भाग-७
आकांक्षाने पाणी प्यायले
"तुला आता बरं वाटतंय ना?" सोनियाने तिच्या आईला विचारले.
“मला खूप गुदमरल्यासारखं वाटतंय. राजेशला भुताने पळवून नेलं आणि आपल्याला ते कळलंही नाही. आपल्या सर्वांचा जीव धोक्यात आहे, राजेश कुठे असेल?” आकांक्षाने सोनियाला विचारले.
“आई तू घाबरून जाऊ नकोस खंबीर राहिलो तरच आपण राजेशला मदत करू शकतो.”
“हो काकू, आपण संयमाने वागले पाहिजे, तरच आपण राजेशपर्यंत पोहोचू शकू.” काकूंना धीर देत रिया म्हणाली.
“ठीक आहे आता दुसरा पर्याय तरी काय? आपण स्वत:हून खड्ड्यात उडी मारली आहे.” आकांक्षा टफीला उचलून घेऊन खोलीच्या कपाटाला हाताने स्पर्श करत म्हणाली.
“आपण एक एक करून खोल्या तपासून पाहुया. तेव्हाच खरे काय ते आपल्याला समजेल.” असे म्हणून सोनिया खोलीतून बाहेर पडली.
तिघी हळू हळू पुढे जात होत्या. सोनियाने एका खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, दार उघडले पण खूप अंधार होता. फक्त गवाक्षातून वारा येत आहे हे जाणवत होते. आकांक्षाने भिंतीला हात धरत धरत अंदाज घेत घेत इलेक्ट्रिक बोर्डला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला कोणीतरी हात लावल्यासारखे जाणवले, म्हणून तिने विचारले.
"रिया, सोनिया तुमच्यापैकी कोणी मला हात लावला का?" सोनियाला वाटले की ती घाबरेल म्हणून तिने माझा हात लागला असे खोटे सांगून वेळ मारून नेली.
रियाने सोनियांचा हात घट्ट पकडला आणि दीर्घ श्वास घेऊ लागली.
"रिया माचिस काढ, इथे लाईट नसेल" बोर्डाचे बटण चालू आणि बंद करत सोनिया म्हणाली.
“मी टॉर्च काढते, माचिसचा काय उपयोग? असाही माझा मेंदू आता काम करत नाहीये....” रिया म्हणाली.
रियाने टॉर्च लावता क्षणी सोनिया रियापासून २ पावले मागे गेली आणि रियाकडे आश्चर्याने पाहू लागली.
“काय झालं, तुम्ही दोघी माझ्याकडे असं का बघत आहात?” रिया घाबरली आणि घामाघूम झाली.
"मागे वळून पाहू नकोस"
सोनिया आकांक्षाच्या पुढे आली आणि तिने रियाला सूचना केली. आता रियाची हालत खराब झाली होती , ती हळू हळू पुढे येऊ लागली आणि रडत म्हणाली
"का? काय? मागे काय आहे?" रियाची पुढे येताच सोनिया आणि आकांक्षा मागे सरकल्या.
"तुझ्या मागे... तुझ्या....."
" मागे?,,, काय? बोल ना काय आहे मागे??"
असे म्हणत असताना अचानक रिया मागे वळली, ती किंचाळली. रियाच्या मागे असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडा होता आणि आत एक हात लटकत होता. रिया पळत पळत आकांक्षाच्या मागे येऊन लपली आणि देवाचा धावा करून लागली.
सोनिया आकांक्षा रिया घाबरलेल्या आणि त्या हाताकडे पाहत होत्या इतक्यात एक फुलदाणी खाली पडली. तिघी घाबरून खोलीबाहेर पळत सुटल्या आणि पायऱ्यांजवळ थांबल्या कारण प्रवेशद्वार आता बंद होते आणि बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता.