भाग -९
सोनियाला खूप अशक्तपणा जाणवू लागला होता.भीतीने तिला तहान लागली होती. तिने जाळीकडे निरखून पाहिले तरी तिला काहीच दिसेना. अचानक जिन्यांवरून काठीचा आवाज येऊ लागला ती घाबरतच खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला वाटले की कोणीतरी जिन्यावर पायऱ्या उतरत आहे आणि सावकाश काठी वाजवत आहे., सोनिया पळत पळत बाजूला गेली. ती एका मूर्तीच्या मागे लपली आणि गुपचूप पायऱ्यांकडे पाहू लागली.
तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्यासारखं तिला वाटलं. सोनियाने घाबरून घट्ट डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला नंतर घाबरून मागे वळून बघितले, पण तिथे कोणीच नव्हते. सोनियाला आता चक्कर येऊ लागली होती, तिला वाटले की आता काही आपण वाचू शकणार नाही, इतक्यात अचानक मूर्तीतून हसण्याचा आवाज येऊ लागला. सोनिया थकल्यामुळे जड पावलांनी दाराच्या दिशेने धावली तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. तेव्हा तिचे डोके जमिनीवर आपटल्यामुळे ती बेशुद्ध पडली.
सोनिया बेशुद्ध अवस्थेत पडली होती, तिच्या आजूबाजूला एक काळी सावली घिरट्या घालत होती जी सतत तिच्याकडे लक्ष ठेवून होती. एव्हाना सूर्य मावळला होता आणि चंद्रप्रकाश पसरला होता आणि चंद्राचा प्रकाश कवडशातून गाळून येत होता.
सोनिया जागी झाली आणि तिने हळूच डोळे उघडले तेव्हा ती काळी सावली दिसेनाशी झाली. सोनियाने तिच्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली आणि तिने घटघट पाणी संपवले. इतक्यात तिला समोर तिच्या मागे असलेली मूर्ती दिसली. सोनिया घाबरून मागे सरकू लागली
“आई, तू कुठे आहेस?” सोनिया रडवेली होऊन खिन्नपणे म्हणाली.
इतक्यात त्या मूर्तीतून हसण्याचा आवाज येऊ लागला, सोनिया मागे सरकत होती तेव्हा तिला जाणवले की ती आपोआप मागे जात आहे. ती मागे जात असताना जमिनीवरील गुप्त दार अचानक सरकले आणि उघडले. ती आता जमिनीत एका भुयारातून गडगडत गडगडत खाली जात होती. भरपूर खोल भुयारात गडगडत जाताना तिची शुद्ध कधी हरपली ते तिला कळलेच नाही.
सोनिया जिथे पडली तिकडे बऱ्याच गवताच्या गंजी ठेवल्या होत्या. त्यावर सोनिया धपकन पडली, सोनिया खाली पडताच भुयारात जोरात आरडाओरडा सुरु झाला. आकांक्षा, टफी आणि रिया तिकडेच होते. टफी भुंकत होता.
“सोनिया, उठ बाळा ” आकांक्षाने रडत रडत सोनीयाला उठवण्याचा प्रयत्न केला.
तिचा आवाज ऐकून सोनियाने हळूच डोळे उघडले.
"आई.... आई......." म्हणत ती पुन्हा बेशुद्ध पडली.
“काकू, तिला मार बसला आहे आणि ती थकली आहे, तिला आराम करू द्या” असे म्हणत रियाने आईला धीर दिला.
टफी धावत सोनियाजवळ गेला आणि तिचा वास घेऊ लागला. तो तिचे पाय चाटू लागला. तेवढ्यात सोनिया शुद्धीवर आली आणि तिने आकांक्षा रिया आणि टफीला आपल्या समोर पाहिले आणि उठण्याचा प्रयत्न केला. रिया, आकांक्षा आणि सोनिया तिघींनि एकमेकांना मिठी मारली आणि त्या रडू लागल्या.