Get it on Google Play
Download on the App Store

०८ विलक्षण सूड २-३

(ही कथा व यातील पात्रे संपूर्णपणे काल्पनिक आहेत कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

त्या महात्म्याला वंदन करून त्यांचा आशिर्वाद व निरोप घेऊन संजय नदीच्या काठी आला .स्नान करून तो नदीमध्ये  कंबरभर पाण्यात उभा राहिला .त्याने मंत्र साधना सुरू केली .दिवस उन्हाळ्याचे होते .आंबे काजू करवंदे रानमेवा  भरपूर होता .त्याने तिथेच एक चालचलावू पर्णकुटी बांधली होती सकाळी लवकर उठावे.रानमेवा गोळा करावा .स्नान करावे .रानमेवा पोटभर खावा. नंतर पुन्हा स्नान करून तसेच ओलेत्याने नदीमध्ये कंबरभर पाण्यात उभे रहावे.सूर्य अस्तास जाईपर्यंत तिथेच मंत्र साधना करावी .नंतर अंग कोरडे करून फलाहार करून निद्रा घ्यावी .असा त्याचा दिनक्रम  चालला होता.कितीही काळ जावो आपण साधना करीत राहायचे यावर तो ठाम होता.

एक महिना दोन दिवसांनंतर तो दिव्य पुरुष त्याच्या पुढ्यात उभा राहिला .संजयने त्याला वंदन केले .त्यांने त्याला एक वेगळा मंत्र दिला .या मंत्राचा जप मनातल्या मनात केल्याबरोबर तू तुला हवे ते रूप धारण करू शकशील .तू अगोदरच कोणते रूप धारण करायचे ते ठरव .प्रत्येक वेळी तेच रूप तुला प्राप्त होईल .ते तुझे बदललेले रूप फक्त एक तास टिकेल .नंतर तू कुठेही असलास तरी आपल्या पूर्व रूपाला येशील .या मंत्राच्या प्रभावाने तुला फक्त पांच वेळा आपले रूप बदलता येईल.त्यानंतर या मंत्राचा प्रभाव नाहीसा होईल .फक्त एक महिनाच या मंत्राचा प्रभाव राहील. त्यानंतर जरी तू हा मंत्र जपला तरी त्याचा प्रभाव राहणार नाही .तुझे रूप बदलणार नाही .  खरे सांगायचे तर हा मंत्र तू विसरून जाशील .तुला तुझ्या बहिणीवर ज्यानी अत्याचार केला त्यांचा सूड घ्यायचा आहे.कोणते रूप धारण करणार आणि कसा सूड घेणार ते अगोदरच काळजीपूर्वक निश्चित कर .यशस्वी हो असा आशीर्वाद देऊन तो दिव्य पुरुष अंतर्धान पावला .

संजयची साधना संपली होती . त्याने वर्षभर सुद्धा साधना करायची तयारी ठेवली होती.त्याच्या सुदैवाने एक महिन्यात  त्याला यश प्राप्त झाले होते.लवकर यश प्राप्ती झाल्यामुळे व सूड घेण्याचा मार्ग सापडल्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला .

आता पुन्हा आपल्या शहरात घरी जायचे आणि त्या चार नराधमावर सूड घ्यायचा एवढेच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते. ध्येय साध्य करताना जरी मृत्यू आला तरी त्याला त्याची तयारी होती . मात्र कोणत्याही परिस्थितीत सूड पूर्ण केल्याशिवाय त्याला मृत्यू येता तर तो अधांतरी राहिला असता .

दिव्य पुरुषाकडून मंत्र मिळवून संजय मजल दरमजल करीत  परत आपल्या घरी आला .त्याच्यासमोर आता  एकच ध्येय होते .त्या चौघा चांडाळाचा खून .ज्यावेळी त्याने बहिणीवर अत्याचार व तिचा मृत्यू पाहिला तेव्हाच त्याने शपथ घेतली होती.वाटेल ते करीन परंतु त्यांना मृत्युदंड दिल्याशिवाय राहणार नाही .विचित्र स्वप्न मालिका, त्यानंतर अवलियाची  झालेली भेट, मग दिव्य पुरुष लवकर प्रसन्न होणे, त्याने रूप बदलण्याचा दिलेला मंत्र यामुळे त्यांचे काम सोपे झाले होते त्याचप्रमाणे आपल्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे ही खात्री पटली होती .

त्यांना नुसता मृत्युदंड देऊन चालणार नव्हते .आपल्याला मृत्यू का येत आहे तेही त्यांना कळणे आवश्यक होते . त्याचप्रमाणे झटकन मृत्यू येऊनही चालणार नव्हते .ते चौघे तडफडून तडफडून मरणे आवश्यक होते .यासाठी अगोदर त्यांना पत्ररूपाने सूचना मिळणे आवश्यक होते .संजयने त्या चौघांना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले .

~~~~यांस

तुम्ही काही दिवसांपूर्वी एक घोर अपराध केलेला आहे.एका मुलीवर तुम्ही अत्याचार केला आहे .नुसता अत्याचार नव्हे तर तुम्ही चौघांनी अत्याचारांची परिसीमा गाठली होती.मृत्यूपूर्वी पूनमने ही सर्व हकिगत मला सांगितली होती.ती आत्मघात करणार आहे हे मला कळले असते तर मी तिला वाचविले असते. या अपराधासाठी तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे .येत्या एक महिन्यात तुम्हाला मृत्यूला तोंड द्यावे लागेल .मृत्यू साधा नसून तुम्ही तडफडून तडफडून मराल.मी तुम्हाला ठार मारणार आहे 

रामशास्त्री 

चौघांना हे पत्र मिळताच ते संपूर्णपणे हादरले . आपल्याला हा रामशास्त्री नक्की मारणाऱ याची त्याना खात्री पटली .कुठेही खुट्ट वाजताच आपल्याला मारण्यासाठी कुणीतरी आले आहे असे त्यांना वाटू लागले.भीतीने ते अर्धमेले झाले.चौघेही एकत्र जमले आणि वाचविण्यासाठी आपल्याला काय करता येईल याची त्यांनी चर्चा केली .एकदा तर त्यांना ही कुणीतरी आपली थट्टा केली असेही वाटले .त्यांनी जे काही अमानुष कृत्य केले होते त्याची बढाई त्यांच्या मित्रांमध्ये मारली होती.त्यांच्यापैकी कुणीतरी हे कृत्य केले असले पाहिजे असेही त्यांना वाटले .परंतू नंतर विचार करता कदाचित हे खरेही असेल हा कुणीतरी रामशास्त्री खरेच असेल तर ?आपण पूर्ण काळजी घेतलेली बरी . नेहमी चार चौघात राहायचे. एकटे राहायचे नाही.आपल्यासोबत एक अंगरक्षक ठेवायचा .नेहमी भरलेले पिस्तुल व एक सुरा आपल्याजवळ ठेवायचा .असे काही निर्णय त्यांनी घेतले .एक महिन्यात काही न झाल्यास नंतर आपण पुढे काय करायचे ते ठरवू असाही विचार त्यांनी केला.

त्याचबरोबर या रामशास्त्र्याला शोधून काढायचे असाही निर्णय त्यांनी घेतला .ज्याअर्थी  हा कोणी रामशास्त्री, पूनमने त्याला सर्व हकीगत सांगितली  असे म्हणतो त्याअर्थी तो संजय असू शकत नाही कारण त्याच्या समोरच सर्व घटना घडली होती असा विचार त्यांनी केला .त्यावर एकाने संशय प्रगट केला .आपण दुसऱ्या कुणाला तरी शोधत बसावे म्हणून संजयने तर ही चाल केली नसेल ना ?त्यावर संजयवरही लक्ष ठेवावे आणि त्याचप्रमाणे हा जो कुणी रामशास्त्री आहे त्यालाहि शोधून काढावे.असे शेवटी त्यांनी ठरविले .

संजयला त्यांना आपला संशय येईल ही कल्पना होती.त्याचप्रमाणे ते हा रामशास्त्री कोण ?पूनमचा कुणी मित्र प्रियकर आहे का ?याचा शोध घेतील याची कल्पना होती. कदाचित आपल्यावर जीवघेणा हल्ला करतील याचीहि त्याला कल्पना होती.स्वतःची पूर्ण काळजी घेण्याची योजना त्याने तयार केली होती .ते चारही विषारी नाग आहेत. आपण त्यांच्या फण्यावर पाय ठेवला आहे .ते काहीही करू शकतात ते त्याला माहीत होते .

तूर्त त्याने  त्या चौघांना कामाला लावले होते. त्याचप्रमाणे घाबरवून सोडले होते. त्यांना मृत्यू देईपर्यंत ते रोज तीळतीळ मरावे असे संजयला वाटत होते .

संजय पुढे खरा प्रश्न होता की आपण कोणत्या प्राण्याचे रूप धारण करावे ?कारण त्याने एकदा प्राणी निश्चित केला की त्याला पुन्हा तो बदलता येणार नव्हता .मंत्रोच्चारण केल्यानंतर प्रत्येक वेळी  त्याचे रूपांतर त्याच प्राण्यात होणार होते .त्याच्या डोळ्यासमोर हत्ती वाघ सिंह असे काही हिंस्र पशू त्याचप्रमाणे  कुत्रा मांजर असेही काही पाळीव पशु  आले परंतु त्याने त्यांच्यावर काट मारला .कारण कळल्याशिवाय दिसल्याशिवाय चटकन हे प्राणी आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत .आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर ते चटकन कुणालाही न दिसता कळता पळूनही जाऊ शकणार नाहीत.नंतर त्याने गरुड घार गिधाड घुबड अशा काही पक्ष्यांचाही   विचार केला परंतु वर दिलेल्या कारणांसाठी  त्याने त्यांच्यावरही काट मारली.नाग विषारी सापांच्या काही जाती यांचाही त्याने विचार केला . परंतु हेही आपल्या लक्ष्यापर्यंत कसे काय व्यवस्थित पोचू शकतील आणि आणि नंतर न मरता ते कसे पळून जाऊ शकतील याचा विचार करता त्याला हेही प्राणी त्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने  समाधानकारक वाटले नाहीत . रूप बदलून खून करून एका तसात त्याला परत यायचे होते .जर त्यांच्या आसपास असताना तो मूळ रूपात आला असता तर तिथेच त्याला मारण्यात आले असते .त्याचा सूड अधुरा राहिला असता .

त्याला मंत्र म्हणून स्वतःचे रूपांतर अशा एका प्राण्यात करायचे होते की जो कुणालाही पटकन दिसणार नाही.मृत्युदंड दिल्यानंतर तो पुन्हा पूर्व रूपाला येईपर्यंत सहज लपून राहू शकेल, त्यानेच हे कृत्य केले हे त्यांच्या लक्षात येणार नाही,असा प्राणी त्याला हवा होता .त्याच्या डोळ्यासमोरून अनेक प्राणी जात होते आणि त्यांचे त्यांच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने समाधान होत नव्हते .

असा विचार करीत असताना त्याला एकदम इंगळीची  (विंचवाची एक भयानक जात) आठवण झाली.ही इंगळी साधारण रुपयांच्या आकारापासून वेळप्रसंगी डिशच्या आकारापर्यंत मोठी असू शकते. इंगळी काळी असते .काही इंगळ्या भयंकर  विषारी असतात .त्या आकाराने लहान असतात .त्यांचा आकार तळहातापेक्षाही लहान असतो .त्यांच्या विषाने तडफडून तडफडून हाल होऊन क्लेश होऊन मृत्यू येतो .संजयला आपल्या शत्रूंना तसाच मृत्यू यावा असे वाटत होते .

*विचार करून शेवटी त्याने इंगळीचे रूप आपल्या हेतू पूर्तीसाठी धारण करायचे ठरविले.*

त्यांना पत्र पाठविल्यावर व आपण भयंकर  विषारी इंगळीचे रुप आपण धारण करायचे असे ठरविल्यावर त्याच्या पुढील प्रश्न होता प्रथम कुणाला मारावे ?

गुड्डू व सज्जू ही दोन नामांकित गुंडांची मुले होती. राघव व सामंत ही दोन राजकीय प्रभाव असलेल्या  पुढाऱ्यांची मुले होती .त्यातील सामंत हा या टोळीचा नायक होता .त्याला शेवटी मारावे असे संजयने ठरविले .त्याच्या डोळ्यासमोर एकेक जण मरताना जेव्हा तो पाहिल तेव्हा तो स्वतः  रोज तीळ तीळ मरेल तेच संजयला हवे होते .

तर प्रथम गुड्डू नंतर सज्जू त्यानंतर राघव व शेवटी सामंत अशा क्रमाने मृत्यूदंड द्यावा असे त्याने ठरविले .

आता प्रत्येकाला कुठे आणि कसे गाठावे कसे मारावे हे ठरवायचे होते  

(क्रमशः)

५/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन