Get it on Google Play
Download on the App Store

भाग-१०, रविवारची भटकंती

पाऊस सुरु झाल्यानंतरचा हा पहिलाच रविवार. पण पाऊस सुरु झालाय असं कालपर्यंत तरी वाटत नव्हते. हवामानखात्याने नेहमीप्रमाणे 'अंदाज' वर्तवत पाऊस ४ दिवस लौकर येणार असे सांगितले होते. हवामान खात्याचे अधिकारी हातात छत्री धरून पावसाची वाटचाल बघत होते. 'तो' केरळात आला, गोव्यात आला, तळकोकणात आला,...... असे म्हणत म्हणत पाऊस खाली रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही आला. आणि म्हटल्याप्रमाणे त्याने या दोन जिल्ह्यांना जोरदार दणका दिला. पण पुढे मात्र पाऊस हवामान खात्याला काही दाद देईना. हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असे भाकीत केले पण पाऊस मात्र 'आम्ही नाही जा' असे म्हणत कोकणातून घाट चढून वर येईनाच. मग कंटाळून शेवटी छत्रीधारी अधिकाऱ्यांनी आपल्या छत्र्या मिटवून ठेवत 'पाऊस ८-१० दिवस विश्रांती घेणार' असे जाहीर करून टाकले. कोकणाचे ठीक हो, पण आम्ही घाटावरचे लोक म्हणू लागलो, 'कि बाबा रे, विश्रांती घायची तर अवश्य घे, पण कंटाळा आल्यावर घे. अगोदर सुरुवात तरी कर' पण आमचे ऐकेल तो पाऊस कसला? ........ आणि काल मात्र हवामान खात्याच्या 'फेकाफेकी' ची वाट न बघता, पाऊस घाट चढून वर तर आलाच, पण चक्क साताऱ्यात पोहोचला.

काल सकाळी ११ वाजताच मी आणि वंदना बाहेर पडलो. मस्त वातावरणात जरा लांब फेरफटका मारू म्हणून निघालो. यवतेश्वर घाट चढून प्रकृती रिसॉर्ट पर्यंत जाईतो पावसाने आमच्या पुढे पाण्याच्या घागरी ओतायला सुरुवात केली होती. रस्त्यात माकडांना घरून आणलेले खाद्य खायला घालीपर्यंत मी बराच भिजला होतो. या माकडांना खायला घालताने हातातील पुडा एके ठिकाणी कधी टाकू नका. (सहज एक सूचना- त्यातला मोठा नर हमखास दादागिरी करून इतर लहानग्यांना काही मिळू देत नाही. त्याला एखादा तुकडा टाकीत इतरांपुढे थोडे थोडे टाकावे) .............

भरारनारा वारा, डोंगर माथ्यावर सांडलेले ढग, दरीतून येणाऱ्या धुक्याच्या झुंडी, आणि नागमोडी वळणे घेत आपली साथ करणारा काळाभोर ओला रस्ता, आणि काय हवे. रविवार असल्याने बरीच वर्दळ होती. एवढे हॉटेल झालेत पण प्रत्येक हॉटेलसमोर किमान २-३ गाड्या दिसत होत्या. पठार ओलांडून आम्ही कास जवळ पोहोचलो. पण कोसळणारा पाऊस आणि तिथली गर्दी बघून लेक वर जाणे टाळत आम्ही पुढे निघालो. कासचा रस्ता आहेच मुळी मनमोहक. पण निसर्गाचे खरे वैभव पाहायचे असेल तर पुढे बामणोली घाट, तेटली, तापोळा इकडे जायला हवेय.

कास ओलांडून आम्ही पुढे निघालो. रस्त्यात कास तलाव उंची वाढवण्याचे काम चालू आहे. जुन्या भिंतीच्या अलीकडे नवीन भिंत बांधणे चालू आहे. कुठलीही नवीन डेव्हलपमेंट म्हटली कि पहिले संकट येते ते नैसर्गिक संपदेवर. कासची उंची वाढेल, पाणीसाठाही वाढेल पण या वाढीव उंचीमुळे खूप मोठा जंगल परिसर पाण्याखाली जाणार आहे. कासच्या आजूबाजूच्या जंगलातून केलेली भटकंती, जेवणावळी, ते हुंदडणं लवकरच इतिहास जमा होणार आहे. एक चकाचक धरण तिथे उभे होईलही. पण आताची सर त्याला येणार नाही. प्रगती आणि जुना ठेवा एकत्र कसा मिळणार. असो.

कास गाव ओलांडले कि गर्द जंगल सुरु होते. त्यातला ५ मिनिटाचा एक पॅच तर दिवसही अंधारलेला वाटावा असा आहे. पावसात आणि धुक्यात तर अप्रतिम. महाबळेश्वर ची आठवण येणे साहजिक पण मला तर हमखास मनोजकुमार चा 'गुमनाम' सिनेमा आणि त्यातील 'गुमनाम है कोई, बदनाम है कोई' किंवा 'धुंद' सिनेमाची आठवन होते. पुढे गेल्यानंतर घाट उतरायला लागले कि समोर दिसू लागतो तो अथांग पसरलेला कोयना बॅकवॉटर चा पसारा. सध्या नुकताच उन्हाळा संपून गेल्याने पाणीसाठा तसा खूपच कमी आहे. त्यामुळे वर निळ्या आभाळाशी हातमिळवणी करणारे हिरवेगार  जंगल, मध्ये कोरडी पडलेली तांबडी जमीन आणि खोलगट भागात असलेला पाणीसाठा, आणि त्यातून चालणारी होड्या, स्कुटर बोट, मोटर बोटीची वाहतूक. सुंदर लँडस्केप.

आम्ही या कोयना बॅकवॉटरच्या कडेकडेने जात बामणोली कडे न वळता सरळ तेटलीला गेलो. साताऱ्यापासून हे अंतर ५० किमी. इथे 'जलतारा' नावाचे छान हॉटेल आहे. अगदी तारांकित नाही पण एवढ्या दूर जंगलात कदमांनी सुरु केलेले हे हॉटेल साताऱ्यातील अनेकांच्या ओळखीचे आहे. मी पहिल्यांदा गेलो त्याला १६-१७ वर्ष झाली असतील. आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा बऱ्यापैकी गर्दी होती. पण माझ्या इच्छेनुसार कदमांनी बाजूच्या बागेत आमच्यासाठी टेबल ची व्यवस्था करून दिली. तिथून समोर जवळच 'तापोळा' दिसते. महाबळेश्वरला येणारे पर्यटक या तापोळ्याला स्पीड बोटींचा थरार अनुभवण्यासाठी येतात. हाकेच्या अंतरावर तापोळा दिसत असले तरी इथे रस्त्याने जायचे म्हटले तर चांगला ८-१० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. मी पूर्वी एकदा असे जाऊन पुढे महाबळेश्वर गाठले होते. 'जलतारा' मध्ये निवांत गप्पा मारत दोन अडीच तास घालवल्यानंतर आम्ही परत निघालो. आकाश अजूनच झाकोळून गेले होते. आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्या, त्यांच्या पलीकडचे डोंगर आणि त्यावर पहुडलेले ढग साद घालत होते. शेवटी एकेठिकाणी रस्त्या कडेला गाडी लावून जरा चालूया म्हणत आम्ही एका टेकडीवर चढलो. तिथून अजूनच मस्त चित्र दिसत होते. दूरवर दिसणारी तुरळक घरे, पायथ्याशी असलेले छोटे ५-५० घरांचे गाव खूपच मस्त. बामणोली, तेटली कडील घरे बघतली कि कोकणाची आठवण येते. फक्त खास कोकणातला खरा वास, आणि नारळ सुपारीच्या बागा इथे नसतात. घरे आणि थोडीबहुत माणसेही तशीच. एक करवंदांनी लगडलेले झाड दिसले. आम्ही दरवर्षी एकदा तरी करवंदे खाण्यासाठी कासच्या जंगलात जातो, पण यावर्षी काही कारणाने राहून गेले होते, ती हौस अशी पूर्ण झाली. मनसोक्त करवंद खाऊन आम्ही खाली उतरलो...............

बामणोली सोडता सोडता पावसाने चांगलाच जोर पकडला होता. घाट चढताने पाऊस आणि धुक्यात रस्ता हरवून जात होता. आम्ही अगदीच त्या पावसात भिजत फिरलो नसलो तरी, काचा बंद करून, ए.सी. लावून गाडी चालवण्याचा करंटेपणा न करता उघड्या खिडकीतून येणारा पाऊस झेलत प्रवास करत होतो. कासजवळ तर गाड्यांची गर्दीच गर्दी होती. अनेक जण त्या पावसात चिंब भिजत आनंद घेत होते. घाटातही अनेक ठिकाणी अशा गाड्या उभ्या करून बरेच बालगोपाल आणि तरुण तरुणीही आनंदाने नाचत एन्जॉय करत होते. त्यामानाने काल तळीरामांची संख्या कमी होती. फॅमिलीसह गेलात तरी हा परिसर तसा एकदम सेफ. हो कधी कधी तुरळक घटना घडतातही. पण त्या बहुतांशी 'रस्ता सोडून, जरा बाजूला जात आडोसा शोधणाऱ्या' कपल्स च्या बाबतीत. इतका छान निसर्ग, पाऊस, धुके एन्जॉय करायला सर्वानांच आवडते, तसे तरुणाईला आवडते आणि एन्जॉय करण्यात काही हरकतही नाही. बास, तेवढा आडोसा शोधून आपल्या आईबापांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा देण्याचं महान कार्य टाळलं तर मग काय मज्जाच मज्जा. (पण.....प्रत्येकाच्या मजेच्या कल्पना वेगळ्या असू शकतात बरं)

अशा मस्त वातावरणात निवांत अकरा ते सहा असा वेळ घालवत आम्ही साताऱ्यात पोहोचलो तेंव्हा शहरातही चांगला पाऊस पडत होता. आजचा हा एक दिवस अतिशय मस्त गेला. असे आतापर्यंत अगणित वेळा आम्ही या निसर्गाच्या सानिध्यात फिरून आलोय, आणि पुढेही जात राहूच. तुम्ही कधी जाताय? ...........

अनिल दातीर