५ तीळ
( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
इन्स्पेक्टर दामिनी आपल्या केबिनमध्ये दैनंदिन काम करीत होती.इन्स्पेक्टर म्हणून गेली पाच वर्षे ती कार्यरत होती.एवढ्यात शिपाई तिला मोठ्या साहेबांनी बोलाविले आहे म्हणून सांगत आला ती साहेबांच्या केबिनमध्ये गेली.साहेबांनी लगेच कामाबद्दल बोलण्यास सुरुवात केली.गेले काही महिने रेल्वेमध्ये चोऱ्या होत होत आहेत .या चोऱ्या विशेषतः लेडीज डबे किंवा लेडीज स्पेशल ट्रेन्संमध्ये होतात.गळ्यातील चेन्स मंगळसूत्र पर्सीस यांची चोरी होते.रेल्वेत गर्दी प्रचंड असते.सीसीटीव्हीचा चोर हुडकून काढण्यासाठी उपयोग होत नाही.स्त्रियांच्या डब्यामध्ये चोरी होत असल्यामुळे चोर कुणीतरी स्त्री असणार. तेव्हा गर्दीच्या वेळी निरनिराळ्या लोकलमधून फिरून चोरांचा तपास केला पाहिजे.शक्यतो चोरीच्या वेळी चोराला पकडले पाहिजे.रेल्वे हा रेल्वे पोलिसांचा प्रांत असतो.रेल्वे पोलिस व आपण यामध्ये नेहमीच सहकार्य असते तेव्हा तुम्ही उद्यापासून रेल्वेमधून फिरून या चोराचा किंवा चोरांचा तपास करावा.
दामिनी साहेबांच्या केबिनमधून परत आली आणि आता उद्यासाठी कोणती योजना आखावी याचा विचार करू लागली. दामिनी कराटेमध्ये प्रवीण होती.ती वेषांतरही उत्तम करीत असे.ती धाडसी तर होतीच त्याचबरोबर तिने पोलिस ट्रेनिंग मध्ये पहिला नंबर मिळवला होता.प्रचंड गर्दीमध्ये जरी एखादीला पाकीटमारी करताना, चेन स्नॅचिंग करताना पाहिले, तरी तिला पकडणे शक्य होईल का याबद्दल तिला दाट शंका होती.दुसऱ्या दिवसापासून तिने गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी निरनिराळ्या मार्गावर गस्त घालण्यास सुरुवात केली. प्रत्येक स्टेशनवर उतरणाऱ्यांची व चढणार्यांची प्रचंड गर्दी असते. दादरसारख्या काही स्टेशनवर तर गर्दीचा महापूर असतो.अशा वेळी आपला डावा हात उजव्या हाताने धरता येत नाही.डोक्याला कंड उठली किंवा काहीतरी चावले असे वाटले तरी हात वर करून ना खाजवता येते ना चापटी मारता येते.अशा वेळी आपले पाकीट कोणी मारीत आहे किंवा चेन ओढीत आहे असे लक्षात आले तरी त्याला किंवा तिला धरणे अशक्य होते. अशा वेळी दुरून एखादीला चोरी करताना पाहून तिला पकडणे शक्य होणे मुष्कील होते.
तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे एखादीला चोरी करताना पाहिल्यास तिला नंतर ओळखून पकडता येईल अशा हिशोबाने तिने गस्तीला सुरूवात केली.साहेबांची ऑर्डर असल्यामुळे व अशा कामांमध्ये तिला रस असल्यामुळे ती हे काम यशस्वी करण्यास उत्सुक होती .
एक दिवस संध्याकाळी दादर स्टेशनवर एक बाई दुसर्या बाईच्या गळ्यातील चेन ओढताना दिसली.दामिनीला त्या साखळी चोराला तिथे पकडणे शक्यच नव्हते .तिच्यावर शक्य तितके लक्ष ठेवीत ती तिच्या पाठोपाठ दादर स्टेशनवर उतरली.गर्दीतून ती त्या गळ्यातील चेन ओढणार्या बाईजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होती. गर्दीत तिला ते शक्य झाले नाही.थोडय़ाच वेळात ती बाई गर्दीत दिसत नाहीशी झाली .एका बाईच्या गळ्यातील चेन ओढताना पाहूनसुद्धा दामिनी काहीही करू शकली नाही.
दामिनीने त्या बाईचा चेहरा पूर्ण लक्षात ठेवला होता.ती बाई कुठेही भेटली असती तर दामिनीने तिला लगेच ओळखले असते.त्या बाईच्या हनुवटीवर एक तीळ होता.त्या तीळावरून तिला लगेच ओळखले असते. तो तीळ वैशिष्ट्यपूर्ण होता.नेहमीच्या तिळाच्या आकारापेक्षा तो बराच मोठा होता.तीळ नसता तरीही त्या बाईला दामिनीने कुठेही पकडले असतेच हा भाग निराळा. एक दिवस भाजीबाजारातून जात असताना ती बाई भाजी खरेदी करीत असताना दिसली.तिने त्या बाईकडे निरखून पाहिले.तिच्या हनुवटीवर तीळ दिसतात तिला समाधान वाटले.त्या बाईच्या पाठोपाठ दामिनी चालू लागली.दामिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवीत करारी आवाजात तिला पोलिस स्टेशनला चलण्यास सुचविले.तिने कांं? कशाला? मी काय केले आहे? वगैरे चौकशी सुरू केल्यावर, पोलिस स्टेशनला येण्यास नकार दर्शविल्यावर,जास्त गडबड करू नका. मुकाट्याने पोलिस स्टेशनला चला, नाहीतर मला तुम्हाला बेड्या घालून पोलिस स्टेशनला न्यावे लागेल असा दम दिला.दामिनी साध्या पोशाखात असल्यामुळे त्या बाईने पोलीस स्टेशनला येण्यास विरोध दर्शविला होता.दामिनी साध्या पोशाखातील पोलीस आहे हे लक्षात येताच तिच्या चेहर्यायावरील रंग मावळला.ती मुकाट्याने तिच्याबरोबर पोलिस स्टेशनला आली.
पोलीस स्टेशनला येताच तिची पोलीस चौकशी सुरू झाली.तू चेन स्नॅचर आहेस.आतापर्यंत तू कितीतरी सोनेरी साखळ्या गळ्यातील मंगळसूत्रे व पर्सेस उडविल्या आहेत. बर्या बोलानं कबुलीजबाब दे नाहीतर तुला पोलिसी हिसका दाखवावा लागेल वगैरे दमबाजी सुरू झाली.
तिने मी ती नव्हेच असा पवित्रा घेतला.दामिनीला तिचा हा सर्व कांगावा वाटत होता.मी साधी शिपाई आहे.एका ऑफिसमध्ये मी काम करते.असे म्हणून तिने तिचे ओळखपत्र दाखविले.त्यावर तिचे नाव, ऑफिसचा पत्ता, घरचा पत्ता, इत्यादी सर्व नोंद होती.ऑफिसचा फोन नंबरही दिलेला होता.खोटी कागदपत्रे तयार करून लोकांना फसवले जाते.त्या नंबरवर फोन करून चौकशी करण्यात आली.त्या दिवशी सुटी असल्यामुळे काही उत्तर मिळाले नाही.दामिनी तिला जीपमधून स्वतः घरी पोहोचविण्यास गेली.ती बाई कुठे राहते आणि ओळखपत्रावर दिलेल्या पत्त्यावर खरेच राहतेना याची खात्री तिने करून घेतली.
दुसर्या दिवशी दामिनी तिला घेऊन तिच्या तथाकथित ऑफिसमध्ये गेली.ती बाई खरेच तेथे काम करीत होती याबद्दल तिने खात्री करून घेतली.दामिनी आता विचारात पडली होती.त्या दिवशी गळ्यातील सोन्याची साखळी ओढताना तिने पाहिले होते.परंतु त्याच वेळी ती बाई ऑफिसमध्ये असल्याचा सज्जड पुरावा मिळत होता .दामिनी गोंधळात पडली होती.दामिनीला तीच बाई चोर होती याबद्दल जितकी खात्री वाटत होती तितकाच भक्कम पुरावा ती त्यावेळी तिथे नसल्याबद्दल मिळत होता.यामध्ये काहीतरी रहस्य असले पाहिजे त्या रहस्याचा उलगडा झाला म्हणजे सर्व कोडे सुटेल असा विचार दामिनीने केला.
कुसुम राहते त्या जागी आणखी कोणकोण राहतात अशी चौकशी तिने केली.ती व तिची मुलगी तिथे राहते असे तिने सांगितले.तिचे संपूर्ण नाव कुसुम जयदीप जगदाळे असे त्या ओळखपत्रावर लिहिलेले होते. शेजारीपाजारी चौकशी करता तिच्या बोलण्याला दुजोरा मिळाला .तिच्या कुटुंबीयांबद्दल दामिनीने चौकशी केली.कुसुमचे आईवडिल या जगात नव्हते.त्यांचा मृत्यू झाला होता.तिला एक भाऊ होता.तो नाशिकला रहात होता.तिचे लग्न झाल्यावर तिला एक मुलगी झाली आणि त्यानंतर तिचा नवरा तिला सोडून गेला.कोणाच्यातरी ओळखीने तिला या ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी मिळाली.तिची माहिती शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीशी जुळत होती.कुठेही काहीही कमकुवत मुद्दा आढळून येत नव्हता .
तरीही कुठेतरी काहीतरी चुकत आहे,काहीतरी आपल्या नजरेतून सुटत आहे असे दामिनीला वाटत होते.आपले काय चुकले आहे ते तिच्या लक्षात येत नव्हते.त्या दिवशी सोनसाखळी ओढताना आपण कुसुमला पाहिले यावर दामिनी ठाम होती.एकच शक्यता होती.कुसुम सारखी दिसणारी आणखी एखादी बाई असली पाहिजे.तिची कुसुमशी ओळख असेल किंवा नसेल.दामिनी चौकशी करीत होती त्या काळात चोरीच्या घटना सुरूच होत्या.दामिनीने या काळात कुसुमवर कडक लक्ष ठेवले होते.ती रोज ऑफिसला जात होती.तिच्या वर्तणुकीत काहीही गैर आढळून आले नाही.
दामिनीच्या मनामध्ये एक विलक्षण कल्पना आली.जर ती खरी ठरली तर सर्वच रहस्याचा उलगडा झाला असता.कुसुमच्या ऑफिसमधील एक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज दामिनीने मागितले.त्यातील फक्त कुसुमचे फुटेज तिने वेगळे काढले.ते फुटेज तपासत असताना तिला काहीतरी आपल्या नजरेतून निसटले आहे असे वाटत होते.~हनुवटीवरील तिळाची जागा निरनिराळ्या फोटोमध्ये बदलत होती असे तिला आढळून आले.काही फोटोत तो तीळ बरोबर मध्यभागी होता.तर कांही फोटोत तो अर्ध्या इंचाने उजवीकडे सरकलेला दिसत होता.तिने तेवढेच फोटो पुन्हा पुन्हा निरखून पाहिले.
याचाच अर्थ ऑफिसमध्ये निरनिराळ्या वारी निरनिराळ्या बाई कामाला येत होत्या.आणि त्याचा पत्ता कुणालाच लागत नव्हता.कुसुमची बहीण किंवा तिच्या सारखीच हुबेहुब दिसणारी दुसरी कुणीतरी दुसरीकडे कुठेतरी रहात असली पाहिजे.त्या दोघींचा किंवा निदान एकीचा रेल्वेमधून प्रवास करून स्त्रियांच्या गळ्यातील सोनसाखळ्या मंगळसूत्र पर्सेस चोरण्याचा धंदा असावा.एक हे काम करीत असावी दुसरी ऑफिसमधे जात असावी. ऑफिसमधील काम हा त्यांचा केवळ दिखावा असावा.अन्य वेळी कुणी पकडल्यास आपण ती नव्हेच असे सांगता येणे त्यामुळे शक्य होत होते . गर्दीमध्ये पकडणे शक्य नाही. पकडली जाणार असे वाटल्यास माल फेकून देऊन माझ्यावर उगीचच आळ घेतात असा कांगावा करता येणे सहज शक्य होते.केव्हा तरी पकडल्यास मी ती नव्हेच म्हणून प्रत्येक जण मोकळी होत असावी.त्यासाठी ऑफिसमध्ये नोकरी दाखविली जात असावी.
*कुूसुमला बोलवून तिला पोलिसी हिसका दाखवण्यात आला.*
*आम्हाला सर्व काही कळले आहे असे सांगण्यात आले.*
*मुकाट्याने तुझ्या बहिणीचा पत्ता दे.*
*पोलिसांना सर्व काही कळले आहे असे लक्षात आल्यावर कुसुमने कबुलीजबाब दिला.*
* पोलिसांनी एरवीही तिच्या बहिणीचा पत्ता शोधून काढला असताच.*
* तिने पत्ता सांगितल्यामुळे सर्वकाही सोपे झाले.*
*तिच्या बहिणीला पकडण्यात आले.*
*ज्या सोनाराला त्या सोने विकत होत्या त्याच्याकडून मिळेल तेवढा माल हस्तगत करण्यात आला.*
*दोघांनाही कोर्टाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली.*
*तिच्या मुलीला अनाथगृहात पाठविण्यात आले.*
*जुळ्या बहिणींची केस म्हणून ही ओळखली जाते.*
२६/१०/२०२०©प्रभाकर पटवर्धन