३ भामटे १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
रेल्वे स्टेशनवर संवाद उतरला त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते .त्याच्या जवळ सामानाने गच्च भरलेल्या तीन बॅगा होत्या.या अगोदर तो एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरी करीत होता .त्याहूनही बड्या कंपनीत त्याचा ऑनलाइन इंटरव्ह्य़ू झाला होता .त्याला आता प्रत्यक्ष जाऊन इंटरव्ह्य़ू द्यायचा होता. इंटरव्ह्यू हा केवळ उपचार (नॉमिनल) आहे असे त्याला सांगण्यात आले होते.तुम्ही हजर(जॉईन) व्हायच्या तयारीने या असेही त्याला सांगण्यात आले होते.त्यामुळे बर्याच सामानासह तो आला होता.काही दिवस एखाद्या लॉजिंग बोर्डिंगमध्ये राहावे नंतर जागा बघावी असा त्याचा विचार होता.
या गावांत तो पहिल्यांदाच येत होता.रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला एखाद्या चांगल्या हॉटेलात घेऊन चल असे सांगावे,हॉटेल ठीक वाटले तर तिथे राहावे,ठीक नसले तर हॉटेल बदलता येईल ,असा त्याचा मनसुबा होता .
हमालाने बॅगा रिक्षामध्ये नेऊन ठेवल्या. हमालाने रिक्षावाल्याला किंचित डोळा मारला.रिक्षावाल्यानेही त्याला प्रत्युत्तर दिले . ती त्यांची काहीतरी खूण असावी.चांगला बकरा आहे काप असे कांहीतरी हमाल म्हणत असावा.रिक्षा सुरु झाली कुठे जायचे असे रिक्षा चालकाने विचारले.एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन चल, संवाद म्हणाला.त्यामुळे रिक्षावाल्यांचे काम सोपे झाले .संवादने हॉटेलचे नाव सांगितले असते तर मग रिक्षावाल्याला त्याच्या माहितीची दुसरी जागा कशी स्वस्त व मस्त आहे हे संवादला पटवावे लागले असते.
-एक चांगले लॉजिंग बोर्डिंग माझ्या ओळखीचे आहे तुम्ही म्हणत असाल तर तेथे जाऊ.घरगुती जागा आहे. बाईंना आर्थिक अडचणीमुळे घराचे रूपांतर लॉजिंगमध्ये करावे लागले.स्वस्त आणि मस्त आहे- रिक्षाचालक बोलला.
"चांगले आहे ना चल तर मग तिथे घेऊन".इति संवाद .प्रवासाने त्याचे अंग चिकचिकले होते. केव्हा एकदा हॉटेलात जाऊन स्नान करतो,कपडे बदलतो,आराम करतो,ताजातवाना होतो,असे संवादला झाले होते .
थोड्याच वेळात रिक्षा एका घरापुढे येऊन थांबली .रस्त्यावरच निअॉन साइनचा बोर्ड चमकत होता.
~राहण्या जेवण्याची उत्तम सोय ~दररोज रुपये तीनशे फक्त .
संवाद एखाद्या हॉटेलमध्ये राहायला गेला असता तर त्याचे किमान दररोज एक हजार रुपये सहज खर्च झाले असते. जागा कशी आहे ते पाहू . दोन चार दिवस राहू. आपली नोकरी पक्की होउंदे .नंतर कुठे रहायचे त्याचा निर्णय घेता येईल .संवादने मनाशी विचार केला.
एक मिनिट थांब जागा रिकामी आहे का ते पाहतो, संवाद रिक्षा चालकाला म्हणाला .त्याने दरवाज्यावरील बेल दाबली.तत्क्षणी एका मध्यमवयीन बाईने दरवाजा उघडला. घंटी दाबल्याक्षणीच दरवाजा उघडल्यामुळे संवाद जरा दचकला. जशा कांही त्या बाई आंतल्या बाजूला उभ्याच होत्या.त्या दरवाजातून अारपार पाहात होत्या.त्यांना संवाद दिसला होता .म्हणून त्या बाईनी दरवाजा लगेच उघडला होता.असे वाटत होते . त्या बाईंना पाहून संवाद पुन्हा एकदा दचकला .बाई टापटिपीच्या नीटनेटक्या दिसत होत्या. तसे त्यांच्यात दचकण्यासारखे काही नव्हते तरीही काहीतरी गूढ होते .गूढ काय होते ते सांगणे शक्य नव्हते .ते फक्त जाणवत होते.
जागा रिकामी आहे का? मला स्वतंत्र खोली पाहिजे. भाडे किती पडेल?एका दमात संवाद म्हणाला.
किती दिवस राहणार? आमचा महिन्याचा दर कमी आहे.फक्त न्याहरी, न्याहारी आणि रात्रीचे जेवण, न्याहरी दुपार व रात्रीचे जेवण यांचे दर वेगवेगळे आहेत .बाई म्हणाल्या .
मी काही दिवस राहणार. न्याहारी व रात्रीचे जेवण घेईन. संवाद म्हणाला .
चारशे रुपये पडतील. तीनशे रुपये जर तुम्ही खोली शेअर केली असती तर पडले असते . ठीक आहे ,मला स्वतंत्र खोली पाहिजे, संवाद म्हणाला .खोली रिकामी आहे बाई म्हणाल्या. सामान उचलायला कुणी नाही का?संवादने विचारले.आमची जागा लहान आहे. नोकर नेहमी असतो, आता तो भाजी आणायला गेला आहे .प्लीज माफ करा ,तुम्हालाच बॅगा आणाव्या लागतील, बाई बोलल्या.रिक्षातून बॅगा घेऊन संवाद हॉलमध्ये आला.रिक्षावाल्याने संवादला थोडी मदत केली.रिक्षावाला व बाई यांचा काहीतरी नेत्र-संवाद झाला,असे त्याला वाटले. त्याला कुठेतरी काहीतरी चुकत आहे असे वाटत होते .नक्की काय चुकत आहे ते लक्षात येत नव्हते .
बाईंची हालचाल व हास्य त्याला रहस्यमय व गूढ वाटत होते. एकदा तर बाई अभिनय तर करीत नाही ना असाही संशय त्याला आला .
थंडीचे दिवस होते .एका कोपऱ्यात हीटर चालू होता .त्याचा मंद ध्वनी खोलीत घुमत होता. हीटरमुळे खोली उबदार वाटत होती. हीटरच्या पुढ्यात वेटोळे करून एक मांजर झोपले होते.एका कोपर्यांत कुत्रा होता.तोही दोन्ही पाय पुढे ठेवून स्वस्थ बसला होता.
हॉल चांगला सुशोभित केलेला दिसत होता.खोलीत मंद प्रकाश पसरला होता .एका बाजूला काऊंटर व त्यामागे काही किल्ल्या बोर्डाला लटकवलेल्या होत्या .काउंटरमागे एक क्लार्क बसलेला होता.त्याच्यापुढे एक रजिस्टर होते .क्लार्ककडे त्याने किल्ली मागितली .क्लार्कने कांही प्रतिक्रिया दाखविली नाही .त्याने निरखून पाहिले. तो पुतळा होता.इतका हुबेहुब होता की जिवंत मनुष्य वाटत होता .संवादने दचकून बाईंकडे पाहिले.त्या त्याच्याकडे निरखून पाहात होत्या.त्यामुळे संवाद आणखीच दचकला.
त्या म्हणाल्या सर्व काम मीच पाहते .तो केवळ दिखावा (शो )म्हणून ठेवला आहे .
हा तर जिवंत मनुष्य वाटतो. संवाद म्हणाला.
होय एकेकाळी तो जिवंतच होता .त्याला मी पेंढा भरून ठेवला आहे.माझ्या ओळखीचा एक कसबी कलाकार आहे .त्याला तुम्ही कुणाचेही प्रेत द्या तो पेंढा भरून हुबेहूब पुतळा तयार करतो .पेंढा भरून प्राणी ठेवणे ही माझी खास आवड आहे .प्राणी पेंढा भरून शो म्हणून ठेवणे हे ठीक आहे .परंतु पेंढा भरून माणूस ठेवणे हे जरा अतीच होत आहे असे संवादला वाटले.आपण कुठे आहोत?बाई काय बोलत आहेत?त्याला गरगरल्यासारखे होऊ लागले .अाधीच प्रवासाने तो कातावला होता.त्यात या वेडसर बाईचे अर्धवट बोलणे.त्याला क्षणभर काहीच कळेनासे झाले .
काउंटर मागे जाऊन भामिनीबाईनी त्याला खोलीची किल्ली दिली .मी तुमच्याबरोबर खोली दाखवायला आले असते परंतु येथे कुणी नाही.मला येथे थांबावे लागेल.तुम्हाला एकटय़ालाच जावे लागेल.येथून बाहेर पडले की डाव्या बाजूला लिफ्ट आहे .पहिल्या मजल्यावर जा. बोळीतून(पॅसेज, कॉरिडॉर) सरळ गेल्यावर बोळीच्या टोकाची डाव्या हातची खोली.खोली तयार केलेली आहे.तुम्ही ताजेतवाने व्हा. खोलीला लागूनच स्वच्छता खोली आहे.नंतर खाली या. रजिस्टरमध्ये तुमचे नाव नोंदवा.अापण बरोबरच चहा घेऊ.मला पाहुण्याबरोबर चहा घ्यायला आवडतो.जेवण तयार आहे .तुम्ही जेवणार असालच. भामिनी बाई म्हणाल्या .
किल्ली घेऊन संवाद पहिल्या मजल्यावर निघाला .जिकडे तिकडे गालीचे अंथरलेले होते .सर्वत्र नुकताच रंग दिलेला असावा.ऑइलपेंटचा मंद वास येत होता.बॅगा नेवून संवादने लिफ्टमध्ये ठेवल्या.लिफ्टमध्ये खुर्चीवर लिफ्टमन बसला होता .लिफ्टमनला बॅगा उचलायला कां सांगितल्या नाहीत, असा एक निसटता विचार त्याच्या मनात आला.कांही माणसे माजोरी असतात .नियोजित कामाबाहेर कांहीही करायला ती तयार नसतात.त्यातील हा असावा. संवादच्या मनात विचार चमकून गेला. नेहमी लिफ्टमन स्टुलावर बसलेला असतो.लिफ्टमन आणि खुर्चीत ही गोष्ट त्याला जरा विचित्र वाटली. त्याला त्याने पहिला मजला असे सांगितले.
*लिफ्टमनने कांहीही हालचाल केली नाही.*
*कदाचित त्याला डुलकी लागली असेल म्हणून संवादने जोरात पहिला माळा असे त्याला सांगितले.*
*त्याने तरीही काहीही हालचाल केली नाही.*
* संवादला संशय आला. काऊंटरमागील क्लार्क प्रमाणे हाही पुतळा असावा.*
*त्याने त्याला हळूच हात लावून पाहिला .तो हुबेहूब बनविलेला पुतळा होता.*
* त्याला हात लावला तेव्हा त्याची त्वचा थरथरली असा संवादला संशय आला.*
(क्रमशः)
२०/२०/©प्रभाकर पटवर्धन