५
कसला तरी आवाज ऐकून मला जाग आली.मी डोळे उघडले.बरीच रात्र झाली असावी. समुद्र किनाऱ्यावर बरीच शांतता होती.माझ्या सभोवती कितीतरी वृध्द मंडळी बसलेली होती.सभोवार इतके वृद्ध स्त्री पुरुष बघून मी दचकून उठून बसलो.आजूबाजूला पाहत असताना मला कांही मंडळी ओळखीची दिसली.माझे आजोबा आजी चुलत आजोबा चुलत आजी यांना मी ओळखत होतो.ते आता या जगात नव्हते.तरीही मी त्यांना समोरच्या समुदायात पाहात होतो.मला नक्की काय चालले आहे ते कळत नव्हते.मी जागा आहे की स्वप्नात आहे.मला कांहीच कळत नव्हते.
एवढ्यात माझे आजोबा उठून उभे राहिले.ते बोलू लागले: कमलाकर तू तर मला ओळखतोस.तुझ्या लहानपणी मी तुला अंगाखांद्यावर खेळवलेआहे.तू मला निश्चित ओळखतोस.आता मी या जगात नाही.मी पितर लोकांमध्ये असतो.तिथून पंधरा दिवस मी पृथ्वीतलावर तुमच्या सहवासात येतो.तुम्ही जसा विचार करता तसा विचार मीही पूर्वी जेव्हा भूतलावर होतो तेव्हां करीत होतो.परंतु आता माझ्या विचारात फार फरक पडला आहे.तुम्ही सर्व पुढीलप्रमाणे विचार करता.
पितृपक्षामध्ये आपल्याकडे पितर आले आहेत.शुभ कार्य करू नये.जी तुलनात्मक चिरस्थायी स्वरुपाची आहे अशी वस्तू फ्लॅट, प्लॉट, घरातील टिकाऊ वस्तू, इत्यादी खरेदी करू नये. हा तुमचा विचार बरोबर नाही.
पितृपंधरवडय़ाची प्रथा कां पडली असावी यासंबंधी एक तर्कशुद्ध विचार तुला सांगतो.पूर्वी सर्वत्र शेतीप्रधानता हाेती.व्यापार उदीम फारच कमी होता.उद्योग मोठ्या प्रमाणावर नव्हते .बारा बलुतेदार पद्धती होती.बहुतेक लोक कमीजास्त प्रमाणात शेती करीत असत.भाद्रपदातील या काळात धनधान्य,भाजीपाला,या काळात तयार होणारी फळफळावळ, इत्यादी तयार झालेली असतात.घरात ताजे धनधान्य आलेले असते.समृद्धी असते.सुख शांती असते. स्वाभाविक आपल्याला आपले वडील आजोबा यांची आठवण येते.उदाहरणार्थ आईला केळी आवडत असत. लाल भोपळ्याची भाजी आवडत असे.वडिलांना डाळिंब्या घालून पडवळाची भाजी आवडे.वडिलांना घावन,पुरणपोळी,खांडवी
(तांदळाच्या कण्या व गूळ यापासून केलेला एका गोड पदार्थ) पातोळे(काकडी पासून केलेला एक गोड पदार्थ)आवडे.आई वडिलांना आवडत असलेल्या गोड पदार्थांची पक्वान्नांची आठवण येते.इत्यादी इत्यादी.वडील आजोबा आई आजी तर आता आपल्यात नाही.त्यांना कांही मार्गाने या वस्तू पोहोचवता येतील का?तुम्ही गुरुजींना याबद्दल विचारायला गेल्यावर त्यांनी तुम्हाला उपाय सुचविला.श्राद्ध घाला.श्रद्धेने या वस्तू पितरांना अर्पण करा. त्या त्यांना पोहोचतील.अशा तऱ्हेने महालय श्राद्ध, अपभ्रंश महाळ अस्तित्वात आला.
तेवढेच पुढे बोलू लागले. मला नेहमी वैयक्तिक पातळीवर प्रश्न पडे व अजूनही पडतो.जर पितर आपल्या येथे वास्तव्यास येणार असतील येत असतील,तर आपल्या मुलाची आपल्या वंशजांची समृद्धी बघून त्यांना आनंदच होणार.मुलगा एका खोलीत, दोन खोल्यात, चाळीच्या वातावरणात, राहत होता.आता तो ब्लॉकमध्ये,फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये, राहायला जात आहे.पूर्वी तो सायकलने फिरत असे, बसने जात असे,आता त्याने स्कूटर मोटारसायकल घेतली.पूर्वी तो स्कूटरने फिरत असे,आता त्याने मोटार घेतली.पूर्वी घरात फ्रीज नव्हता.आपण असतानाच त्याने फ्रीज आणला.इत्यादी इत्यादी.पितर येथे असताना आपल्या वंशजांचा, मुलाचा, उत्कर्ष होताना पाहून त्याना वाईट वाटैल कि आनंद होईल?
समजा आपले वडील गावाहून आपल्या येथे आले आहेत.आपली समृद्धी त्यांना कळू नये म्हणून आपण नव्या गोष्टी घेण्याचे टाळत आहोत.नवा प्लॉट फ्लॅट बंगला विकत घेत नाही.ते गेल्यावर घेतो हे नंतर कळल्यावर त्यांना काय वाटेल?आपण जायची घरातील सर्व जण वाट पाहत आहेत.त्यांना नव्या वस्तू घ्यायच्या आहेत परंतु पितर येथे असल्यामुळे नको असे ते म्हणतात.आपले वास्तव्य अशुभ समजत आहेत.हा काळ अशुभ समजत आहेत.हे सर्व ऐकून पाहून पितरांना बरे वाटेल काय?घरात चर्चा चालली असेल अमुक घेऊ,तमुक घेऊ,आता नको पितृपंधरवडा आहे.तो संपल्यावर पुढच्या महिन्यात घेऊ.पितर घरात आहेत. ते हे ऐकत आहेत.त्यांना काय वाटेल?असा मला प्रश्न पडतो.आजोबा बोलत होते.
मी प्रथम उठलो आणि आजोबा व आजीच्या पाया पडलो.लहानपणी मला त्यांचा फारच लळा होता. आई वडील रागावल्यावर ते माझी बाजू घेत असत.मला पाठीशी घालीत असत.मला समजून घेत असत.त्यांच्यामुळे माझा मार कित्येकदा वाचला होता.आज कित्येक वर्षांनी मला ते पुन्हा दिसत होते.इतर वृद्ध मंडळींना मी ओळखत नव्हतो.ते माझे पूर्वज असले पाहिजेत,नातेवाईक असले पाहिजेत, असा अंदाज मला आला होता. माझी सर्वांशी ओळख करून दिली तर मला आनंद होईल असे मी आजोबांना म्हणालो.
माझ्या आजोबांना चार मोठे भाऊ व तीन बहिणी होत्या.त्यातील कुणालाच मी पाहिले नव्हते.पणजोबांना सहा भाऊ होते असे मी ऐकून होतो.पणजोबासकट त्यातील कुणालाच मी पाहिले नव्हते.त्यांचे पुत्र पौत्रही पाहिले नव्हते.त्यातील काही जिवंत होते तर कांही मृत झाले होते.आजोबांनी माझी सर्वांजवळ ओळख करून दिली.सर्वांना मी एकच साष्टांग प्रणिपात घातला.माझ्या पणजोबांनी तर मला त्यांच्या छातीशी घट्ट धरले.पणजीने तर मला छातीशी धरून माझे पटापट पापे घेतले.मला अगदी लाजल्यासारखे झाले.तरी बरे समुद्रावर जवळपास कुणीही नव्हते.तुरळक गर्दी दूर अंतरावर होती.ही सर्व मंडळी मला जशी दिसत आहेत तशीच सर्वांना दिसत असावी असा माझा ग्रह होता.परंतु ही मंडळी फक्त मला दिसत होती.मी साष्टांग प्रणिपात करीत असताना जवळूनच एक मनुष्य चालत गेला.वाळूवर रात्री हा कुणाला नमस्कार करीत आहे अशा विचित्र दृष्टीने पाहात तो गेला त्यावरून ते माझ्या लक्षात आले.
मी माझ्या आजोबांना तुमच्या मताशी शंभर टक्के मी सहमत आहे असे सांगितले.परंतु घरातील मंडळी ऐकत नाहीत त्याला मी काय करू?
त्यावर आजोबा म्हणाले,मी आता तुला जे कांही सांगितले ते घरी गेल्यावर तुझ्या बाबाला व आईला सांग.त्या अगोदर आम्ही सर्व तुला भेटलो हेही सांग.तुम्ही नवीन खरेदी केली तर आम्हाला आनंदच होईल.तुमच्या उत्कर्षांने आम्हाला समाधानच वाटेल.आपल्या वंशजांचा वाढदिवस पाहून अतिशय आनंद होईल.या पंधरवड्यात अशुभ म्हणून तुम्ही वाढदिवस सुद्धा करायचे टाळता.तो अश्विन प्रतिपदेला करता.आम्हाला आमच्या वंशजाच्या वाढदिवसाला हजर राहता येत नाही.तो सोहळा पाहता येत नाही. आम्हाला त्याचे वाईट वाटते.तुम्हाला आमच्या मनातील व्यथा सांगाव्यात असे आम्हाला पुन्हा पुन्हा नेहमी वाटत असे.न भिता तू त्या ऐकून घेशील म्हणून आम्ही तुला दर्शन दिले.
इतरांना पटेल न पटेल तू प्रथम तुझ्या वडिलांना सांग.तू तुझ्यापासून सुरुवात कर.हळूहळू लोकांना आमचे म्हणणे पटू लागेल.कोणत्याही गोष्टीत बदल हळूहळू होत असतो.एकदम होत नाही.विरजण लावल्यावर दूध दूधच दिसते.परंतु ते दूध नसते.दही होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.त्याप्रमाणेच एक दिवस पितृपंधरवडा हा शुभ समजला जाईल.पितरांना आनंद देण्यासाठी या पंधरवड्यात आवर्जून खरेदी केल्या जातील.अशी मला आशा आहे.ते दिवस लांब नाहीत.दिवाळीच्या सुमाराला खरेदीसाठी जशी बाजारात गर्दी उसळते तशीच गर्दी पितृपंधरवड्यात उसळेल.