Get it on Google Play
Download on the App Store

५ प्रेम विवाह कथा १-२

(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )                

आपल्या वाचनात बर्‍याच  वेळा नागरी प्रेमकथा येतात .त्यातील बहुतेक प्रेमकथा मध्यम वर्गातील युवक युवतींवर  लिहिलेल्या असतात .

याचा अर्थ असा नाही की प्रेम हे फक्त अशाच स्तरावर होत असते .शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, नागरी ग्रामीण ,तरुण वयस्कर , कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी, प्रेम बसू शकते .प्रेम विवाह होऊ शकतात.थोडक्यात प्रेमाला वय, जात ,धर्म, आर्थिक स्तर,शिक्षण, कशाचाही अडथळा नसतो .

पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते .

तुम्ही व आम्ही म्हणजे सर्व समाज आला .

लेखक जसे जसे सर्व स्तरातून येऊ लागतील किंबुहना येऊ लागले आहेत .तसतश्या सर्व स्तरातील जात,धर्म,वय, आर्थिक स्तर यामधील प्रेमकथा आपल्याला वाचायला मिळतील . 

प्रेम म्हणजे काय हे सांगणे मोठे कठीण आहे . लैंगिक आकर्षण, पूर्वजन्मीची  पटलेली खूण,ही आपलीच हा आपलाच अशी आत्मिक ओळख ,नक्की सांगणे मोठे कठीण आहे.इथे आपण विशिष्ट  प्रकारच्या  स्त्री पुरुष प्रेमाबद्दल विचार करीत आहोत .विचाराची मर्यादा संकुचित आहे . प्रियकर प्रेयसी या प्रेमाबद्दल विचार करीत आहोत .

एवढी प्रस्तावना पुरे .आज मी तुम्हाला मी पाहिलेल्या एका  ग्रामीण प्रेमविवाहाची कथा सांगणार आहे .

गाव तसा मोठा होता .गावाला बारा वाड्या होत्या .कुणबी तेली तांबोळी बामण महार चांभार सुतार कुंभार लोहार अशा विविध जातींच्या निरनिराळ्या छोट्या किंवा मोठ्या वाड्या होत्या .गाव अस्ताव्यस्त पसरलेला होता .गावाला समुद्र किनारा व नदी किनारा होता .समुद्राच्या काठाच्या, कोणत्याही गावाच्या  समुद्र किनाऱ्याचे निरीक्षण केल्यास,बहुतेक वेळा आपल्याला पुढील गोष्टी आढळून येतील . नेहमी दोन डोंगर समुद्रात घुसलेले दिसून येतात .त्या दोन डोंगरांमध्ये समुद्र किनारा लहान किंवा लांबलचक, कमी जास्त रुंद पसरलेला असतो .त्या दोन डोंगराच्या आश्रयाने  लहान किंवा मोठ्या नद्या समुद्राला येऊन मिळत असतात. समुद्र किनारी किंवा खार्‍या नदी किनारी राहणारी वस्ती दर्यावर्दी लोकांची असते .त्यामध्ये खारवी, दालदी, भंडारी,इ. लोक येतात.यात मुस्लिम,ख्रिश्चन  हिंदू सर्व धर्माचे लोक असतात .

मी सांगतो या गावामध्ये भंडारी लोकांची वस्ती समुद्र किनारी होती .भंडारी दर्यावर्दी जमात म्हणून प्रसिद्ध आहे . शिवाजीच्या काळामध्ये आरमारात भंडारी लोकांची संख्या मोठी होती .शूर निडर,काटक,जिवाला जीव देणारी, तापट, अशी ही जमात आहे .

तर या गावात एका डोंगरापासून दुसऱ्या डोंगरापर्यंत समुद्रकिनारी पसरलेल्या वाळूला लागून भंडार्‍यांची घरे होती .साधारण रचना पुढील प्रकारची होती .समुद्र ,किनारा, समुद्र किनारी उगवणारी उंडिणी यासारखी काही झाडे, सुरूचे बन,टेकडीसारखा उंचवटा, नंतर थोडी सपाटी, त्यानंतर घरे

प्रत्येक घर स्वतंत्र होते. त्याच्या चारी बाजूला त्या घरमालकाची जमीन होती. घराभोवती बाग.बागेत माड पोफळी आंबे क्वचित केळी या झाडांची प्रामुख्याने लागवड होती.दोन घरांमध्ये एक सामायिक कुंपण होते.घराच्या पुढच्या बाजूला फाटक व नंतर रस्ता होता.

गाव मोठा असला तरी गावात शिक्षणाचा प्रसार  विशेष  झालेला नव्हता. गावातील शाळा सातवीपर्यंतच होती. त्यापुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागे.

घरी शिक्षणाची पार्श्वभूमी नसल्यामुळे बरीच मुले चौथीनंतर शिक्षण घेत नसत .फारतर सातवी म्हणजे डोक्यावरून पाणी गेले.शेती करणे, पारंपरिक व्यवसाय सांभाळणे ,हेच मुलाला करायचे असल्यामुळे जास्त शिक्षणाची गरजही भासत नसे. तर मुलीला लग्न होऊन सासरी जायचे असे  व तेथील वातावरणाशी जुळवून घ्यायचे असे. 

सधन भंडार्‍यांच्या स्वतःच्या होड्या, लॉन्च, होत्या.अश्या होडय़ांवर इतर भंडारी किंवा काही वेळा कुणबी वगैरेही   नोकर म्हणून काम करीत असत.होड्या गलबत लॉन्च  यांचा उपयोग माल माणसे यांच्या वाहतुकीसाठी केला जात असे.तसेच काही होडय़ा गलबते लाँच वगैरे   समुद्रात मासेमारीसाठी जात असत.बऱ्याच भंडाऱ्यांची शेतीही होती. 

तर समुद्र किनारी परश्या व गणप्या अश्या  दोघा भंडार्‍यांची घरे  एकाशेजारी एक होती. शेजारी शेजारी असले तरी ते हाडवैरी  होते .त्यांच्यामधून विस्तव जात नसे.त्यात परश्याचे गणप्याशी जास्त वैर होते .वैर या पिढीतच  सुरू झाले होते.वैराचे कारण हास्यास्पद होते .परश्याला मुलगी सांगून आली होती.त्याला ती आवडली होती. वडील मंडळीचे देण्या घेण्यावरून फिस्कटले .तीच मुलगी नंतर गणप्याला सांगून गेली.तिचे गणप्याशी लग्न झाले.तेव्हापासून परश्या गणप्याशी निष्कारण वाकड्यात जाऊन बोलू लागला. वागू लागला.

जशास तसे या न्यायाने गणप्याही परश्याशी वैर असल्यासारखे वागू लागला.काळाच्या ओघात त्यांच्या भांडणाला जास्त पीळ पडत गेला.भांडणाची कारणे अत्यंत क्षुल्लक व हास्यास्पद असत.  दोघांचे कुंपण समान असल्यामुळे कुंपणाजवळची झाडे त्यांचा विस्तार एकमेकांच्या आगरात (बागेत) जात असे .माड(नारळाचे झाड ) पोफळ( सुपारीचे झाड)आंबा, कोणत्याही झाडाला  सरळ लंबरेषेत आकाशाकडे विस्तार करता येत नाही .ती कुठेही तिरकी आरकी जातात.तुझ्या झाडाचा विस्तार माझ्या आगरात कां आला? तो विस्तार छाटून टाक.किंवा माझ्या आगरात  जो विस्तार आला त्यावरील सर्व फळे माझी आहेत ती मला मिळाली पाहिजेत .माड पोफळ यांचा विस्तार छाटून टाकायचा म्हणजे ते झाडच छाटून टाकले पाहिजे.

प्रत्यक्षात परस्परांच्या झाडांचा विस्तार एकमेकांच्या आगरात जात होता .काहीतरी तोडगा काढता आला असता .परंतू तोडगा काढण्यापेक्षा भांडण उकरण्यात करण्यात दोघांनाही जास्त रस होता .दोघांचीही शक्ती व बुद्धी उत्पादन कार्याकडे लागण्यापेक्षा अनुत्पादित कार्याकडे लागत असे.दोघांची शेतीही एकमेकांना लागून होती .त्या दोघांच्या शेतामध्ये बांध होता त्यावर झाडे होती त्यांच्या विस्तारावरून पुन्हा हेच भांडणाचे कारण निर्माण  होत असे .घरी व शेतांमध्ये भांडण चालूच असे .

गणप्याला  गावात जायचे असल्यास परश्याच्या शेतातून गेले तर चटकन जाता येत असे .अन्यथा फार लांबचा वळसा मारून जावे लागत असे .परश्या गणप्याला आपल्या शेतातून जायला परवानगी देत नसे.

दिवस महिने वर्षे अशीच चालली होती .परश्याला मुलगा व गणप्याला मुलगी झाली.परश्याच्या मुलाचे नाव सखाराम  तर गणप्याच्या मुलीचे नाव गोदावरी.पूर्वीच्या काळी नावे ठेवताना देवदेवता व नद्या यांची नावे ठेवली जात असत .गोदा सख्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती. शाळेत दोघांचीही दाट मैत्री होती .शाळेत जाताना व परत येताना दोघेही बरोबरच येत असत.घरातून निघताना गोदा जरा अगोदर निघत असे. थोडे पुढे जाऊन ती एका झाडाखाली सख्याची वाट पाहात थांबे.सख्या थोड्या वेळाने घरातून निघून तिच्याबरोबर पुढे शाळेत जात असे.

दोघेही यथावकाश वयात आली. मोठी झाली.शहाणी झाली.वयसुलभ प्रेम त्यांच्यात निर्माण झाले.आपण विवाह करावा असे त्यांना वाटू लागले . आपले वडील याला केव्हाही  परवानगी देणार नाहीत याची त्यांना खात्री होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे  परश्या व गणप्या यांच्या बायकांची परस्परांशी  चांगली मैत्री होती. त्यांचे अजिबात  भांडण नव्हते.त्या दोघी एकाच गावच्या होत्या . लहानपणापासून त्या मैत्रिणी होत्या .एकाच गावात शेजारी शेजारी आपण जाणार यामुळे त्या आनंदात होत्या .आपली मैत्री लग्नानंतरही तशीच चालू राहील असे त्यांना वाटत होते .परश्याच्या ऐवजी गणप्याशी लग्न झाले यात नर्मदेचा काहीच गुन्हा नव्हता.

लग्नानंतर त्यांना गप्पा मारता येत नसत. भेटता येत नसे. चोरून भेटावे लागे.परश्या व गणप्या यांच्यामध्ये मैत्री असती तर त्यांना परस्परांकडे सहज जाता आले असते.त्यांच्या सामायिक कुंपणाला फाटकही ठेवता आले असते .किंवा  कुंपणावरून उडी मारूनही पटकन जाता आले असते  .परंतु नवर्‍यांच्या  भांडणापायी दोघींचाही जीव घुसमटत असे.घोव(नवरे) बाहेर गेलेले असतील त्यावेळी फाटकाकडे  एक डोळा ठेवून दोघी सामायिक कुंपणाजवळ येऊन गप्पा मारीत असत .

दोघांमधील भांडण संपावे .आपल्या मुलांचे लग्न व्हावे.  मैत्रिणींचे रूपांतर विहिणीमध्ये व्हावे असे दोघींनाही वाटत असे.मुलांची मैत्री होती .तरुण वयात मैत्रीचे रूपांतर प्रेमात आकर्षणात झाले होते .त्यांच्या आयांचीही या लग्नाला संमती होती .अडथळा फक्त गणप्या व परश्या यांचा होता.

गोदा व सखा यांचे परस्परांवर प्रेम आहे हे त्यांच्या आयांना माहित नव्हते .

गोदा व सखा या दोघांनीही आपल्या आयांच्या  मार्फत काहीतरी कारस्थान करून विवाह जमून यावा असे वाटत होते.

आपल्या वडिलांचे भांडण संपावे असे त्यांना वाटत होते .

तसे काही न झाल्यास त्यांना नाईलाजाने वडील सांगतील तिथे लग्न करावे लागले असते.

(क्रमशः)

७/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन