७
मी त्यांना सर्व पितर समुद्रावर मला साक्षात भेटल्याचे सांगितले.तुम्ही मला फ्रीज आणल्याबद्दल बोल लावत होता तेव्हाच ते प्रगट होणार होते.परंतु तुम्ही कदाचित घाबराल म्हणून ते प्रगट झाले नाहीत.त्यांनी तुम्हाला एक निरोप दिला आहे.असे सांगून मी त्यांना आजोबांनी दिलेला निरोप सविस्तर सांगितला.बाबांचा मला पितर भेटले यावर विश्वासच बसत नव्हता.मला स्वप्न पडले किंवा मी झपाटला गेलो आहे अशी कांहीतरी त्यांची समजूत झाली होती.त्यांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसत होती.जेव्हां मी त्यांना पणजोबा कसे दिसत होते.पणजी कशी दिसत होती. ते सविस्तर सांगितले तेव्हां त्यांचा माझ्यावर विश्वास बसला.जुन्या काळी फोटो काढायची सुविधा नव्हती.त्यामुळे मी त्यांना फोटोंमध्ये पाहिले असल्याचा संभवच नव्हता.ते व इतर चुलत पणजोबा वगैरे कसे दिसत होते ते माझ्याजवळ बाबा कधीही बोलले नव्हते.तसा विषय निघाला नव्हता. कांही कारणही नव्हते.त्यामुळे मी सत्य बोलत आहे याची त्यांना खात्री पटू लागली होती.जेव्हा मी त्यांना दुधाला लावलेल्या विरजणाची आजोबांनी दिलेली उपमा सांगितली,तेव्हा त्यांचा माझ्यावर एकदम विश्वास बसला.कारण ही उपमा अनेकदा त्यांनी त्यांच्या बाबांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या तोंडून ऐकली होती.
मनुष्यात, समुदायात, जातीत, धर्मात,प्रथा, रुढी, परंपरा, समजुती, यामध्ये एकदम बदल होत नाही.एखादा विचार बदल घडवण्यास सुरुवात करतो.प्रत्यक्ष त्याचा परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो.हा मुद्दा समजून सांगताना आजोबा विरजणाची उपमा देत असत.गुरूकडून शिष्याने
अनुग्रह घेतल्यावर शिष्य लगेच गुरूपदाला पोहोचत नाही.परंतु तो पूर्वीचा साधा मनुष्यही राहिलेला नसतो.दही होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
मी खरे बोलत आहे याची खात्री दोघांनाही पटली.मला कुणी झपाटलेले नाही याचीही खात्री त्यांना पटली.मला सर्व पितरांचे साक्षात दर्शन झाले म्हणजे मी पुण्यवान आहे अशी त्यांची समज झाली.जुन्या काळी एकनाथांनी साक्षात पितरांना जेवायला घातले होते त्याची त्याना आठवण झाली.मी एकनाथांसारखाच पुण्यवान आहे असा त्यांचा बहुधा ग्रह झाला असावा.
त्यांनी आजोबांच्या म्हणजे त्यांच्या बाबांच्या इच्छेप्रमाणे, निरोपाप्रमाणे, वागायचे ठरवले.त्यांनी मला व माझ्या मुलांना फ्रीज घरात घ्यायला सांगितला.जुना फ्रीज बाजूला ठेवला.पॅकिंग उघडून नव्या फ्रीझला वीज जोडणी दिली.मुले आइस्क्रीम पॅक आणण्यासाठी बाजारात गेली. तीन फॅमिली पॅक आणून आंत ठेवण्यात आले.नंतर येणार्या जाणार्याला दोन चार दिवस आम्ही नवा फ्रीज दाखवीत होतो.त्याला अाइस्क्रीम देत होतो.प्रत्येक जण आमच्याकडे या पंधरवड्यात नवी वस्तू घेतल्याबद्दल आश्चर्य प्रकट करीत होता.कांहीजण बहुधा दोषही देत असावेत.माझे बाबा प्रत्येकाला त्यांच्या बाबांचे तत्त्वज्ञान समजून सांगत होते.हे पंधरा दिवस पितर आपल्या घरी वास्तव्याला येतात.त्यांना आनंद होईल अशी वर्तणूक आपण ठेवली पाहिजे.त्यासाठी तीन गोष्टी केल्या पाहिजेत.खालील तीन गोष्टी ते आवर्जून प्रत्येकाला सांगत असत.