Get it on Google Play
Download on the App Store

०१ तिचा बदला १-२

(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

संस्थानिक गेले तरी संस्थानिकांचा रुबाब मिजासआणि माज हा कांही गेला नाही .निदान काही संस्थानिकांमध्ये तो अजूनही शिल्लक आहे .बर्‍याच संस्थानिकानी त्यावेळी  जमिनी पैसा सोने नाणे यांचा बऱ्यापैकी संचय करून ठेवला .त्याच्या जोरावर अजुनही ते रुबाबात असतात .काही जणांच्या बाबतीत मात्र काप गेले पण भोके राहिली अशी अवस्था आहे.होते ते सर्व ते घालवून बसले आहेत .पण रुबाब मात्र कायम आहे.नुसतेच मिशीला तूप लावून फिरत असतात.हल्ली दोन प्रकारचे नवसंस्थानिक  उदयाला आले आहेत. कित्येक उद्योगपती हे गडगंज पैसा कमवून संस्थानिकांप्रमाणे राहात आहेत .हा पैसा कमवण्यामागे त्यांचे सर्व प्रकारचे कौशल्य आहे ."सर्व प्रकारचे"हे शब्द महत्त्वाचे आहेत.तर दुसरा प्रकार म्हणजे नवउदयाला आलेले राजकारणी.इथेही त्यांचे "सर्व प्रकारचे" कौशल्य त्यामागे आहे!

काही म्हणा तीन प्रकारचे संस्थांनिक दिसतात एवढे मात्र खरे .जुने संस्थानिक, उद्योगपती आणि राजकारणी. सुरुवातीला उल्लेख केलेला रुबाब मिजास आणि माज हा मात्र काही जणांजवळ नसतो. प्रत्येक क्षेत्रात सन्माननीय अपवाद हे असतातच.

तर आपले सर्जेराव प्रतापरावांचे  चिरंजीव  हे पहिल्या प्रकारातील संस्थानिक आहेत .प्रतापरावांचा मोठा राजवाडा  अाहे .अनेक नोकर नोकराणी ,अरे मी चुकलो दास दासी, नोकरीला आहेत.त्यातील एकीचे नाव सगुणाबाई .ती सर्जेरावांच्या लहानपणापासून दाई म्हणून नोकरीला होती . सर्जेराव तिच्या अंगा खांद्यावर खेळत मोठे झाले.सगुणा बाईला जवळजवळ सर्जेरावांच्या वयाची एक लहान मुलगी होती .तिचे नाव राधा .तर राधा आणि सर्ज्या  ही दोघे बरोबरच एकत्र खेळत लहानाची मोठी झाली .दोघेही एकमेकांना अरेतुरे करीत असत. प्रतापरावांचा मात्र, सर्जेराव अहो सर्जेराव असे म्हटले पाहिजे असा आग्रह असे.

सर्जेराव जसा मोठा होत गेला तसा त्याचा स्वभाव हळूहळू बदलत गेला. लहान मोठा, गरीब श्रीमंत, शहाण्णव  कुळी ब्याण्णव कुळी,वगैरे गोष्टी  त्याच्या अंगात भिनण्यास सुरुवात झाली .त्याची लहानपणीची मैत्रीण राधा हिच्याबरोबर बोलण्यात त्याला आपला अपमान वाटू लागला .राधा त्याच्याशी काही बोलण्यासाठी जाई परंतु हा तिच्याशी नीट बोलत नसे .लहानपणापासून बरोबर खेळल्यामुळे राधाला सर्जेराव आवडत होता.तिचे त्याच्यावर हळूहळू प्रेमही बसले होते.सर्जेरावला मात्र तिच्या बरोबर फिरणे बोलणे आपल्या पातळीला योग्य नाही असे वाटू लागले होते. लहानपणापासूनच्या दोस्तीमुळे राधाला एकदम तोडून टाकणेही त्याला कठीण जात होते.

एक दिवस सर्जेराव शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाण्यास निघाला.गरीबीमुळे राधाला पुढे शिक्षण घेणे शक्य नव्हते .एसएससीनंतर तिने शिक्षण सोडून दिले होते .गोल साडी दोन शेपटे ब्लाऊज असा तिचा साधा पोषाख असे. एक दिवस राधाने सर्जेरावाजवळ शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असा प्रस्ताव मांडला .त्यावर सर्जेरावने शांतपणे माझे तुझ्यावर प्रेम नाही किंवा त्याला जे काही वाटत होते ते शांतपणे सांगण्याऐवजी तिचा अपमान केला. तुझी आई आमच्या राजवाड्यावर दासी म्हणून काम करते.तिची तू मुलगी म्हणजे दासीच. असा विचार,तोंड वर करून माझ्यासमोर मांडण्याची तुझी हिंमतच कशी झाली?आम्ही उच्च वर्गीय, उच्च वर्णीय,तू नीच वर्गीय, नीच वर्णीय,आम्ही श्रीमंत, तू गरीब भिकारी, आपली बरोबरी कशी होऊ शकेल ? आमचा असा अपमान करण्यासारखा विचार तुझ्या मनात तरी कसा आला ? वगैरे वगैरे तुसडेपणाने बरेच काही अपमानास्पद बोलला .त्याने नुसता नकार दिला असता तर राधाला वाईट वाटले असते परंतु राग आला नसता.राधा गरीब असली तरी स्वाभिमानी होती .त्याच्या अश्या औध्दत्यपूर्ण बोलण्याने तिचा तिळपापड झाला.ती एक अक्षरही न बोलता तिथून निघून गेली परंतु मनामध्ये तिने याचा पुरेपूर बदला घेईन वचपा काढीन अशी मनोमन प्रतिज्ञा केली .

सर्जेराव शिक्षणासाठी शहरात निघून गेला .मोठ्या शहरातही त्यांचा एक राजवाडा होताच .त्यात तो राहात असे.गडगंज पैशांमध्ये लोळण्याची लहानपणापासून सवय असल्यामुळे त्याचे शिक्षणाकडे लक्ष बेतास बातच होते.श्रीमंतीची मग्रुरी त्याच्या अंगात भिनली होती ती त्याच्या वर्तनात पदोपदी दिसत असे.जुगार नाच इत्यादी श्रीमंती शौक त्याच्या अंगात भिनले होते .एखादी नवीन सुंदर मुलगी दिसली की तिच्याशी मैत्री करण्यात तिला आपल्या बरोबर फिरविण्यात त्याला गंमत वाटत असे.लग्नाचा विचार अजून त्याच्या मनात आला नव्हता .आला दिवस उंची कपडे घालून अत्तर लावून मौज मजा करण्यात घालवावा असा त्याचा एकूण उनाड फुलपाखरी दिनक्रम होता .

इकडे राधा सर्जेरावचा बदला घेण्याच्या इच्छेने त्याला धडा शिकविण्याच्या इच्छेने तळमळत होती. तिला नक्की काय करावे ते कळत नव्हते.

*तिची एक  मैत्रीण होती.ती सर्जेराव राहात होता त्याच मोठ्या शहरात राहात होती .*

तिथे ती एका कारखान्यात बऱ्यापैकी नोकरीही करीत होती .

*तिला भेटण्यासाठी पाहुणी म्हणून राधा चार दिवस शहरात गेली.*

*तिच्याजवळ राधाने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली .*

*दोघींनी मिळून एक प्लॅन आखला.*

(क्रमशः)

४/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन