंध फुल वाहून पूजा करणार आहेस का? साध्वी प्राचीजी यांची हि अशी साई बाबा सारखी फ्रेम करून घेऊया का त्यासाठी? तिच्यावर तुझं प्रेम आहे आणि तूला जतीनचा पत्ता कट करायचा आहे असं सरळ का सांगत नाहीस?
प्रशांत ठाम राहिला – “मी प्राचीचे मन मोडू शकत नाही. मी फक्त माझी मैत्री जपतोय. मी प्राचीकडे तशा नजरेने पाहत नाही."
आता अमरचा संयम ढळला - "मग कशा नजरेनं बघतोस?"
प्रशांत - "त्या नजरेनं, ज्या नजरेनं तू कधीच पाहू शकत नाहीस."
अमर - "मी कशा नजरेनं बघतो?"
प्रशांत- "त्या नजरेनं जिच्यामुळे मीनाक्षी तुला सोडून गेली."
खोलीत काही वेळ शांतता पसरली. बाकीच्या चार मुलांच्या काळजाचे ठोके वाढले. गंजेडी गांजा पिणे थांबवून हातात चिलीम घेऊन तमाशा पाहू लागला कि समजावे काहीतरी राडा होणार आहे.
प्रशांतकडे रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी बघत अमर म्हणाला,
“सून बे, चुतीये! मी मीनाक्षीवर प्रेम करत होतो आणि मी माझ्या प्रेमाचा अनादर केला नाही. मी तिला स्पष्टपणे म्हणालो होतो की जर तिला दुसरा कोणी आवडत असेल तर सोड विषय. ती निघून गेली. मला त्याची काहीच खंत नाही.
“मी तुझ्यासारखा झाट्यासारखा जगू शकत नाही, मैत्रीच्या नावाखाली संबंध ठेवायचे आणि खाली बाबूराव टाइट तुझा. आणि हे करताना मी साळसूद बगळा आणि सगळ्यात वेगळा अशा आविर्भावात स्वत: एक पवित्र स्वभावाचा माणूस असल्याचं ढोंग कर.”
“बोच्या, तू प्रेम बीम काही करत नाहीस. तुला फक्त घ्यायची आहे तिला आणि ते सुद्धा एकदाच. आणि ते झालं कि प्राची गेली भोकात.”
तुझ्यात पाच पैशाचा पण प्रामाणिकपणा नाहीये असता तर जतीन असा खचला नसता. तुझ्यामुळे प्राचीने जतीनला निराश केले आहे आणि आश्चर्य म्हणजे प्राचीला त्याचं काहीच वाटत नाही.”
प्रशांत हसला- " अमर भाई तुला समजणार नाही. पण मला तुझ्याबद्दल खरंच वाईट वाटतं."
आता आणखी तिथे बसण्यात काहीच अर्थ नव्हता. निघायच्या आधी प्रशांतने अर्थपूर्ण नजरेने अमरकडे बघितले –
“प्रत्येकाला आपापली बाजू माहित असते. मला माझी बाजू माहित आहे. मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही."
आज या प्रकरणामुळे अगदी लहानपणापासूनची मैत्री कायमची संपली होती.