Get it on Google Play
Download on the App Store

९ प्रेम गाथा ३-३

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

तिच्या आई वडिलांनी शाम इंजिनिअर आहे. आपली मुलगीही एम ए आहे.दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे .पोटापुरते मिळवतील .नाहीतर आपण आहोतच.आपण  त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू .असा विचार करून शेवटी लग्नाला संमती दिली.

संमती दिली नाही तरीही पोरे ऐकणार नाहीत.कदाचित त्यांनी ऐकले तरी ती रंजीस होतील.त्यांच्या मनासारखे होऊंदे. असे म्हणून मनातून किंचित खट्टू होऊन परंतु वरवर हसत हसत  संमती दिली.दोघांचाही एक निर्णय चांगला होता .आई वडिलांना दुखवून ,रंजीस करून, त्यांच्या मनाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचे नाही.अशा स्थितीत कुणालाही सुख लागणार नाही .आई वडील नाराज असतील तर आपण तरी सुखी कसे होणार ? विवाह दोन व्यक्तींचा होत असला तरी दोन कुटुंबांचा, दोन खानदानांचा, त्याच्याशी संबंध येत असतो.                              

मीरा शामच्या आई वडिलांना भेटायला आली होती.शामच तिला घेऊन आला होता.एकदा मीराचे आईवडील शामच्या आई बाबांना भेटायला आले.बरोबर अर्थातच मीरा होती .शामही घरी होता.ओळख झाल्यावर व्याही व्याही होणार हे ठरल्यावर त्यांचे परस्परांकडे येणे जाणे सुरू झाले 

त्यागोदर मीरा शामला घेऊन त्यांच्या घरी गेली होती.दोघांच्याही घरून हा विवाह न करण्यासारखे काहीही नव्हते. मुले रंजीस होतील बंड करतील म्हणून  बळजबरीने नव्हे तर सारासार विचार करून दोघांच्याही आई वडिलांनी मनापासून संमती दिली.

थाटात विवाह संपन्न झाला .कांही दिवस मीरा शामच्या घरी  त्याच्या आई वडिलांकडे रहात होती.रीतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे सणवार झाले .शाम व मीरा दोघांनीही वेगळी जागा बघितली होती.दोघांनाही त्यांच्या छंदापासून जरी पुरेसे उत्पन्न मिळत नसले तरी थोडेबहुत उत्पन्न मिळत होते .प्रत्येकजण दुसर्‍याला आपल्यापेक्षा खूप चांगले भरपूर उत्पन्न मिळते असे समजत होता .त्यामुळे आपले स्वत:चे उत्पन्न जरी कमी पडले तरी आपले व्यवस्थित भागेल असा दोघांचाही विश्वास होता .दोघांनीही या विश्वासाला तडा जाऊ दिला नव्हता .उलट गैरसमजात भरच घातली होती.

मीरा माझी चित्रे अशी खपतात तशी खपतात असा आव आणीत असे.मी यांच्याकडे पोट्रेट करायला गेले .मी त्यांच्याकडे पोर्ट्रेट करायला गेले .त्यांनी मला इतके पैसे दिले .लोक मला मी मागेल तितके पैसे त्यांचे पोर्ट्रेट काढण्यासाठी देतात .अशा लंब्याचवड्या बाता मारीत असे.याचा परिणाम काय होईल त्याचा विचार करीत नसे .तिला जे व्हावेसे वाटते ते होतच आहे अशी समजूत करून घेत असे.  

शामही मला असे पैसे मिळतात तसे पैसे मिळतात अश्या  थापा ठोकत असे.अमक्या  फिल्मला मला पार्श्वसंगीतासाठी विचारले गेले. मला पार्श्वगीत गायनासाठी इतके पैसे मिळणार आहेत .असे सांगून स्वतःचे समाधान करून घेत असे .याचा अंतिम परिणाम काय होईल त्याचा तो विचार करीत नसे .जो तो मिळविलेले पैसे स्वत:जवळ ठेवीत असे.त्यामुळे प्रत्यक्षात किती पैसे मिळतात ते कळण्याचा संभवच नव्हता.  

दोघेही स्वतंत्र जागेत राहायला आले.दोघांचाही राजा राणीचा संसार सुरू झाला .थोड्याच दिवसात त्यांना संसाराचे चटके बसू लागले .सर्वारंभ:तंडुला: प्रस्थ मूल: या उक्तीप्रमाणे पैशांसाठी प्रत्येक ठिकाणी अडू लागले.मीरा शामजवळ पैसे मागे .तर शाम मीराजवळ  पैसे मागे.आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त भरपूर पैसे मिळतात असा भ्रम त्यांनी निर्माण केला होता .

सर्व सोंगे आणता येतात परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही.हेच शेवटी खरे .

या जगात केवळ कला असून चालत नाही .त्यासाठी दैव अनुकूल असावे लागते . थोडी बहुत तडजोड करावी लागते .याचे दोघांनाही सुरुवातीला भान नव्हते .भान आल्यावर तडजोडीला तयार असूनही त्यांना पुरेसा पैसा मिळू शकत नव्हता.

हा अनुभव आल्यावर त्यांनी नोकरी करायचे ठरविले .परंतु दुर्दैवाने परस्परांना विश्वासात घेतले नाही .शामला एका कारखान्यात सुपरवायझरची नोकरी मिळाली.त्याची मेकॅनिकल इंजिनीअरिंगची डिग्री उपयोगाला आली होती .गाण्याची ऑडिशन आहे.गाण्याची रिहर्सल आहे.गाणे रेकॉर्ड व्हायचे आहे.अशी कोणती ना कोणती सबब सांगून तो कारखान्यात कामावर जावू लागला .

मीराचीही अवस्था याहून फारशी वेगळी नव्हती.मला एका मोठ्या श्रीमंताचे पोर्ट्रेटचे काम मिळाले आहे .मला तिथे जावे लागते असे सांगून ती घराबाहेर पडत असे.तिला ऑफिसात नोकरी मिळाली होती .तिच्या गोड आवाजावर ,तिच्या चटपटीतपणावर, तिच्या दिसण्यावर, तिला स्वागतिकेची,रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली होती .

दोघांनाही बऱ्यापैकी पैसा मिळत होता .अर्थात त्यांना त्यांच्या कलेतून जो पैसा मिळू शकला असता त्याच्यापेक्षा कितीतरी  कमी पैसा त्यांना मिळत होता.दोघेही सकाळी नाष्टा करून डबा घेऊन कामावर जाण्यासाठी लवकर घराबाहेर पडत.तो त्याच्या कारखान्यात जाई .ती तिच्या ऑफिसमध्ये जाई.

एक दिवस ती कामांमध्ये गुंतलेली असताना तिला  साहेबांनी मला बोलाविले आहे येऊ का ते विचारा, असे कुणीतरी विचारले .आवाज ओळखीचा वाटला म्हणून तिने चमकून वर पाहिले.ध्वनिमुद्रणाला जातो म्हणून सांगून सकाळी बाहेर पडलेला शाम तिच्या पुढ्यात उभा होता .

पोर्ट्रेट काढण्यासाठी म्हणून बाहेर पडलेली मीरा त्याच्यासमोर कारखान्याच्या ऑफिसमध्ये स्वागतिकेच्या खुर्चीत बसलेली होती.

दोघेही परस्परांना पाहून चकित झाली .त्यांना धक्का बसला .ही वेळ आपल्या भावना दाखविण्याची बोलण्याची नव्हती. तिने आपल्या भावना लपविल्या.समोर ऑफिसमधील सर्व  मंडळी बसलेली होती.तिने इंटरकॉमवर फोन करून साहेबांना शाम आल्याचे कळविले.त्यांनी परवानगी देताच त्याला जा म्हणून सांगितले .तिला एकीकडे प्रचंड ताण जाणवत होता .अाज सध्याकाळी शामला तोंड कसे दाखवायचे या विवंचनेत ती होती.तिला प्रचंड रडू कोसळत होते.आपण सुरुवातीलाच खरे ते बोलायला पाहिजे होते.चुकीची भावना तिला अंतर्यामी खात होती . तिने सफाईने आपल्या भावना लपविल्या .जणू काही, कांही झालेच नाही .कुणीतरी अनोळखी व्यक्ती साहेबांना भेटायला गेली अशा थाटात ती तिची कामे करू लागली .

शामचीही अवस्था वेगळी नव्हती.त्यालाही अपराधी भावनेने ग्रासले होते .साहेबानी कोणत्या कामासाठी बोलाविले आहे तेच तो विसरून गेला होता.प्रचंड स्वयं-शिस्तीने स्व-नियंत्रणाने, आपल्या भावना व विचार लपवून, क्षोभ आवरून, तो साहेबांच्या केबिनमध्ये गेला.‍काम संपल्यावर मीराकडे न पाहता तो बाहेर निघून गेला.

दोघांनाही आज रात्री परस्परांना कसे भेटायचे? काय सांगायचे? असा प्रश्न पडला.                  

प्रियकर प्रेयसीमध्ये पती पत्नीमध्ये लपवा छपवीला जागा नसते.लपवा छपवी असू नये .दोघांनीही परस्पराना पूर्णपणे विश्वासात घेतले पाहिजे.जे काही असेल ते सत्य स्पष्टपणे वाटून घेतले पाहिजे .(शेअर केले पाहिजे.)या गोष्टींचे दोघांनाही भान नव्हते .एक लपवाछपवी दुसऱ्या लपवाछपवीला निमंत्रण देते.हळूहळू फसवणूक असत्य विस्तारत जाते .आपण दुसऱ्याला फसवत आहोत ही कल्पनाच नेहमी प्रत्येकाला त्रास देत राहते .एकत्र जीवन जगण्याला, अनुभवण्याला, आनंद मिळविण्याला, आपण मुकतो.एकदा फसवणूक केली की आपण सत्य सांगायला घाबरू बिचकू लागतो.आतापर्यंत आपण दुसऱ्याला फसवले. आता तो किंवा ती काय म्हणेल हाच विचार मनात घर करू लागतो.गिरमीटासारखा मनाला भोक पाडून लागतो .हळूहळू  सहजीवन अशक्य होऊ लागले. मनाचा दाह होऊ लागतो.  

जे कांही असेल ते स्पष्टपणे बोलले पाहिजे.पती पत्नीमध्ये पडदा नसावा .

रात्री दोघेही एकत्र आली . दोघेही स्तिमित होऊन परस्परांकडे पाहात होती.काय बोलावे ते त्यांना सुचत नव्हते.आपण काय केले व काय करायला हवे होते त्याची जाण दोघांनाही झाली होती .

काहीही न बोलता शामने आपले हात फैलावले. मीरा धावत येऊन त्याच्या बाहुपाशात सामावली.या हृदयीचे गूज त्या हृदयात गेले.परस्परांना जे बोलायचे व सांगायचे होते ते न बोलता न सांगता दुसऱ्याला समजले .आपल्याला आवडती कला सोडून, दुसरे रुक्ष काम पैशासाठी  करावे लागते, हे ऐकून दुसऱ्याला क्लेश होतील, ते होऊ नयेत म्हणून प्रत्येकजण दुसऱ्यापासून आपण वेगळे काम करतो, हे छपवीत होता.दुसऱ्याला फसवण्याचा हेतू नव्हता.दोघांचीही परस्परावरील प्रेमापोटी लपवाछपवी चालली होती.परस्परांवरील प्रेमच यातून व्यक्त होत होते.ही लाख मोलाची बात प्रत्येकाला समजली होती. जाणवली होती.या हृदयीचे गूज त्या हृदयी असे झाले होते .

*भविष्य काळात त्यांच्या कलेला जगाकडून दाद मिळेल ना मिळेल.*

*पैशांचा ओघ येईल न येईल .*

*आर्थिक संपन्नता ,सामाजिक मान्यता, मानमरातब, मिळेल न मिळेल.*

*दोघांची हृदये आज खऱ्या अर्थाने एक झाली होती.*

*ही जागृती ही एकात्मता त्या दोघांना सर्वार्थाने जगाशी लढायला सामर्थ्य देणार होती .*

*ताठ मानेने जगायला मदत करणार होती .*

(समाप्त )

१६/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन