६
आजोबा माझे लाडके होते.मी आजोबांचा लाडका होतो.त्यांनी प्रेमाने मला सर्व समजून सांगितले होते.मी घरी जाऊन ते बाबांना व आईला सांगावे अशी त्यांची अपेक्षा होती.ज्यावेळी घरात सर्वजण मी फ्रीज आणल्यामुळे मला उलट सुलट बोल लावीत होते त्यावेळी आजोबा तिथे होते.ते सर्व ऐकून त्यांना वाईट वाटले होते.त्याचवेळी प्रकट होऊन बाबांना चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात असे त्यांना वाटले होते.परंतु कदाचित मुले घाबरतील,आई बाबाही घाबरतील, म्हणून ते प्रकट झाले नव्हते.मी तसा काही घाबरणार नाही याची त्यांना खात्री होती.त्यामुळे माझ्यापाठोपाठ ते व बाकी सर्व पितर समुद्रावर आले होते.समुद्रावर गर्दी होती तोपर्यंत ते प्रगट झाले नव्हते.गर्दी कमी झाल्यावर ते माझ्या सभोवार बसून मी जागा होण्याची वाट पहात होते.समुद्रावर बसल्या बसल्या ते आपसात गप्पा मारीत होते.त्या आवाजाने मला जाग आली होती.आणि मी उठून बसलो होतो.
रात्रीचे अकरा वाजले होते.जरा फिरून येतो असे सांगून बाहेर पडलेला मी अजून घरी परतलो नव्हतो.मी कुठे गेलो म्हणून घरात काळजीचे वातावरण होते.मला बघताच सर्वानीच समाधानाचा सुस्कारा सोडला. सर्वानी लावलेले बोल मी एवढे मनाला लावून घेईल असे त्यांना वाटले नव्हते.बाबा व आई ते मला असे कां बोलले ते समजावून सांगू लागले.प्रथा, परंपरा, समजुती, पध्दती,रूढी,या पाळाव्या लागतात.चार लोक आपल्यालाला नावे ठेवतील असे वागून चालत नाही.आपल्याला समाजात राहायचे आहे.अशाप्रकारे दोघेही माझी समजूत घालत होती.मी हिरमुसला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
मी दोघांनाही म्हटले,आज मी एका विलक्षण अनुभवातून गेलो आहे.मी सांगितले तरी ते कोणाला खरे वाटणार नाही.मी कांहीतरी कथा रचून सांगत आहे असे तुम्ही म्हणाल.
त्यावर बाबा म्हणाले, नेहमीप्रमाणे तुझी लांबलचक प्रस्तावना पुरे कर मुद्दा सांग.