Get it on Google Play
Download on the App Store

८ प्रेम गाथा २-३

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

दोघेही आता ठरवून एकाच ठिकाणी जात .एकाच हॉटेलात उतरत.जोडीने बरोबरच हिंडत.ती चित्रे काढी.चित्रे काढीत असताना  हा तिला व ती चित्रे कशी काढते ते पाहात असे.

तो गात असे.ती ऐकत असे.पूर्वी तो केवळ स्वानंदासाठी गात असे .आता तो तिच्यासाठी गात असे .ती गीत सुचवी हा ते गाई.

एकूणच दोघांचे आकडे चांगले जुळले होते . अजून कुणीच कुणाला लग्नाबद्दल विचारले नव्हते .किंबहुना कुणी विवाहित आहे काय हेही विचारले नव्हते .परस्पर अविवाहित आहेत असे गृहीत धरून ती दोघे चालली होती.

मीराच्या वागण्यात पडत असलेला फरक तिच्या आई वडिलांच्या लक्षात आला .जी मुलगी पूर्वी चित्रांमध्ये रमत असे ती आता एकाएकी गायनात कशी रमू लागली याचे कोडे त्यांना पडत असे.

शामच्या घरीही त्याच्या आईवडिलांची तीच स्थिती होती.नेहमी 'आ' 'ऊ' मध्ये दंग असलेला आपला मुलगा एकाएकी चित्रांमध्ये रस कसा घेऊ लागला त्याचे त्यांना नवल वाटत होते.

मीराचा व्यक्तिचित्र (पोट्रेट) मध्येही हातखंडा होता.तिने शामला समोर बसवून मेहनतीने त्याचे पोर्ट्रेट तयार केले.ते त्याला प्रेझेंट दिले.एक दिवस तो ते घरी घेऊन आला .आपल्या शयनगृहात त्याने ते लावले .अर्थात त्याअगोदर त्याने ते त्याच्या आईबाबांना दाखविले होते.पोर्ट्रेट तयार करायला चित्रकाराला किती पैसे द्यावे लागले असे बाबांनी विचारले.त्यावर हसत हसत अगदी मोफत असे उत्तर त्याने दिले .चित्राखाली नेहमीप्रमाणे मीरा अशी लपेटदार अक्षरे मीराने काढली होती.ती बाबांच्या नजरेतून सुटली नव्हती .ही कोण मीरा असे त्यांनी विचारले.त्यावर त्याने मीरा भेटल्यापासूनची सर्व हकीगत दोघांनाही सांगितली.पुढे तुम्ही काय ठरवले आहे असेही बाबांनी विचारले .तर आईने तिला एकदा घरी घेऊन ये असे सांगितले .

शाम म्हणाला मी तिला अजून लग्नाबद्दल विचारलेले नाही.आम्हा दोघांत तो विषयच अजून निघाला नाही.आम्ही बरोबर फिरतो. गप्पा मारतो.एकाच हॉटेलात उतरतो.आमच्यापैकी कुणीच अजून तो विषय काढलेला नाही .आमचे स्वभाव जुळतात .आमच्यात स्नेहपूर्ण घट्ट मैत्री आहे .मनोमन मी तिला वरले आहे .तिचीही बहुधा तीच अवस्था असावी.यावर त्याचे बाबा म्हणाले,व्वा !एकाच हॉटेलात उतरता बरोबर फिरता आणि मुख्य मुद्दाच दोघांनी एकमेकांना विचारलेला नाही आनंद आहे .शाम म्हणाला आमच्या खोल्या स्वतंत्र असतात. बाबा म्हणाले मला तुझ्याबद्दल खात्री आहे .तू तसे काही वावगे करणार नाहीस .तरीही तुम्ही दोघांनी विवाह केलेला चांगला.त्यावर शामने होकारार्थी मान हलवली .

बाबा तरीही तो विषय तसा सोडायला तयार नव्हते .तुमचे एकमेकांवर प्रेम आहे याबद्दल मला खात्री आहे .तुम्ही वावगे वागणार नाही याचीही खात्री आहे .आपल्याजवळ कमी असला तरी पुरेसा पैसा आहे .तरीही तुम्हा दोघांना आर्थिक स्वातंत्र्य असले पाहिजे .तू नोकरी करीत नाहीस.तुला गायनातून विशेष पैसा मिळत नाही .स्वानंदासाठी गाणे वगैरे भाषा ठीक आहे.परंतु शेवटी व्यवहार पाहिला पाहिजे .तू आर्थिक स्वतंत्र झाल्याशिवाय विवाह करता कामा नये असे मला वाटते.निदान तू आणि मीरा यांचे एकत्रित उत्पन्न तुम्हाला पुरेसे असले पाहिजे.या बाबांच्या बोलण्यावर त्याची आई म्हणाली ,असे काय कठोरपणे बोलता ?आपला सर्व पैसा त्यांचाच नाही का ?यावर बाबा म्हणाले ते सर्व बरोबर आहे तरीही प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे . आतापर्यंत शामने त्याच्याजवळ असलेल्या कलेचा पैसा मिळवण्यासाठी वापर केला नाही .मी त्याला दोन चारदा सुचविले .त्याने त्याकडे दुर्लक्ष केले .मीही तो मुद्दा फारसा ताणला नाही . परंतु लग्न करायचे म्हटल्यावर याबाबत मी सर्वांच्याच हिताच्या दृष्टीने आग्रही आहे .शामने होय,आजपासून प्रयत्नांना सुरुवात करतो असे सांगितले.

मीराला एकाएकी निर्माण झालेली गाण्याची आवड तिच्या बाबांच्या लक्षात आली होती.तिचे तास न् तास फोनवर बोलणेही त्यांच्या लक्षात आले होते.त्यांच्या मित्रांकडून मीरा कुणाबरोबर तरी हिंडत असते हाही अहवाल त्यांना मिळाला होता.मीरा स्वत:हून सांगेल म्हणून ते वाट पाहात होते.मीरा तसे कांही आपणहून सांगेल असे त्यांना वाटेना.शेवटी त्यांनी तिला स्पष्टच विचारले. तिनेही पहिल्यापासून सर्व हकिगत सांगितली.आम्ही एकमेकांना गृहीत धरले आहे .प्रत्यक्षात यासंदर्भात आमचे काहीही बोलणे झालेले नाही .तो मला विचारील म्हणून मी वाट पाहत आहे असे उत्तर दिले.

त्यावर तिच्या बाबांनी ते सर्व ठीक आहे परंतु पोटा पाण्याचे काय असा सरळ प्रश्न विचारला.तो चांगला गातो असे तू म्हणतेस.मी तर त्याची गाणी रेडिओ टीव्ही कुठेही ऐकली नाहीत .त्याचा फोटो त्याचे नावही कुठेही पाहिले नाही .शाम नोकरी करतो का?करत असल्यास त्याला पगार किती ?त्यामध्ये तुम्हा दोघांचे भागेल का? तू हौस म्हणून चित्र काढतेस. तुझी चित्रे चांगली असतात यात शंकाच नाही .परंतू त्यातून तुलाही विशेष काही उत्पन्न मिळत नाही.तुझा तू सर्व खर्च भागवतेस यापलीकडे कांही नाही. तूही चित्रकलेचा पैसा मिळविण्याच्या दृष्टीने उपयोग करावा.निदान तुम्हा दोघांचे एकत्रित उत्पन्न तुम्हाला पुरेसे पाहिजे.

बघ शांतपणे विचार कर .आमच्यावर रागवू नकोस . चिडू नकोस.मी प्रॅक्टिकल व्यवहारी माणूस आहे.गायन ऐकून किंवा चित्रे बघून पोट भरत नाही .गाणे गाऊन  किंवा चित्रे काढून पोट भरत नाही.मी या बाबतीत गंभीरपणे बोलत आहे.

शामने मीराला मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे, अापण कुठे भेटू या असे विचारले.दोघांची एका बागेत भेट झाली .शामने मीराला  प्रेमिकाच्या थाटात प्रपोज केले. तिनेही होकार दिला .दोघेही मनोमन जे समजून चालले होते ते प्रत्यक्षात आले.

प्रथमच मीराने शाम कुठे नोकरी करतो का ते विचारले . आतापर्यंत  दोघांच्या होणाऱ्या संभाषणामध्ये हा फारच व्यावहारिक जमिनीवरील प्रश्न होता .त्याचे उत्तर अर्थातच नाही असे होते.तिने तिचे बाबा काय म्हणाले ते सांगितले .त्यानेही त्याचे बाबा काय म्हणाले ते तिला सांगितले .दोघांनीही त्या दिवसापासून अर्थार्जन करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करण्याचे ठरविले.

आपण काय हां हांम्हणता पैसा मिळवू अशा भ्रमात ती दोघे होती.प्रत्यक्षात जग कठोर आहे प्रत्येक ठिकाणी रॅकेट्स असतात याचा अनुभव त्यांना यायचा होता .   

अर्थार्जनाच्या दृष्टीने त्याने विचारच केला नव्हता.बाबांनी अनेकदा सांगूनही तो आपल्याच धुंदीत होता .आपण इतके सुरेख गातो की आपण गेल्या गेल्या आपल्याला पार्श्वगायक म्हणून संधी मिळेल.असे त्याला वाटत होते .आपल्याला गायनाची संधी मिळेल .आपल्या रेकॉर्ड्स येतील.आपल्या गायनाचे कार्यक्रम होतील .निदान आपल्याला पोटापुरते तरी मिळेल अशी त्याची समज होती.दुसऱ्या दिवसापासून त्याने संगीतकार, नाटककार,निर्माते यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली.त्याला काही ठिकाणी संधी मिळाली नाही असे नाही.परंतू जवळजवळ फुकट गा किंवा नंतर पैसे देऊ असे त्याला सांगण्यात आले .आपण काय आता हवे तेवढे पैसे मिळवू असा असणारा त्याचा भ्रम दूर झाला. त्याचे पाय जमिनीवर आले .तरीही तो तडजोड करण्याला तयार नव्हता.

मीराला आपण चित्र प्रदर्शन भरवू.चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी असंख्य लोक येतील .आपण वर्तमानपत्रात बातम्या मध्ये वाचतो त्याप्रमाणे आपल्याला कित्येक लाख नाही परंतु हजारो रुपये मिळतील अशा भ्रमात मीरा होती.प्रत्यक्षात तिला तिची आवडती चित्रे लोक काही शेकड्यात मागत होते .ती अर्थातच त्या किमतीला चित्रे विकण्याला तयार नव्हती .कांही चित्रे विकली गेली.परंतु प्रत्यक्षात फारच कमी उत्पन्न मिळाले .

दोघांनाही आपल्याला पुरेश्या उत्पन्नाचा स्रोत चालू राहील असे वाटत होते तसे प्रत्यक्षात होत नाही असे आढळून आले . अहंकारापायी दोघेही ते स्वतःजवळ किंवा परस्परांजवळ मान्य करायला तयार नव्हती.

शामच्या वडिलांनी त्याचा अहंकार डिवचला होता. लग्न करायचे .स्वतंत्र संसार थाटायचा. तो यशस्वी करून दाखवायचा असे त्याने ठरविले.मीराच्या बोलण्यावरून आपल्याला पुरेसा पैसा मिळाला नाही तरी तिच्या व आपल्या  उत्पन्नात  आपले भागेल असे त्याला वाटत होते.बरोबर मीरालाही तसेच वाटत होते.थोडक्यात प्रत्येकाने आपले पत्ते उघड केले नव्हते .दोघेही एकप्रकारे परस्परांना फसवीत होती.

शामने आपल्या आईवडिलांना लग्नानंतर मी स्वतंत्र संसार थाटणार असे सांगितले.त्यावर आई भावुक होऊन त्याला वेगळा संसार करून द्यायला तयार नव्हती.बाबांनी तिची समजूत काढली .शाम आपलाच आहे.आपला सर्व पैसा त्याचाच आहे.तो आपल्या जवळ, आपण त्याच्याजवळ राहणार आहोत.तरीही त्याचा भ्रमनिरास होणे आवश्यक आहे .आतापर्यंत तो फुलासारखा राहिला आहे .आपण त्याच्यावर आतापर्यंत  कुठच्याही गोष्टीचा जोर दिलेला नाही  विशेष जोर केलेला नाही.त्याला जगाची कठोरता कळूद्या.शामनेही आईची समजूत काढली.तो आईला म्हणाला हा एक प्रयोग आहे.यशस्वी होईल अशी आशा आहे .निदान आम्हा दोघांचे एकत्रित उत्पन्न पुरेसे होईल असा आम्हाला विश्वास आहे.तसे झाले नाही तर मी कुठे तरी जी मला मिळेल ती नोकरी स्वीकारीन.मी तुमच्या आग्रहासाठी इंजिनिअर झालो आहे.मला कमी जास्त पगाराची नोकरी नक्की मिळेल .

तिकडे मीरानेही आपल्या आई वडिलांची तशीच समजूत काढली.

* तिच्या आई वडिलांनी शेवटी शाम इंजिनिअर आहे.*

*आपली मुलगीही एम ए आहे.*

*दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे .*

*पोटापुरते मिळवतील.  नाहीतर आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू .असा विचार करून लग्नाला संमती दिली.*

*संमती दिली नाही तरीही पोरे ऐकणार नाहीत.*

*कदाचित त्यांनी ऐकले तरी ती रंजीस होतील.*

*त्यांच्या मनासारखे होऊ दे असे म्हणून मनातून किंचित खट्टू होऊन परंतु वरवर हसत हसत  संमती दिली.*                          

(क्रमशः)

१६/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन