खुनाचा दिवस
दुपारचा दीड वाजला होता. दारावरची बेल वाजली. ऋचाने दरवाजा उघडला. दारात ऋषी थकलेल्या अवस्थेत होता.
“दादा, कसं होतं लेह-लढाक ट्रेकिंग? मजा आली का?” ऋचाने विचारला.
“जाम थकलो यार ऋचा पाणी आणशील का?” ऋषीने विचारलं.
“इतक्या तरुणवयात कसले थकता तुम्ही...??” माई आत्या बेडरूममधून बाहेर येत तक्रारीच्या सुरातच म्हणाली.
ऋषी थकलेल्या अवस्थेत असल्याने त्याने तिला प्रत्युत्तर दिले नाही.
“ऋचा, मी जरा फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत तुम्ही वाढून घ्या.” असे म्हणत तो बेडरूम मध्ये गेला.
“वाढून द्या. खायला द्या. भांडी घसा. मोलकरीण केलीय माझी तुझ्या आईने.” माई आत्या ऋचाला म्हणाली.
तिची हि कटकट आता सवयीची झाली होती. ऋचाने तिला काहीहि उत्तर दिले नाही. ती आई-बाबांसमोर कधीच कटकट करायची नाही. त्यामुळे आम्ही तिची तक्रार केली कि आईला खोटंच वाटायचं. आत किचनमध्ये जाऊन ऋचाने पानं वाढली. ऋषी फ्रेश होऊन आला.
“वा...! भरली भेंडी आणि पोळ्या, आमटी-भात. ऋचा पापड तळ ना.” ऋषीने उत्साहात ऋचाला सांगितले.
“बाहेर गावाहून आलास ना...! दुपारचं तळकट कसलं खातोस..! लोणचं पण आण गं...!” आत्याने हुकून सोडला.
“आज जेवण मस्त झालं. किती दिवसांनी नीट जेवलोय.” ऋषीने मिटक्या मारत जेवण संपवले.
“मी आज कथ्थक क्लासलापण जाणार आहे. संध्याकाळ होईल यायला. किल्ली घेउन जात आहे. मी येईपर्यंत आई-बाबा आले नसतील तर तुमची झोप मोड नको.” ऋचाने, ऋषी आणि आत्याला सांगितलं.
“दिवे लागणीपर्यंत झोपत नाही हो मी...” माई आत्याने कुत्सितपणे सांगितलं.
“बरं मी जाते. टेक रेस्ट दादा” ऋचाने घरातून काढता पाय घेतला.
“मी पण आता जरा पाठ टेकते.” म्हणत माई आत्या हॉल मध्येच खाली पसरली.
ऋषीने आपला मोबाईल चार्जिंगला लावला आणि सोफ्याचा बेड करून त्यावर आडवा झाला. ऋषी थकलेला तरी त्याच्या हातातून मोबाईल काही सुटत नव्हता. एव्हाना आत्या आपल्या नेहमीच्या कर्णकर्कश्य सुरात घोरत होती. ऋषीने त्रासून आपला गाशा आई-बाबांच्या बेडरूममध्ये नेला.
“ए. सी. चालू असेल तर किमान घोरण्याचा आवाज तरी येणार नाही.” ऋषी स्वतःशीच बडबडला.
मोबइलच्या घड्याळाचा अलार्म वाजला आणि ऋषीची झोपमोड झाली. अंगावरच मऊ पांघरूण बाजूला करून उठला. त्याने जरा आळोखे-पिळोखे घेतले. मोबाईल हातात घेऊन पडल्या-पडल्या मेसेजिंग करत होता. त्याच लक्ष खिकडीकडे गेलं. संध्याकाळ झाली होती.
“उठायला हवं. आई-बाबा आले तर, आत्या आणि बाबा मिळून माझीच परेड घेतील. जाम थकायला झालंय.” ऋषी स्वतःशीच बडबडला.
त्याने पांघरुणाची घडी घातली ए.सी. बंद झाला होता. लाईट गेले असावेत. त्याने बेडरुमचं दार उघडलं.
“म्हातारी अजून झोपलीय वाटतं” ऋषी स्वतःशीच पुटपुटला. घरातले बाहेरचे दिवे पण बंद आहेत.
त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याचा पाय ओल्यात पडला.
“शीट...!! नळ चालू राहिला वाटतं. सगळं ओलं झालंय. आई-बाबा यायच्य आधी हे पुसायला हवं.. ! म्हातारी देवळात गेलेली दिसतेय. बरं झालं. ह्या लाईटला पण आत्ताच जायचं होतं.” ऋषी बेडरूमच्या मंद प्रकाशात चाचपडत बाहेर आला.
घराच्या पॅसेजमध्ये अंधार होता. ऋषी त्याच अंधारात चालत बाथरूमपर्यंत आला. चाचपडत त्याने सगळे नळ बंद आहेत का ते पहिले.
“नळ बंद आहेत. हा मॉप कुठे असतो.?? सापडला...!” चाचपडत त्याने मॉप घेतला आणि ओलं पुसायला सुरुवात केली.
ट्रेक, प्रवास आणि आता हे पुसा-पुशीच नाटक. ऋषी थकून जार झाला होता. तेवढ्यात लाईट आले. हॉलमध्ये प्रकाश पसरला.
तो माई आत्या रक्तातुन चालत आला होता. त्याने पुसायच्या नादात ते रक्त सगळ्या घरभर पसरवलं होतं. त्याच्या व्हाईट ट्रॅकपँटला आणि बनियनला जिथे जिथे त्याने हात पुसलेले तिथे रक्त लागलं होतं. माई आत्या हॉल मध्ये झोपलेल्या ठिकाणीच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लॅच उघडण्याच्या आवाजाने ऋषीची तारांबळ उडाली. दरवाजा उघडला. दारात आई, बाबा आणि ऋचा उभे होते.
“माई.........!!!!” बाबा दारातच कोसळले.
माई आत्याच्या जाण्याने बाबांना धक्का बसला होता.
“पोलिसांना फोन करा.” आईने सांगितलं.
ऋचाने पोलिसांना फोन केला. अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस हजर होते.
“घरात चोरी झाली का? कोण-कोण होतं घरात? डेडबॉडी आधी कुणी पहिली?” हवालदाराने विचारला.
“अं.... म... मी...” ऋषी चाचरत म्हणाला.
“काय पाही...” हवालदाराचं बोलणं मध्ये तोडलं.
“मी केला खून...!!” असं म्हणत ऋषीने माई आत्याला मारलेला सुरा आपल्याच गळ्यावरून फिरवला.
जेवणाची बेल वाजली आणि ऋषीकेश दचकून जागा झाला. त्याला स्वप्न पडलं होतं. आज ऋचाला कदमांनी तपासणीसाठी बोलवलं होतं. ऋषीचं विचारचक्र चालू होतं. ऋचा काय बोलणार?? काय घडलं ते सांगणार का?? याचा विचार करत त्याने माठातील पाण्याचा एक घोट घेतला