३
या पितृपंधरवड्यात शुभकार्येही केली जात नाहीत.वास्तुशांत, विवाह, मुंंज,वाढदिवस,इत्यादी सर्व गोष्टींना मनाई असते.चिरस्थायी नवीन खरेदीसाठी हा काळ अशुभ समजला जातो.या काळात पितर तुमच्याकडे वस्तीला आलेले असतात.वगैरे वगैरे गोष्टी त्याने सांगितल्या.
मला व्यक्तिश: लोकांची ही प्रवृत्ती हा विचार पटत नव्हता.आपले पूर्वज आपल्या घरी येतात तो काळ अशुभ कां समजावा?समोरच मी एक सॅमसंगचा फ्रीझ बघितला.ते मॉडेल मला आकर्षक वाटले.आमचा फ्रीज जुना झाला होता.त्यांत वस्तू समाधानकारकरित्या गार होत नसत.आणून ठेवलेले आईस्क्रीम पाघळत असे.कांही ना कांही कारणाने खरेदी पुढे ढकलली जात होती. मी पद्माकरला सहज विचारले काय रे या फ्रीजची किंमत किती?त्याबरोबर त्याला उत्साह चढला.त्याने त्या व दुसऱ्या कांही फ्रीजच्या खास उल्लेखनीय विशेष गोष्टी सांगायला सुरुवात केली.एवढेच करून तो थांबला नाही तर हा फ्रीज तुला मी सात हजार रुपये कमी किमतीत देतो असेही म्हणाला.तो मला नेहमीच डिस्काऊंट देत असे.परंतु सात हजार रुपये कमी म्हणजे जरा जास्तच डिस्काऊंट होता.त्याला असे कां विचारता तो म्हणाला, हा तुझ्यासाठी पितृपंधरवड्याचा डिस्काऊंट.त्यावर मी त्याला समजले नाही असे म्हणालो.त्यावर तो म्हणाला, डिस्काऊंट दिला तरी या पंधरवडय़ात कुणीही कांहीही खरेदी करत नाही.इतर धर्मीय लोक व हिंदू धर्मीय नास्तिक खरेदी करतात.किंवा अगदी नाइलाजच असेल खरेदी न टाळता येण्यासारखी वस्तू असेल तरच खरेदी करतात.तरीही मी विचार करीत होतो.कसला विचार करतोस त्याने विचारले.घरी काय म्हणतील! त्यांची प्रतिक्रिया काय असेल? कळत नाही मी म्हणालो.
पद्माकर म्हणजे एक नंबरचा गोडबोल्या आणि कुशल विक्रेता.माझ्या शंकेवर त्याने एक उपाय सुचविला.मी हा फ्रीज आता तुझ्याकडे पोहोचवतो.तू घरच्यांच्या प्रतिक्रिया पाहा.फारच विरोधी तिखट प्रतिक्रिया आल्यास फ्रिज तसाच ठेव.पॅकिंग उघडू नको.पुढच्या महिन्यात प्रतिपदेला उघड .मला पैसे पुढच्या महिन्यात दे.म्हणजे खरेदी पुढच्या महिन्यात केलीस असे होईल.शेवटी हो ना करता करता मी नवा फ्रिज घेऊन घरी आलो.पहिला फ्रिज जुना झाला होता.नवा मोठा, अनेक खुब्या असलेला, फ्रीज आणला हे बघून सर्व खूष होतील असा माझा अंदाज होता.मुले खूष झाली.नव्या फ्रीज निमित्त आइस्क्रीमचा फॅमिली पॅक आणायचा बेत त्यानी ठरविला सुद्धा.