Get it on Google Play
Download on the App Store

आधारवड......!!

असेच एकदा  सिनेमा बघून  थिएटरमधून बाहेर पडताना एका छोट्या मुलीने आपल्या आईला विचारले पदर म्हणजे काय? (का ते तुम्हाला कळले असेलच) आधी  असे कपडे घालायचे का??.हे कानावर पडले न् विचार आला ..

घरात मोठं कुणीतरी पाहिजेच...

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची.
त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा
कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला असायचा,
त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे

त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्कांचे..!!

आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला......      
स्वयंपाक खोली काय अन्  देवघर काय सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली.......   
          
मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे .
मर्यादा , धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत .

पूर्वी ह्याच गोष्टी , चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची.....
म्हणून  घरात मोठी वयस्क माणसे पाहीजेत......

संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति - रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे......   

रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे...
रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे.......
मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे . चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ....
*घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो......*
एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं......
टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं.......
बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं ......
*खरच घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*.....
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हात असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान....
कसं का असेना...सांगसवर करणारं .......
*घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*
ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात. घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...
त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच                                *घरात मोठ कुणीतरी पाहिजेच*..  ....

झेप घेण्याची ताकद ही मनातून येते तिथे वयाचे संदर्भ  योग्य ठरत नसावेत माणसाने म्हातारे होवू नये पण ज्येष्ठ जरुर व्हावे  कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधते तर ज्येष्ठत्व इतरांना आधार देते ...असे ज्येष्ठत्व जपणारे घरात कुणीतरी जरुर असावे..

पण काळ बदलला समाजमने बदलली...विचारांची दिशा ही बदलली ...मोठया केवळ वयाने नव्हे तर प्रगल्भ हाताची शाबासकीची आशिर्वादांची गरज भासेनाशी झाली,, मन स्वार्थ पाहू लागली ....अन  उमलत्या कळ्यांना बंदिस्त करु लागली......घरात मोठ कुणीतरी पाहिजेच ही एक म्हण बनून राहिली...आदर्श ही बदलले ......लहान मोठ्यांचेही जगण्याचे संदर्भ बदलत चाललेत ....आपणही बदलायला हवं का?? असा विचार येवून....!! पण नाही मनाने कधीच म्हातारे न होता एक आधारवड ज्येष्ठ होण्याची गरज ,वेळ आली खरी....आपल्याला कुणा ज्येष्ठांचा आधार नाही मिळाला ....पण..म्हणून घरात मोठं कुणीतरी हवचं ही खंत राहिलीच....मनात असूनही केवळ  कुणा इतरांच्या सुखासाठी त्याच्या आधाराचा सहवासाचा त्याग करावा लागलाच....हे ही ...कारण...म्हातारे नको ज्येष्ठ होवूयात ....मग पटेल घरात कुणीतरी मोठं हवचं हे मी का बोलतेय..!

.सध्याच्या या काळात अशा आधारवडांची गरज आहे काळ प्रतिकुल आहे ..पुन्हा मूल्यांची बीजे रुजवण्यासाठी अशा मोठ्यांची गरज आहे...मात्र ते मोठे .आधावड हवेत हं ...आपलंच बघणारे ..नकोत .
पटलयं तुम्हांला ही पण....उगाच व्यक्त व्हायला नको ही जनरीतच ....असो हे माझ्या मनाचे शब्द ...!

मग आधारवड होवूयात.अगदी केवळ आईवडील सासुसासरे म्हणून नव्हे तर प्रत्येक नात्यांत अगदी मित्र मैत्रीण च्या नात्यातही आधारवड ...हा पण  आधारवड झालात म्हणून लगेच तुम्ही म्हातारे नाही होत हं ....!!

व्यक्ती सापेक्षता असेलच...!

©मधुरा धायगुडे