१२ शिकार ३-३
(ही गोष्ट काल्पनिक आहे प्रत्यक्षात कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
अविनाशच्या घरी परत जाताना अविनाश शांतारामला म्हणाला एका माणसाची मजा आहे बुवा .
दुसऱ्या दिवशी शांताराम आपला जो काही बाडबिस्तरा होता तो घेऊन दादासाहेबांच्या बाह्य़गृही हजर झाला. त्याला येऊन आठ दिवस झाले होते .शांता त्याला एक दोनदा दिसली होती परंतू भेट झाली नव्हती .ती तिच्या कॉलेजमध्ये व्यस्त होती तर शांताराम त्याच्या कॉलेजमध्ये व्यस्त होता.एकाच आवारात राहत असूनही भेट नाही यांचे शांतारामला नवल वाटत होते.ती आपल्यापासून मुद्दाम लांब राहत आहे की काय असा संशय त्याला येऊ लागला .दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी असे होते की काय असे त्याला वाटू लागले होते .आऊट हाऊसमध्ये राहायला येण्याचा हेतूच विफल होतो की काय असे त्याला वाटू लागले .
दादासाहेब आपल्यावर लक्ष ठेवून आहेत,दादासाहेबांच्या गुड बुक्समध्ये आपण आहोत हे त्याच्या लक्षात आले होते . परंतु वहिनींचे काय ? त्यांना आपल्याबद्दल काय वाटते ?
शांता आपल्याला निश्चित आवडते परंतु तिचे काय ? तिला आपण पसंत आहो कि नाही ते त्याला कळले नव्हते.
तशी दोघांची भेट दोनतीनदाच झाली होती .तेही नुसते दर्शन होते. तो अविनाशच्या कॉलेजमध्ये गेला होता त्यावेळी ती त्याला काहीतरी डिफिकल्टी विचारण्यासाठी आली होती.ते तिचे पहिले दर्शन .तेव्हाच ती त्याच्या मनात भरली होती.तिच्यासाठी त्याने अविनाशच्या कॉलेजमध्ये त्याला भेटण्याच्या बहाण्याने, परंतु प्रत्यक्षात शांता भेटेल ,काही ओळख बोलणे होईल, अशा हेतूने तीन चार चकरा मारल्या होत्या .कॉलेजच्या आवारात ती दोनदा निसटती दिसली होती.यापुढे विशेष प्रगती झाली नव्हती .
त्यांच्या बंगल्यावरून जात असताना ती पाठीमागून सायकलवरून आली होती .तिने आग्रहाने दोघांनाही बंगल्यात नेले होते . परंतु तिने अविनाशला बोलाविले होते व शांताराम त्याच्याबरोबर गेला होता एवढेच .दादासाहेबांनी त्याला बाह्यगृह देण्याचे सांगितले त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसले होते .तो भास होता की ते सत्य होते तेच शांतारामला कळत नव्हते . त्याचे शांतावरील प्रेम एकतर्फीच आहे की दुतर्फी आहे ते त्याला कळत नव्हते. असे तर नव्हते दादासाहेब शांतारामवर लक्ष ठेवून आहेत आणि शांताराम शांतावर लक्ष ठेवून आहे. शांता कुणावर लक्ष ठेवून आहे ?शांताला शांतारामबद्दल काही वाटते का? याची कल्पना शांतारामला नव्हती. एकूण गोंधळाचे वातावरण होते .आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चाललो आहोत असे शांतारामला वाटू लागले होते.आपले विचार इच्छा पूरक(विशफुल थिंकिंग ) आहेत असे तर नाही ना? आपण धुक्यातून पुढे जात आहोत,असा विचार त्याच्या मनात आला .
शांतारामला शांताबद्दल जे वाटत होते तसेच शांताला वाटत होते काय ते भविष्यकाळातच कळणार होते .
शांता तशी चतुर आणि हुषार मुलगी होती .शांताराम आपल्यावर फिदा आहे हे तिने ओळखले होते .आपल्याला जरी तो अावडत असला तरी आपण लगेच त्याला भेटणे योग्य होणार नाही.त्याला थोडा तळमळत ठेवला पाहिजे . असे तिला वाटत होते.तिची खोली आऊटहाऊसच्या बरोबर समोर होती. खिडकीच्या पडद्याआडून ती त्याला बघत होती.तो मधून मधून आपल्या बंगल्याकडे पाहतो.मधून मधून वरती खिडकीकडे ही पाहतो .मला पहाण्यासाठी तो थोडा बहुत कासावीस झालेला आहे. हे सर्व तिच्या लक्षात आले होते .एकूणच सिच्युएशनची तिला गंमत वाटत होती . बाबा आईजवळ बोलताना तिने निसटते ऐकले होते.बाबांना तिच्यासाठी शांताराम पसंत होता .शांतारामचे मत काय आहे ते त्यांच्या लक्षात येत नव्हते. आईला त्यांनी शांतारामचा त्या दृष्टीने विचार करायला सांगितले होते.आईला शांताराम पसंत होता ,परंतु त्याच्या घरची आर्थिक कौटुंबिक इत्यादी परिस्थिती कळल्याशिवाय ती त्याला पास करणे शक्य नव्हते.
दादासाहेबांचे सामाजिक स्थान, आर्थिक स्थिती,इ. पाहता त्यांना त्यांच्या तोलामोलाचा जावई पाहिजे असे तिचे ठाम मत होते.थोडक्यात शांतारामला तोलल्याशिवाय ती होकार देणार नव्हती!
आठ दिवसांनी शांताराम कोणतेतरी पुस्तक वाचत बसला असताना दरवाजावर टकटक झाली . दरवाजा उघडाच आहे आंत या म्हणून शांताराम जोरात ओरडला.दरवाजा उघडून शांता आंत आली.तिच्या हातात डिश होती . त्यात शिरा व बटाटेवडे होते. त्यांचा खमंग वास सुटला होता.आईने तुम्हाला द्यायला सांगितले आहे असे म्हणून तिने ती डिश शांतारामाच्या हातात दिली .लगेच ती निघाली .शांतारामने तिला जरा बसा तर खरे असे म्हटले .कां असे विचारता .तो म्हणाला, रिकाम्या झालेल्या डिशेस घेऊन जाण्यासाठी .
त्याच्या बोलण्यातील मिस्किलपणा तिच्या लक्षात आला.त्याने आपल्या जवळील एक डिश घेऊन त्यात थोडा शिरा व बटाटेवडा काढला.आणि तिच्या हातात दिला .त्याची ही चाल तिला भावली .दोघांनी गप्पा मारत मारत फराळ केला.
त्यानंतर ही नेहमीचीच गोष्ट झाली . दादासाहेबांकडे काही फराळ झाला कि शांतारामकडे शांता तो फराळ घेऊन येत असे .दादासाहेबांकडे कितीतरी नोकर होते. वहिनींना त्या कोणाबरोबर तरी फराळ पाठवता आला असता.परंतु त्या कटाक्षाने शांता बरोबरच फराळ पाठवीत असत. त्या निमित्ताने दोघांचे बोलणे गप्पा होत असत .वहिनी दादासाहेबांच्या पत्नी, काही पदार्थ झाला की तो लगेच शांतारामसाठी वेगळा काढून ठेवीत असत.शांताराम दोन दिवस दिसला नाही तर त्याच्या प्रकृतीची चौकशी करीत असत.त्यावरून त्यांनी शांतारामला पास केले असे लक्षात येत होते .
दादासाहेबांनी तिला पटवून दिले होते की पैशापेक्षा माणसे मोठी असतात .शांतारामचे आईवडील जरी आपल्या इतके श्रीमंत नसले तरी माणसे स्वभावाने फार चांगली आहेत . आपली मुलगी त्यांच्याकडे सुखात राहील.शांताराम याच कॉलेजवर राहील असे आपण पाहू म्हणजे मुलगी आपल्या समोरच राहील .सदानंद शिक्षणासाठी परदेशात गेला आहे त्याच्या पत्रावरून, तो तिकडेच बहुधा स्थायिक होईल असे वाटते .इथे आपल्याला शांता शिवाय कोण आहे?जावई म्हणजे मुलगाच की ?
शांतारामचे आईवडील इथे काही दिवस आले होते.त्यावेळी वाहिनी व त्यांची चांगली ओळख झाली होती.दादासाहेबांनी समजून सांगितल्यावर व शांतारामाच्या आईवडिलांशी ओळख झाल्यावर वहिनींचा थोडासा असलेला विरोध पूर्णपणे मावळला होता .
हे सर्व होत असताना शांतारामला त्याची काडीमात्र कल्पना नव्हती.दादासाहेबांच्या मनात नक्की काय आहे, वहिनींचे मत काय आहे ,त्याचा अंदाज त्याला आला असला तरी खात्री पटली नव्हती
त्याने एक दिवस दादासाहेबांजवळ बोलताबोलता खानावळीतील जेवण चांगले नसते अशी तक्रार केली.दादासाहेबांनी त्याला आमच्या इथे इतक्या जणांचा सैपाक होतो त्यात तुम्ही काही जड नाही उद्यापासून आमच्याकडे जेवायला या असे सांगितले होते .तेव्हापासून शांताराम दादासाहेबांकडे जेवूं लागला होता.आता तर शांता त्याला रोज दोन तीनदा भेटत होती .
हळू हळू शांताराम दादासाहेबांच्या घरातील एक घटक होऊ लागला होता.
या सगळ्या घटनांमध्ये दादासाहेबांनी केलेली एक गोष्ट जी शांतारामला माहीत असण्याचे कारण नव्हते ती फक्त अविनाशला माहीत होती .इंजिनीअरिंग आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स या कॉलेजेसचे प्राचार्य दादासाहेबांच्या चांगले ओळखीचे होते .तुमच्या पाहाण्यात एखादा चांगला मुलगा आला तर मला सुचवा असे त्यांना दादासाहेबांनी सांगितले होते .शांतारामचे नाव कॉलेजच्या प्राचार्यानी दादासाहेबांना सुचविले होते .दादासाहेबांनी शांतारामबद्दल सर्व माहिती अगोदरच काढली होती.त्यांना तो पसंत पडल्यावर मगच त्यांनी अविनाशला त्याला आपल्याकडे आणायला सांगितले होते. अविनाशची व दादासाहेबांची पहिल्यापासूनच ओळख होती.अविनाश शांतारामला घेऊन त्यांच्या बंगल्यावरून सहज जात नव्हता . तो शांतारामला दादासाहेबांकडे घेऊन जाणारच होताच.एवढ्यात योगायोगाने शांता सायकलवरून आली आणि त्याना आत घेऊन गेली.दादासाहेब व शांताराम यांची भेट हा योगायोग नव्हता तर तो घडवून आणलेला योगायोग होता .
शांतारामला हार्मोनियम चांगला वाजवता येत असे .रिकाम्या वेळी करमणूक म्हणून तो मराठी भावगीते जुन्या सिनेमातील गाणी आणि हिंदी गाणी वाजवत असे.जेव्हा दादासाहेब घरी असत तेव्हा ते मुद्दाम गाणी ऐकण्यासाठी तिथे येऊन बसत .वहिनीही येत असत .शांता तर प्रथम पुढे असे .शांताला हार्मोनियमवरील गाणी ऐकून स्वतः हार्मोनियम शिकावा असे वाटू लागले .ती शिकण्यासाठी शांतारामकडे येऊ लागली .तिला हार्मोनियम शिकण्याचे उत्तेजन दादासाहेबांनी दिले होते .दोघांचीही शिकवणी हळूहळू रंगू लागली .त्या रंगाचा भंग कुणी करीत नसे.
क्वचित केव्हा दोघे संगमावर फिरायला जाऊ लागले.त्या काळात आणि लहान गावात लग्न न होता दोघांनी फिरणे संयुक्तिक समजत नसत.दोघेही बाहेर कधी फिरायला विशेष गेली नाहीत.सिनेमाला जाताना ती स्वतंत्र जाई तो स्वतंत्र जाई आणि दोघे थिएटरवर एकत्र भेटत.
शेवटी दोघांचे लग्न निश्चित झाले .लग्न संपन्न झाले .शांता आउट हाऊसमध्ये राहायला आली.की शांताराम बंगल्यात राहायला गेला हे विशेष महत्त्वाचे नाही .
*शिकारी कोण? आणि शिकार कोणती? याबद्दल संभ्रम आहे.*
*शांता व शांताराम दोघांनाही आपण शिकारी असे वाटत होते.*
*दादासाहेब स्वतःलाच शिकारी समजत होते *
* जाऊ द्या झाले गैरसमजातच त्यांचा आनंद आहे*
*खरी शिकारी नियती होती!*
(समाप्त)
१५/१/२०२०©प्रभाकर पटवर्धन