Get it on Google Play
Download on the App Store

भाग-७ वेरूळ-औरंगाबाद-जालना

बी.ए.आय. च्या अनेक चांगल्या उपक्रमापैकी `टेक्निकल साईट व्हिजिट' हा एक चांगला उपक्रम असतो. यावेळी जालना येथील `कालिका-स्टील' इंडस्ट्रीला जाण्याचे ठरले होते. अगदी शेवटच्या क्षणी मी यात सामील झालो आणि तेही केवळ एक नवीन भाग पाहायला मिळेल, जालन्याला तरी आपण दुसरे कशासाठी जाणार असा विचार करतच. कालिका स्टील ने अगदी उत्तम व्यवस्था करून आमची ही ट्रिप मस्त पूर्ण केली. जाताने स्लीपर कोच ने आम्ही ५७ जणांनी जालन्याकडे रात्री ११ ला प्रस्थान केले. जालन्यात `हॉटेल सॅफरॉन' या जालन्यातील सर्वात चांगल्या हॉटेल मध्ये आमची व्यवस्था होती. सकाळी आवरून आम्ही `कालिका स्टील ऍलॉईस' या इंडस्ट्रीला भेट द्यायला गेलो. `जालना' तसे म्हटले तर मराठवाड्यातील एक दुष्काळी, दुर्लक्षित शहर. पावसाचे प्रमाण अत्यल्प. यावर्षीच्या जून पासून सुरु झालेल्या पावसाळ्याच्या सिझन मध्ये आतापर्यंत फक्त दोनदा इथे पाऊस झाला असे कळले. जालना हे तसे मुस्लिम बहूल शहर म्हणता येईल. आणि असणारच औरंगाबाद पासून ६० किमी वर असलेल्या या शहरावर कायमच मुस्लिम शासन राहिले आहे. मूळचे जुने जालना शहर बरेचसे बकाल, गर्दी-गोंगाट असेच आहे. पण स्टील इंडस्ट्रीने या शहराला भारताच्या नकाशावर महत्वाचे स्थान मिळवून दिलंय. हे शहर `स्टील-हब' म्हणून ओळखले जाते. बहुतांशी स्टील कंपन्यांचे जालना इथेच प्लांट आहेत. सुरुवातीला माझा आणि अनेकांचा असाच समज होता कि, स्टील साठी लागणारा कच्चा माल `आयर्न स्टोन' किंवा `स्पॉन्ज आयर्न' या भागात मिळत असेल म्हणून सर्वांनी इथे स्टील कंपन्या काढल्यात. पण असे काही नाही. सगळा कच्चा माल हा ओरिसा, बिहार, उत्तराखंड येथून येतो. केवळ एकाने फॅक्टरी काढली, त्याची चालली म्हणून दुसऱ्याने, तिसऱ्याने काढली असे करत सगळाच स्टील उद्योग इथे शिफ्ट झाला. खरेतर इथे पाण्याचा अभाव, स्टील इंडस्ट्रीला तापलेले स्टील थंड करण्यासाठी पाणीही खूप लागते, आणि ते विकतही घ्यावे लागते तरी पण इथे एवढे स्टील प्लांट आहेत. कदाचित स्वस्त आणि अनुभवी मजूर, भरपूर मोकळ्या जागा हेही कारण असावे. या स्टील उद्योगामुळेच जालना शहराची हद्दीबाहेर होणारी वाढ खूप वेगाने होतेय. मूळ शहर सोडून बाहेरच्या क्षेत्रात अनेक मोठमोठे हौसिंग प्रोजेक्ट्स, टाऊनशिप दिसल्या

.............. `कालिका स्टील' चा हा प्लांट अतिशय मोठा आहे. ६०% स्पॉन्ज आयर्न आणि ४०% लोखंडाचे स्क्रॅप वापरून इथे रोज १२०० टन स्टील तयार केले जाते. म्हणजे रोज जवळपास ५ ते ६ कोटी चा इथे टर्न ओव्हर इथे होतो. रसरसलेले लालबुंद लोहाचे ते गर्डर, बारचे कटिंग होताने वळवळणारा तो तप्त लोखंडी बार पुढे पास होताने पाहणे नक्कीच रोमांचक. सर्व फॅक्टरी ऑटोमेटेड असल्याने तशी माणसे कमीच पण काही कश्टाची कामे मात्र अजूनही मॅन्युअली केली जातात. ही फॅक्टरी व्हिजिट लक्षात राहण्यासारखी. संध्याकाळी प्रथेप्रमाणे कॉकटेल डिनर आणि डी.जे. चा ठेका. `एक सुरमयी शाम '. मी ही त्यात सहभाग नोंदवत एक गीत सादर करून माझी गाण्याची हौस भागून घेतली.

................... दुसऱ्या दिवशी वेरूळ ला भेट द्यायचे ठरले होते. खरेतर माझ्या मनात वेरूळ बरोबरच `देवगिरी' किल्ल्याला भेट द्यायची इच्छा होती, पण जालना सोडताने झालेला उशीर आणि वेरूळला पोहोचायलाच वाजलेले १२.३० यामुळे फक्त वेरूळ एवढेच होणार होते. आतापर्यंत वेरूळ ला माझी हि तिसरी भेट. पण याअगोदर गाईड न घेतल्याने सर्वच केवळ आंधळेपणानेच पाहिले होते असे वाटले. गाईड ने वेरूळ-अजिंठा त्याच्या ऐतेहासिक/ पौराणिक महत्वासह, प्रत्येक कोरलेल्या मूर्ती मागच्या `अनटोल्ड-स्टोरीज' सांगितल्याने माझी या लेण्यांकडे बघण्याची दृष्टीच बदलली. गाईडच्या माहिती भांडारातून हा योग्य `चष्मा' तुमच्या डोळयांवर चढवला कि या मूर्तींमागील अनेक बारकावे स्पष्ट दिसू लागतात. वेरूळ-अजंठा यांचा उल्लेख एकत्र येत असला तरी दोन्हींमध्ये १०३ किलोमीटरचे अंतर आहे. वेरूळला कोरीव लेणी जास्त तर अजंठ्याला चित्र जास्त. वेरूळला एकूण ३४ लेणी आहेत. त्यापैकी १७ हिंदू, १२ बुद्धिस्ट आणि ५ जैन संस्कृतीशी निगडित आहेत. राजा `कालचुरीं, राजा `कृष्णकुट' आणि राजा `चालुक्य' यांच्या कारकिर्दीत हि लेणी खोदली गेली असे म्हणतात. मला मात्र कायमच हा प्रश्न पडतो कि ही लेणी नक्की `का, कोणासाठी, कोणी खोदली असतील? यांचा राहण्यासाठी उपयोग होत असावा असेही वाटत नाही, पूजा-आर्चेची ही मंदिरे आसावित असेही वाटत नाही, यातून काही उत्पन्न मिळत असेल असेही नाही. यांचा कालावधी साधारणतः पाच ते आठव्या शतकातला आहे. १५० ते २०० वर्षे हि खोदकामे चालू होती. म्हणजे ४ ते ५ पिढ्या यात काम करत होत्या. आणि तरी सुद्धा हि कला पुढच्या पिढीत तितक्याच ताकदीने पोहोचवली जात होती. कारण बऱ्याच मूर्तींमध्ये हे साम्य दिसून येते. इतके सारखेपणा येण्यासाठी नक्कीच काहीतरी रेखांकित नकाशे, साचे आणि अगदी बारीक मोजमापे करण्याची साधने या वेळच्या लोकांकडे उपलब्ध असणार. नुसत्या नजरेने बघून तसेच शिल्प दुसरीकडे उभारणे अशक्यच. ही लेणी बघून काहीतरी `अतर्क्य, अचाट, अवर्णनीय' बघितल्याचा आनंद नक्कीच होतो. अर्थात हे आपल्या मानसिकतेवरही आहे. कारण जाता येताने `काय बघायचं परत परत, सगळीकडं दगडच तर हाईत' अशी म्हणणारी व्यक्तीही मला भेटली. अनेक जण बारकाईने बघण्यापेक्षा त्या शिल्पांबरोबर सेल्फी काढून घेण्यातच समाधान मानताना दिसली. असो.......... पसंद अपनी अपनी. हि संपूर्ण साईट `वर्ल्ड हेरिटेज' म्हणून घोषित असल्याने तसा शासनाचा किंवा पुरातत्व विभागाचा बऱ्यापैकी कंट्रोल आहे.

..............मुख्य लेणे म्हणजे `कैलास लेणे' हे एकच त्या गाईड बरोबर बघायला अख्खा दिवस जाऊ शकतो इतके त्यात बारकावे आहेत. रथाच्या आकारात असलेले हे एक शिव मंदिर. संपूर्ण जगात असे हे एकमेव शिल्प आहे जे अखंड एकाच दगडात किंवा डोंगरात कोरून तयार केलेले आहे. १५०-२०० फूट उंचीचे हे कैलास लेणे वास्तुशास्त्रातील एक अजब म्हणावे लागेल. इथे भगवान शंकराच्या जीवनातील अनेक प्रसंग मूर्ती स्वरूपात दाखवले आहेत. गाईडने त्यातील भाव, बारकावे, आणि त्यामागील उद्देश सांगितल्यावर बऱ्याच गोष्टी नव्याने आकलन झाल्या. एका शिल्पात हा रावण, शंकर सदैव आपल्या सोबत असावेत या हट्टापायी सर्व कैलास पर्वतच उचलून घेऊन लंकेला न्यायला निघाला होता, पण भगवान शंकराने आपल्या अंगठयाच्या जोरावर हा प्रयत्न विफल केला. शंकर यावेळी खरेतर रावणाला त्याच पर्वताखाली चिरडून मारूही शकत होते पण शंकरानेच रावणाला अमरत्व दिलेले होते. म्हणून शंकराने आपले प्रतीक म्हणून एक शिवलिंग रावणाला दिले आणि हे लंकेपर्यँत पोहोचेतो कुठेही खाली ठेवायचे नाही असे सांगितले. मग गणपतीने चलाखी करत रावणाला हे शिवलिंग खाली ठेवायला भाग पडले. (चलाखी किंवा राजकारण करण्यात देव देखील कमी नव्हते) अशी आख्यायिका आहे. एका भिंतीवर आठ ओळींमध्ये अनेक छोटी छोटी शिल्पे आहेत. अनेक जण तिथे फार न रेंगाळता पुढे जातात, आम्हीही तसेच गेलो असतो. पण गाईडने जेंव्हा त्यातील कथा सांगायला सुरुवात केली तसतशी ती चित्रलिपी उलगडत गेली आणि त्या आठ ओळींमध्ये संपूर्ण रामायण चित्रीत केलेले सापडले. याच लेण्यातील भव्य हत्ती आणि शेजारचे उंचच उंच ध्वजस्तंभ भव्यतेची जाणीव करून देतात. आधी कळस मग पाया या प्रमाणे वरून सुरुवात करून खाली १५० फुटांपर्यंत अखंड कोरीव काम करत यायचे हे त्याकाळी कसे साधले गेले असेल? इथला २० फुटाचा कॅंटीलिव्हर आणि त्यावरील १००-१२५ फुटाचा उभा डोंगर म्हणजे अद्भुत आश्चर्य. कैलास लेणे बघून आम्ही पुढील लेण्यांकडे वळलो. त्यातील बौद्धांचे प्रार्थना स्थळ खूपच उत्कृष्ट कोरीव कामाचा नमुना ठरावा असे आहे. त्यातील गोलाकार आकारात कोरलेल्या दगडी रीब्ज वर आधारलेले छत, बौद्धांची भव्य मूर्ती, समोरच्या झरोक्यातून घेतलेल्या प्रकाशामुळे गौतम बुद्धांच्या डोक्यामागे दिसणारे तेजोवलय सर्वच अप्रतिम. या गुहेत ध्यान करताने येणारा`ओंकार' चा धीरगंभीर आवाज आणि त्याच्या प्रतिध्वनीतून निर्माण होणारी आवाजाची कंपने कोणालाही ट्रान्स मध्ये नेण्यास पुरेशी आहेत. वेळेअभावी त्यापुढची अजून एक दोन लेनि बघून आम्ही परत फिरलो. गाईड बरोबर घेऊन इथल्या प्रत्येक लेण्यात जाऊन बघायला किमान एक आठवडा पाहिजे.................. एवढी फिरस्ती करताने भरपूर फोटो काढले पण मी एकही सेल्फी काढली नाही किंवा कोणाला सांगून माझा त्या लेण्यांमधील फोटो ही काढला नाही. हो, ग्रुप फोटोसाठी मात्र मी उभा राहिलो. दौलताबाद अर्थात देवगिरी चा किल्ला पुन्हा एकदा बघायचे राहूनच गेले. इथून जवळच एक बारा ज्यीतीर्लिंगापैकी एक `घृष्णेश्वर' हे अप्रतिम वास्तुशिल्प शिव मंदिर आहे.

............... परतीच्या प्रवासात आठवण राहील असा जेवणाचा बेत सांगायलाच हवा. औरंगाबाद मधील `थाट-बाट' या हॉटेलात आमचे दुपारचे जेवण (४.३० वाजता) होते. इथे सगळंच चांदीचे. ताट, पाच-सहा वाट्या, पाण्याचे ताकाचे ग्लास, चमचे सगळंच चांदीचं. आणि जेवणात किमान १५ पदार्थ असतील. त्यांचा वाढण्याचा स्पीड इतका होता कि ताटातील घास तोंडात जाईपर्यंत दुसरा पदार्थ ताटात येऊन पडत होता. सगळंच अनलिमिटेड. कितीही खा. मला तर एवढे पदार्थ बघूनच दडपण आलं होतं. शेवटी ताटावर एक हात आडवा धरत दुसरा हात मात्र खरंच आडवा मारत यथेच्छ भोजन केले. आणि मग सुस्तावलेले सगळे परतीच्या प्रवासाला लागलो. इतके जेवण होऊनही त्याच्या पाचक वैशिष्टयांमुळे पुन्हा ११ वाजता सर्वांनी पुण्याजवळ जेवण केले आणि ४ वाजता सातारा गाठले.

.............पुन्हा एक शनिवार रविवार भटकंतीत छान गेला............

अनिल दातीर