प्रकरण १० - भीती
भीती हे काय प्रकरण आहे .भीती ही नेहमी कसली तरी कोणाची तरी वाटत असते .केवळ नुसती भीतीच असू शकणार नाही.पाणी प्रवास आग मृत्यू चोरी अशी कसली ना कसली भीती वाटेल.या गोष्टी ज्ञात आहेत.त्यांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. मला मृत्यूची भीती कां वाटते ?मृत्यूनंतरही "मी" असेन व माझे काहीतरी अहित होईल अशी जर माझ्या मनात कल्पना असेल तर भीती वाटेल.ही भीती मृत्यूची नाही तर कल्पनेची आहे .तेच पाणी आग प्रवास इत्यादी बद्दलच्या भीतीविषयी सांगता येईल .त्या आहेत जे माहित नाही,ज्या बद्दल कांही कल्पना नाही , त्याबद्दल भीती वाटणे कसे शक्य आहे?मी मृत्यूला भितो असे जेव्हा म्हणतो, तेव्हा मी खरोखर ज्ञाताला भीत असतो.जे कांही माहित आहे ते सोडावे लागेल म्हणून भीत असतो .माझी भीती ही चेतन व अचेतन वस्तू सोडाव्या लागतील या बद्दलची आहे .त्यांचा सहवास मला मिळणर नाही याची भीती आहे. माझी भीती ही मृत्यूची भीती नाही .भीती ही नेहमी ज्ञात गोष्टींशी संबंधित असते अज्ञाताशी संबंधित असूच शकत नाही.
ज्ञाताच्या भीतीपासून मुक्त कसे व्हावे याची चौकशी मी करणार आहे .ज्ञाताची भीती म्हणजे ज्ञात सोडावे लागणार सुटणार याची भीती .माझे कुटुंब ,माझी जात, माझा देश, माझा समाज ,माझा धर्म,माझा नावलौकिक, माझी संपत्ती, माझे आप्तेष्ट ,माझे व्यक्तिमत्त्व, माझ्या भुका,माझ्या इच्छा इत्यादी इत्यादी सुटणार किंवा सोडावे लागणार याबद्दलची भीती .तुम्ही कदाचित असे म्हणण्याचा संभव आहे कि सद्सद्विवेकबुद्धीमुळे भीती निर्माण होते.सद्सद्विवेक बुद्धी हे काय आहे ? सद्सद्विवेक बुद्धी धारणेतूनच निर्माण झाली नाही काय?धारणा म्हणजेच ज्ञानसंग्रह नाही काय ?मी काय जाणतो?ज्ञान म्हणजे काय ?ज्या मुळे ज्ञाताबद्दल सूत्रतेची(निरनिराळ्या गोष्टींशी असलेले परस्पर संबंध) जाणीव राहते,अश्या काही कल्पना, मते ,काही निर्णय, म्हणजेच ज्ञान नाही काय ?कल्पना- विचारप्रक्रियेतून, विचारप्रक्रिया- धारणा व आव्हान यातून, निर्माण होत नाहीत काय ?माझी भीती ही ज्ञाताबद्दलची आहे.ज्ञात सुटेल सोडावे लागेल सुटणार याबद्दलची आहे.माझी माणसे मला सोडावी लागतील, माझ्या कल्पना व वस्तू मला सोडाव्या लागतील, याला मी भितो.
मी कोण याचा शोध घ्यायला मी भितो.कारण त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील असे मला कुठेतरी जाणवते.मी नुकसानीत येईन याची मला भीती वाटते .जेव्हा कांहीतरी नुकसान होईल, कांही मिळणार नाही, किंवा कांही सुख मिळणार नाही, तेव्हा होणाऱ्या क्लेशांना,मी भितो. आपल्याला क्लेशांची भीती वाटत असते.क्लेश दोन प्रकारचे असतात .शारीरिक क्लेश व मानसिक क्लेश .शारीरिक क्लेश म्हणजे ज्ञातंतूंची प्रतिक्रिया असते. मानसिक क्लेश म्हणजे ज्या वेळी मला सुख देणाऱ्या गोष्टींना, मी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी होणारे क्लेश होय .अशा गोष्टी कुणीतरी हिसकावून नेईल, हिरावून नेईल, अशी भीती मला वाटते .संग्रहाला धक्का लागलेला नाही तोपर्यंत मानसिक संग्रह ,क्लेश रोखून धरतो ."मी" हा एक अनुभव कल्पना इत्यादिकांचा संग्रह आहे .
हा संग्रह कुठचाही जोरदार धक्का रोखून धरतो .मला कुठलाही धक्का नको असतो .त्यामुळे ज्या ज्या गोष्टींनी या संग्रहाला धक्का बसेल त्या त्या गोष्टींची मला भीती वाटते .अशा प्रकारे माझी भीती ही ज्ञाताची भीती आहे .क्लेश दूर ठेवण्यासाठी, दुःख दूर राखण्यासाठी, क्लेश व दुःख टाळण्यासाठी, जमविलेल्या भौतिक व मानसिक संग्रहाच्या हानीच्या शक्यतेमुळे मला भीती वाटते .मानसिक क्लेश टाळण्यासाठी ,मानसिक संग्रह करण्याच्या प्रक्रियेतच, भीती आहे . ज्ञानही क्लेश दूर ठेवण्याला मदत करते .ज्याप्रमाणे वैद्यकीय ज्ञान शारीरिक क्लेश दूर ठेवण्याला मदत करते , त्याप्रमाणेच श्रद्धा मानसिक क्लेश दूर ठेवण्याला,कमी करण्याला, मदत करते .
यामुळेच माझ्या श्रद्धाना मी जपत असतो .श्रद्धा सुटतील मोडतील तुटतील फुटतील कि काय? अशी मला भीती वाटत असते.या श्रद्धांच्या सत्यतेबद्दल माझ्याजवळ प्रत्यक्ष पुरावा नसला तरी तो मला चालतो. माझ्यावर लादलेल्या काही पारंपरिक व परिस्थितीजन्य श्रद्धा,मी माझे अनुभव व त्या अनुभवांनी मला दिलेली खात्री, श्रद्धा ठेवण्याला पुरेशी असते .श्रद्धा व ज्ञान यांचे कार्य एकच आहे .क्लेश दूर ठेवण्याची ती साधने आहेत .जोपर्यंत ज्ञात संग्रह आहे तोपर्यंत भीती आहे .ज्ञात संग्रह तो संग्रह हरविण्याची भीती निर्माण करतो.अशा प्रकारे अज्ञाताची भीती ही वस्तुत: ज्ञात हरविण्याची भीती असते .संग्रह म्हणजे भीती. भीती म्हणजे क्लेश .ज्याक्षणी हे मला हरवून चालणार नाही असे मी म्हणतो, त्याच क्षणी भीती उत्पन्न होते. संग्रह करण्यामध्ये माझा हेतू दुःख दूर ठेवावे असा जरी असला तरी त्यामुळे दुःख निर्मिती होते .संग्रह करणे या प्रक्रियेत क्लेश आहेत .माझ्याजवळ असलेल्या गोष्टीच भीती म्हणजे क्लेश निर्माण करतात .
संरक्षणाचे बीज आक्रमण आणते.मला भौतिक सुरक्षितता पाहिजे. त्यासाठी मी सर्व समर्थ सरकार निर्माण करतो. या सरकारला मग शस्त्र सुसज्ज सैन्य लागते .मग युद्ध आलेच .व अशा प्रकारे सुरक्षितता नाश पावते.जिथे जिथे स्वसंरक्षणाची वासना आहे तिथे तिथे भीती आहे.जेव्हा सुरक्षितता मागण्यातील मूर्खपणा माझ्या लक्षात येतो ,तेव्हा संग्रह करणे मी सोडून देतो .आमच्या हे लक्षात येते, परंतु आम्ही संग्रह करणे सोडू शकत नाही, असे तुम्ही म्हणाल तर त्याचा एवढाच अर्थ आहे किं तुमच्या काहीच लक्षात आलेले नाही .लक्षात ठेवा संग्रह करण्यामध्येच क्लेश आहेत . संग्रह प्रक्रिया व श्रद्धा ठेवणे हा एकाच संग्रह प्रक्रियेचा भाग आहे .सैनिकी मिरवणूक चालली असताना, समारंभ चालू असताना, आपली प्रतिक्रिया काय असते ते तुम्ही पाहिले आहे काय ?देशावर आक्रमण होण्याची भिती असते,तेव्हा तुम्ही आपली प्रतिक्रिया पहिली आहे काय?यावेळी देश, राष्ट्र, धर्म, जात, प्रांत, इत्यादिकांशी तुम्ही समरस झालेले नसता काय ? इतर काही वेळा तुम्ही तुमचा/तुमची मुलगा, मुलगी, पत्नी, पती, कुटुंबीय, तुमचा समाज, एखादी विशिष्ट क्रिया किंवा अक्रिया(पूजा,जप इ.) याच्याशी समरस झालेले नसता काय ?
समरसता ही स्वतःला विसरण्याची प्रक्रिया आहे .जो पर्यंत मी "मी" बद्दल जागृत आहे, तोपर्यंत क्लेश झगडा व भीती असते, हे मी जाणतो .परंतु जर मी स्वत:ला दुसऱ्या काही भव्य वस्तूत, दिव्य कल्पनेत, सुंदरतेत, जीवनात, सत्यात, श्रद्धेत, ज्ञानात, पाहू शकेन, त्याच्याशी समरस होऊ शकेन, तर "मी" पासून माझी सुटका होत नाही काय?मी माझ्या देशाबद्दल बोलत असतो, तेव्हा तात्पुरता '"मी" स्वतःला विसरत नाही काय?जर मी माझे कुटुंब, माझे आप्त, एखादी जात, एखादा समाज, एखादा पक्ष, एखादे तत्त्व, यांच्याशी समरस होऊ शकत असेन, तर तात्पुरता का होईना मी या "मी" पासून मुक्त होत नाही काय? अशा तर्हेने समरसता ही "मी" पासून पलायन करण्याची एक पळवाट आहे .जो मनुष्य सद्गुणांची जोपासना करीत असतो, जो "मी" पासून दूर पळत असतो, त्याचे मन खरोखर फार कोते असते .असे मन खरोखर फार सद्गुण संपन्न नसते.सद्गुण ही अशी काही चीज आहे कि तिची मशागत करता येत नाही . तिची जोपासना करता येत नाही .
तुम्ही जो जो सद्गुण संपन्न होण्याचा प्रयत्न करता तो तो "मी"चे बळ वाढत जाते.निरनिराळ्या आकारात आपल्याला माहीत असलेली भीती, कुठली ना कुठली पळवाट शोधीत असते .अशा प्रकारे झगडा वाढतच असतो . तुमची समरसता जितकी जास्त तीव्र, तितकी त्या वस्तूला धरून ठेवण्याची इच्छा जास्त असते.मग तुम्ही त्या वस्तूला धरून ठेवण्यासाठी, केवढाही विरोध करायला, झगडा करायला, वेळ प्रसंगी मरायलाही, तयार असता .पण लक्षात घ्या या सगळ्यामागे भीती असते . आता तरी भीती म्हणजे काय हे आपल्याला कळले काय?जे आहे त्याचा स्वीकार न करणे म्हणजे भीती नाही क़ाय ?
स्वीकार याचा अर्थ कळणे फार जरुरीचे आहे.स्वीकार म्हणजे स्वीकार करण्यासाठी केलेले प्रयत्न नव्हेत, किंवा खटपटीने केलेला स्वीकारही नव्हे .स्वीकार करण्याचा प्रयत्न म्हणजे पुन: बनणे होणे आले.फक्त चौकटीचा प्रकार वेगळा एवढेच . स्वीकार करण्यासाठी प्रयत्न होत असतील तर ते न करणे हेही नव्हे, कारण तोही एक प्रकारचा आकार,एक प्रकारचा प्रयत्न होय.
जे काही असेल त्याचा सहज स्वीकार .जे आहे ते आपण जेव्हा यथातथ्य पहातो तेव्हा त्याचा स्वीकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .जेव्हा जे आहे ते मी नीट पाहात नाही तेव्हाच त्याचा स्वीकार करण्याचा प्रश्न उद्भवतो.स्वीकार प्रक्रिया निर्माण होते .अशा प्रकारे भीती म्हणजे जे आहे त्याचा स्वीकार न करणे होय .प्रतिक्रिया,प्रत्याघात, प्रतिप्रहार ,जबाब, स्मरण,आशा, आकांक्षा, हेलकावे, निष्फळता, इत्यादिकांचे गाठोडे, जाणिवेच्या हालचालींचे फळ, असा मी यांच्या पलीकडे कसा जाऊ शकेन.हे अडथळे व मार्ग बंद करणे,याशिवाय मन जाणीवयुक्त असू शकेल काय ?
जेव्हा अडथळा नसतो तेव्हा असामान्य आनंद असतो ,हे आपल्याला माहित आहे.जेव्हा शरीर पूर्ण आरोग्याने मुसमुसलेल असते त्यावेळी एक प्रकारचा स्वयंभू आनंद उसळत नसतो काय ?आपल्याला हे माहित आहे. आपल्याला याचा अनुभव केव्हा ना केव्हा आला आहे .जेव्हा मन पूर्ण स्वतंत्र असते, मोकळे असते, उघडे असते ,ओळखण्याचे केंद्र गैरहजर असते, जेव्हा "मी" ज्याक्षणी गैरहजर असतो, त्यावेळी अशा काही क्षणी आनंद उसळत नसतो काय?जेव्हा "मी" गैरहजर असतो अशी स्थिती आपण केव्हा ना केव्हा अनुभवलेली नाही काय ?आपण सर्वांनी कधीना कधी ती अनुभवलेली आहे . समज व स्वातंत्र्य हे फक्त "मी"कडे एकाच वेळेला व सर्व बाजूंनी आरपार बघत असताना असते.विचाराचे (वस्तुतः विचार व वासना या वेगळ्या नाहीत)फल अश्या या वासनेतून उद्भवलेल्या सर्व क्रिया समर्थनाविना धि:काराविना दाबून टाकल्या शिवाय जेव्हां मी संपूर्णपणे समजू शकतो तेव्हाच हे शक्य होते.जर हे समजू शकेन तरच मी या "मी"च्या कुंपणापलीकडे जाण्याची शक्यता आहे.