Get it on Google Play
Download on the App Store

देव

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अगदी पहिल्यांदा मला जेव्हा जाणीव झाली कि मी बोलू शकतो. तेव्हा मी त्या पवित्र पर्वतावर प्रयत्नपूर्वक चढून गेलो आणि माझे दोन्ही हात उंच करून म्हणालो

“ हे देवा, मी तुझा सेवक आहे. तू सांगत नसलास तरी तुझ्या सर्व इच्छा मी जाणतो. त्या सर्व मला काळ्या दगडावरील पांढऱ्या रेषेप्रमाणे आहेत. मी नेहमीच तुझ्या आदेशाचे पालन करीन.”

यावर देव काहीच म्हणाला नाही. एखाद्या प्रचंड मोठ्या वादळाप्रमाणे तो निघून गेला.

या घटनेला जवळपास एक हजार वर्षे लोटली असावीत. मी पुन्हा एकदा तो पवित्र पर्वत मोठ्या शर्थीने चढून गेलो. माझे दोन्ही हात उंच करून म्हणालो

“ हे निर्मिका, मी तुझे सृजन आहे. तू मला मातीतून जन्म दिलास. माझे जे काही आहे ते सर्व केवळ आणि केवळ तूच दिले आहे आहेस.”

याबर देवाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अत्यंत शक्तिशाली पंख असलेल्या एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशात निघून गेला.

आणखी एक हजार वर्ष निघून गेली. मी पुन्हा त्या पवित्र पर्वतावर चढलो. पुन्हा माझे दोन्ही हात उंच करून म्हणालो,
“ मायबापा, मी तुझा मुलगा आहे. तू मला जन्म देताना माझ्यावर अपार दया दाखवलीस. तूझे मन प्रेमाने ओतप्रोत भरलेले होते. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझीच भक्ती करेन. आणि तुझ्या मार्गदर्शनाने मी या पृथ्वीवर राज्य करेन.”

तरीही देवाने काहीच उत्तर दिले नाही. मी त्या पर्वतावरून पाहत होतो. त्याच्या विस्मयकारी मार्गक्रमण करण्याच्या वेगाने धूळ उडून आजू बाजूचा परिसर धूसर झाला होता.

आणखी एक हजार वर्षे लोटली. मी पुन्हा पर्वत शिखरावर पोचलो. माझे दोन्ही हात उंच करून देवाला उद्देशून म्हणालो,

“ हे प्रभो, माझ्या जीवनेचे तूच एकमेव उद्दिष्ट आहेस. मला मिळालेले यश देखील तूच आहेस. तुझा भूतकाळ मी आहे आणि तू माझा भविष्यकाळ आहेस. तू उंच आकाशात उमलणारे सुंदर फुल आहेस. आणि मी आहे त्या फुलाच्या वेलीचे मूळ. आपण दोघे या सूर्य नारायणच्या किरणांमुळे विकसित होत आहोत.

त्याबरोबर ईश्वर चक्क थांबला. त्याच्या यानातून तो खाली उतरला. माझ्याकडे चालत आला आणि मला त्याने कवेत घेतले. एखादा छोटा ओहोळ समुद्राला मिळत असताना समुद्र जसा सहजपणे त्याला आपल्यात सामावून घेतो अगदी तसे ते दृश्य होते. तो माझ्या कानात कुजबुजला.

मग मी पर्वतावरून खाली उतरलो आणि मैदानात आलो. दऱ्याखोरे, नदीनाले तुडवत मी पुढे जाऊ लागलो. तेव्हा मला ईश्वराने जे कानात सांगितले ते लक्षात आले कि संपूर्ण पृथ्वीच देव आहे.