Get it on Google Play
Download on the App Store

अमित गंगाधर गोडसे! ९० च्या दशकात एमआयटी मध्ये इंजिनिअर झालेला विद्यार्थी. नंतर अनेक वर्ष अमेरिकेत नोकरी करून पुन्हा भारतात परत आलेला. अमितने ठाण्याहून पुण्यात आल्या आल्या हिंजेवाडी जवळच्या प्रशस्त बंगल्यात राहायला सुरुवात केली होती. तो बंगला त्याला कंपनीने दिला होता आणि बंगल्यात चार नोकर दिमतीला होते. सोबत एक इम्पोर्टेड लक्झरी सिडान आणि एक ड्रायव्हर.

त्याचं बालपण ठाण्यात गेलं होतं. खूप मेहनती, निव्वळ मेरीट वर पुढे जायचं इतकंच ठाऊक असलेला अमित गोडसे! टांग्याला जुंपलेला घोडा रस्त्यावर लक्ष ठेवून वेगाने पळावा म्हणून जशी घोड्याच्या डोळ्यांना झापडं लावली जातात अगदी तशीच फक्त अभ्यास आणि मेहनत अशी दोन झापडं दोन्ही डोळ्यांना बांधून धावायचं बाळकडू अमितला त्याच्या आई वडिलांनी लहानपणीच पाजलं होतं.

“आपण ओपनमध्ये येतो आपल्याला मेहनत करावीच लागते. पर्याय नाही. आणि मी डोनेशन म्हणून एक छदाम देणार नाही” अशी धारणा असलेले अमित यांचे वडील श्री. गंगाधर गोडसे  एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होते आणि त्यांची आई शाळेत शिक्षिका होती. गोडसे बाई एका मराठी मिडियमच्या शाळेत मराठी आणि संस्कृत शिकवायच्या. एकूणच काय मध्यमवर्गीय वेल टू डू न्युक्लीअर फॅमिली होती आणि अमित गोडसे अभ्यासू, मेहनती आणि प्रचंड हुशार होता. अभ्यासात हुशार असल्यामुळे म्हणा किंवा घरून तसेच बाळकडू मिळाल्यामुळे म्हणा शिष्यवृत्ती वगैरे संधी नेहमी मिळत गेल्या आणि तो यशाची शिखरं सर करत गेला.

इतका यशस्वी असलेला अमित अमेरिकेत गेल्यावर फक्त दोन वेळा भारतात येऊन गेला होता. पहिल्या वेळेस जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा आणि नंतर ४ वर्षांनी गोडसे बाई वारल्या तेव्हा! बाकी त्याला भारतात काय घडतंय याच्याशी फारसं घेणं देणं नव्हतं.

नंतर आर्थिक मंदीमुळे म्हणा किंवा एकसुरी आयुष्याला कंटाळून म्हणा नंतर अमितने त्याच्या अमेरिकेतल्या नोकरीला राम राम ठोकला आणि तो भारतात परत येऊन ठाण्याच्या घंटाळीच्या १ बीएचके मध्ये येऊन राहिला. पण तो छोटासा ब्लॉक ज्यात त्याचं संपूर्ण बालपण गेलं तो आता त्याला कोंदट वाटत होता. कालाय तस्मै नमः!

आणि अशीही ती बिल्डींग कधी दिवसात रिडेव्हलपमेंटला जाणार होती. म्हणून त्याने थोड्या दिवसातच घोडबंदर रोडला एक रेडी पझेशनचा फुल्ली फर्निश्ड ३ बीएचके फ्लॅट खरेदी केला. तो सुद्धा ‘सरदेसाई गार्डन’ च्या ८ फेजच्या कॉम्प्लेस मध्ये, १८ वा मजला, ४ लिफ्ट, पूर्व-पश्चिम, भरपूर उजेड,२४ तास पाणी, प्रचंड हवेशीर, फ्रेंच विंडोज, ३ बाल्कनीज, मॉड्युलर किचन, आधुनिक बाथरूम, १ मास्टर बेडरूम, सगळं एकदम हाय क्लास.

बाल्कनीमध्ये उभं राहिलं कि संपूर्ण ठाणे शहर नजरेच्या टप्प्यात येत असे. सकाळी उठल्या उठल्या बेडरूमच्या खिडकीतून सूर्योदय दिसत असे आणि संध्याकाळच्या वेळेला हॉलच्या बाल्कनीतून सनसेट पण दिसत असे. सकाळी उठल्यावर तो आधी १ तास बिल्डींगच्या आवारात जॉगिंग करत असे. आणि मग क्लब हाउसमध्ये जिम आणि स्विमिंग एक दिवसाआड. खूपच चांगली सोसायटी होती. आणि हे सगळं फक्त दीड कोटी रुपयांमध्ये! और क्या चाहिये?  

वेलकम टू सायबेरियाड

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters