Get it on Google Play
Download on the App Store

बालपण

ऋचा तावडेंबरोबर इंट्रोगेशन रुममध्ये आली. तिने आजूबाजूला पाहिलं. सगळी रूम धुळीने भरलेली होती. फकत चार खुर्च्या आणि टेबल तेवढं स्वच्छ होतं. तिने नाकाला रुमाल लावला आणि पुढे गेली. कदमांनी तिला समोर बसण्याची खुण केली. ऋचाने पर्समधून एक रुमाल काढला आणि तिने खुर्ची पुसली.

“तावडे मॅडम, पाणी द्याल का मला तहान लागलीय. खूप ऊन होतं.” ऋचाने सांगितले.

तिला तावडेंनी समोर जग आणि पेला आणून दिला. तिने जगाच्या कडा आपया रुमालाने पुसल्या आणि अक्खा जगच तोंडाला लावला आणि घटाघट पाणी पिऊ लागली. तिचं पाणी पिऊन झालं. तिने जग ठेवला आणि परत रुमालाने जगची कडा पुसली..

“डन...! आता विचारा...!” ऋचा म्हणाली.

“काय ???”

“आता विचार…!” ऋचा म्हणाली.

“नाही नाही... त्याच्या आधी...??”

“डन…!!” “का काय झाल.??” ऋचा म्हणाली.  

 तिचं हे बोलणं ऐकून कदमांनी शिंदेंना एक कटाक्ष टाकला.

“ऋषिकेश असं करू शकतो का?? तू त्याची जुळी बहीण ना...! तुला काय वाटतं??” कदमांनी विचारलं.

“मी तुम्हाला छोट्या-छोट्या स्टोरी सांगते. बाकी तुम्ही त्याचा अर्थ काढा.” ऋचा जरा कोड्यात बोलली.

डॉ. रेगे यांना आता जरा हे काहीतरी विचित्र वाटलं होतं. त्यांनी कदमांना एका कागदावर लिहून दिलं

“सायकोलॉजिकली डीस्टर्ब वाटते. जरा जपून विचारा..!”

“सांग तुला काय सांगयचं...!” कदमांनी स्टेनोला लिहायचं इशारा दिला.

“आम्ही सातवीत होतो. तेंव्हा.... नाही... त्याधी म्हणजे पाचवीत होतो. तेंव्हा बाबा दादाला खूप मारलं होत. आम्ही अभ्यास अर्धवट सोडून खालच्या मजल्यावरच्या मुलांबरोबर खेळायला गेलेलो.” ऋचा सांगू लागली.

“फक्त अभ्यास अर्धवट सोडला म्हणून मारलं?? पटत नाही.. काय वाटतं तुम्हाला डॉक्टर?” कदमांनी विचारलं.

“आपण ती काय म्हणते ते संपूर्ण ऐकून घेऊया का??” डॉ. रेगेनी सांगितले.

“बरं- बरं पुढे.” कदम म्हणाले.

“हो, बाबा तसे आम्हाला खूप आधीपासूनच कधी-कधी विनाकारण मारायचे, ओरडायचे. म्हणायचे आम्ही त्यांना ताप देतो. त्यांची नाचक्की करतो. तसं तर आत्तापण म्हणतात. पण आम्ही जसजसे मोठे होऊ लागलो तसतसे त्यांची भीती कमी झाली. आता आम्ही बाबांना फाट्यावर मारतो. आई त्यातल्या त्यात बरी आहे. पण तिची पण चोवीस तास कुरकुर चालू असते. ऑफिसमध्ये काहीही झालं तरी आमच्यावर राग निघतो. माई तशी बरी होती. पण खुप घोरायची. ती पण अशीच अडलेली नडलेली. एखाद्या अश्या बाईने किती बोलाव..? कसं बोलाव? याचं काही प्रमाण आहे...! पण हीच्या तोंडाचा पट्टा आपला नेहमीच सुटलेला असायचा.” ऋचा आपल्या सगळ्या तक्रारी सांगू लागली.

“मी आणि दादा जुळे आहोत. आम्ही नेहमी एकत्र राहतो. सगळं एकत्र करायचो. शाळेत पण एका बाकावर बसायचो. ते तुम्हाला दादा पहिल्यांदा कसा रिमांड होम मध्ये कसा गेला याची एक गंम्मत सांगते..” ऋचा अतिउत्साहित होऊन हे सांगतेय हे पाहून डॉक्टर रेगे जरा चिंतेत आले.

“दादा आणि मी नेहमी ज्या बाकावर बसायचो तिथे एक मुलगी बसली होती. तिच्याबाजुला एकच जागा मोकळी राहिली होती. मग मी जाऊन बसले आणि दादा मागून आला. त्याने तिला उठायला सांगितले पं ती काही उठली नाही.. मग दादाला राग आला. त्याने मनात विचार केला कि तिला कर्कटकाने मारलं पाहिजे. मग आमच्या छोट्या सुट्टीनंतर ती बाकावर येऊन बसली. बसताच क्षणी तिच्या खालून रक्त भळा-भळां व्हायला लागलं. ते पाहून टीचर आमच्या बेंचजवळ आली. तिला त्या बेंचवर दादाचं कर्कटक सापडलं. तिचं रक्त पाहून पूर्ण वर्गामध्ये फक्त मी आणि दादा हसत होतो. जाम मज्जा आली.” असं म्हणत ऋचा टाळ्या देत हसू लागली.

“मग काय दादाने कबूल केलं. मुख्याध्यापिकांनी पालकांना बोलवायला सांगितलं. आईला फोन गेला तेंव्हा आईने तिला वेळ नाही सांगून फोन ठेवला. तिने एकादा विचारही केला नाही कि का फोन आला असेल..? तिने माईला शाळेत पाठवलं. माई म्हणजे पाचवी नापास बाई. तिला काय कळतंय दगड...!! आमची शाळा कॉनव्हेंट होती. तरी मॅडमनी वाचून दाखवलं आणि तोंडीपण समजावून सांगितलं. “मास्टर ऋषिकेश विल बी सेंड टू सेंट. जॉर्ज रिमांड होम, भिवंडी.” तर ती माई म्हणते रिमांड म्हणजे बोर्डिंग काय..?? ऋषीला पाठवणार काय? बरं आहे जरा सुधारेल. बोर्डिंगला पाठवा मेल्याला भारीच विकळलं आहे.. कोडगा झालाय नुसता... आमची काही हरकत नाही.” ऋचा थोडी खिन्न वाटली.

ऋचाचे हावभाव आणि मूड क्षणाक्षणाला बदलत होते. डॉक्टर रेगेंना ऋचा सायाकोलॉजिकली डीस्टर्ब आहे याची खात्री केली. कदाचित भावाला सोडून जायला लागल्यामुळे ती तशी झाली असेल असं अंदाज रेगेंनी लावला. ती पुढे सांगायला लागली.

“एकदा ना दादा सुधारला म्हणून त्याला घरी पाठवलं होतं. तसं त्याला दर सहा-आठ महिन्यांनी पाठवायचे कारण तो चांगलं वागायचा. पण मग बाबांनी कधी त्याची तक्रार केली कि त्याला परत घेऊन जायचे.” ऋचा सांगत होती.

“बाबा तक्रार करायचे?? का असं काय करायचा तुम्ही..?” डॉक्टर रेगेंनी जरा कुतुहलाने विचारलं. त्यांच्या दृष्टीने केस आता खरी सुरु झाली होती.

“हो... बाबा सारखे दादावर रागवायचे. एकदातर आम्ही बाबांना अद्दल घडवायची म्हणून त्यांच्या शूजमध्ये खिळे ठेवले. ते त्यांच्या पायांना टोचावे असं वाटत होतं. पण बाबांना समजलं. एकदा आम्ही आईच्या डायबीटीसच्या गोळ्यांच्या जागी संपत आलेल्या डांबरगोळ्या ठेवलेल्या. आईने त्या गोळ्या घेतल्या हि...! आई चांगली पाच दिवस आजारी पडली.. तीही अनपेड सुट्टी... आमच्या मॅडमनी बोलवलेलं तेंव्हा वेळ नव्हता आणि स्वतः आजारी पडल्यावर कसं बरोबर सुट्टी घेतली. स्वार्थी आहे ती पक्की....” ऋचा शून्यात बघत होती. 

डॉ. रेगेंनी तिला विचारलं “ऋचा, आई वाईट आहे का..??”

ऋचा भानावर आली “नाही.. वाईट नाही. ती बिझी आहे. रादर तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत.  दादा आणि मी एकदा समर कॅम्पला गेलो होतो. तिथे एक मुलगी दादाच्या मागेच लागली होती. त्याला गोचीडीसारखी चिकटलेली.”

“मग काय झालं तिचं????” डॉ.रेगेंनी विचारलं.

“तिचं काय होणार...?? आम्ही एका टेकडीवर गेलेलो तेंव्हा तिला ढकललं मी....! पण लकी शी... वाचली. दादाची रिमांड होमची हिस्टरी असल्याने त्यालाच जावं लागलं परत रिमांड मध्ये. असाही मी तिच्याशी बोलायचे पण नाही आणि तिला मागून धक्का दिल्याने कुणी मारला तेच माहिती नव्हतं.” ऋचाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कदम आणि सगळ्यांना चिंतेत टाकणारा होता.

“मला ना त्यामुळेच दादाला रिमांड मध्ये नेलं कि वाईट वाटायचं.” ऋचा म्हणाली.

“तुला दादा आवडातो म्हणून वाईट वाटायचं ना?” कदमांनी विचारलं

“नाही मला फक्त मीच आवडते.” ऋचा फारच सहज बोलून गेली.

आत्याचा खून कुणी केला याचा अंदाज कदमांनी बांधला. ऋचा त्याबद्दल काही बोलतंच नव्हती. कदमांनी तिला,

“माई आत्याला पण तूच मारलंस का?” अधीरपणे विचारलं

“नाही, म्हणजे मी स्वताहून नाही केला. म्हणजे मी क्लाससाठी निघालेले. फडके रोडजवळ असेन.. नाही.. हो तिथेच होते.. मी एका चिकनच्या दुकानासमोरून जात होते.. खाटकाने कोंबडी उलटी टांगून तिला हलाल केली होती. तिच्या मानेतून पहाटे म्युन्सिपाल्टीच्या नळातून जसं जोरात पाणी येत ना तसं रक्त येत होतं. तेंव्हा अचानक माझ्या डोक्यात विचार आला कि आत्याला अशीच चिरली तर?? खूप घोरते थेरडी..!. मग मी माझी स्कुटी घेऊन गेले आणि मारलं तिला. मला नंतरच आठवत नाहीये. पण मी खून नाही हा केला. आत्या चांगली होती आमच्यासाठी रोज चांगला नाश्ता करायची. परवाच पिझ्झा केला होता. सेम डॉमिनोस...!” ऋचाचा हा खुलासा ऐकून सगळेच एकदम अवाक् झाले.

“शिंदे देशपांडेंन बोलवून घ्या. ऋचाला कस्टडीत ठेवावं लागेल.” कदमांनी शिंदेंच्या कानात सांगितलेलं डॉक्टर रेगेंनी ऐकलं.

“मला वाटतं तिला सायकोथेरपीची गरज आहे.” त्यांनी कदमांच्या कानाजवळ जाऊन सांगितलं.

“हिला बसवा बाहेर तावडे. शिंदे तुम्ही पोराला घेऊन या..!” कदमांनी सांगितलं.

ऋचा उठली. आपल्या घाऱ्या डोळ्यांच्या कोनातून हसत होती. इतका वेळ सोज्वळ वाटणारा तिचा चेहरा अचानक भयावह वाटत होता.