Get it on Google Play
Download on the App Store

सप्तात्मे

एके रात्री मी नेहमी प्रमाणे झोपलो होतो. जरा अर्धवट झोपेतच होतो. तर मला काहीतरी कुजबुज ऐकू आली. माझे सप्तात्मे आपापसात बोलत होते.

पहिला आत्मा म्हणाला, “या मूर्खाच्या शरीरात मी इतकी वर्षे वास करून आहे. या संपूर्ण काळात दिवसा त्याला वेदना द्यायच्या आणि रात्री पुन्हा मानत दु:ख आणि विषाद निर्माण करायचा हेच करतो आहे. आता मला रोज रोज तेच तेच करण्याचा कंटाळा आलाय. आता मी बंड करणार आहे.”

त्यावर दुसरा आत्मा म्हणाला, “ अरे भावा, नशीबवान आहेस. कारण या मूर्खाच्या मनात आनंद उत्पन्न करण्याचे काम माझ्या गळ्यात आले आहे. तो हसतो तेव्हा मी हसतो. तो सुखी असतो तेव्हा मी गाणी गुणगुणतो. त्यांच्या चांगल्या विचारांमुळे मला पायात चाळ बांधून नाचावे लागते. खरतर मला यांचा कंटाळा आलाय. बंड तर मी पुकारायला हवं.”

इतक्या तिसरा आत्मा म्हणाला, “ आणि माझे काय?मी प्रेमाच्या भावनेने बांधला गेलेला आत्मा आहे. आणि वासनांची झापड डोळ्यांवर लावून मोकाट धावणारा मी अश्व आहे. या मुर्खाविरुद्ध प्रणय वासनेच्या चिखलात रुतलेल्या मलाच बंड पुकारले पाहिजे.”

यावर चौथा आत्मा बोलू लागला, “ तुमच्या सर्वांच्या दु:खापेक्षा माझे दु:ख मोठे आहे. कारण बीभत्स, द्वेष्टे आणि विनाशक किळसवाणे मन याखेरीज मला काहीच प्राप्त नाही. पण मी वादळाप्रमाणे आहे. माझा जन्म नरकात अंधाऱ्या बिळात झाला आहे. मी या मूर्खाची सेवा का करू? मीच बंड पुकारणार.”

यावर पाचवा गरजला, “ अजिबात नाही. तुमच्या ऐवजी बंड मी पुकारणार. मी विचारी, कल्पना विलासी आणि क्षुधातृष्णा जागृत करणारा आत्मा आहे. माहित नसलेल्या किंवा अद्याप अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध लावण्याचे भोग माझ्या नशिबी आलेत. अविश्रांतपणे मला भटकावे लागते. आता बस! बंड मीच पुकारणार.”
 
यावर सहावा त्वेषाने बोलू लागला, “ मी कष्टाळू आत्मा. मी इतकी मेहनत करतो कि कोणालाही माझी दया येईल. आशाळभूत डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने मी सोशिक हातांनी मूर्त स्वरुपात आणतो. अस्तित्वात नसलेल्या वस्तूंना नवीन आणि चिरंतन असा आकार मी देतो. या मेहनती वेड्याविरुद्ध बंड करण्याचा अधिका मलाच आहे.”

आता शेवटचा म्हणजे सातवा आत्मा बोलू लागला, “ तुम्ही सगळे आधी ठरवून दिलेली काम करता आणि एवढ्याशा गोष्टीसाठी या माणसाविरुद्ध बंड पुकारावे हे अनाकलनीय आहे. किमान तुम्हाला सर्वाना एक एक निश्चित ध्येय आहे. एक ठरवून दिलेले काम आहे. तुम्च्यासाखे माझे नशीब असते तर फार बरे झाले असते.
माझ्या नशिबात काहीच काम नाही. नुसते बसून राहायचे. तुम्ही काही नाही सृजन किंवा निर्दालन करण्यात गुंग असता. मी मात्र उगाच बसून असतो. माझ्या नशिबाला दिशा नाही किंवा काळाचे काही बंधन नाही. हे अतिशय निरस आणि कंटाळवाणे आहे. आता तुम्हीच सांगा बंड कोणी करायला हवा.”

सातव्या आत्म्याचे बोले ऐकले आणि सर्व सहा आत्मे निरुत्तर झाले. त्याचप्रमाणे सर्व आत्म्यांना त्याची दया आली. जसजशी रात्र चढत गेली तसतशी बंडखोरीची भावना त्यांच्या मनातून निघून जाऊ लागली. उलट त्यांच्या मनात आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना आली. ते सर्वजण शांत झोपी गेले आणि तो सातवा आत्मा सर्व जीव आणि वस्तू यांच्या मागे असलेल्या शून्यात नजर लावून बसला.