Get it on Google Play
Download on the App Store

बाप

“आता तुम्ही जे काही बोलाल ते सगळं आम्ही रेकोर्ड करू आणि स्टेनो लिहून घेईल. तुम्ही निवांत आठवून सगळं सांगा जे काही आठवेल ते. आम्हाला ऋषिकेशबद्दलची जवळपास सगळी माहिती मिळाली आहे. तुम्ही काहीही लपवू नका. या आरती वाघ भेटलात ना मगाशी..? त्या तुमच्या वकील आहेत.  ऋषिकेश जर दोषी नसेल तर त्या नक्कीच वाचावतील.” कदमांनी मकरंदला सांगितलं.

“मी मकरंद देशपांडे. राहणार......” मकरंदला थांबवत 

शिंदे म्हणाले “ ओ साहेब, ते राहूदे झालाय ते. पुढच सांगा..”

“ऋषिकेश लहानपणापासूनच असा होता. सारखा त्रास द्यायचा. काही ना काही तक्रारी शाळेत असताना पण यायच्या. मी कधी त्याच्या शाळेत गेलो नाही. मला वेळच नसायचा ह्या सगळ्यासाठी. प्रतिमा जायची. तेंव्हा शाळेतले प्रताप तिच तुम्हाला सांगेल. पण घरात एकदा त्याने माझ्या बुटात चुका ठेवल्या होत्या. मी आपला नेहमीप्रमाणे शूज झटकले आणि त्यातून चुका खाली पडल्या. तेंव्हा मी त्याला बेदम मारलं होतं. ह्या सगळ्यानंतर त्याला आम्ही परत रिमांड होमला पाठवलेला.” मकरंद सांगताना थोडा थांबला आणि त्याने सुस्कार सोडला.

“परत म्हणजे?? तुम्ही आधीपण ऋषिकेश देशपांडेला रिमांडहोममध्ये पाठवलेला का ?” कदमांनी विचारलं.

“हो, पहिल्यांदा त्याला त्याच्या शाळेतूनच पाठवलेलं होतं. प्रतिमा गेलेली मुख्याध्यापिकांची भेट घ्यायला तेंव्हा तिनेच कन्सेंट दिला होता.” मकरंद थांबून पाणी प्यायला.

“ते कळलं हो. तुम्हाला काहीच माहिती नाही पहिल्यांदा का रिमांडमध्ये गेला होता ते.??” कदमांनी जरा आश्चर्यचकित होऊन विचारलं. डॉ.रेगे आणि कदमांनी एकमेकांकडे प्रश्नांकित नजरने पाहिलं.

“नाही. आम्ही आमच्या कामातच इतके व्यस्त असतो. त्यात माईची जबाबदारी होती. घराचे ई. एम. आय. भरायचे असतात. ऋचाच्या भविष्यासाठी प्लॅनिंग करायचे आहे. हे सगळं मला एकट्याला करायचं आहे. शिवाय ऑफिस मध्येही खूप काम आणि स्ट्रेस असतो. या सगळ्यात ऋषिकेशकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. त्याला टाका तुरुंगात. त्याने फार घृणास्पद काम केलंय.” मकरंद शरमेनेच जरा म्हणाला.

“त्याला सुधारायला एक चान्स हवा असं वाटत नाही का तुम्हाला??” आरती वाघ यांनी काळजीने विचारलं.

“ठीक आहे. तुम्ही जा आणि प्रतिमा देशपांडे यांना पाठवा.” कदमांनी इशाऱ्याने शिंदेंना मकरंदला घेऊन जायला सांगितलं.

“तावडे, मिसेस देशपांडेना घेऊन या.” कदमांनी तावडेंना सांगितलं.

मकरंद बाहेर गेला त्याने प्रतीमाकडे एक कटाक्ष टाकला. प्रतिमा आपल्याच विचारात होती. तिला मकरंद रूममधून बाहेर आलेला पण कळलं नाही. तावडे तिच्या जवळ आल्या आणि त्यांनी प्रतीमला आत यायला सांगितलं.हे सगळं मकरंद पाहत होता.

“माझं कुठे काही चुकलं का?? मी इतकं सगळं दिलं या पोरांना, प्रतिमाला...! घर, शिक्षण, खर्चाला पैसे, अजून काय लागतं सुखी माणसाला.?? प्रतिमाने मुलांना नीट सांभाळालं नाही. तिला नेहमीच आपला जॉब महत्वाचा वाटला. आता काय उपयोग या सगळ्याचा...??” मकरंदचे विचारचक्र थांबले. तो हताश होऊन बसला होता.