प्रकरण १ : ओळख
आपण जरी एकमेकांना दीर्घ काळ ओळखत असलो तरी आपले विचार तुम्हाला यथा तथ्य समजावून देणे अशक्य आहे.कारण मी जो शब्द ज्या अर्थाने वापरीत असेन, त्या अर्थाने तो तुम्हाला अभिप्रेत असेल ,असे नाही. .एकमेकांवर नितांत उत्कट प्रेम असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत तत्काळ समज शक्य असते.एकाच वेळी एकाच पातळीवर ज्यावेळी आपण भेटू ,त्यावेळी हे विचार संवहन तात्काळ शक्य होते .
विशिष्ट हेतूने ज्यावेळी आपण प्रेरित असू त्यावेळी सहजपणे व परिणामकारक रित्या विचार संवहन करणे अतिशय कठीण होते .मी अत्यंत साधे शब्द वापरणार आहे .क्लिष्ट व तांत्रिक शब्दांचे येथे काही प्रयोजन आहे, असे मला वाटत नाही .मानसशास्त्रीय व तत्त्व शास्त्रीय तांत्रिक परिभाषा मी वापरणार नाही .सुदैवाने मी मानसशास्त्र व धर्म यावरील ग्रंथ वाचलेले नाहीत .रोजच्या व्यवहारातील व वापरातील साधी शब्दयोजना करून अत्यंत गूढ अशा विचारांचे संवहन करण्याचा माझा विचार आहे .परंतु जर तुम्हाला ऐकावे कसे हे माहीत नसेल तर मात्र हे विचार संवहन अतिशय कठीण होणार आहे.
उत्कृष्ट श्रोतृत्व ही एक कला आहे .उत्तम श्रोता होण्यासाठी व्यावहारिक गोष्टी ,पूर्वग्रह व पूर्व मते ,दूर ठेवणे अत्यावश्यक आहे .ज्यावेळी तुमचे मन विचार ग्रहण करण्याच्या स्थितीमध्ये असेल त्यावेळी विचार संक्रमण सहज शक्य होईल .
ज्यावेळी तुमचे मनापासून लक्ष असेल ,त्याचवेळी तुम्हाला मी सांगितलेला अाशय सहज समजेल .भीती ,इच्छा ,वासना, लालसा ,चिंता , धर्मज्ञान, किंवा मानसिक व आत्मिक गोष्टी,यांचे पडदे आपल्या भोवती आहेत .आपण जे काही ऐकतो ते या पडद्यातून गाळून आलेले असते.त्यामुळे आपण स्वतःचाच आवाज ,गोंगाट ,ध्वनी, ऐकत असतो .जे काही सांगितले जात आहे ते आपण कधीच ऐकत नाही .आपले शिक्षण ,ज्ञान`, संस्कार, पूर्वग्रह ,आवडी निवडी, संमती किंवा विरोध, हे सर्व बाजूला ठेवून, एकाग्रतेने व उघड्या मनाने ऐकणे, ही अत्यंत बिकट गोष्ट आहे .जर आपल्याला हे शक्य झाले तर आपण एकमेकांना तात्काळ समजू शकू .
आपल्या अनेक अडचणी मधील ही एक प्रमुख अडचण आहे .तुमच्या श्रद्धा व तुमची विचारसरणी यांच्या विरुद्ध जर मी बोललो, तर नुसता मानसिक विरोधही करू नका .फक्त उघड्या मनाने लक्षपूर्वक ऐका .कदाचित तुम्ही बरोबर असाल मी चूक असेन .लक्षपूर्वक ऐकून व एकसमयावच्छेदे विचार करून आपण एकत्रित सत्याचा शोध घेणार आहोत .प्रथम हे लक्षात असू द्या, कि तुम्हाला दुसरा कुणी सत्यदर्शन करू शकत नाही .सत्याचा शोध ज्याचा त्याने घेतला पाहिजे .शोध घेण्यासाठी मन शोध घेण्याच्या समजून घेण्याच्या स्थितीत असणे अत्यावश्यक आहे .मन ज्यावेळी संरक्षक किंवा विरोधात्मक स्थितीत असेल ,त्यावेळी ते ग्रहण करण्याच्या स्थितीत असणे शक्य नाही .वस्तुस्थितीविषयी ज्यावेळी आपण सावध होऊ लागतो व विचार करू लागतो ,त्याचवेळी समज येण्यास सुरुवात होते .सत्याची धि:कार केल्याशिवाय ,किंवा बाजू घेतल्याशिवाय, ओळख होणे, ही खर्या शहाणपणाची सुरुवात आहे .
आपल्या घडणी नुसार, संस्कारानुसार, धारणेनुसार, पूर्व ग्रहानुसार , एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण व विवरण करू लागतो, त्या वेळी अापण सत्यापासून दूर जातो .सत्य शोध हे एक प्रकारचे संशोधन आहे .जे काही आहे ,त्याच्या यथार्थ ज्ञानासाठी संशोधनाची आवश्यकता आहे .त्याचे विवरण व स्पष्टीकरण, तुम्ही आपल्या मूडप्रमाणे करू शकत नाही .जर आपण त्याविषयी सावध असू, लक्षपूर्वक ऐकू ,निरीक्षण करू, व पाहू ,तर सर्व प्रश्न लगेच ताबडतोब सुटतील .
या बैठकीच्या द्वारे अापण तेच करण्याचे ठरविले आहे .मी आपल्याला सत्य सूचित करणार आहे .मी माझ्या आवडीप्रमाणे, किंवा मूड प्रमाणे, त्याचे विवरण व भाषांतर करणार नाही .आपणही आपल्या पार्श्वभूमीनुसार ,त्याचे भाषांतर, विवरण ,करू नये अशी माझी प्रार्थना आहे .
प्रत्येक घटना यथार्थपणे पाहणे अशक्य आहे काय ?जर आपण प्रत्येक गोष्टीविषयी ,सावध असलो ,तर समज येण्यास काय हरकत आहे ?सत्याची ओळख, त्याचे दर्शन व त्याविषयी सावधानता, आपल्या सर्व धडपडीचा अंत करतात .जर मी खोटा आहे हे ओळखले, तर सर्व धडपड विरोध तिथेच थांबेल .स्वतःची ओळख ,ही शहाणपणा व खरी समज, यांची सुरुवात आहे .किंबहुना कालाच्या बंधनातून अापण तत्काळ सुटाल.काल हा शब्द सेकंद मिनिट तास दिवस महिने वर्षे या अर्थाने मी वापरीत नसून, एक माध्यम, मानसिक प्रक्रिया, या अर्थाने वापरत आहे .कोणत्याही ठिकाणी कालाचा हस्तक्षेप मोडतोडीला व गोंधळाला कारणीभूत होतो .धि:कार ,तुलना, वकिली, यांच्याशिवाय ,त्याला ओळखण्यातून,सत्याचे दर्शन होणार आहे. स्वतःच्या हालचालीची भूमिकेची व परिस्थितीची पूर्णपणे समज व जाणीव असणे आवश्यक आहे .येथूनच बंद सुटण्यास सुरुवात होते .जो मानसिक गोंधळ व द्वंद्वे याविषयी सावध नसतो, त्याचा तो जे काही आहे, त्याहून दुसरे होण्याचा प्रयत्न, सदैव सुरू असतो .आपण लक्षात ठेवूया कि जे काहीआहे त्याचे विश्लेषण आपल्याला करावयाचे आहे . निरीक्षण करावयाचे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या विषयी आपल्याला नामरूपाशिवाय जागृतही राहावयाचे आहे . सत्याची ओळख होण्यासाठी, त्याचा मागोवा घेण्यासाठी, सावध मन व कोमल हृदय , यांची आवश्यकता आहे .ते जे काही आहे ते निर्जीव नाही. ते अत्यंत गतिमान आहे .क्षणाक्षणाला ते बदलत आहे. जर मन, श्रद्धा व ज्ञान यांनी जखडलले असेल तर ते त्याचा मागोवा घेण्यास समर्थ ठरणार नाही .जर तुम्ही जवळून पाहाल तर ते अत्यंत गतिमान आहे .त्याचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत चपळ मन पाहिजे .
श्रद्धा, ज्ञान ,पूर्वग्रह, संस्कार ,शिक्षण, तुलनात्मक दृष्टिकोन, यांनी जेव्हा मन जखडलेले असेल; अभ्यास जड व शुष्क असेल, त्या वेळी ते मन ,अत्यंत गतिमान असलेल्या त्याचा मागोवा घेण्यासाठी दुर्बल ठरते .वैयक्तिक व सामाजिक गोंधळ ,यांनी आपण ग्रस्त झालेले आहोत .माझ्या समजुतीप्रमाणे हे प्रत्येकाला माहीत आहे .याबद्दल विशेष विचार किंवा चर्चा करण्याची गरज नाही .गोंधळ व पर्वतप्राय दुःखे ही केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगात सर्वत्र आहेत .जगाच्या एखाद्या विशिष्ट भागापुरती किंवा देशा पूरती ती मर्यादित नाहीत .वर्णनातीत क्लेश ,केवळ वैयक्तिक नाहीत तर सामाजिकही आहेत .हे क्लेश सार्वत्रिक स्वरूपाचे असल्यामुळे ते विशिष्ट देश राष्ट्र जात धर्म प्रदेश वंश यांच्यापुरते मर्यादित करून सोडवण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा आहे .
अश्या वेळी आपण वैयक्तिक व सामाजिक दुःखाचे बरोबर आकलन करू शकणार नाही .हा सर्व गोंधळ दिसत असताना, माहित असताना, त्यावरील आपली प्रतिक्रिया काय आहे ?.
येथे राजकीय सामाजिक धार्मिक व वैयक्तिक दु:खे आहेत .आपण मानसिकदृष्ट्या गोंधळून गेलेले आहोत .राजकीय नेत्यांपासून धार्मिक नेत्यांपर्यंत सर्वजण हा गोंधळ दूर करण्यास असमर्थ ठरलेले आहेत .आपले महान ग्रंथही काही मार्ग दाखवू शकलेले नाहीत .तुम्ही भगवद्गीता बायबल कुराण ग्रंथसाहेब किंवा आणखी एखादे कोणते धार्मिक ,राजकीय, वा मानसशास्त्रीय पुस्तक वाचा. त्यामध्ये तुम्हाला केवळ शब्द शब्द शब्द आणि शब्द दिसतील.सत्याचा मूळ गाभा मात्र तिथे अभावानेच तळपत आहे .तुम्ही काय करीत आहात तर त्यांचे(धार्मिक राजकीय पुस्तके नेते इत्यादी) शब्दच केवळ पुन: पुन: उच्चारित आहात . तुम्ही गोंधळलेले आहात .तुम्हाला जीवनात अनिश्चितता वाटत आहे.
केवळ शब्दांचा पुनरुच्चार कशाचेचे दर्शन घडवू शकत नाही .त्यामुळे शब्द व पुस्तके निरुपयोगी ठरली आहेत .ज्यावेळी तुम्ही मार्क्स भगवद्गीता बायबल किंवा आणखी एखाद्या धर्म ग्रंथातील अवतरणे देता, त्यावेळी तुम्ही आधार घेत असूनही, अंतर्यामी अत्यंत अनिश्चित असता,असुरक्षित असता, गोंधळलेले असता व तुमची उक्ती असत्य ठरते .तिथे जे काही लिहिलेले आहे ती केवळ जाहिरात बनते .जाहिरात म्हणजे सत्य नव्हे. ज्यावेळी तुम्ही कशाचा तरी आधार घेता त्या वेळी, अतुलनीय ,गडबड गोंधळ असुरक्षितता तुम्हाला वाटत असते .स्वअस्तित्वाचे ज्ञान होण्यापासून तुम्ही दूर जात असता.स्वतःचा गोंधळ ज्ञानी जनांच्या शब्दांनी झाकण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न असतो .
परंतु आपला प्रयत्न तर हा गोंधळ समजून घेण्याचा आहे . झाकण्याचा नाही.अतुलनीय गोंधळ गडबड, स्वअस्तित्वाबद्दलची असुरक्षितता, या बद्दलचा तुमचा अनुभव काय आहे ? .तुमची प्रतिक्रिया काय आहे ?मी याबद्दल जसजशी चर्चा करीन, तसतसे तुम्ही माझ्या शब्दांचा नव्हे ,तर तुमच्या मनाचा मागोवा घ्या .तुमच्या विचारांचा मागोवा घ्या.दिवसेन दिवस केवळ प्रेक्षक असण्यात, अवतरणे देण्यात ,लोकांचे आधार घेण्यात व शोधण्यात ,आपण गढून गेलेले आहोत .स्वतः उत्साहाने शोध घेण्याचे ,विचार करण्याचे, आपण विसरून गेलेले आहोत .प्रत्येक गोष्ट आपल्याला तयार पाहिजे . कुणीतरी शोधावे व नंतर आपण त्याचा वापर करावा असा आपला दृष्टिकोन असतो .स्वतः उत्तर शोधण्याचे आपण टाळीत असतो .
राजकारणी व्यक्ती किंवा धार्मिक पुढारी किंवा इतर क्षेत्रातील आणखी कुणी यांची व्याख्याने ऐकण्याला ,खेळ पाहण्याला, आपल्याला आवडते.त्यांची अवतरणे द्यायला आपल्याला आवडते. परंतु इथे तर आपल्याला स्वतःलाच आपला शोध घ्यावयाचा आहे .इथे अवतरणांचे व महाजनांच्या उक्तीचे काही काम नाही .
जर तुम्ही क्रियाशील नसाल ,केवळ व्याख्यान ऐकण्याच्या व आपल्याला कांहीतरी तयार मिळेल ,अश्या आशेने इथे आला असाल तर मग या आपल्या बैठकीचा कांहीच उपयोग नाही . इथे आपण एकमेकांचे विचार समजून घेणार आहोत .त्यांचा मागोवा घेणार आहोत . त्याचे निरनिराळे भाग, त्याची उत्पत्ती ,त्यावरील प्रतिक्रिया ,आपली भावना ,याची ओळख करून घेण्याचा, त्याचे विश्लेषण करण्याचा ,आपला प्रयत्न आहे .तेव्हा तुम्ही हे क्लेश, हा गोंधळ ,ही दुःखे ,यावरील आपली प्रतिक्रिया काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा.मला दुसऱ्या कुणाच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांची मते काय आहेत ,ते मला सांगू नका .जर या शोधापासून तुमचा आर्थिक सामाजिक राजकीय फायदा होणार असेल तर तुमची प्रतिक्रिया निश्चित सकारात्मक आहे .
जरी हा गोंधळ चालू राहिला तरी तुम्हाला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही .जगामध्ये जास्त गोंधळ ,जास्त संकटे, म्हणजे सुरक्षिततेसाठी जास्त धडपड होय.
जेव्हा तुम्हाला असुरक्षितता वाटते ,त्यावेळी तुम्ही वस्तुस्थितीचे यथा योग्य व यथा तथ्य निरीक्षण करण्याऐवजी कशाचा तरी आधार शोधण्याचा प्रयत्न करता.तो आधार बँकेमधील लठ्ठ अकांउटचा असेल, एखाद्या ध्येयाचा असेल, एखादी प्रार्थना ,देऊळ, चर्च, मशीद ,गुरुद्वारा ,गुरु ,यांचाअसेल. त्यामुळेच रोज जगात निरनिराळे पंथ गुरू परंपरा वाद(मार्क्सवाद नक्षलवाद आतंकवाद) इत्यादी इत्यादी निर्माण होत आहेत .जास्त गोंधळ म्हणजे तुम्हाला जास्त जास्त नेते व जास्त जास्त पक्ष यांची गरज वाटत आहे .तुम्ही देव ,तथाकथित गुरू ,धार्मिक पुस्तके ,विचारवंत, पक्ष ,यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करता .
ज्या वेळेला या गोंधळाचा, तुम्हाला चटका जाणवतो, त्यावेळी तुम्ही कशाचा तरी आश्रय शोधता .डावे उजवे मधले राजकीय पक्ष ,सामाजिक आर्थिक धार्मिक पंथ ,दुःख निवारणाचे जे मार्ग दाखवतात ते जास्त धोक्याचे आहेत असे मला वाटते .कारण या सर्व ठिकाणी मनुष्य हा क्षुद्र समजला जातो .पण त्यांची तत्त्वे जास्त महत्त्वाची ठरतात. ~विशिष्ट तत्त्वज्ञान किंवा कल्पना महत्त्वाची ठरते मग त्यासाठी मानवजातीचा कितीही संहार झाला तरी हरकत नाही .~बरोबर हेच अाज जगात चालले आहे.हिटलर स्टॅलिन यांनी केवळ तत्त्वांसाठी कितीतरी लोकांचे शिरकाण केले . अलीकडच्या काळात दहशतवाद ,मूलतत्त्ववाद, नक्षलवाद ,चीनमधे व अन्यत्र मार्क्सवाद ,इत्यादिनी जगामध्ये प्रचंड संहार केला आहे. केवळ मी म्हणतो म्हणून तुम्ही हे खरे मानू नका .तुम्ही स्वतः विचार करा.डोळे उघडून जगाकडे पहा . तुम्हाला जगात बरोबर हेच चाललेले आढळून येईल . अाज पंथ महत्त्वाचे ठरले आहेत .व्यक्ती क्षुद्र ठरल्या आहेत.पंथ प्रमुखांच्या हाती प्रचंड सत्ता, सामर्थ्य ,केंद्रीत झाले आहे.तत्त्वांची व्यक्तीला नशा चढली आहे .दारू किंवा अन्य वस्तूंच्या सेवनाने येणार्या नशेहून ही नशा भयंकर आहे .असंख्य व्यक्तींचे तत्त्वांसाठी बळी दिले जात आहेत .
या मानसिक व जागतिक अंतर्बाह्य गोंधळाचे कारण काय बरे असावे ? युद्ध जरी अणुबाँबच्या धास्तीमुळे होत नसले तरी प्रत्यक्षात युद्धाचे ढग इतस्तत: रेंगाळताना दिसून येतात .नैतिक व आत्मिक अध:पात,जड इंद्रियजन्य गोष्टींचा उदो उदो व हव्यास ,हे याचे कारण आहे .यंत्रानी व मनाने बनविलेल्या गोष्टींचे अापण दास झालो आहोत .ज्यावेळी जडवाद भोगवाद याशिवाय कुठलीही दुसरी तत्त्वे मानली जात नाहीत ,त्यावेळी काय होते ?ज्यावेळी वस्तूंना आपण इंद्रिय उपभोगाच्या दृष्टीने जास्त महत्त्व देतो ,त्यावेळी काय होते ?त्या वेळी गोंधळ कमी होण्याऐवजी गोंधळात वाढच होते .मी सांगतो म्हणून हे मान्य करू नका .थोर लोकांच्या अवतरणाची वाट पाहू नका.तुम्हीच स्वतःशी विचार करा .तुमची श्रीमंती ,तुमचे मनाने व हातानी निर्माण केलेल्या गोष्टींचे अस्तित्व, महत्त्वाचे ठरते.जेव्हा वस्तू महत्त्वाच्या ठरतात ,त्यावेळी श्रद्धेला एक आगळे महत्त्व प्राप्त होते .जगात आज हेच चालले आहे, असे तुम्हाला वाटत नाही काय ?
अशा प्रकारे इंद्रियांना,इंद्रियांनी निर्माण केलेल्या गोष्टीना व इंद्रिय उपभोगला ,जास्त महत्त्व देऊन ,आपण जास्त जास्त गोंधळ निर्माण करतो .मग आपण आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय मार्गांनी किंवा सत्याचा शोध, महत्त्वाकांक्षा ,सत्ता ,इत्यादी मार्गानी पळवाटा शोधतो.परंतु सत्य आपल्या जवळच आहे. त्याचा शोध अन्यत्र घेण्याचे काही कारण नाही .त्याचा शोध उतावळेपणाने घेण्याचे कारण नाही .जो त्याचा उतावळेपणाने पाठलाग करतो ,त्याला ते कधीच प्राप्त होणार नाही .आपण जे काही करतो त्याची फलश्रुती बहुधा नेहमी गोंधळ विसकाटाविसकट व दुःखे यांमध्ये होते असे आढळून येते .आपले राजकारण ,आपल्या सामाजिक हालचाली व युद्ध थांबवण्यासाठी होणार्या बैठका, यांचाी परिणीती नेहमी युद्धात होत असल्याचे आढळून येते . आपण चांगल्यासाठी म्हणून जे करतो ,त्याची परिणिती नेहमी दुःखामध्ये होत असलेली आढळून येते.क्लेश दुःख गोंधळ यांच्या लाटेने सतत व्यापले जाण्याचे अापण याच क्षणी थांबवू शकतो का ?बुद्ध ख्रिस्त शंकराचार्य यासारखे महान गुरू, कदाचित त्या वेळी यशस्वी झाले असतील.परंतु दुःख क्लेश व गोंधळ ते कायमचे मिटवू शकले नाहीत .जर आपण सामाजिक व आर्थिक गोंधळाला कंटाळून, क्लेश दुःखे यांना कंटाळून ,या किंवा अश्या मोठ्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे ठरविले ,जगापासून अलिप्त होऊन व धर्म विचारात गुंगून जाण्याचे ठरवले तरी जगातील क्लेश दुःख गोंधळ हे चालूच राहतील .तुमची व माझी समस्या अशी आहे की क्षणात आपण या सर्व गोंधळापासून दुःख व क्लेशांपासून पासून मुक्त होऊ शकतो का ?जर या जगात त्याचा एक विभाग म्हणून राहण्याचे नाकारून ,अापण राहाल, तर इतरांना यातून बाहेर पडण्यासाठी भविष्यकाळी नव्हे तर आत्ताच आपली मदत होण्याची शक्यता आहे .तिसरे महायुद्ध होईल की नाही ते सांगता येत नाही .विनाशकारी शक्ती इतक्या जोरदार आहेत की विनाश टाळता येणे कठीण आहे .जर आपण हे क्लेश व हा गोंधळ याचे क्षणात आकलन करू शकू ,तर ही सत्याची ज्योत आपण इतरांच्या हृदयातही प्रज्वलित करू शकू . आपण क्षणात स्वतंत्र होऊ शकतो .क्लेशातून मुक्तता करून घेण्याचा तोच एक मार्ग आहे .सत्यप्राप्ती झाली तर ती आत्ताच होऊ शकेल .जर तुम्ही उद्या म्हणाल तर तुम्ही सदैव या गोंधळात दु:खात गटांगळ्या खात रहाल .
तत्काळ सत्याचे दर्शन होईल,या सर्व दुःखापासून मुक्तता होईल ,अशी स्थिती येणे शक्य आहे का ?मी खात्रीने सांगतो की हो ते शक्य आहे . तो एकच मार्ग आहे .श्रद्धा व समजुती शिवाय ती गोष्ट शक्य आहे .ती प्रत्येकाने केलीच पाहिजे .ही अशी क्रांती आहे कि जिला खऱ्या अर्थाने अतुलनीय क्रांती म्हणता येईल .ती घडवून कशी आणायची हा प्रश्न आहे .एका पंथांच्या ठिकाणी ही दुसऱ्या पंथाची स्थापना नव्हे .आपण साधारणपणे क्रांती हा शब्द डाव्यांच्या कल्पनेप्रमाणे उजव्यात झालेला बदल या अर्थाने वापरतो .डावे म्हणजे तरी काय ?विशिष्ट बदल होऊन चालू राहिलेले उजवेच होय.जर उजवे इंद्रियजन्य गोष्टींच्या पायावर उभे असतील, तर डावेही तिथेच उभे आहेत .फक्त तीव्रता किंवा सांगण्याच्या पद्धतीत फरक एवढेच म्हणता येईल .ज्यावेळी व्यक्ती आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांबद्दल जागृत होईल , त्याच वेळी क्रांती होईल .तुमचे लोकांशी पत्नीशी पतीशी शेजार्याशी नोकरांशी मित्रांशी सहकाऱ्यांशी असलेले संबंध म्हणजे समाज होय.समाजाला स्वत:चे असे स्वतंत्र अस्तित्व नाही . आपल्या परस्परांशी असलेल्या संबंधातून समाज निर्माण झालेला आहे .आपले परस्पर संबंध हे मानसिक धारणेच्या बाह्य प्रतिक्रिया होत .जर आपण स्वतःला समजल्याशिवाय समाज बदलण्याची इच्छा करू किंवा प्रयत्न करू तर समाज परिवर्तनाची तिळमात्रही शक्यता नाही .केवळ बाह्य सुधारणेने काहीही प्राप्त होणार नाही .आपण आपले परस्पर संबंध समजून घेतले पाहिजेत .या समजामधून खरी क्रांती अस्तित्वात येईल.आपण अंतर्यामी पराकाष्ठेचे गोंधळून गेलेले आहोत .आपल्या परस्पर संबंधातून निर्माण होणारा समाज, हा आपल्या आंतरिक स्थितीचा, आंतरिक धारणेचा, बाह्य परिणाम आहे . आपण अंतर्यामी गोंधळून गेलेले असल्यामुळे बाहेर समाजातही त्याची प्रतिक्रिया घडून गोंधळ दिसून येतो .या सर्व गोष्टींची आपण अवश्य चर्चा करू शकतो .समाजाने आपल्याला निर्माण केले की आपण समाज निर्माण केला त्याचीही चर्चा होऊ शकते .
आत्तापर्यंतच्या चर्चेतून हे निश्चित उघड झाले आहे की माझ्या इतरांशी असलेल्या संबंधातून समाज निर्माण होतो.जोपर्यंत स्वतःमध्ये मूलगामी परिवर्तन झाले नाही, तोपर्यंत समाजातही मूलगामी परिवर्तन होणार नाही .जेव्हा एखाद्या पंथाकडे आपण मूलगामी परिवर्तनाच्या आशेने बघतो त्यावेळी आपण केवळ मूळ प्रश्नाला बगल देत असतो .मनुष्य नेहमी पंथ निर्माण करीत असतो .पंथ मनुष्याला बदलू शकणार नाही .जोपर्यंत मी माझे तुमच्याशी असलेले संबंध जाणीत नाही, जोपर्यंत माझ्यामध्ये मूलगामी क्रांती होत नाही ,जोपर्यंत माझ्यामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत समाज परिवर्तनही शक्य नाही .सर्व क्लेश गोंधळ क्रूरता दुःखे विनाश याचे कारण मी आहे हे लक्षात आले पाहिजे .स्वतःला समजून घेण्यासाठी कालावधीची गरज नाही .मी मला या क्षणी समजू शकतो .स्वतःची ओळख मी उद्या करून घेईन किंवा ती मला उद्या होईल असे जर मी म्हणेन तर केवळ क्लेश गोंधळ यांना मी कारणीभूत होईन.जेव्हा मी आत्ताच न म्हणता भविष्य काळाचा उल्लेख करतो,ज्याक्षणी मी काळाचे माध्यम आणतो त्याच क्षणी गोंधळाच्या लाटे खाली मी दडपला जातो .आत्मज्ञान आत्ता उद्या नाही .उद्या हा आळशी अरसिक व निर्बुद्ध मनासाठी आहे .जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत रस वाटतो तेव्हा ते काम तुम्ही लगेच करता उद्यावर टाकत नाही .तत्काळ ज्ञान,तत्काळ क्रांती, तत्काळ समज, शक्य आहे.जर तुम्ही आता बदलले नाहीत तर कधीच बदलणार नाही .जो बदल काल माध्यमातून होतो तो साधा बदल असतो .ती सुधारणा असते. ती मूलगामी क्रांती नसते. क्रांती आत्ताच होऊ शकेल उद्या नाही .
जेव्हा ती होते तेव्हा तुम्ही सर्व प्रश्न विरहीत होता .नंतर तुम्ही स्वतःबद्दल काळजी करत नाही .गोंधळ मोडतोड व विनाश यांच्या पलीकडे तुम्ही जाता