Get it on Google Play
Download on the App Store

१ विक्रमादित्य १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

दैनिक समाचारच्या पहिल्या पानावर एक दिवस ठळक अक्षरांमध्ये एक पत्र छापून आले.

त्या पत्राने सर्वत्र खळबळ माजली. 

पत्राच्या अगोदर संक्षिप्त संपादकीय पुढील प्रमाणे होते .

(काल पत्रपेटीमध्ये खाली दिलेले पत्र आम्हाला मिळाले .पत्र एका कागदावर वर्तमानपत्रातील अक्षरे कापून ती चिकटवून लिहिलेले होते.पत्राचा फोटोही दिला आहे .

पत्र पुढील प्रमाणे होते.)

~विक्रमादित्य~

आपले गाव पूर्वी लहान होते.गुन्हे होत असत परंतु गुन्ह्यांचे प्रमाण नगण्य होते .हल्ली मूळ गावाचा विस्तार सर्व दिशांनी होत आहे .औद्योगिकरण व नागरीकरण यांचा हा परिणाम आहे.लोकसंख्या वाढली की गुन्हे वाढणार परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ न होता,ती गणिती श्रेणीने होत आहे. गुन्हे कां वाढले याच्या समाजशास्त्रीय,राज्यशास्त्रीय, अर्थशास्त्रीय,ऐतिहासिक,भौगोलिक,  इत्यादी कारणांची मी चर्चा करीत नाही.गुन्हे वाढले ही वस्तुस्थिती आहे . याला कुठेतरी आळा घातलाच पाहिजे .पोलिस त्यांचे काम करीतच आहेत .परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचे काही कर्तव्य आहे.

आम्ही पंचवीस जणांची, सामाजिक कार्यकर्त्यांची,  तत्त्वासाठी समाजाच्या हितासाठी वाटेल तो त्याग करणारी, एक संघटना स्थापन केली आहे .

गुन्हे अनेक प्रकारचे असतात.आम्ही पुढील प्रकारच्या गुन्ह्यावर तूर्त लक्ष केंद्रित करणार आहोत.नंतर वेळोवेळी आम्ही इतर गुन्ह्यांकडे लक्ष देणार आहोतच. आमचे स्वयंसेवक सर्वत्र लक्ष ठेवणार आहेत.माझे कार्य पाहून माझ्या कार्याला समाजाचा पाठिंबा मिळेल याची मला खात्री आहे . 

नाटक,सिनेमा, सोशल मीडिया, मासिके, कशामुळेही असो  मुलींची निरनिराळ्या प्रकारे छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे.नर्म विनोदाने, नाजूक नजाकतीने,मुलींच्या अंत:करणाला, जखम होणार नाही अशा पद्धतीने , मुलीला उद्देशून एखादे वाक्य बोलणे हा भाग निराळा आणि धक्का मारणे,अंगचटीला जाणे , विनयभंग करणे ,अश्लील बोलणे हा भाग निराळा. श्रृंगार व बटबटीत वासना यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून मुलीना त्रास दिला जात आहे. 

मुलीबरोबर तिच्या मर्जीविरुद्ध आक्षेपार्ह वर्तन करताना कुणी आढळल्यास त्याला जन्माची अद्दल घडवण्यात येईल.

तर अशा वर्तनापासून दूर राहावे .

पोलिस तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे, व्यक्तीला पकडणे,त्याच्यावर गुन्हा दाखल करणे व कोर्टांमध्ये तारखांवर तारखा मिळून तो शाबीत होणे,शिक्षा होणे ,यामध्ये फार कालापव्यय होतो .

कित्येक  तरुण पैशाच्या जोरावर व  पुराव्याअभावी सुटून जातात .कित्येक वेळा झालेली शिक्षा पुरेशी असते असे नाही .न्यायदानाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे आहे .

ऐतिहासिक काळी विक्रमादित्य न्यायदान करीत असे .त्याचा न्याय नेहमी अचूक व शिक्षा गुन्ह्यानुसार नेमकी असे .

मीही त्याप्रमाणेच न्यायाला विलंब लावणार नाही.

तत्काळ शिक्षा व गुन्ह्याप्रमाणे योग्य शिक्षा हे माझे सूत्र रहाणार आहे. तरी रोडरोमियोंनी  सावध असावे . इतर प्रकारच्या गुन्ह्यांकडेही मी हळूहळू लक्ष देणार आहेच.

" विक्रमादित्य"

त्या दिवसाचे संपादकीयही याच विषयावर होते.विक्रमादित्याने पत्रात मांडलेला मुद्दा पुन्हा जास्त  विस्तृतपणे मांडला होता.एका बाजूला अशा तत्काळ न्यायदानाची गरज मांडली होती .तर त्याची दुसरी बाजूही प्रकर्षत्वाने मांडली होती.संपादकीय विद्वत्तापूर्ण व संतुलित होते. 

पोलीस यंत्रणा, कायदा,शासनयंत्रणा,न्यायव्यवस्था , असताना अशाप्रकारे एखाद्याने न्यायदान करणे कितपत बरोबर आहे असा मुद्दा मांडला होता .यामुळे कायद्याचे राज्य अस्तित्वात राहणार नाही. हा लोकशाहीला धोका आहे. उद्या कोणीही उठेल आणि कोणालाही कांहीही शिक्षा करू लागेल. कायद्याचे राज्य असण्याच्या दृष्टीने हे पूर्णपणे चूक आहे .हे लोकशाहीला घातक आहे. हे हुकुमशाहीला पूरक आहे. असे मत मांडले होते .

त्याच दिवसापासून नागरिकांमध्ये जिकडे तिकडे घराघरात, कट्ट्यावर, ऑफिसमध्ये, याचीच चर्चा सुरू झाली .काही लोक हिरिरीने विक्रमादित्याची बाजू घेत होते .तर काही जण विरुद्ध बाजू घेत होते .दोन्ही बाजूंत निश्चित तथ्य होते. 

काही जणांना ही कुणीतरी केलेली थट्टा वाटत होती .काही जणाना हा कोणीतरी केलेला रिकामपणाचा उद्योग वाटत होता .काही जणाना हा उगीचच घबराट पसरविण्याचा उद्योग वाटत होता.एकाने तर अशी पुडी सोडून दिली की पत्र बित्र काही नाही हा सगळा  दैनिक समाचारचा आपला खप वाढवण्यासाठी उद्योग आहे. 

हा कायद्याचा अपमान आहे, असे काही जणांचे मत होते .हे पोलिसांना व शासनाला आव्हान आहे, असेही कांही तावातावाने सांगत होते .पोलिसांनी गंभीरपणे हा विषय घेतला पाहिजे.हा जो कुणी कायद्याला आव्हान देणारा विक्रमादित्य आहे त्याला पकडून शिक्षा केली पाहिजे असे मत काही जण  हिरीरीने  मांडत होते.मतामतांतराचा एकच गदारोळ उडाला होता. विक्रमादित्य चांगला असेलही, खरा असेलही, परंतु असेच लोक उठतील आणि लोकांना मनमानी शिक्षा ठोठावण्याला सुरुवात करतील.(म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु काळ सोकावतो. ) असे लोकशाहीवादी लोक गंभीरपणे व आवर्जून सांगत होते. 

वाचकांची पत्रे व लेख वर्तमानपत्रात दररोज येत होते.फेसबुक व्हॉट्सअॅप यावरही निरनिराळी मते मांडली जात होती .विविध प्रकारची त्याच्या बाजूने व त्याच्या विरुद्ध अशी मते मांडली जात होती .

आपापल्या विचारधारेप्रमाणे गुंडगिरी कां वाढली आहे याची कारणे निरनिराळे राजकीय पक्ष देत होते.कांही विद्वज्जड लोकांनी समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, ऐतिहासिक, भौगोलिक, कारणेही दिली.गुंडगिरी दूर करण्याचे उपायही सुचवले.उगीच कोलाहल करू नका वेट अँड वॉच,थांबा आणी पाहा,असे एकाने सुचविले.केवळ एका पत्राने  लोकांना बऱ्यापैकी रिकामपणाचा उद्योग मिळाला होता.त्याबरोबरच बरेच विचारमंथनही झाले होते .

असेच चार पाच  दिवस गेले .लोकांच्या चर्चेचा जोर कमी झाला होता.विक्रमादित्य ही एक हूल आहे असेही काही जण म्हणू लागले होते.बऱ्याच जणांना तर ही केवळ हूल आहे,एक स्टंट आहे ,याची खात्रीच पटली होती .तशा प्रकारची पत्रे,तशा प्रकारची चर्चा , पोस्टस् येण्यास सुरुवात झाली होती. 

~आणि ती बातमी आली ~ 

रात्री एकच्या सुमारास आरोग्य हॉस्पिटल समोर  एका जखमी तरुणाला एका गाडीतून आणून सोडण्यात आले . हॉस्पिटलची बेल वाजविण्यात आली.तरुण बेशुद्धावस्थेत होता .त्या तरुणाची पाठ रक्तबंबाळ झालेली होती .त्याच्या पाठीवर पांच फटके मारण्यात आले होते .पाठीला मिठाचे पाणी लावून,प्रत्येक वेळी वेत पाण्यात बुडवून नंतर फटके मारण्यात आले असावेत.

फटक्यामुळे त्या तरुणाची पाठ भप्प सुजली होती. त्याला पंधरा वीस दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले . पाठीवर जन्मभर वेताच्या वळांची खूण राहणार होती. 

त्या तरुणाचा फोटोही छापून आला होता .कॉलेजसमोर गुंडगिरी करणाऱ्या, मुलींची छेड काढणाऱ्या,  गुंडगिरीतून सर्वांवर दहशत बसविणाऱ्या,एका तरुण विद्यार्थी कम गुंडाचा तो फोटो होता .तो नावाला विद्यार्थी होता. त्याच्या छेडछाडीने मुली अस्वस्थ होत असत. त्या त्याला घाबरत होत्या.जखमी अवस्थेत हॉस्पिटलसमोर त्याला सोडण्यात आला तेव्हा त्याच्या हातावर विक्रमादित्य असे लिहिलेले होते. त्याला विक्रमादित्याने शिक्षा केली हे वाचून मुलींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते .

विक्रमादित्याची ओळख पटविण्यासाठी   सीसीटीव्हीमधील टेप पाहण्यात आली .

चार बुरखाधारी व्यक्तींनी त्या तरुणाला आणून ठेवले होते असे आढळून आले .

त्यातील एकाने बेल वाजवली होती .

बुरख्यामुळे कुणाचीही ओळख पटू शकली नाही .गाडीचा नंबरही दिसू शकला नाही.   

जिथून त्या मुलाला पळविण्यात आले होते तेथील सीसीटीव्ही टेप पाहण्यात आली. 

.एक गाडी आली .त्यातून चार बुरखाधारी उतरले.

*त्यांनी त्या तरुणाची उचलबांगडी केली.आणि क्षणार्धात ते गाडी घेऊन पसार झाले असे आढळून आले .*

*इथेही गाडीचा नंबर मिळू शकला नाही .*

* नंबर प्लेटवर एक कापड लावण्यात आले होते असे आढळून आले .*

* विक्रमादित्याला ओळखण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले होते *

(क्रमशः)

३०/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन