भाग-12- माझी भटकंती- ऑल टाइम फेवरीट गोवा
गोवा म्हणजे असे ठिकाण, जिथे प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी त्याला हवी तशी एन्जॉयमेंट हवी तेंव्हा उपलब्ध आहे. गोव्याला अनेकदा गेलोय. पण यावेळची गोवा ट्रिप म्हणजे 'मी न पाहिलेला गोवा' अशा शब्दात सांगता येईल. पावसाळी ट्रिप करूया म्हणून घरात विषय निघाला तेंव्हा सर्वानुमते (आम्ही तिघे) 'गोवा' ठरले. गोव्याला जायचे म्हटल्यानंतर अनेक गोष्टी मनात आल्या. मुळात एवढ्या पावसात गोव्याला जायचे का? चौकशी करता कळले कि या दिवसात वॉटर स्पोर्ट्स हि बंद असतात. मग गोव्यात बोअर तर होणार नाही ना? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात कोकणात किंवा गोव्यात जाणारे घाट जरा डेंजरसच. खाली कोकणात उतरायचे म्हणजे पोलादपूर, कोयनानगर, राधानगरी, आंबोली, अंबा, फोंडा, आणि सर्वात शेवटचा चोरला यापैकी एक उतरून जावे लागणार. पैकी आम्हाला सर्वात जवळचा आणि सर्वांच्याच पसंतीचा घाट म्हणजे अंबोली. पण पावसाळ्यात अंबोलीत कधी दरड कोसळेल आणि कधी घाट बंद होईल हे सांगणे अवघड. मग आमच्या सुहास दादाच्या सांगण्यावरून 'चोरला' घाटातून जायचे ठरवले. आणि हा निर्णय अतिशय योग्य ठरला. आणि यापुढे कायम 'चोरला' घाटातूनच जायचे असे पक्के ठरवले. हो, ३० किलोमीटर अंतर जास्त भरते पण रस्ता अतिशय सुंदर, खड्डे नाहीत, बऱ्यापैकी रुंद रस्ता आणि त्यामानाने ट्राफिक कमी.
आम्ही तिघे शनिवारी सकाळीच निघालो. चोरला घाटातून जायचे म्हणजे बेळगाव पर्यंत हायवे ने जाता येते. वेळ आणि त्रास दोन्हीही वाचतात. चोरला घाट म्हणजे गर्द निबिड जंगल. जवळ जवळ सर्वच ७०-८० किलोमीटरचा रस्ता जंगली प्राणी, पक्षी यांच्यासाठी राखीव असल्याने कुठेही मोठे गाव किंवा सिमेंटचे जंगल लागत नाही. कर्नाटकच्या जंगलांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये जाणवण्याइतका फरक आहे. महाराष्ट्रीयन जंगले म्हणजे कमी उंचीची बऱ्यापैकी दाट. या जंगलांमधून फिरता येऊ शकते. पण कर्नाटकची जंगले म्हणजे उंचच उंच झाडे, खालचा परिसर वेली, वृक्षांनी भरलेला. अतिशय घनदाट. तेंव्हा या जंगलांमध्ये फिरायचे म्हटले तर एकदम अवघड. चोरला घाटही असाच. एक प्रमुख रस्ता सोडला तर आजूबाजूला फक्त आणि फक्त जंगल. मध्ये मध्ये राखीव वनक्षेत्र आणि विविध प्राण्यांचे फोटो असलेले बोर्ड सोडले तर बाकी काही नाही. तेंव्हा कुठे आलोय, किती लांब जायचे हे कळणे मुश्किल. जी.पी.एस. सुद्धा रेंज नसल्याने बहुदा चालत नाही. पण रस्ता अतिशय नयनरम्य. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि नजर जाईल तिथपर्यंत दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या छटा. बेळगाव सोडले तर मध्ये काही खायचे म्हटले तरी अवघड. आम्ही घाट उतरल्यानंतर कुठे जेवण मिळेल का हे शोधत पुढे जात होतो. घाट संपला तरी ग्रामीण गोव्यात सरळ रस्ता नाहीच. वाकडी तिकडी वळणे. असेच शोधत असताने एक छान हॉटेल मिळाले. तिथे अनपेक्षित रित्या मच्छी राईसप्लेट मिळाली. आपल्याला राईस प्लेट म्हणजे '२-३ चपात्या, भाज्या, चटणी कोशिंबीर आणि शेवटी थोडासा भात' अशीच माहित असते. पण इथे राईसप्लेट म्हणजे 'एक फ्राईड फिश (किंग फिश/ बांगडा) जावळाची (सुकट) चटणी, आणि एक वाटी शिम्पल्याची, नारळाचे दूध न घातलेली फक्त आमसुलाची सोल कढी आणि भाताचा ढीग. सवयीप्रमाणे आम्ही रोटी मागवली आणि भाताचा ढीग बराचसा तसाच सोडला.
दुपारी पणजीत पोहोचलो. आतापर्यंत गोव्यात जायचे म्हणजे 'कलंगुट' च्या आसपास एखादे हॉटेल बघायचे, एखादी संध्याकाळ कलंगुट बीचवर, एखादी चक्कर कँडोलिम, अंजुना, बाघा, लिली पुट पर्यंत. कलंगुटच्याच आसपास थोडीसी खरेदी, बराचसा वेळ निवांत पडे रहो ...... आणि परत. पण यावेळी मात्र पावसाळा असल्याने आणि वॉटर स्पोर्ट्स बंद असल्याने राहण्यासाठी नॉर्थ गोवा वगळून साऊथ मध्ये आणि तेही प्रॉपर पणजीच्या मार्केट मध्येच असलेले थ्री स्टार 'हॉटेल ग्रँडे डेलमोन' बुक केले होते. अगदीच काही नाही तर हॉटेलच्या आजूबाजूला तरी फिरता यावे. हॉटेल मध्ये चेकिन करून, थोडेसे आवरून बाहेर पडलो. पणजीतला फेमस बीच म्हणजे 'मिरामार' आमचे हॉटेल मांडवीच्या किनाऱ्यापासून एकच रस्ता आत होते. त्यामुळे अनेकदा प्रवास या मांडवी नदीच्या कडेकडेने झाला. आत असलेले कॅसिनो, क्रूझ जाता येता दिसत होते. मिरामारला बरीच गर्दी होती. समुद्र खवळलेला असल्याने मोठ्या लाटा येत होत्या. वॉटर स्पोर्ट बंद होते पण तरीही अनेकजण त्या लाटांमध्ये उतरून समुद्र एन्जॉय करत होते. किनाऱ्यावर गार्डस ची गाडी सारखी फिरत लोकांना धोक्याची जाणीव करून देत बाहेर काढत होती पण तरीही लोक रिस्क घेऊन लाटांमध्ये जात होतेच. या मिरामारचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वर्षानुवर्षे असलेले असंख्य कावळे. कावळे खरेतर माणसापासून दूर राहतात. पण इथले कावळे मात्र कबुतरांसारखे बिनधास्त पर्यटकांच्या आजूबाजूला फिरत त्यांच्या हातातून पडणारे खाद्य पदार्थ खात असतात. मीही भेळवाल्याकडून चुरमुरे घेऊन खाण्याऐवजी या कावळ्यांना टाकले. ते बघून संकेत म्हणालाहि 'बाबा आता म्हातारपणाचे छंद शोधायला लागलेत'. या कावळ्यांनी केलेले नक्षीकाम (?) इथल्या झाडांवर, रस्त्यांवर, पुतळ्यांवर, घरांवर ठळकपणे दिसते.
परत येताने मांडवीच्या कडेला कॅसिनो प्राईड जवळ थांबलो. लगेच एकजण आला आणि कॅसिनो, क्रूझ यांचे बुकिंग करायचे का विचारू लागला. यातील काही आम्हाला नको होते. हे क्रूझ तास बोअरिंग प्रकार. ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि आत घुसून नाचणार असाल तर जरा मजा वाटेल. आम्ही गोवा फिरण्यासाठी काय करता येईल असे विचारल्यावर त्याने अनेक पर्याय सांगितले. खाजगी टॅक्सी, टुरिस्ट बस किंवा मग गाईड. स्वतःची गाडी असली तरी रस्ते शोधत फिरणे म्हणजे जरा वेळखाऊ काम होते. गुगल वर तरी किती विसंबून राहायचे. मग आम्ही उद्यासाठी एका गाईडची व्यवस्था करून हॉटेल कडे परत आलो. मध्येच एके ठिकाणी गाडी लावून मार्केट मध्ये चक्कर मारला. संध्याकाळच्या जेवणासाठी 'हॉटेल रिट्झ' शोधून ठेवले. आम्ही उतरलेल्या हॉटेलच्या मेनूकार्ड वरील 'आम्लेट -१२० रुपये' बघून जेवण बाहेरच करायचे ठरवले होते. रिट्झ मध्ये छान जेवण मिळाले. उद्या काय बघायचे याची चर्चा करत आम्ही निद्राधीन झालो.
'ग्रँडे डेलमोन' मधेच ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. बाहेर एक म्हातारे गृहस्थ हाफ चड्डी, हातात छत्री घेऊन आमच्या गाडी जवळ उभे होते.टीपीकल कोकणी माणूस, 'दीपक' नाव ऐकून एखादा पोरगेलासा गाईड असेल असे वाटले होते, पण हे 'दीपक बिसवाडकर' तसे ५५-६० चे असावेत. पण माणूस छान होता. मोजकीच बडबड. आम्ही त्यांना आम्हाला जुने चर्चेस, मंदिरे बघायची आहेत असे सांगितले. मघाशी मी म्हटले होते ना 'मी न पाहिलेला गोवा' तो इथून सुरवात झाला. गाईडने आम्हाला पणजीपासून १० किमी अंतरावरील 'बॅसिलिका ऑफ बॉम जीजस' नावाच्या एका भव्य चर्च जवळ नेले. हे चर्च सध्या 'आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' च्या ताब्यात आहे. बाहेरून इमारत छान आहेच पण आत गेल्यानंतर मात्र तेथील बांधकामाच्या भव्यतेची कल्पना आली. हे चर्च बघून मला माझ्या 'स्पेन-पोर्तुगाल' आणि त्या अगोदरच्या 'पोलंड-हंगेरी-स्लोव्हाकिया' ट्रीपची आठवण झाली. या दोन्ही ट्रिप मध्ये अनेक चर्चेसचा समावेश होता. ओल्ड गोव्यातील हे भव्य चर्च पोंर्तीगीजांच्या श्रीमंतीची जाणीव करून देते. अर्थात हि श्रीमंती त्यांनी आपल्यालाच लुटून मिळवली होती. असो. आम्ही ज्या बाजूने आत गेलो होते तेथील हे चर्च बघून जरा मागच्या बाजूला गेलो तर अजून एक त्याहीपेक्षा भव्य चर्च दिसले. अगोदरचे चर्च वापरात नसल्याने जरा जुनाट वाटत होते, आणि जरा मेन्टेनन्सही कमी होता. पण हे मुख्य चर्च मात्र चांगलेच भव्य, सुंदर आणि वापरात होते. त्याचे उंचच उंच छप्पर त्याकाळच्या प्रगत बांधकाम शास्त्राची साक्ष देत होते.
बाहेर आलो तर समोर मोठे गार्डन होते आणि त्याहीपलीकडे लाल दगडात बांधलेले 'सेंट फ्रान्सिस झेव्हिअर' या नावचे दुसरे एक देखणे चर्च होते. इथे ५०० वर्षपूर्वीचे 'सेंट झेव्हिअर' या ख्रिश्चन धर्मगुरूचे पार्थिव शरीर जतन करून ठेवले आहे असे गाईड ने सांगितले. पण आमच्या दुर्दवाने 'भारताचे राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंदजी' तिथे आणि त्याच वेळेला येणार होते. त्यामुळे ते चर्च पर्यटंकासाठी बंद होते. त्यामुळे हि इमारत बघता आली नाही. राष्ट्रपती यायची वेळ झाल्याने पोलीस समोर थांबूही देत नव्हते. मग आम्ही बघितले त्यावरच समाधान मानत पुढे निघालो. तिथून पुढे ३५ किलोमीटर वरील 'मंगेशी मंदिर' ला निघालो. आम्ही ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्यावर दर १०० मीटरवर एक पोलीस उभा होता. राष्ट्रपती या रस्त्याने जाणार असावेत असे वाटले. पण राष्र्टपती 'मंगेशी मंदिर' लाच येणार होते. त्यामुळे तिथंही आम्हाला नो एंट्री होती. मग गाईडने आम्हाला पुढे १०-१२ किलोमीटर वरील 'पोर्तुगीज हाऊस' या म्युझियमला नेले. पोर्तुगीज काळातील अनेक वस्तूंचे या मोठ्या बंगल्यात जतन करून ठेवले आहे. इथे एक त्या काळातील मातब्बर पोर्तुगीज वकील राहत होते. त्यांचा पोर्तुगीज शासनात चांगलाच दरारा होता. या महाशयांची ३ री कि ४ थी पिढी अजून गोव्यात राहते, असे गाईडने सांगितले. या पोर्तुगीज हाऊस च्या विरुद्ध बाजूला पर्यटंकासाठी 'गोवन संस्कृतीचे पुतळ्यांच्या स्वरूपात प्रदर्शन मांडलेले आहे. एकदा नक्कीच बघण्यासारखे आहे. इथेच एक जमिनीवर लाल दगडात कोरलेले मीराबाईचे स्कल्पचर आहे. जमिनीवर कोरलेले हे सर्वात मोठे स्कल्पचर आहे असे तिथे लिहिलेले आहे.
तेथून बाहेर पडलो. एव्हाना चांगलीच भूक लागलेली होती. गाईड म्हणाला कोलवा बीचला जाऊया. तिथे चांगले रेस्टॉरंट पण आहे. 'सागर-किनारा' मध्ये सुंदर जेवण मिळाले. जेवण करून बीचवर गेलो. 'कोलवा-बीच' अतिशय सुंदर, स्वच्छ आणि लांबच लांब पसरलेला. हा गोव्यातील सर्वात मोठा बीच आहे असे गाईडने सांगितले. पुढच्या वेळी गोव्यात आलो तर साऊथ गोव्यातच हॉटेल बघायचे असेही ठरवले. कोलवा बीच पणजीपासून ३७ किलोमीटर लांब असला आणि पाऊस असला तरी इथे भरपूर गर्दी होती. अंदमानच्या बीचची आठवण झाली. गाईड म्हणत होता पुन्हा परत जाऊन 'मंगेशी मंदिर' बघूया. पण जर राष्ट्रपतींचा दौरा संपला नसला तर पुन्हा निराशा व्हायची म्हणून आम्ही दुसऱ्याच रस्त्याने परत फिरलो. रस्त्यात गाईड अमुक बीच-तमुक बीच असे सांगत होता. पण कोलवा नंतर तरी लगेच दुसरा बीच बघावा असे वाटले नाही. आतापर्यंत मीच गाडी चालवत होतो पण परत येताने संकेत ने गाडी घेतली. मी गाईड्स शी बोलत होतो कि इतका वेळा आलो तरी पण गोवा पोलसांनी कधी त्रास दिला नाही. आणि बोला-फुलाची गाठ पदवी त्याप्रमाणे थोडयाच वेळात एका पोलिसाने गाडी अडवली. संकेत कडेही लायसेन्स आहे, पण दुर्दैवाने पाकीट हॉटेलवरच राहिले होते. विधाउट लायसन्स गाडी चालवणे, भरीस भर म्हणून पीयूसी मागच्याच १५ दिवसांपूर्वीच संपलेले आणि गाडीचा नंबर ''३९'' एवढाच लिहिलेला, तो चार अंकी लिहिलेला ००३९ असा पाहिजे............... ,मग काय सांगायचे. २००० रुपये 'गोवा-पोलीस' ला सप्रेम भेट देत परत पणजी गाठली.
पणजीत अजून बघण्यासारखे काय आहे असे विचारल्यावर गाईडने आम्हाला मिरामार आणि 'दोणा पावला' असे पर्याय दिले. पण दोनीही बघीतले असल्याने त्याला म्हटले कि आम्हाला अजून एखादे चर्च किंवा मंदिर दाखवा. मग त्याने तिथून जवळच असलेले पणजी चर्च दाखवले. या चर्चचे बाह्य स्वरूप अतिशय देखणे आहे. अनेक सिनेमात हे चर्च दिसते. या चर्चला जाणाऱ्या पायऱ्या खूपच छान दिसतात. गोव्यातील अनेक स्पॉट हे सिनेमाच्या शुटिंगवरून ओळखले जातात. जसे दोना पावला इथे सिंघम चे शूटिंग झाले होते. तसेच या पायऱ्यांवर अनेक सिनेमाचे शूटिंग झाले आहे. अनिल कपूरचा 'मुसाफिर' चे काही सिन या पायऱ्यांवरचे आहेत. चर्चमध्ये रविवारची प्रार्थना असल्याने आत नाही जाता आले पण दरवाज्यातून जे दिसले ते तसे सामान्यच होते. याला तसा काही जुना इतिहास नसावा, नेहमीच्या प्रार्थनेसाठी बांधलेले चर्च. आतल्यापेक्षा बाहेरूनच हे सुंदर दिसते.
चर्च बघून गाईडला रजा देऊया असे म्हटले होते पण संकेत म्हणाला कि वेळ आहे तर कलंगुट ला जाऊया. गाईडचे घरही मांडवी च्या पलीकडच्या तीरावर असल्याने मग त्याला सोडून आम्ही कलंगुटला पोहोचलो. रस्त्यात तुफान पाऊस होता. गोव्याच्या पावसाची एक वेगळीच मजा आहे . संपूर्ण दोन-तीन दिवसाच्या प्रवासात आम्हाला अनेकदा पाऊस भेटला. बटन दाबल्यासारखा कधीही सुरु होतो, धो-धो कोसळतो आणि टाकीतले पाणी संपल्यासारखा ५-१० मिनिटांनी थांबूनही जातो. उगाच बुर बुर नाही. त्यामुळे पाणी पटकन वाहून जाते. शिवाय पणजी तसेही स्वच्छ शहर असल्याने कुठेही चिखलाची चीक चीक दिसत नाही. कलंगुटला पोहोचलो तर तिथे गर्दीचा महापूर आलेलाच होता. पावसाळ्यात गोव्याला येणारे आपल्यासारखे वेडे काही कमी नाहीत हे बघून बरे वाटले. कलंगुट मार्केट मध्ये फिरलो, पण कुणालाच काही घ्यावेसे वाटले नाही. हि संपूर्ण ट्रिप आम्ही एकही वस्तू खरेदी न करता पूर्ण केली. हवे ते खाल्ले-पिले, मनसोक्त फिरलोही पण खरेदी मात्र काहीही नाही. कलंगुट वरून अंधार पडता पड़ता हॉटेल वर आलो. दुसरे एक 'हॉटेल शेरे पन्जाब' संध्याकाळच्या जेवणासाठी बघून ठेवले होते. पण दिवसभरच्या फिरण्याने कंटाळल्याने आणि पाऊसही असल्याने 'ग्रँडे डेलॉमॉन' लाच जेऊया म्हटले, काय थोडे पैसे जास्त जातील, जाऊ दे. पण हॉटेल ने अतिशय निराशा केली. जेवण अतिशय फालतू मिळाले. पैसेही जास्त गेले. बाहेर पडून कुठे काही स्वीट मिळतेय का म्हणून बाहेर पडलो. पलीकडच्या एका ठिकाणी छान खाऊ गल्ली होती. तिथे तंदूर, बिर्याणी आणि इतरही पदार्थ मिळत होते. पण खाण्याची इच्छा नव्ह्ती. म्हणून मग फालुदा, आईस्क्रीम खाऊन परत आलो.
सकाळी आवरून परत साताऱ्याला निघालो. पण जाता जाता पुन्हा एकदा मिरामार बीचला भेट देऊन आलो. सवयीने वेगळ्या वाटा धुंडाळायची उर्मी असल्याने गाईडने सांगितलेल्या जरा वेगळ्या वाटेने जायचे ठरवले. मांडवी नदीच्या कडे कडेने ८-१० किलोमीटर गेल्यावर 'रायबंदर फेरी बोट' मिळते. या फेरी बोटीने गाडीसह पलीकडे रायबंदरला जाता येते. आम्ही गाडी फेरीत चढवून पलीकडे गेलो. बोटिंगची आमची हौस अशी पूर्ण झाली. ही फेरी सर्वांसाठी फुकट असते. फक्त फोर व्हीलरचे १० रुपये घेतात. पुढे उतरून या रायबंदर वरून बिचोलिम आणि पुढे साखळीम. हा २०-२२ किलोमीटरचा प्रवास वळ्णावळणाचा, झाडीतून आणि ग्रामीण गोवानीज खेड्यांमधून जातो. रस्ता एकदम क्लीन, खड्डे नसलेला. तसे गोव्यात नजरेत भरणाऱ्या गोष्टी म्हणजे तेथील स्वच्छता आणि सुंदर रस्ते. साखळीम ला पोहोचल्यावर आम्ही पुन्हा चोरला घाट मार्गे बेळगाव रस्त्याला लागलो. घाटातील निसर्ग बघत अचानक कोसळणाऱ्या पावसाची मजा घेत बेळगावात आलो. उशीर झाला तरी कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा खायचा असे ठरवले होते. पण बेळगावात कुठल्या तरी पक्षाने मुख्य रस्त्यावरच आंदोलन केल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत आडकलो आणि दिड तास तिथेच गेला. कोंडी सुटल्यावर दिसणाऱ्या पहिल्याच हॉटेलात जेवण करून घेऊन ४.३० ला बेळगाव सोडले आणि अंधार पडता पड़ता पुन्हा घर गाठले. अनेकदा गोव्यात जाऊनही कधी हे चर्च, मंगेशी मंदिर, पोतुगीज हाऊस, कोलवा बीच झालेले नव्हते ते असे अचानक झाले. एक पोलिसांचा वाईट अनुभव सोडता आमची गोवा ट्रिप एकदम झकास. ...........................
अनिल दातीर