Get it on Google Play
Download on the App Store

भाग-४-माझी भटकंती....... वासोटा ट्रेक

बिल्डर्स असो.ऑफ इंडिया सातारा सेंटर तर्फे दरवर्षी सभासदांसाठी काही तरी स्पोर्टस इव्हेन्ट केला जातो. यावर्षी ट्रेकिंग ची कल्पना कुणीतरी सुचवली आणि अनेकांच्या मनात असलेली वासोट्याला भेट देण्याची सुप्त इच्छा जागृत झाली. फार सुंदर पद्धतीने केलेल्या नियोजनाने हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. रविवारी दुपारीच २५ जणांनी बामणोली कडे प्रयाण केले. बामणोलीपासून पुढे २ किमी. वर शिवसागर जलाशयाच्या म्हणजेच कोयना बॅक वॉटर च्या काठावर आमचा मुक्काम होता. तिथे पांडुरंग नावाच्या व्यक्तीने आमची सगळी व्यवस्था केली होती. आमचे मेम्बर प्रकाश, संतोष, सयाजी, किरण यांनी हे सगळे नियोजन फार मस्त केले होते. गेल्याबरोबर नास्ता, बिन दुधाचा कोरा चहा खूप छान लागला. रात्री चुलीवरची मटण भाकरी, आमळी (संपूर्ण खायचा छोटा मासा) साधाच पण मस्त तांदळाचा भात आणि जेवणानंतर शेकोटी ची उब, अवर्णनीय अनुभव. रहायला सहा टेन्ट होते. भरारणाऱ्या वाऱ्याने टेन्ट उडून जातो कि काय असे वाटावे एवढा वारा होता. सकाळी त्याच जलाशयात पोहण्याचा आनंद काही औरच होता. सगळे आवरून, नास्ता करून वासोट्या कडे बोटीने निघालो................

वासोटा किल्ला........... इथे जायचे म्हणजे सातारा ते बामणोली ४० किमी. गाडीने आणि तिथून १.३० तासाचा बोटीचा प्रवास. हा किल्ला १२ व्या शतकात कोल्हापूरच्या शिलाहार राजा नंदगोपाल उर्फ राजा भोज याने बांधला असा इतिहासात उल्लेख आहे. कोयनेचा अथांग जलाशय, आजूबाजूचे घनदाट अरण्य, अवघड डोंगर कडे यामुळे या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे. गंगू तेलीण नावाची एक स्त्री तिथे राहत होती आणि तिने तीन महिने एका आक्रमणाला थोपवत या किल्लयाचे रक्षण केले होते असा उल्लेख कोठे कोठे आहे. शिर्के घराणे, नंतर मोरे घराणे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे सरदार मोरेंचा पाडाव करत शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि याला `व्याघ्रगड' असे नाव ठेवत तुरुंग म्हणून या किल्ल्याचा वापर केला. पण तिथे राज्याचा खजिनाही असावा. कारण संभाजी राजांच्या नंतर पेशव्याच्या ताब्यात हा किल्ला असताने इंग्रजानी इतक्या अवघड किल्ल्यावर तोफा नेऊन या किल्ल्यातील चंद्रिका महाल, दारुकोठार आणि इतर इमारती उध्वस्त करून त्याकाळी ५ लाखाची लूट केली असा इतिहासात उल्लेख आहे ...................

पण हा वासोटा किल्ला म्हणून प्रसिद्ध असण्यापेक्षा एक अवघड ट्रेक म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पूर्व बाजूचा पायथा म्हणजे सातारा जिल्हा आणि पश्चिम बाजू म्हणजे कोकणातले खेड. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो ट्रेकर्स इथे भेट द्यायला येतात. इथे येणे म्हणजे पिकनिक नव्हे. इथली खडी चढण भल्याभल्यांना घाम गाळायला लावते. इथे येण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते. हि परमिशन असेल तरच बोटीचे बुकिंग मिळते. इथे कुठल्याही प्रकारचा अमली पदार्थ, दारू, सिगारेट, नेण्यास परवानगी नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट चेकिंग करून असे काही असल्यास बाहेर टाकून द्यायला लावते. तसेच बरोबर प्लॅस्टिकची बाटली किंवा डबे असतील तर त्याची नोंद करून येताने परत घेऊन आलेले दाखवावे लागते. बरोबर आहेच, पर्यावरणाचे चे संरक्षण केले नाही तर हि सुंदर जंगले कचरा कुंड्या व्हायला वेळ लागणार नाही. हा सर्व परिसर कोयना अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प म्हणून अति संवेदनशील म्हणून राखीव आहे. हे जंगल वाघ, अस्वल, गवे आणि इतर अनेक प्राण्यांनी समृद्ध आहे. इथे ट्रेकिंग करताने काळजी घेणे आवश्यक आहे, काही ठिकाणी अतिशय उभी चढण आणि मोठं मोठ्या दगडांमधून वाट काढावी लागते. घसरून पडले तर हात पाय मोडू शकतो आणि आपल्याबरोबरच इतरांचाही खोळंबा होऊ शकतो........................

आमच्या ३२ जणांच्या ग्रुप ने मात्र हि लढाई यशस्वी रित्या पार पाडली. विशेष म्हणजे आमच्यातील काहींच्या घरातील महिलांचाही ७ जणींचा ग्रुप आम्हाला सकाळी बामणोलीत जॉईन झाला होता. त्यांनीही अवघड मोहीम यशस्वी फत्ते केली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एकंदरीत रविवार आणि सोमवार निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्यादीच्या डोंगर कपारींच्या सोबतीत फार मस्त गेले. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट देऊन हा अनुभ घ्यायलाच हवा. येण्यासाठी चांगली वेळ म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबर. पावसाळ्याच्या अगोदरपर्येंतही जाऊ शकता पण जस जसे कोयनेतील पाणी कमी होऊ लागते तसतसा बोटीचा प्रवास कमी होऊन चालत जाणे वाढते. ....................

अनिल दातीर