०४ अपमानाचा बदला २-२
(ही कथा काल्पनिक आहे .वास्तवाशी कथा किंवा पात्रे यांचे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
त्याला कुणीतरी निनावी फोन करून सदाशिव तुझ्याकडे तू नसताना वारंवार येतो .काळजी घे . एवढीच बातमी दिली .
ती बातमी ऐकून त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसत आहेत असे त्याला वाटू लागले.
जिममध्ये जातो असे सांगून मधुकर नेहमीप्रमाणे बाहेर पडला .
घराजवळील हॉटेलमध्ये रस्त्याच्या बाजूला तो चहा पीत बसला होता .त्याचे सर्व लक्ष रस्त्याकडे होते .थोड्याच वेळात सदाशिव आपल्या सोसायटीत जाताना त्याने पाहिला .त्याने चांगली दहा मिनिटे जाऊ दिली .नंतर जाऊन दरवाज्यावरील बेल वाजविली .कुणीही दरवाजा उघडला नाही .त्याने दरवाज्यावरती जोरात ठोठावले.जरा वेळाने मालिनीने दरवाजा उघडला .चोरून दूध पिताना पकडल्यासारखा दोघांचाही चेहरा होता.दोघांचा चेहरा आणि दोघांचे विस्कटलेले कपडे सर्व काही सांगत होते.
मधुकरने सदाशिवला आज माझ्याकडे तू आलास तो शेवटचा पुन्हा माझ्या घरात तू दिसता कामा नये.असे म्हणून त्याला घराबाहेर काढला .
त्या दिवशी मालिनी व मधुकर यांचे कडाक्याचे भांडण झाले .मालिनी व सदाशिव या दोघांनाही आता काहीतरी लवकर करणे आवश्यक होते.मधुकरने खरे म्हणजे मालतीला घटस्फोट देऊन विषय संपवायला हवा होता .परंतू जीवन गुंतागुंतीचे असते .एक अधिक दोन बरोबर तीन इतके साधे गणित नसते .मधुकर मालिनीला घटस्फोट द्यायला तयार नव्हता.
तरीही घटस्फोट घेणे व नंतर मालिनी व सदाशिव यांनी लग्न करणे हाच योग्य मार्ग होता .चर्चे.ने विचाराने कदाचित प्रश्न सुटू शकला असता.
परंतु सदाशिव व मालिनी या दोघांनाही तो मार्ग योग्य वाटला नाही. दोघांनाही घाई झाली होती अविचाराला डोके नसते हेच खरे. काही दिवस शांततेत गेले.सदाशिव व मालिनीने योग्य तो धडा घेतला असे मधुकरला वाटले.तो सर्व काही विसरून पूर्वीप्रमाणेच मालिनीशी वागायला तयार होता .त्याचे मालिनीवर मनापासून प्रेम होते .
परंतु दोघेही मधुकरच्या नकळत वेगळीच खिचडी शिजवीत होती.मनुष्य एकदा वाहू लागला की त्याच्या वहाण्याला मर्यादा नसते हेच खरे.अशा वेळी स्वतःला सावरणे कठीण असते .कामातुराणां न भयं न लज्जा हेच खरे .
सदाशिवने दुसऱ्या गावी नोकरी शोधली.येथील नोकरीचा राजीनामा दिला .सर्व काही गुप्तपणे केले .मधुकर सर्वकाही निवळले असे समजून चालत होता.
एके दिवशी कामावरून मधुकर घरी येतो तो मालिनी गायब झालेली होती.तिने एक ओळींची चिठ्ठी लिहिण्याची मेहरबानी केली होती ."तू मला हवे ते सुख देऊ शकत नाहीस .मी तुला सोडून सदाशिवबरोबर जात आहे."एवढाच मजकूर त्यामध्ये होता .
मधुकर रागाने लाल हिरवा पिवळा झाला .त्याच्या पायाची आग मस्तकात गेली.प्राप्त परिस्थितीत तो काहीच करू शकत नव्हता .त्याची पत्नी त्याला नामर्द ठरवून सदाशिवबरोबर पळून गेली होती.
सदाशिवला शोधण्यासाठी मधुकर आकाशपाताळ एक करणार होता .आपल्या जिवलग मित्राने आपली पत्नी पळवून नेली याचा त्याला प्रचंड राग आला होता .मित्राने गोडगोड बोलून केसाने गळा कापला होता .या गुन्ह्याला क्षमा नाही असे मधुकरला वाटत होते.मृत्यूदंड हीच शिक्षा या गुन्ह्याला योग्य आहे असे त्याला वाटत होते . त्याला शोधून काढल्यावर तो त्याला जबरदस्त शिक्षा देणार होता .फाशी गेलो तरी हरकत नाही परंतु मी बदला घेणारच अशी प्रतिज्ञा त्याने केली होती .
मधुकरने जंगजंग पछाडले परंतु त्याला सदाशिव कुठे गेला ते कळेना.त्यांची दाट मैत्री होती त्यावेळी त्याला त्याच्या घराचा आईवडिलांचा पत्ता माहित झाला होता .तिथे प्रत्यक्ष जावून त्याने शोध लावण्याचा प्रयत्न केला .त्यात तो अयशस्वी झाला .
सदाशिवने राजीनामा दिल्यानंतर त्याची कंपनीकडे जी येणी होती.पीएफ पगार वगैरे . त्या मार्फत बँकेमार्फत त्याचा पत्ता लावण्याचा त्याने प्रयत्न केला .परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही .पोलिसांत पत्नी पळून गेल्याची तक्रार करावी व त्यामार्फत सदाशिवचा शोध लावावा असे एकदा त्याला वाटले परंतु तो मार्ग त्याने अवलंबला नाही .आपली जाहीर बदनामी होईल. आपल्या अब्रूचे जाहीर धिंडवडे निघतील.असे काहीसे त्याला वाटले असावे .
शेवटी त्याने गुप्तहेर एजन्सीची मदत घेण्याचे ठरविले .त्याच्या घरावर जिथे आईवडील राहात होते तिथे त्याने सतत लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली.एक ना एक दिवस तो आपल्या घराशी संपर्क ठेवील आणि आपल्याला बरोबर सापडेल याची त्याला खात्री होती .फक्त वेळ लागणार होता .मधुकर सूड घेण्यासाठी कितीही काळ थांबायला तयार होता .
गुप्तहेर एजन्सी मार्फत शोध न लागता त्याला अकस्मात सदाशिवचा पत्ता कळला .मधुकरचा एक मित्र काही कामासाठी कोल्हापूरला गेला होता.तिथे त्याला दोघेही सदाशिव व मालिनी एका बागेमध्ये दिसली.त्या मित्राला मधुकरची तळमळ माहीत होती.त्यांने त्या दोघांचा नकळत पाठलाग केला.आणि फोन करून मधुकरला त्यांच्या घराचा पत्ता कळविला.
मधुकरने एक धारदार सुरा विकत घेतला .कोल्हापूरला तो एका हॉटेलात उतरला .रिक्षा करून तो सदाशिवच्या ब्लॉकवर पोचला.त्याच्या ब्लॉकची बेल दाबल्यावर सदाशिवने दरवाजा उघडला.समोर मधुकरला पाहून त्याचा चेहरा खर्रकन् उतरला.पाठीमागील कोचावर मालिनी बसलेली होती .तिच्या चेहऱ्याची तर रयाच गेली .सदाशिवने दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला .बुटाचा पाय दरवाजात घालून त्याने त्याचा तो प्रयत्न विफल केला.
पापाला केव्हाही पाय नसतात.दोघेही नि:शब्द झाली होती .जसे काही काहीच झाले नाही अशा प्रकारे मधुकर आत सोफ्यावर जावून बसला.त्याने किंचित जरबेने सदाशिवला दरवाजा बंद करायला सांगितला.एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे सदाशिवने दरवाजा लावून घेतला.खरे म्हणजे त्याला पळून जायचे होते .पण त्याचे पाय जड झाले होते .तो पळू शकत नव्हता.
मधुकर तालमेमध्ये कसलेला मनुष्य होता.उठून त्याने एका डावातच सदाशिवला आडवा केला.झटक्यात सुरा काढून त्याने त्याचे कान व नाक कापून टाकले.आकांताने किंचाळत सदाशिव बेशुद्ध झाला .मालिनी स्तिमित होऊन मधुकर कडे पाहात होती .एखाद्या पुतळ्याप्रमाणे ती बसली होती .मधुकरने रक्ताळलेला सुरा हातात घेऊन तिच्याकडे चार पावले टाकली .तिला जोरात किंकाळी मारायची होती .परंतु तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता .
तिच्या पुढ्यात उभे राहू मधुकर एवढेच बोलला .मला तुलाही अशीच शिक्षा करायची होती.परंतु मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे .तुला तशी विद्रुप पहाणे मला शक्य होणार नाही .मी तुला व सदाशिवला सोडून देत आहे.जेव्हा जेव्हा तू सदाशिवला पहाशील तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण येईल. तू नीट जगू शकणार नाहीस .तू नीट झोपू शकणार नाहीस. मी तुला स्वप्नात दिसेन. हीच शिक्षा तुला पुरेशी आहे .
तू फोन करून अॅम्ब्युलन्स बोलाव.मी असाच पोलीस स्टेशनला जाणार आहे .कदाचित मी सुटेन कदाचीत मला चार पाच वर्षांची शिक्षा होईल .
तुम्ही सापडेपर्यंत गेली दोन वर्षे मी नीट झोपलेला नाही .आता मी समाधानाने शांत झोपू शकेन.तू दगा दिल्यापासून मी तळमळत होतो .
सदाशिवला व पर्यायाने तुला केलेली शिक्षा पुरेशी आहे असे मला वाटते .एवढे बोलून मधुकर दरवाज्याबाहेर पडला .त्याने आपल्या मागे दरवाजा धाडकन लावून घेतला .
(समाप्त) २८/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन