Get it on Google Play
Download on the App Store

०२ तिचा बदला २-२

(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

तिची एक  मैत्रीण होती.ती सर्जेराव राहात होता त्याच मोठ्या शहरात राहात होती .राधा मैत्रिणीला भेटायला म्हणून त्या शहरात गेली .

तिच्याजवळ राधाने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली .दोघींनी मिळून एक प्लॅन आखला.

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन राधाचा संपूर्ण गेटअप बदलण्यात आला. लांबसडक केस कापून  शोल्डर कट करण्यात आला. केसाना सोनेरी रंग देण्यात आला. साडीचोळी वगैरे काढून टाकून आठ दहा प्रकारचे उंची मॉडर्न ड्रेस शिवण्यात आले.त्यामध्ये बरेच काही झाकतील व दाखवतीलही अशा प्रकारचे जीन्स व टॉप्स होते,त्याचप्रमाणे मिडी फ्रॉक्स स्कर्ट्स टॉप्स  वगैरे व्हरायटी वेशभूषा तज्ज्ञाच्या सल्ल्याने  तयार करण्यात आले .फेशियल टोटल स्किन टचप वगैरे तर अर्थातच करण्यात आले.हे सर्व केल्यावर राधाच्या मैत्रिणीलाही राधाला ओळखता येईना .त्यानंतर खास शिक्षिकेकडून बॉल डान्स आणि इतर मॉडर्न डान्सच्या स्टेप्सही तिला शिकविण्यात आल्या.उच्चभ्रू वर्तुळामध्ये निरनिराळ्या पार्टीजमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या डान्स फ्लोअरवर ती कुठेही कमी पडणार नाही उठून दिसेल अशी तालीम देण्यात आली.तिचे नावही बदलण्यात आले .संजना उर्फ मिस् सांझ असे नाव तिला देण्यात आले .उडाणटप्पू सर्जेरावाला राधाला ओळखणे  शक्यच नव्हते.

त्या दोघांची भेट सहज होईल असे पाहायचे होते .उच्चभ्रू वर्तुळामध्ये वावरण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांच्या एटिकेट्स मॅनर्स  पोशाख इत्यादि शिकणे आवश्यक होते त्याचप्रमाणे श्रीमंतांचा जो एक अंगभूत श्रीमंतीचा डौल असतो तोही अंगी मुरणे आवश्यक होते.थोड्याच दिवसामध्ये सांझ या सर्वात तरबेज झाली .सर्वारंभ:तंडुल: प्रस्थ मूल: याप्रमाणे  हे सर्व करण्यासाठी पैशाची गरज होती.दोघीही हट्टाला पेटल्या होत्या .तिच्या मैत्रिणीने त्यासाठी बँकेतून  कर्ज काढले .राधाने तिच्या आईला सांगून प्रतापरावांकडून कर्ज घेतले. काही सोन्याचे दागिने विकण्यात आले .राधा उर्फ सांझला गर्भश्रीमंत असल्याचा देखावा डौल निर्माण करावयाचा होता.ती कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते .

मंत्रसिद्ध बाण तयार होता आता तो फक्त सर्जेरावांवर सोडायचा होता .दोन तीन हाय प्रोफाइल क्लबची  मेंबरशिप घेण्यात आली .सांझने त्या निरनिराळ्या क्लबमध्ये आलटून पालटून जाण्याला सुरुवात केली .राधा दिसायला रेखीव देखणी होती आता मेकअपमुळे तिचे सौंदर्य खुलून आले होते .ही नवीन कोण अप्सरा आली अशी चर्चा उच्चभ्रू वर्तुळात सुरू झाली .स्थानिक पर्‍या सर्वांना  माहिती होत्या.त्यामुळे आपली एक आयडेंटिटी निर्माण करणे आवश्यक होते. दिल्लीला आपले वडील मोठे उद्योगपती आहेत. इथे मुंबईला मी सहज फिरण्यासाठी आले आहे असे तिने सांगितले.तिची ओळख व्हावी म्हणून तिच्या बरोबर डान्स करण्यासाठी, तिच्याबरोबर फिरण्यासाठी,तरुणांमध्ये अहमहिका लागली .

कोणीतरी नवीन गिर्रेबाज पाखरू आले आहे ही वार्ता सर्जेरावच्या कानावर गेली.शेवटी एका क्लबमध्ये दोघांची भेट झाली .त्याच्याकडे बघून सांझने न बघितल्यासारखे केले.कुणीतरी त्यांची ओळख करून दिल्यावर ठीक आहे अशा अर्थी मान हलवून ती दुसरीकडे निघून गेली .सर्जेरावला आपण श्रीमंत देखणे असल्याचा गर्व अभिमान होता . ही फटाकडी हिंग लावूनसुद्धा आपल्याला विचारीत नाही असे पाहिल्यावर तो इरेला पेटला .ही राधा आहे असा संशय येणे सुद्धा शक्य नव्हते.

शेवटी केव्हांतरी दोघे एकदा एकत्र डान्सफ्लोअरवर डान्स करू लागले.  

दोघे हळूहळू नेहमी एकाच क्लबमध्ये जाताना दिसू लागले .

सिनेमा नाटक संगीत इत्यादी कार्यक्रमांमध्ये दोघेही बरोबर दिसू लागले .

मासा आपल्या गळाला लागला यामुळे सर्जेराव खूष होता .

मासा आपल्या गळाला लागला म्हणून राधा खूष होती .

राधाने सर्जेरावला हिशेबी जवळीक  करू दिली .

त्यामुळे सर्जेराव दिवसें दिवस आणखी तप्त होत जात होता .

शेवटी एक दिवस सर्जेरावने एकांत पाहून तिला कवेत घेण्याचा प्रयत्न केला .

तिने त्याला एकदम झिडकारून टाकला. याची सर्जेरावला अजूनपर्यंत कधीही सवय नव्हती.

सांझने सांगितले की एका विशिष्ट मर्यादेपेक्षा मी लग्न झाल्याशिवाय कुणालाही जवळ येऊ देणार नाही .हिंडणे फिरणे नाचणे इथपर्यंत ठीक आहे परंतु स्त्रीला तिची काही मर्यादा म्हणून आहे की नाही ?

तिला आपली करीन या इर्षेने  सर्जेराव पेटला होता .शेवटी त्याने तिला मागणी घातली .तू माझी होशील का म्हणून विचारले .याच क्षणाची राधा वाट पाहात होती.

अकस्मात एखादा ढग गर्जावा व बरसावा त्याप्रमाणे ती गरजली व ढगफुटीप्रमाणे बरसली.तिने आपले खरी ओळख प्रकट केली.तू त्या वेळी मी नीच वर्गातील नीच वर्णातील गरीब म्हणून मला झिडकारले.तुला उच्च नीच ,गरीब श्रीमंत, वर्ग वर्ण, हे महत्त्वाचे वाटत होते .मी भपका दाखविल्यावर तू ते सर्व विसरलास. मी कोण?मी कुठून आले?माझा वर्ग कोणता? माझा वर्ण कोणता?मी खरीच गर्भश्रीमंत आहे का? याचा काहीही विचार न करता तू वेड्यासारखा माझ्या मागे लागलास.तुला बाह्य भपका पाहिजे.तुला देखावा पाहिजे.तुला अंतरंगातील प्रेम गोडवा श्रीमंती कधी कळलीच नाही .आणि कळणारही नाही.

तू माझ्या लायकीचाच नव्हतास. त्यावेळी तू मला झिडकारले ते फार छानच झाले.नाहीतर मी एका मूर्खाशी लग्न करून फसले असते .

*त्यावेळी तू माझा अपमान करून मला झिडकारले मी तुला आता तसेच झिडकारते.त्या वेळी मी तुझ्या लायकीची नव्हते आता तू माझ्या लायकीचा नाहीस*

*असे म्हणून ती तिथून निघून गेली. सर्जेराव आ करून, स्तिमित होऊन, शरमिंदा होऊन, ती गेली त्या दिशेकडे पाहात राहिला.*

*तिचा बदला पूर्ण झाला होता.* 

(समाप्त)

४/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन