प्रकरण ११ - साधेपणा
साधेपणा म्हणजे काय याचा विचार करणे मला आवडेल .कदाचित आपण त्यातून संवेदनाक्षमता ,साधेपणा शिवाय शक्य नाही ,अशा निर्णयावर येऊ.साधेपणा म्हणजे बाह्य वर्तणुकीतील साधेपणा अशी आपली सर्वसाधारण कल्पना असते .साधे कपडे ,साधी राहणी, सर्व गोष्टींचा त्याग, आवश्यक असेल तेवढीच मालमत्ता, म्हणजे साधेपणा अशी आपल्या सर्वांची समजूत आहे असे मला वाटते .साधेपणा म्हणजे केवळ वर उल्लेख केलेली बाह्य़ वर्तणूक असणे शक्यच नाही .स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर वरील बाह्य वर्तवणूक म्हणजे कांही वेळा तमाशा होय.साधेपणा अत्यावश्यक आहे असे मला वाटते .ज्यावेळी स्व-ज्ञानाचे महत्त्व तुमच्या लक्षात येऊ लागेल, त्यावेळी साधेपणा आपोपच अस्तित्वात यायला सुरुवात होईल . कोणत्या तरी आकारात स्वतःला बसवून घेणे म्हणजे साधेपणा नव्हे.प्रशंसनापर अशा एखाद्या चौकटीत आपल्याला बसविणे म्हणजे साधेपणा नव्हे.साधेपणा असण्यासाठी कितीतरी तीव्र समज व प्रचंड सूक्ष्मतम बुद्धी लागते.
दुर्दैवे करून साधेपणा म्हणजे बाह्य साधेपणा अशी आपली समज असल्यामुळे आपण तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतो .थोड्या वस्तू असणे, थोड्या वस्तूंनी समाधानी असणे, थोडक्यात गोडी मानणे, जे काही थोडे बहुत असेल ते सर्वानी वाटून घेणे, त्यात इतरांना सहभागी करून घेणे, तुलनात्मकदृष्टय़ा खूप सोपे आहे .हे सर्व चांगले असले तरी बाह्य साधेपणा साध्या अंतरंगाची हमी देऊ शकत नाही .तो पुरावा होऊ शकत नाही .बाह्य साधेपणा आणला म्हणजे हळूहळू अंतरंगही साधे होते असेही नाही .आजच्या यांत्रिक व तांत्रिक युगात परिस्थितीनुरूप कितीतरी गोष्टी अपरिहार्यपणे स्वीकाराव्या लागतात .कितीतरी गोष्टी स्वीकारण्यासाठी परिस्थितीचा दबाव असतो .कितीतरी गोष्टींचा मोहही निर्माण होतो .जीवन जास्त गुंतागुंतीचे बनत चालले आहे .
या गुंत्यातून निसटण्यासाठी आपण निरनिराळ्या वस्तूंच्या त्यागाला सुरुवात करतो. अमूक अमूक वस्तू आपण वापरता कामा नये असे ठरवितो .मोटारी, आगगाड्या,विमाने,हेलिकॉप्टर, उंची कपडे,टीव्ही,मोबाईल, कॉम्प्युटर,लॅपटॉप,सुंदर सुंदर घरे, इत्यादी .या सर्वांचा त्याग केला म्हणजे आपण साधे झालो अशी बर्याच जणांची समजूत असते .मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांनी, संतांनी व साधूंनी असा त्याग केलेला आहे. लंगोटी लावून, झोपडीत राहून, वृक्षाखाली आपले जीवन जगून,एकदा जेवून, आपले प्रश्न सुटतील असे मला वाटत नाहीत .आपले प्रश्न सोडविण्याला या गोष्टी मदत करतील असे सुद्धा मला वाटत नाही.
मूलगामी खरा साधेपणा अंतरंगात आला पाहिजे .बाह्य वर्तणुकीत तो आपोआप उमटतो .आपण साधे कसे व्हावे ही खरी समस्या आहे .साधेपणा म्हणजेच संवेदनाक्षमता,त्यासाठीं संवेदनाक्षम मन, संवेदनाक्षम अंतकरण,अत्यावश्यक आहे .असेच मन काही घ्यायला काही समजून घ्यायला समर्थ असते.
अगणित अडथळे, आपल्याला बांधून ठेवणारे असंख्य बंध, भीती, यांनी अापण कसे अडकलेले आहोत ,हे नीट समजून घेण्याने ,अंतर्यामी साधेपणा येईल असे मला वाटते.आपल्यापैकी बऱ्याच जणांना बंध आवडतात .लोक आप्तेष्ट ,निरनिराळ्या संस्था, वस्तूसंग्रह, निरनिराळ्या कल्पना, मित्र, यात अडकलेले असतात. असे गुंतणे असे अडकणे आपल्याला आवडते.कैदी बनणे कैदी असणे आपल्याला खरोखरच आवडते .बाह्यवर्ती आपण जरी कदाचित् साधे असलो, तरी अंतर्यामी आपण फार अशुद्ध व अवघड असतो.असंख्य वासना, अाशा, कल्पना,तृष्णा,ध्येये,आकांक्षा, श्रद्धा, मते, निर्णय, पुरावे, अवतरणे, ज्ञान ,इत्यादिंच्या गजाआड अडकलेले आपण कैदी असतो.
आणखी आणखी गज, तटबंद्या, भिंती, कुंपणे, खंदक, निर्माण करणे आपल्या आवडते.गज तोडण्याचे प्रयत्न म्हणजे फक्त निराळ्या तर्हेचे कुंपण असते .या सर्व तटबंद्या जमीनदोस्त झाल्याशिवाय आपण स्वतंत्र होणार नाही.आणि अंतर्यामी स्वातंत्र्य आल्याशिवाय साधेपणा अस्तित्वात येणार नाही. तेव्हा सुरुवात आंत झाली पाहिजे बाहेर नव्हे. श्रद्धा प्रक्रिया व श्रद्धा ठेवण्याची कारण मीमांसा, संपूर्ण लक्षात आली कि असामान्य स्वातंत्र्य अस्तित्वात येते.
श्रद्धेपासून मुक्तता झाली कि आपोआपच स्वातंत्र्य प्राप्त होते .स्वातंत्र्य म्हणजे साधेपणा व साधेपणा म्हणजे स्वातंत्र्य .स्वतःच निर्माण केलेल्या, स्वतःला अडथळा निर्माण करणाऱ्या,अडथळ्यां बद्दल संपूर्ण जागृती असण्यासाठी, विलक्षण बुद्धी लागते.अशा बुद्धीशिवाय समजाशिवाय साधेपणा अस्तित्वात येत नाही.
जागृतता म्हणजे सदैव अखंड पहारा, स्वतःला कुठच्याही आकारात न बसविणे होय .बसविण्याचा प्रयत्नही न करणे होय .हे सुध्धा न करणे. मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येत अाहे काय? कुठच्याही प्रकारच्या विशिष्ट श्रद्धा व विचारांचे गुलाम अापण होता कामा नये. असता कामा नये.अंतर्यामी जे काही असते, त्याचा परिणाम अपरिहार्यपणे बाहेर होत असतो .कुठचीही बाह्य क्रिया ,हे एक केवळ अंतरंगाचे प्रतिबिंब असते .अंतरंग बदलाविना, नुसते कायदे व शिस्तपालन, नियमावल्या ,यांचा काडीचाही उपयोग नाही .कांही बदल कांही सुधारणा अशा कायद्यांनी होतात .पण शेवटी अंतरंगाचा जोर होऊन बहिरंग झाकळले जाते .अंतरंग जर अधाशी ,वखवखलेले, ध्येयप्राप्तीसाठी आसुसलेले, कुठच्याही प्रयत्नाचे पालन करण्यासाठी अकटोविकट आसुसलेले असेल, तर शेवटी अंतरंगातील गुंतागुंत ,कितीही काळजीपूर्वक रचलेली समाजरचना उद्ध्वस्त करून टाकते .
सुरवात आंत झाली पाहिजे,बाहेर नव्हे.परंतु हेही विसरता येत नाही कि अंतरंगात प्रवेश बाह्य समजानेच शक्य होतो.सर्वत्र चाललेले निरनिराळे गोंधळ, क्लेश, दु:ख, विरोध ,हेलकावे, हे पाहता व त्याचे जास्त जास्त संशोधन करता,शेवटी तुम्ही या सर्वांचे गुंतागुंतीचे कारण, अशा अंतरंगातील गुंतवळ्यापर्यंत येऊन पोहचता.बाह्य स्थिती ही अंतरंग स्थिती दाखवते .परंतु अंतरंग समजण्यासाठी प्रवेश हा बाहेरूनच करावा लागतो. आपल्यापैकी बरेचजण तसे प्रयत्न धडपड करीत असतात. ही बिकट बाह्य परिस्थिती टाकून वा टाळून नव्हे तर, बाह्य परिस्थिती हळूहळू समजून घेऊन, अशाप्रकारे हळूहळू अंतरंगामध्ये येऊन, अंतरंग गुंतागुंत जशी जास्त जास्त प्रकाशित होत जाईल, तसतसे आपण आपोआपच संवेदनाक्षम होऊ लागतो.
अंतरंग साधेपणा आवश्यक आहे .त्यामुळे संवेदनाक्षमता निर्माण होते .जे मन संवेदनाक्षम नाहीं, जागृत नाही, सावध नाही, ते कुठल्याही सृजनशील क्रिया करण्यास, कांही घेण्यास असमर्थ असते .साधेपणा अंगी बाणविण्यासाठी केलेले कुठलेही प्रयत्न , हे मन मद्दड मठ व सुस्त करून टाकतात .साधेपणाच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न मन मठ्ठ करतो .कुठलेही शिस्तपालन मग ते समाजाने लादलेले असो, सरकारने लादलेले असो, किंवा धर्माने लादलेले असो, जातीने लादलेले असो, किंवा स्वतःच लादलेले असो,त्याचा हेतू एका विशिष्ट चौकटीत बसणे हा असतो .त्याची परिणती अंतरंग आणखीच अवघड व गुंतागुंतीचे होण्यात होते .बाह्य दर्शनात तुम्ही एखाद्या चौकटीत बसाल व साधेपणाचा तमाशा दाखवू शकाल .कितीतरी तथाकथित धार्मिक लोक हेच करीत असतात .विशिष्ट पोषाख, विशिष्ट दैनंदिन दिनचर्या,आचार,नेमधर्म, विशिष्ट प्रार्थना पद्धती, इत्यादिकांच्या साहाय्याने साधेपणाचा तमाशा उत्कृष्ट करता येतो .पण असे आचरण साधेपणा आणित नसते.कोणत्याही प्रकारची कोणीही केलेली सक्ती, साधेपणा आणू शकत नाही.किंबहुना साधेपणा हा प्रयत्न करून मिळवण्याची चीजच नव्हे .जो जो तुम्ही साधेपणासाठी धडपडता,बाह्य वर्तन दाबून टाकण्याचा प्रयत्न करता,आपली गुंतागुंत वितळवून टाकण्यासाठी धडपड करता, तो तो तुम्ही असलेला साधेपणाही हरवून बसता.दाबून टाकणे, टाळणे, शिस्त पालन करणे, या मागील कारण परंपरा जसजशी आपण समजावून घेता, तसतसा आपोआप साधेपणा येऊ लागतो. अत्यंत धूर्त मुत्सद्दी व चाणाक्ष होऊन नव्हे तर अत्यंत विलक्षण साधे होऊनच आपण अत्यंत किचकट असे गुंतागुंतीचे सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक व परिस्थितीजन्य प्रश्न प्रश्न सोडवू शकू .
गुंतागुंतीच्या मनुष्यापेक्षा साधा मनुष्यच जास्त स्पष्ट पाहू शकतो .त्याला जास्त प्रत्यक्ष अनुभव येतो .आपले मन हे श्रद्धा, ज्ञान,अवतरणे, त्या त्या प्रश्नावरील अनेकांची मते,यांनी इतके गच्च भरलेले आहे,कि साधे असण्याला,संवेदनाक्षम असण्याला, प्रत्यक्ष अनुभवण्याला, ते असमर्थ ठरते. आजपर्यत हे प्रश्न निरनिराळ्या प्रकारे सोडविण्याचे प्रयत्न झाले.आता अशी वेळ आली आहे कि वेगळीच निराळी पद्धत वापरण्याची आवश्यकता आहे .ती पद्धत म्हणजे आपण साधे असले पाहिजे. सरळ असले पाहिजे.साधेपणा स्व-ज्ञानातून निर्माण होतो .आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना,आपल्या विचारांच्या हलचाली,आपल्या कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया, आपली कुठच्या कुठच्या चौकटीत बसण्यासाठी चाललेली धडपड, या पाठीमागील भीती, कारणमीमांसा,( सामाजिक प्रचलित मते , मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांची मते, किंवा मोठमोठया बुद्ध ख्रिस्त यासारख्या संतांची शिकवणूक, इत्यादी इत्यादी मुळे निर्माण झालेली धारणा) व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरक्षित असावे ही मूलभूत तीव्र अशी वासना, या सर्वांचे अखंड अविरत साक्षित्व म्हणजे स्व-ज्ञान होय.
आपण सुरक्षितता शोधित आहोत याचाच अर्थ आपण घाबरलेले आहोत.याचाच अर्थ आपण साधे नाही. निर्भयतेशिवाय साधेपणा असत नाही .साधेपणा शिवाय संवेदनक्षमता नाही.संवेदनाक्षम अंतःकरण चराचरा बद्दल संवेदनक्षमता बाळगते.वायू ,पशू पक्षी, निर्झर, आकाश, निसर्ग, पर्वत, बाहेर घडणारी प्रत्येक हालचाल,याबद्दल संवेदनाक्षमता, ही साधेपणाशिवाय असत नाही.साधेपणाविना चराचराची प्रत्यक्ष ओळख होत नाही.
आपल्यापैकी बरेचजण उथळ जीवन जगत असतात. जाणिवेच्या अगदी बाह्य थरात अापण वावरत असतो .इथे आपण विचारशील बुद्धिमान व समजयुक्त असण्याचा प्रयत्न करतो .तथाकथित धार्मिक असण्यापेक्षा हे कांही फार निराळे नाही .जाणिवेच्या बाह्यथरातच अापण साधे असण्याचा प्रयत्न करतो .हा प्रयत्नही शिस्त पालन करून चाललेला असतो .हा खरा साधेपणाच नव्हे .वरचा थर शिस्त पालनाने साधा करण्याचा प्रयत्न काठिण्य आणतो.त्यामुळे मन स्वच्छ पारदर्शक प्रवाही व तत्पर बनत नाही.जाणिवेच्या सर्व पातळ्यांवर अखंड संपूर्ण साधेपणा असणे अत्यंत कठीण आहे .त्याला कुठल्याही तर्हेचा अडथळा व हातचे राखून ठेवणे मारक ठरते.
साधेपणा प्राप्त होण्यासाठी स्व-शोध कळकळ पाहिजे .आपल्या अस्तित्वाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी तळमळ पाहिजे .कुठल्याही बारीकसारीक सूचनेबद्दल जागृतता पाहिज़े .आपल्या आशा,आकांक्षा,भीती, समजुती, यांचे जास्त जास्त संशोधन केले पाहिजे.अशाप्रकारे जास्त जास्त स्वतंत्र बनले पाहिजे .जेव्हा मन कुठच्याही खोड्यात नसते, कुठच्याही विशिष्ट आकारात नसते, तेव्हांच आणि फक्त तेव्हांच साधेपणा अस्तित्वात येतो .त्याचवेळी समोर दत्त म्हणून उभ्या असलेल्या अत्यंत गूढ व किचकट समस्या सुटतात.
ज्ञान हे आपल्याला प्रश्न सोडवण्याला मदत करणार नाही .उदाहरणार्थ मरणोत्तर जीवन आहे. जीवाला अखंडत्व आहे .आला म्हणजे आला ,गेला म्हणजे गेला ,असे नाही. हे तुम्ही जाणाल.तुम्ही कदाचित जाणाल, तुम्ही जाणता असे मला मुळीच म्हणायचे नाहीं .कदाचित तुमची प्रत्यक्ष खात्री पटेल .पण यामुळे समस्या सुटणार आहेत काय ?तुमची मतप्रणाली माहिती किंवा प्रत्यक्ष ज्ञान याने प्रश्न सुटणार आहे काय? मृत्यूचा प्रश्न सुटला असे होणार आहे काय ? मृत्यू हा त्याहून कितीतरी गूढ कितीतरी खोल व कितीतरी सृजनशील आहे .
प्रत्येक गोष्ट प्रत्येक घडामोड प्रत्येक हालचाल क्षणाक्षणाला ताजेपणाने पाहता आली पाहिजे. ताजेपणाने संशोधन करता आले पाहिजे. प्रत्यक्ष अनुभवानेच प्रश्न सुटत असतात .ज्ञानातून प्रश्न सोडविणे ही अप्रत्यक्ष पद्धत आहे .प्रत्यक्ष अनुभवाशिवाय साधेपणा नाही .साधेपणाशिवाय संवेदनक्षमता नाही .ज्ञानामुळे मन जास्त जड मंद व वाकलेले बनते.त्यामुळे ते प्रतिक्षणी वर्तमानाशी जमवून घेऊ शकत नाही .वर्तमानाशी क्षणाक्षणाला संलग्न असणे हे अशा सुस्त मनाला शक्य होत नाही.प्रतिक्षणी उत्पन्न होणाऱ्या प्रचंड दाबाना तोंड द्यायला त्या समजून घ्यायला ते म्हणूनच असमर्थ असते .
जो उपास तापास करतो, कफनी घालतो,जाडेभरडे कपडे वापरतो, दिवसातून एकदाच जेवतो, हे करीन, ते करणार नाही, असे म्हणतो अशा अनेक शपथा ज्याने घेतलेल्या आहेत, वागणुकीचे नियम ठरवून ठेवलेले आहेत,तो खरोखर धार्मिक नसतो .परंतु जो कमालीचा अंतर्यामी साधा आहे, जो काहीही बनत नसतो, तो खरा धार्मिक आहे .अशा मनाची समज क्षमता असामान्य असते .कारण तिथे अडथळा नसतो. भीती नसते.कुठे जाणे येणे नसते. म्हणूनच परमेश्वर,सत्य,किंवा जे कांही आहे ते, समजण्यासाठी असे मन समर्थ असते .सत्यशोधन करणारे मन साधे नसते.शोधणारे,तपास करणारे, चिकित्सा करणारे,तलास करणारे, चळवळ करणारे, धडपड करणारे,बंड करणारे, मन साधे नसते .आंत किंवा बाहेर कसलातरी आकार असावा अशी इच्छा करणारे मन साधे नसते .जेव्हा मन खरोखरच संवेदनाक्षम असते, जागृत असते, स्व-हालचालींबद्दल , प्रतिक्रियांबद्दल ,विचारांबद्दल, जागृत असते ;काही तरी बनत नसते ,स्वतःला आकार देत नसते, आकार राखीत नसते, तेव्हाच ते सत्य समजण्याला समर्थ असते. फक्त तेव्हाच आनंद असू शकतो .
आनंद हा शेवट नव्हे.सत्यप्रकटन हा शेवट व आनंद हे त्याचे फळ आहे .जेव्हा मन व अंतकरण कुठच्याही शिस्त पालनाने किंवा आचरणाने नव्हे, तर स्व-ज्ञानातून साधे होईल,तेव्हा ते सर्व समस्या अत्यंत सोप्या सरळ पद्धतीने सोडवू शकेल .समस्या कितीही गुंतागुंतीच्या व अवघड का असेनात, त्या विलक्षण साधेपणाने, माहीत असलेल्या पद्धतीहून अत्यंत वेगळ्या पद्धतीने, पाहिल्या पाहिजेत हाताळल्या पाहिजेत .वास्तविक यावेळी यांची गरज आहे .कुठल्या तरी डाव्या किंवा उजव्या प्रणाली, तत्वे,कारिका, साचे ,यानी समस्या सोडविणार्या लोकांची नव्हे तर गोंधळ, झगडे, भांडणे, विरोध,असंतोष, या सगळ्यांकडे ताजेपणाने साधेपणाने व सृजनशीलतेने पाहणाऱ्या लोकांची गरज आहे .प्रतिक्षणी नित्य नवी भेट ही साधेपणाशिवाय शक्य होत नाही.
समस्या फक्त अशा प्रकारेच सुटतील .कुठच्या तरी प्रकारच्या आकाराच्या, राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक किंवा अन्य काही विचारांनी, जर आपण समस्या सोडवीत असू तर प्रतिक्षणी ताजेपणा राहणार नाही.असणार नाही. आणि म्हणूनच या गोष्टींपासून आपण स्वतंत्र झालो पाहिजे.तरच आपण साधे होण्याची शक्यता आहे.यासाठी जागृत असणे आवश्यक आहे.अखंड सर्व-स्व-साक्षित्वाची निकड आहे. स्वतःची संपूर्ण विचारप्रक्रिया समजण्याची आवश्यकता आहे .स्वतःशी संपूर्ण जानपहचान असणे गरजेचे आहे .यातूनच साधेपणा उदय पावतो .साधेपणा म्हणजे गरीब असणे होय.हा साधेपणा सवयजन्य किंवा सद्गुणमशागतजन्य नसतो. मिळविलेला साधेपणा हा साधेपणा नसतो .जे मन स्वतःला गरीब व दयाशील बनवते ते प्रत्यक्षात दयाशील नसते .मशागत करून नव्हे तर स्व-ज्ञानाने जेव्हा अहंकार आपोआप संपूर्णपणे नाहीसा होतो तेव्हा "मी"ला काडीचेही महत्त्व नसते .अशा वेळी स्वतःबद्दलच्या धारणेतून, स्व-महत्त्व जाणिवेतून, समस्यांकडे पाहिले जात नाही .समस्यांसाठी समस्यांकडे पाहिले जाते तेव्हांच त्या सुटतात.