४
अमितची आणि इतरांची टाईमलाईन खूपच वेगळी होती. या प्रसंगामुळे आता त्याचे मन ठाणे आणि त्याचे फ्रेंड सर्कल यांच्यात रमेनासे झाले होते.
म्हणून असेल कदाचित त्याने हिंजेवाडीमधल्या ‘सायबेरियाड टेक’ या कंपनीची ऑफर लगेच स्वीकारली होती. चांगली पोस्ट होती आणि प्रत्यक्ष ग्राउंड वर्क नव्हते आणि पर अॅनम २४ लाख इतके गलेलठ्ठ पॅकेज त्याला देण्यात आले होते. अमेरिकेत यापेक्षा जास्त तो कमवत असे पण भारतात असूनही इतकी चांगली ऑफर असल्यामुळे ती न स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता.