प्रकरण १४ - संबंध रूपता व वेगळेपणा
जीवन म्हणजेच अनुभव .संबंध मयतेतून आलेला अनुभव म्हणजेच जीवन .कोणीही वस्तूत: एकलेपणात संबंधविरहित राहूच शकत नाही.जीवन म्हणजेच संबंधरूपता.संबंधरूपता म्हणजेच कर्म.संबंधरूपता म्हणजेच जीवन .ते समजण्याचे सामर्थ्य कसे बरे प्राप्त होईल?संबंध रूपता म्हणजे केवळ लोकांशी असलेले संबंध एवढेच नव्हे ,तर चराचर सृष्टीशी व कल्पनांशी असलेले अापले संबंधही होय.वस्तू लोक व कल्पना यांच्याशी असलेल्या संबंधातून,हे जीवन, ही संबंधरूपता,हे संबंध, प्रगट होत असतात .हे संबंध समजून घेऊनच ,जीवनाला समर्थपणे यशस्वीपणे तोंड देण्याचे सामर्थ्य, प्राप्त होत असते.सामर्थ्य ही आपली समस्या नाही.सामर्थ्य हे संबंधरूपतेहून निराळे नाही .
आपली समस्या संबंधरूपता समजून घेणे ही आहे.या समजातूनच तरलता उत्कटता व वेगाने ताबडतोब समजून घेण्याचे जमवून घेण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल.
संबंधरूपता म्हणजे स्वतःचा अापण ज्यात शोध घेऊ शकतो असा आरसा आहे .संबंध नाही म्हणजे तुम्ही नाही. तुम्हाला अस्तित्वच नाही .असणे म्हणजे संबंध रूप असणे. तेच अस्तित्व. तुम्ही फक्त संबंधमयतेतच असू शकता .जर संबंध नसतील तर तुम्ही अस्तित्वातच नाही .त्या अस्तित्वाला कांही अर्थ नाही .तुम्ही, "तुम्ही आहात" असा विचार करता, म्हणून तुम्हाला अस्तित्व आहे .तुम्ही अस्तित्वात येता असे नसून,तुम्ही संबंधरूप आहात,म्हणून तुम्हाला अस्तित्व आहे.ही संबंधरूपता समजलेली नसणे हे विरोध व झगड्याचे कारण आहे.
संबंधरूपतेची समज नाही, कारण आपण संबंधरूपता ही कांहीतरी मिळविण्यासाठी, कांहीतरी बदल घडवून आणण्यासाठी, कांहीतरी बनण्यासाठी वापरतो .संबंध रूपता हे स्व-शोधनाचे साधन आहे या दृष्टीने आपण संबंधरूपतेकडे कधी पाहत नाही . संबंध रूपता म्हणजेच असणे.संबंध नाहीत म्हणजे मला अस्तित्व नाही .स्वत:ला समजून घेण्यासाठी मला हे संबंध तपासून पाहिले पाहिजे .त्यांचा शोध घेतला पाहिजे .संबंधमयतेच्या अारशात मी स्वत:ला पाहू शकतो.
हा अारसा(संबंधमयता) वेडावाकडा असतो.जो जसा आहे तसा असतो. त्यात जो जसा आहे, तसे त्याचे प्रतिबिंब पडत असते.आपल्यापैकी बरेचजण या आरशात जे जसे आहे तसे ते पहात नसून, जे काही पाहणे आवडेल, ते बघत असतात .आपण जे कांही आहे त्यापासून पळवाटा शोधून काढतो. वर्तमान पहाण्यापेक्षा भविष्य पाहत असतो. वर्तमानात जगण्यापेक्षा आपण भविष्यात जगत असतो .
जर आपण आपले आयुष्य तपासले, तर आपल्याला असे आढळून येईल कि आपली संबंधमयता, ही स्वतःला निराळे राखण्याची व पाडण्याची एक प्रक्रिया आहे.खरोखरच आपल्याला दुसर्याची काळजी नसते .दुसर्याशी आपला संबंध नसतो .मात्र आपण दुसर्यांबद्दल फार बोलतो. जोपर्यंत संबंधमयता संतोषविते, सुखविते, सुरक्षितता देते, तोपर्यंतच आपण संबंध ठेवतो.जर का या संबंधमयतेला धक्का पोचला तर अापण संबंध तोडून टाकतो.या धक्क्यामुळे आपल्याला असंतोष होतो. वेगळ्या शब्दात थोडक्यात सांगावयाचे झाले, तर जोपर्यंत आपली खुशामत होत आहे, तोपर्यंत आपण संबंध राखतो .हे कदाचित् फार कठोर वाटण्याचा संभव आहे,परंतु जर तुम्ही निरीक्षण कराल, तर ही वस्तुस्थिती आहे असे तुम्हाला आढळून येईल . वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे म्हणजे अज्ञानात राहणे होय.
अज्ञानातून योग्य संबंध कधीच निर्माण होणार नाहीत.जर आपण आपल्या जीवनात डोकावून पाहिले, तर आपल्याला असे आढळून येईल कि संबंधमयतेला आपण एकमेकांमध्ये अडथळे निर्माण करण्याची एक प्रक्रिया बनविले आहे .ही एक भिंत आहे .या भिंतीवरून आपण एकमेकांकडे पहातो.ही भिंत राखणे भिंतीच्या आश्रयाने रहाणे आपल्याला नेहमीच आवडते.ही भिंत राष्ट्रीय, आर्थिक,सामाजिक, धार्मिक,प्रांतीय,जातीय,पंथीय मानसिक, इ. कोणत्याही प्रकारची असेल .जोपर्यंत आपण अशाप्रकारे भिंती आड रहात आहोत तोपर्यंत खरी समज व योग्य संबंध प्रस्थापित होणार नाहीत .आपण असे राहतो कारण हे जास्त सुरक्षित व जास्त सुखकारक असे आपल्याला वाटते.
जग हे इतके (भयानक) दुःखमय,विनाशकारक,क्लेशमय, झगडे,भांडणे,विरोध,इत्यादिकांनी भरलेले आहे कि त्यापासून आपल्याला पलायन करावयाचे असते.
मनाच्या चार भिंतीआड सुरक्षितपणे राहायचे असते .या प्रकारे आपल्या पैकी बहुतेकजणांनी संबंधमयता म्हणजे वेगळे रहाण्याची एक प्रक्रिया बनवली आहे . स्वाभाविकच अशा संबंधमयतेतून वेगवेगळी डबकी तयार करणारा समाज निर्माण होतो.जगात बरोबर हेच सर्वत्र चालले आहे.तुम्ही आपल्या भिंतीमागे रहाता,नंतर चवड्यांवर वर उभे राहून भिंतीवरून हात बाहेर काढता,आणि त्याला विश्वबंधुत्व वगेरे संज्ञा देता .सर्व सैन्ये,सत्ताधीश,सरकारे वगैरे अस्तित्वात रहातातच.स्वतःच्या कुंपणात राहून तुम्ही विश्वबंधुत्वाच्या, विश्वऐक्याच्या विश्वशांतीच्या गप्पा मारता.जोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय,आर्थिक,सामाजिक,धार्मिक, वगैरे वगैरे कुंपणे आहेत तोपर्यंत विश्वऐक्य विश्वशांती अशक्य आहे. वेगळे पडण्याची प्रक्रिया ही स्व-सामर्थ्य-शोध-प्रक्रिया असते. सामर्थ्य तुम्ही केवळ स्वतःसाठी शोधीत असाल किंवा जात धर्म पंथ राष्ट्र इत्यादिकांसाठी शोधीत असाल.तुम्ही सामर्थ्य उपासना करीत आहात म्हणजे वेगळेपणा दूरत्व अपरिहार्य आहे .शक्ती प्रतिष्ठा सत्ता मान यांची वासना, दुभंगवणारी आहे .प्रत्येकाला हेच हवे असते .प्रत्येकाला असे एक स्थान हवे असते कि तो तिथून सत्ता गाजवू शकेल .दुसऱ्याना हुकूम सोडू शकेल .ताब्यात ठेवू शकेल .मग प्रत्येकाचे वर्तुळ घर,गल्ली,गांव,शहर, जिल्हा,प्रांत,राष्ट्र,जग,इत्यादी कांहीही असेल,प्रत्येक जण सामर्थ्याचा शोध घेत आहे .आणि मग अपरिहार्यपणे सामर्थ्य संघर्ष अस्तित्वात येतो.
विरोधातून(संघर्षातून)आर्थिक, धार्मिक,सामाजिक,राष्ट्रीय,औद्योगिक, सैनिकी, इत्यादी सत्तेवर अधिष्ठित समाजरचना होते .सामर्थ्य असावे ही वासनाच वस्तुत: वेगळे पाडणारी नाही काय ?हे समजणे फार अगत्याचे आहे असे मला वाटते.ज्या मनुष्याला जगात शांती पाहिजे,ज्या मनुष्याला जगात युद्धे नकोत,ज्याला शोककारक विनाश नको,ज्याला क्लेश नकोत,त्याने हा प्रश्न समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.हे महत्त्वाचे नाही काय?
जो प्रेमळ आहे, मृदू आहे,ज्याला सामर्थ्य म्हणजे काय हे माहीत नाही,असा मनुष्य कुठचाही समाज राष्ट्र,निशाण, यांनी बांधला जात नाही .त्याला निशाणच नसते.
वेगळेपणाने असणे अशी वस्तुस्थितीच अस्तित्वात नाही, म्हणजेच कुठचाही समाज, देश, व्यक्ती, वेगळी राहूच शकणार नाहीत अशी स्थिती अस्तित्वात येणे,जोपर्यंत तुम्ही सामर्थ्य,शक्ती, मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात, तोपर्यंत शक्य नाही. आणि तुम्ही तर वेगवेगळ्या मार्गाने सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करून,वेगवेगळी डबकी निर्माण करीत आहात.
राष्ट्रीयत्व हा एक मोठा शाप आहे. राष्ट्रीयत्वाच्या, देशाभिमानाच्या, प्रेरणेतून एक वेगळी मजबूत भित बांधली जाते. असा मनुष्य स्वतःच्या देशाशी इतका एकरूप झालेला असतो, कि त्याची परिणति एक वेगळी उंच मजबूत भिंत बांधण्यात होते. जेव्हा तुम्ही व दुसरे कांहीतरी यांच्यामध्ये भिंत बांधली जाते तेव्हा काय होते ?ते काहीतरी सारखे पलीकडच्या बाजूने भिंतीवर डोके आपटीत राहते.जेव्हा तुम्ही कोणाला तरी विरोध करता तेव्हा तो विरोधच, तुमचा कोणाशीतरी झगडा आहे असे दर्शवितो .
सामर्थ्य उपासनेचे फळ वेगळेपणा व वेगळेपणाची प्रक्रिया असे राष्ट्रीयत्व,जगामध्ये कधीही शांती आणू शकणार नाही.जो मनुष्य राष्ट्रीय आहे, आणि त्याचबरोबर विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारीत आहे,तो मनुष्य असत्य भाषण करीत आहे. त्याने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे .तो स्वतःच विरोधमय स्थितीत जगत आहे .तो अज्ञ आहे .
एखादा जगात सामर्थ्य वासने शिवाय जगू शकेल काय ?अर्थात नक्की जगू शकेल .मी स्वतःला वरवर मान्य केले नाही तरी अद्वितीय अतुलनीय समजतो .असे समजण्याचे बाहेरून नव्हे तर खरोखरच अंतर्यामी मी सोडून देईन,तेव्हा मी खरे जगण्याला सुरुवात करीन.स्वतः कशाशी तरी एकरूप होणे,मग तो पक्ष, प्रांत, जात,धर्म,राष्ट्र, देश,जग, सत्य, परमेश्वर, काहीही असो म्हणजेच सामर्थ्याचा शोध घेणे.
तुम्ही सामर्थ्याचा शोध कां बरे घेत असता ?तुम्हाला आपण पोकळ, रिकामे,दुबळे,मद्दड असल्याचे आढळून आले आहे ,आणि म्हणून दुसऱ्या कशाशी तरी एकरूप होऊन,आपली कक्षा वाढवून, आपला दुबळेपणा घालविण्याचा तुमचा प्रयत्न असतो .ही दुसर्या काहीतरी अन्य वस्तूंशी कल्पनेशी एकरूप होण्याची वासना, सामर्थ्य वासनेतून निर्माण होते .
संबंध रूपता हे स्वतःला समजून घेण्याचे साधन आहे. स्वतःला ओळखल्याशिवाय ,समजल्याशिवाय, स्वतःचे मन व अंतःकरण यांचे मार्ग समजून घेतल्याशिवाय, नुसत्या बाह्य डागडुजीने,कांहीही होणार नाही.त्याला कांही अर्थच नाही.स्वत:ला स्व-संबंधातून ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.याला जेव्हां सुरुवात होते तेव्हां संबंधरूपता ही वेगळी पाडण्याची व राखण्याची प्रक्रिया न राहता ती स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया बनते.या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःचे मार्ग, विचार, हेतू, समजून घेता आणि हा शोध, ही समज,म्हणजेच स्वातंत्र्याची मुक्तीची सुरुवात आहे.