Get it on Google Play
Download on the App Store

सहा

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे आई अस्वस्थ झाली आणि तणतण करू लागली.

“मेल्या, त्या चेटकीण प्राचीच्या मागे वेळ घालवतोयस? कामधंदे शिक्षण सगळं आहे बाकी.. लक्षात आहे न? तू तिने बोलवल्यावर रात्री अडीचला घरातून बाहेर पडलास. मला रात्रीच समजले. तुला काय वाटलं? मला कळणार नाही? काल जन्माला आलेला पोर तू.... मला अक्कल शिकवणार का? मी तुला रात्रीच भिंतीवरून उडी मारून जाताना पाहिलं. अरे,त्या प्राचीचा बेवडा बाप तुला मारून टाकेल."

इतकं बोलून प्रशांत काही ढिम्म हलेना. आई प्रशांतच्या अगदी जवळ आली- “कापतील रे. कापतील! तुला! तुला तीच बेवड्याची मुलगी मिळाली का? तिच्या नादात नोकरीची तयारी सोडून, पुढचा अभ्यास सोडून टाईम पास करतोयस. कॉलेज संपलं कि मग काय हमाली करणार आहेस का?”

तिथून पप्पा म्हणाले- "जाऊ दे. तो मुलगा आहे.”

आईचा राग अनावर झाला - " तुम्ही गप्प बसा ओ. मध्ये मध्ये बोलू नका. मुलगा हाताबाहेर जातोय काही काळजी आहे का?  उद्या त्या प्राचीच्या वडिलांनी तुमची कॉलर पकडून वरात काढली तर काही इज्जत राहील का? आज गेली वीस वर्ष मी या चाळीत मानाने राहत आहे. कोणाची टाप नाही. आणि आज या तुमच्या दिवट्यामुळे....."

मग पप्पांनी आवाज चढवला - "ए, तू फालतू बडबड करत्येस. मी काटकर बाईना त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर भेटायला म्हणून गेलो, त्यांची तब्येत कशी आहे वगैरे विचारपूस केली तेव्हाही तू तमाशा केला होतास..? तुझं ना... सगळं खानदान वेडं आहे. तुझ्या नंडेने घर डोक्यावर घेतलं होतं.... का? तर नवऱ्याच्या फोनवर एका मुलीचा कॉल आला होता म्हणून . मी असला तमाशा माझ्या घरात होऊ देणार नाही. तो एक मुलगा आहे, तरुण आहे. मुलीशी बोलतोय. प्रयत्न करतोय. काय वाईट आहे?"

या वादावादी नंतर आईने घरात तारांगण केले ते सांगण्यासारखे नाही. नंतर प्रशांतला घरी जायचे धाडस झाले नाही. त्याला वाटले एकदम रात्रीच जाऊ नाहीतर मावशीच्या घरी जाऊ. एक-दोन चार दिवस तिथेच राहू.

प्रशांत इतका अस्वस्थ झाला होता की दरम्यान प्राचीचे मेसेज आले तरी त्याला उत्तर द्यावेसे वाटेना. मग प्राचीचे अनेक मेसेजेस '???' च्या रुपात आले. वैतागलेल्या प्रशांतने फोनचे नेटच बंद केले.

रात्री प्रशांत घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईचा राग शांत झाला होता. तरुण मुलाच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहून तिला काळजी वाटली. नोकरी धंद्याच्या वयात तो व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत वेळ वाया घालवत होता  ही चिंता आईला खात होती. पण तो घरी आला याचे समाधान वाटले.

आता प्रशांतचा रागही थंडावला होता. त्याने नेट ऑन केले. एकही मेसेज नाही. एकही मिस कॉल नाही.

रागावली कि काय या भीतीने प्रशांतने प्राचीला फोन केला. पण फोन लागेना. ब्लॉक करून टाकलं का काय? व्हॉट्सऍप मेसेज, व्हॉट्सऍप कॉल, व्हिडीओकॉल काहीच चालत नाहीये.

सकाळी रागात असताना प्राचीचा विचार त्याला आजीबात महत्त्वाचा वाटत नव्हता पण आता मात्र तिचा फोन, मेसेज काहीच लागत नसल्यामुळे पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था झाली होती.