२ विक्रमादित्य २-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
विक्रमादित्याला ओळखण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले होते.
विक्रमादित्य नावाचा माणूस आहे. त्याची संघटना आहे. तो शिक्षा करतो.तो बोलल्याप्रमाणे वागतो हे सर्वांना कळून चुकले.विक्रमादित्य अस्तित्वातच नाही, ही हूलआहे,ही अफवा आहे, हा स्टंट आहे, असे म्हणणार्यांचे तोंड बंद झाले. शहराच्या निरनिराळ्या विभागातील आणखी तीन चार तरुणांना या प्रकारे शिक्षा करण्यात आली .वेळोवेळी जखमी गुंड सोडण्याची जागा हॉस्पिटल्स बदलण्यात येत होती .बातमीदारांनी कॉलेजातील मुलींच्या मुलाखती घेतल्या .विक्रमादित्यामुळे मुलींमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण होते असे त्यांना आढळून आले.
यावर वर्तमानपत्रात आणि इतर सोशल मीडियावर पुन्हा उलटसुलट विचारांचा पाऊस पडला . एकंदरीत मुलींमध्ये व जनतेमध्ये विक्रमादित्याबद्दल आदर व समाधान दिसून येत होते. मुलींच्या छेडछाडीचे प्रकरण त्यानंतर जवळजवळ बंद झाले असावे.
अर्थातच काही उत्साही लोकांनी शासनाविरोधात मोर्चे काढले .सरकार कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगाराला पकडू शकत नाही. शासन बदलले पाहिजे.मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे .अशा मोर्चाच्या मागण्या होत्या .पोलिसांनी नेहमीप्रमाणे ठरलेल्या जागी मोर्चा अडवला.
मोर्चामध्ये पैसे देऊन लोक जमविले होते असा आरोप राज्यकर्त्या पक्षाने केला.
या सर्व हालचालींचा विक्रमादित्याच्या कामावर काहीच परिणाम झाला नव्हता .पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नसावा किंवा त्यात ते यशस्वी झाले नसावेत .
विक्रमादित्याने नंतर चेन स्नॅचिंगचे, मुलींच्या गळ्यातील साखळी मंगळसूत्र खेचण्याचे प्रकरण हातात घेतले असावे . कारण एका रात्री पुन्हा दुसर्या एका हॉस्पिटलसमोर दोन तरुणांना असेच फटके मारून सोडण्यात आले .त्यांच्या खिशात त्यांनी चोरलेली मंगळसूत्रे व सोनसाखळय़ाही होत्या. पोलिसांना हवे असलेले गुंड ते होते .स्त्रियांच्या मागून मोटारसायकलवरून येऊन ते गळ्यातील पोत,साखळी, मंगळसूत्र, खेचीत असत.यामध्ये काही स्त्रियांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या तर काही स्त्रिया जमिनीवर आपटल्यामुळे जखमी झाल्या होत्या .
पंधरा दिवसांनी हॉस्पिटलमधून त्या साखळी चोरांना डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .त्यांची चौकशी करता कितीतरी चोरीचा माल मिळाला.
अशाच प्रकारे आणखी काही गुंडांना शिक्षा करून निरनिराळ्या हॉस्पिटल समोर सोडण्यात आले .
कुणी बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला लुटत असे.
कुणी बँकेत पैसे खाली पडले असे सांगून स्वतःजवळील एखादी नोट टाकून काऊंटरवरील पैसे किंवा बॅग पळवीत असे.
कुणी अंगावर घाण टाकून ती साफ करण्यात मनुष्य गुंतला असता त्याची बॅग पळवीत असे .
कुणी मोटारीची कांच फोडून त्यात ठेवलेला किमती माल पळवीत असे.
विक्रमादित्याची प्रत्येक वेळेला (मोडस ऑपरेंडी) कार्यपद्धती तीच असे.नंबर प्लेट झाकलेली मोटार येई. त्यातून चार बुरखाधारी अकस्मात उतरत .गुन्हेगाराला पळवून नेत.शिक्षा करून त्याला कोणत्या तरी एखाद्या हॉस्पिटलसमोर आणून सोडत.या सर्व हालचाली इतक्या जलद व आकस्मिक होत कि त्यांना कुणीही अडवू शकत नसे.
भुरटय़ा चोरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली.
शहरात प्रोटेक्शन मनी प्रकरण , संरक्षण करतो असे सांगत गोळा केलेल्या पैशांचे प्रकरण नंतर विक्रमादित्याने आपल्या हातात घेतले .
गुंडांनी आपल्या दुकानाची मोडतोड करू नये यासाठी नियमितपणे दुकानदार दरदिवशी पैसा देत असत .पैसा मागणारे गुंड असत. पैसा दिला नाही तर हेच गुंड प्रचंड मोडतोड करीत असत. पोलिसांत तक्रार केली तर पोलीस काही गुंडांना पकडीतही परंतू पकडलेल्या गुंडांचे साथीदार दुकानदारांचे नुकसान करीत असत. किंवा सुटून आल्यावर तेच गुंड नुकसान करीत असत .त्यामुळे त्यांच्या वाटेला कुणी जात नसे.पोलिसांतही तक्रार करायला कुणी जात नसे .मुकाट्याने संरक्षण हप्ता देणे ,दुकानदार त्यांच्या हिताच्या दृष्टीने मान्य करीत असत.उगीचच तक्रार करून पोलीस व गुंड यांच्या भानगडीत पडणे कुणालाही वेळ व परिणाम या दृष्टीने परवडत नसे. कदाचित असे नामचीन गुंड व पोलीस यांचे साटेलोटेही असावे असे मत खासगीत दुकानदार प्रगट करीत असत .खरे काय होते ते देव ,गुंड व पोलिस यांनाच माहीत .
थोड्याच काळात विक्रमादित्याने शहरातील गुंडांमध्ये दहशत नर्माण केली .पकडलेल्या गुंडांजवळ,तथाकथित विद्यार्थ्यांजवळ, भुरट्या चोरांजवळ, तुम्हाला कुणी पकडले कुठे नेले याबद्दल पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हां सर्वांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले .
गाडीतून आलेले सर्वजण बुरखाधारी होते .आम्हाला काळी टोपी घालून मोटारीतून नेण्यात आले .बहुधा एका तळघरात नेले असावे .तिथे आम्हाला काळी टोपी डोक्यावर असतानाच फटके मारण्यात आले.नंतर हॉस्पिटलसमोर बेशुद्धावस्थेत सोडण्यात आले त्यावेळी काळी टोपी काढून घेतली असावी. ज्यांच्या डोक्याचे मुंडण केले होते त्यांची काळी टोपी काढण्यात आली होती. आम्हाला कोणालाही ओळखता आली नाही .मुंडण केल्यावर पुन्हा काळी टोपी घालण्यात आली असे उत्तर दिले . याहून कुणीही काहीही जास्त माहिती देऊ शकला नाही.
हा विक्रमादित्य त्याने पत्रात म्हटल्याप्रमाणे गुन्हय़ानुसार शिक्षा कमी जास्त करीत असे .फटक्यांची संख्या कमी जास्त करीत असे.काही लोकांचे मुंडण केले जाई.काही लोकांच्या डोक्यावर पाट काढले जात .काही लोकांचे कपडे काढून केवळ चड्डीवर त्यांना सोडण्यात येई.कमी जास्त फटके हे सर्व शिक्षांमध्ये समान सूत्र होते .
पोलिस या विक्रमादित्याला पकडण्याचा प्रयत्न कां करीत नाहीत, असे विचारल्यावर आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत परंतु तो सापडत नाही असे स्टँडर्ड उत्तर दिले जात असे .
पोलिसांना खासगीत विचारल्यावर पोलीस म्हणत आमचा कितीतरी त्रास या विक्रमादित्याने वाचविला आहे. केवळ गुंडांना पकडण्याचाच नव्हे तर गुन्हा दाखल करणे,कोर्टात केस दाखल करणे, कोर्टात तारखांप्रमाणे चकरा मारणे इत्यादी आमचा त्रास कमी झाला आहे .हा विक्रमादित्य आम्हाला मदतच करीत आहे .त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे . आम्हाला त्याला पकडावे असे वाटत नाही .तो पकडला जावा असेही आम्हाला वाटत नाही .
हल्ली आमच्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे .
मुली रस्त्यावरून बिनधास्तपणे जाऊ शकतात .
आपल्याला कुणी त्रास देईल असे त्यांना वाटत नाही .
कारण विक्रमादित्य त्यांच्या पाठीमागे उभा आहे याची त्यांना खात्री आहे .
हा विक्रमादित्य सर्वत्र लक्ष कसा काय ठेवीत होता? नंतर अकस्मात येऊन गुन्हेगारांना कसा काय घेरीत होता ?त्याची संघटना कशी होती?संघटनेमध्ये नक्की किती लोक होते ?त्यांच्या पाठीमागे एखादा राजकीय पक्ष होता का? संघटनेतील लोकांचा पोटापाण्याचा उद्योग काय होता? विक्रमादित्य श्रीमंत होता का ? संघटनेतील लोकांना तोच पैसा पुरवीत होता का ?हा विक्रमादित्य कोण आहे ?सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत .
मुलींची छेडछाड करण्याला आता कुणी धजावत नाही .
साखळी खेचण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
पूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करता दागिने घालून बिनधास्तपणे स्त्रिया रस्त्यावर हिंडू शकतात .
प्रोटेक्शन मनी, संरक्षण पैसा ,जवळजवळ बंद झाल्यामुळे दुकानदारही आनंदित आहेत.
विक्रमादित्य हा लोकांचा हिरो आहे .त्याचे सभासद शहरात फिरून सावजे बरोबर हेरत असतात.गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षाही ठोठावीत असतात.
*विक्रमादित्य आणि त्याचा समाजाभिमुख संघटना अजूनही अस्तित्वात आहे .*
आता विक्रमादित्य अस्तित्वात नाही. तो आपल्याला काही करणार नाही. असे समजून जर गुंड पुन्हा आपला समाजविघातक उद्योग सुरू करू लागले तर अकस्मात विक्रमादित्य अवतरतो. व शिक्षाही करतो .
*मधूनच कुणाला तरी पकडून गुन्ह्याप्रमाणे कमी जास्त शिक्षा करून हॉस्पिटलसमोर सोडून देण्यात येते .*
*अशी शिक्षा करून विक्रमादित्य अस्तित्वात आहे. चुकीला माफी नाही.हेच तो गुंडांना दाखवून देत असतो .*
*बरेच गुंड, गुन्हेगार, समाजविघातक लोक, शहर सोडून बाहेर गेले असावेत.त्यातील कांही जणांनी गुन्हेगारीचा मार्गही कदाचित सोडून दिला असावा.*
*विक्रमादित्यावर लोक खूष आहेत.*
(समाप्त)
३०/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन