Get it on Google Play
Download on the App Store

आक्रोश

संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. डोंबिवली स्टेशनवर घरी परतणाऱ्या ऑफीस वर्कर्सची तुफान गर्दी होती. रेल्वेच्या त्या गर्दीतून एक ठेंगण्या बांध्याची गोरीपान बाई उतरली. ती बाई साधारण पन्नाशीची असेल. आपल्या काखोटीला पर्स लाऊन त्या गर्दीतून रस्ता काढत होती. ती स्टेशनाच्या बाहेर आली. तिचं घर स्टेशनपासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होतं. तरीही, थकलेली ती शेअर रिक्षासाठी थांबली होती.

“गोग्रसवाडी चलेंगे ना भैय्या??” असं विचारलं.

“ओ....!! भैय्या नाही मी... पेट्रोल संपलंय, पंपावर जातोय..!” रिक्षावाला जरा तिरसटपणे खेकसला.

तिने निराशेने दुसऱ्या रिक्षावाल्याकडे मोर्चा वळवला. तिचं लक्ष आपल्या घड्याळाकडे गेलं. स्टेशनवरंच सात वाजत आले होते.

“गोग्रासवाडी??” परत तोच प्रश्न तिने विचारला.

“चलो...!” रिक्षावाला तुच्छतेने म्हणाला.

सरतेशेवटी ती घराखाली पोहोचली. आता तीन मजले वर चढून जायचं म्हणजे तिच्या जीवावरच आलं होतं. जुनी बिल्डींग असल्याने त्याला लिफ्ट नव्हती. नाईलाजास्तव ती एक-एक पायरी मोजतच वर चढू लागली. 

“आज जेवायला काय केलं असेल माईंनी, काय माहीती. जाऊन मी आमटी-भाताचा कुकर लावेन.. पोळ्या करतील त्या.. माई घरातच असतात म्हणून माझ बरंच काम कमी होतं... नाहीतर ऑफिस पण करा आणि घर पण बघा..!” तिचं विचारचक्र चालू होत. 

तिसरा मजला कधी आला ते कळलंच नाही. ती पर्समध्ये हात घालून घराची किल्ली काढत होती. चष्मा, सफरचंद, पर्कचं चॉकलेट या सगळ्या पसाऱ्यात किल्ली लवकर सापडत नव्हती. 

“विसरले कि काय मी...??” हाताला किल्ली लागली. “सापडली...!!” तिने सुस्कार सोडला.

तिने किल्ली लॅचला लावली आणि दर उघडलं. ती आत आली. माई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचं रक्त सगळ्या घरभर पसरलं होतं. तिचा मुलगा ऋषी रक्ताने माखलेल्या कपड्यात होता. तो किचनजवळच्या पॅसेजमध्ये शून्यात बघत बसला होता. हे सगळं दृश्य बघून तिचे हात पायच गळले. ती धपकन खाली बसली. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.

“ऋषी हे काय करुन बसलास...??" ती बोलता-बोलता थरथरु लागली.

“माई......!!!!!” दारातूनच ऋषीचे बाबा किंचाळले.

त्यांच्या हातातली  ऑफिसची डब्याची बॅग खाली पडली आणि आत येताच त्यांनी ऋषीला पाहिले. त्याचा अवतार पाहिला. ते ऋषीच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

"नालायका तुझ्यासारखं पोरटं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं. कपाळकरंटे निघालो आपण...!"

 ऋषीच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले नाही. ऋषीचा निर्विकार चेहरा पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ऋषीला सगल दोन कानाखाली लगावल्या. त्यांच्या डोळ्यातुन सतत आसवं येत होती. हा सगळा तमाशा चालु असताना शेजारच्या वैद्य काकांनी पोलिसांना फोन केला होता. एव्हाना पोलिस त्याच्या लवाजम्यासहित पोहोचले होते.

"ओ ताई वाट सोडा...! ओ काका घरी आता...!" इनस्पेक्टर कदम घराबाहेर जमलेल्या गर्दिला हटकत पुढे आले.

"शिंदे, फॉरेनसिकवाल्या साळुंखेला बोलवा... आपली बाकी टिम घेउन या म्हणावं...!" कदमांनी ऑर्डर सोडली.

"हो साहेब. लगेच फोन करतो." शिंदे लगबगीने गेला.

"हॅलो घोरपडे, हॉस्पिटलला सांगा डेडबॉडी न्यायची आहे. हो.. बरं.. हो  शिंदे माझ्याबरोबरच आहेत." कदम कॉलवर बोलत होते.

"साळुंखे आणि टीम येतील एक अर्धा तास लागेल ट्रॅफिक लागलंय...!!" शिंदेनी सांगितलं

"खुन झालाय बिल्डींग सील करावी लागेल... तुम्हाला जबाबासाठी पोलिस स्टेशनात यावं लागेल... शिंदे फॅमिली मेंबरची लिस्ट लिहुन घ्या." कदमांनी सांगितलं.

"कोण कोण राहतं इथे...?" शिंदेंनी विचारलं

"मी. ताई.. नाही म्हणजे ताई आता नाही.. मी.. ही.. म्हणजे बायको माझी.. मुलं.. मुलगा हा आणि ऋचा कुठंय..?? म्हणजे मुलगी माझी..! पाच.. म्हणजे चार आता...!" देशपांडे म्हणाले. अजुनही त्यांना घडलेला प्रकार पचनी पडत नव्हता.

"साहेब अहो पुर्ण नावं सांगा...! मृतक कोण आपल्या..? ओ ताई हात नका लाऊ किचनला आता..!" किचनमध्ये जाणार्‍या आईला शिंदेंनी सांगितलं.

"मी मकरंद दत्तात्रय देशपांडे. माझी बायको प्रतिमा मकरंद देशपांडे. मुलगा ऋषिकेश मकरंद देशपांडे. मुलगी ऋचा मकरंद देशपांडे. माझी ताई लता दत्तात्रय देशपांडे." मकरंद म्हणाला.

"डेट झाल्या त्या बहिण काय तुमच्या.? देशपांडे म्हणजे लग्न-बिग्न..?? मुलगी कुठंय तुमची?" शिंदे बोलले.

"हो लग्न झालेलं पण मुलं होउ शकत नाही म्हणुन नवर्‍याने टाकलेली. तरी वीस-बावीस वर्ष झाली ती आमच्या बरोबरच आहे...!" मकरंद म्हणाला.

"ती गाण्याच्या क्लासला गेलीय येईलच इतक्यात" प्रतिमा म्हणाली.

"चला बाकी डिटेलमध्ये स्टेशनात सांगा...! साहेब झालं... न्यायचं का यांना..?" शिंदेंनी कदमांना विचारलं.

कदम फोनवर बोलत होते. त्यांनी हाताने "जरा थांबा" असा ईशारा दिला.

"हां... झालंय का...?? चला मग.. न्या त्यांना गाडीतुन आणि...." कदमांचं वाक्य संपायच्या आतच... 

"मी खुन केला माईचा...! आई-बाबांना काहीच माहिती नाही..!" ऋषीने मौन तोडलं.

“अरे, कुठे फेडशील हे पाप...?? तुझेच लाड नाडतात प्रतिमा..!” मकरंद ऋषिकेशच्या अंगावर धाऊन जात म्हणाला. शिंदेनी त्याला अडवलं.

"प्रश्नच मिटला... चला पोराला बेड्या ठोका... वय काय याचं?? अठराच्या वर आहे ना..नाहीतर चाइल्ड वेलफेअरवाले आमचा गळा पकडायचे..." कदम म्हणाले.

"हो परवाच एकवीस पुर्ण झाली." ऋषी म्हणाला.

शिंदेंनी त्याला बेड्या ठोकल्या. इतरांनाही गाडीतुन येण्यास सांगितले.