दॅट्स ऑल युवर ऑनर( प्रकरण पंधरा)
दॅट्स ऑल युअरऑनर (प्रकरण पंधरा.)
विश्रांती नंतर पुन्हा कोर्ट सुरु झाले .भाटवडेकरांनी स्थानापन्न झाल्यावर त्यांनी
प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“ तुमचे सर्व विषय मांडून झालेत का? म्हणजे तुमच्या बाजूने तुम्ही संपवलय का ? ” न्या.भाटवडेकर यांनी सरकारी वकीलांना विचारले. ते खटला लौकर निकाली काढण्यास आतुर झाले होते.
“ नाही युअर ऑनर,, आमचे कडून नाही संपलाय विषय.” खांडेकर उठून
उभे रहात म्हणाले.
“ एक असा विषय पुढे आलाय की ज्याची काळजी वाटायला लागली आहे.
सरकारी वकील म्हणूनच नाही तर वकिली पेशा मध्ये काम करणारा माणूस
म्हणून सुद्धा. असं काही घडलाय की त्याची खूप सखोल चौकशी करणे गरजेचे
होऊन बसलंय.एका ठिकाणी खोटा पुरावा तयार केल्याचा गुन्हा घडलाय. मला
याच खटल्यात नोंद करून घ्यायचं आहे कारण वरच्या कोर्टात हा खटला जाईल
तेव्हा साक्षीदार उपलब्ध होवू नये म्हणून त्याला गायब केले जाऊ शकते किंवा
परदेशात पाठवले जाऊ शकते. तसे झाले तर वरच्या कोर्टात त्याची साक्ष
वाचता आली पाहिजे ”
“ हे फार विचित्र आणि वेगळेच बोलताय तुम्ही.” न्या.भाटवडेकर म्हणाले
“ घडलच आहे तसं.”
“ ठीक आहे ,चालू करा तुमचे काम.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ मीइन्स्पे.तारकरला साक्षीसाठी बोलाऊ इच्छितो.” दैविक दयाळ म्हणाला.
इन्स्पे.तारकर आत्मविश्वासाने पिंजऱ्यात आला. त्याचा देह बोलीवरून त्याने
साक्ष देण्यासाठी आणि पटवर्धन च्या उलट तपासणी साठी चांगलीच तयारी
केली असावी असे जाणवत होते.
“ तू आधीच शप्पथ घेतली आहेस तेव्हा पुन्हा घेण्याची गरज नाही.” दैविक
दयाळ म्हणाला, “ काल संध्याकाळी तुला देवनार येथील मैथिली आहुजा राहत
असलेल्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचा योग आला.? ”
“ हो सर्.”
“ त्यापूर्वी पुरावा म्हणून कोर्टात सादर झालेला ड्रेस, जो एका विशिष्ठ ठिकाणी
फाटला होता, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलास का? ”
“ काय केलेस तू?”
“ मी दोन गोष्टी केल्या, एक म्हणजे, तो पोषाख ज्या दुकानातून खरेदी केला
होता त्याचा शोध घेतला. तो देवनार मधूनच खरीदला होता. दुसरे म्हणजे त्या
पोशाखा वर जी धोब्याची खूण होती त्याचा शोध घेतला.त्यावरून तो मैथिली
आहुजाचा होता हे सिद्ध झालं.”
“ मला अजून एक सांगावेसे वाटते की आम्ही आरोपीला जेव्हा अटक केली तेव्हा
ती मैथिली च्या च घरी राहत असलेली आढळून आली.तिचे म्हणणे होते की ती
तिला भेटायला आली होती तिथे म्हणून पण खरे तर ती तिथेच रहात होती.”
इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ काल सायंकाळी तू मैथिली च्या अपार्टमेंट मधील गॅरेज मध्ये गेलास तेव्हा
तुझ्या सोबत कोण होतं? की तू एकटाच होतास? ” दैविक दयाळ ने विचारले.
“ माझ्या सोबत जयराज आर्य म्हणजे जो आरोपीचा साहेब होता,तो होता.
“ म्हणजे जो या पूर्वी साक्ष देऊन गेलं तो?”
“ हो तोच.”
“ तू काय केलेस तिथे?” दैविक दयाळ ने इन्स्पे.तारकरला विचारले.
“ जयराज आर्य ने माझ्या निदर्शनाला आणून ......”इन्स्पे.तारकरबोलत असताना
त्याचे म्हणणे मधेच तोडत दैविक दयाळ म्हणाला, “ आरोपी च्या गैर हजेरीत
तुम्हाला त्याने काहीही सांगितले तरी ते तिच्यावर बंधन कारक नाही.तुम्ही काय
केलेत तेवढेच सांगा.”
“ जयराज आर्य आणि मी दोघेही मैथिली च्या गॅरेज मध्ये गेलो.दार लावलेले होते
पण बाहेरून कुलूप नव्हते. आम्ही आत गेलो.आत मध्ये आरोपीचा वकील
पाणिनी पटवर्धन आणि त्याची सेक्रेटरी सौम्या दोघे होते. ते त्यांच्या गाडीच्या
बाहेर होते.”
“ तू विचारलेस त्यांना की ते दोघे तिथे काय करत होते? ” दैविक दयाळ ने
विचारले.
“ जयराज आर्य ने त्यांच्यावर ते तिथे खोटा पुरावा पेरत असल्याचा आरोप
केला. ”
“ त्यावर पटवर्धन काय म्हणाला? ” दैविक दयाळ ने विचारणा केली.
“ आमची जोरदार हरकत आहे या प्रश्नाला.” पाणिनी पटवर्धन कडाडला. “ ही
ऐकीव माहिती आहे.आरोपी तिथे हजर नसताना केलेले विधान आहे.त्याला
काहीही किंमत नाही, संदर्भ नाही ”
“ न्यायमूर्ती महाराज, माझे म्हणणे ऐकले जावे,” दैविक दयाळ म्हणाला.
“ पटवर्धन हे आरोपीचे वकील आहेत जो आरोप केला गेला जयराज आर्य कडून ,तो
पटवर्धन च्या समोरच , त्यांच्या उपस्थितीतच केला गेला आहे आणि तो आरोप
खुद्द पटवर्धन यांच्यावर केला गेला आहे. त्यामुळे पटवर्धन यांनी घेतलेली हरकत
अमान्य करावी.”
न्या.भाटवडेकर यांच्या चेहेऱ्यावर आठ्या पसरल्या. “ अगदी असे जरी समजले की पटवर्धन हे अविचाराने वागले किंवा शहाण्यासारखे नसतील वागले,तरी आरोपीच्या गैर हजेरीत जयराज आर्य यांनी केलेले विधान आरोपीवर कसे काय बंधन कारक असू शकेल? पटवर्धन यांची हरकत मी मान्य करतो. ”
“ ठीक आहे.” नाराजीने दैविक दयाळ म्हणाला. “इन्स्पे.तारकर , तुम्ही नंतर काय केले? ”
“ सर्वात प्रथम आम्ही पटवर्धन आणि सौम्या सोहोनी दोघांना तिथून निघून जायला भाग पाडले. ते गेल्यावर आम्ही आत मध्ये तपासायला सुरवात केली.”
“ काय तपासायला सुरुवात केली? ”
“ काही पुरावा तिथे कोणी सोडला आहे का हेतू पुरस्सर ”
“ काय सापडलं तुला ? ”
“ चिखल लागलेले बूट आणि खालच्या बाजूला शिवणीच्या ठिकाणी फाटलेली एक पॅण्ट ”
“ या वस्तू कोणाच्या आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला का तू? ”
“ ते फार महागडे बूट होते. सुदैवाने तेवढे महाग बूट विकणारे या शहरात दोनच दुकानदार आहेत त्यांच्याकडे चौकशी केली , आणि ते खरेदी करणाऱ्याचे नाव मिळवले.”
“ एक मिनिट ”इन्स्पे.तारकरने उत्तर देण्यापूर्वी पाणिनी पटवर्धन मधेच बोलला. “ ही ऐकीव माहिती आहे. एखादा दुकानदार काय सांगतो यावर ती अवलंबून आहे.”
“ बरोबर आहे पटवर्धन यांचे म्हणणे.” न्यायाधीश न्या.भाटवडेकर म्हणाले. “ आपण या मध्ये काही गोष्टी मान्य करू शकतो का मिस्टर पटवर्धन? ”
“ मी मान्यता द्यायला तयार आहे ,कोर्टाचा वेळ वाचवण्यासाठी पण या अटीवर की विविध लोकांनी इन्स्पे.तारकरला खरोखर तसे सांगितले आहे आणि त्यांची गरज पडेल तेव्हा उलट तपासणीचे मला अधिकार आहेत. ”
“ पटवर्धन, तुम्ही हे मान्य करणार का , की एका दुकान दाराने सांगितलंय की तपन त्याचेकडे नियमित ग्राहक म्हणून येत असे आणि याच प्रकारचे बूट घेत असे. हे बूट बरोब्बर तपन च्याच मापाचे आहेत आणि ते तपन ने खरीदले आणि घातले.? ”
“ ही वस्तुस्थिती आहे? ” पाणिनी ने विचारले.
“ हो वस्तुस्थिती आहे ” दैविक दयाळ उत्तरला.
“ तर मग मी मान्य करतो , उलट तपासणीचे अधिकार वापरण्याच्या अटीवर.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही आणखी एक गोष्ट मान्य कराल का , की तपन चा शिंपी अशी साक्ष देणार आहे की तपन ने घातलेली पॅण्ट ही त्याने तपन साठी शिवलेल्या सुटा मधील होती.कमरेला लावलेल्या रिबीन वरून तो कपडा त्याच शिंप्याने शिवल्याचे लक्षात येते. ”
“ ही वस्तुस्थिती आहे? ” पाणिनी ने विचारले.
“ हो वस्तुस्थिती आहे ” दैविक दयाळ उत्तरला.
“ तर मग मी मान्य करतो , की उलट तपासणीचे अधिकार वापरण्याच्या अटीवर.” पाणिनी म्हणाला.
“ सहकार्याबद्दल आभार पटवर्धन .” दैविक दयाळ पाणिनीला म्हणाला ,आणि इन्स्पे.तारकरकडे वळला .पुढचे प्रश्न विचारायला त्याने सुरुवात केली.
“ या वस्तू म्हणजे तपन चे बूट आणि पॅण्ट कुठे मिळाल्या तुम्हाला? ”
ज्या गॅरेज मध्ये पटवर्धन आणि सौम्या सोहोनी आले होते तेथील एका कुलूप लावलेल्या ट्र्ंकेत ठेवल्या होत्या.”
“ तुम्ही विचारू शकता ” दैविक दयाळ पाणिनी ला म्हणाला
पाणिनी उठून उभा राहिला ही उलट तपासणी महत्वाची होती.सर तपासणीत इन्स्पे.तारकरने पाणिनी वर आरोप केला नव्हता फक्त जयराज आर्य ने तसा आरोप केला आहे असे नमूद केले होते.
“इन्स्पे.तारकर, सर तपासणी मध्ये दैविक दयाळ यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तू सांगितलेस की त्या गॅरेज मध्ये कोणीतरी काहीतरी पुरावा पेरला असेल तर त्याचा शोध तू घेणार होतास. माझ्या असं लक्षात आलं की कोणीतरी हा शब्द उच्चारण्यापूर्वी तू जाणून बुजून थोडावेळ थांबलास आणि मग तो शब्द उच्चारलास.” पाणिनी ने विचारले.
“ बरोबर असू शकेल.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ कोणीतरी म्हणजे नक्की कोणी हे तुला माहित असावे असे मी समजतो.”
“ हो .”
“ त्या ठिकाणी मी खोटा पुरावा निर्माण केलेला असू शकतो? ”
“ असू शकतो.”
“ आरोपीने ही तसे केलेले असू शकते?”
“ ती तेव्हा तुरुंगात...... , नाही नाही तिने केले असू शकते ”
“ मैथिली आहुजाने सुद्धा तसे केलेले असू शकते?”
“ मला वाटते तिने देखील केलेले असू शकते.” थोडा वेळ विचार करून इन्स्पे.तारकरम्हणाला.
पाणिनी च्या चेहेऱ्या वर स्मित रेषा उमटली . “ दॅटस् ऑल युअर ऑनर. माझे प्रश्न संपले.”
“ आम्ही मैथिली आहुजाला शोधून काढायचा निकराचा प्रयत्न करतोय.पण त्यात यश येत नाहीये. दरम्यानचे काळात इन्स्पे.तारकरने पुरावा म्हणून सदर केलेल्या तिच्या ड्रेस च्या संदर्भात साक्ष देण्यासाठी मी बीना रुईया ला बोलवत आहे.”
ती समोर आल्यावर पाणिनी च्या लक्षात आले की मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये स्वागतिका म्हणून काम करणारी ती मुलगी होती. मैथिली आहुजा मोठाल्या सुट केसेस घेऊन बाहेर गेल्याचे तिनेच पाणिनी पटवर्धन ला सांगितले होते.
“ तुझा व्यवसाय किंवा नोकरी या बद्दल माहिती दे आणि तू मैथिली आहुजाला ओळखतेस का ते सांग.” दैविक दयाळ ने सुरुवात केली.
“मैथिली आहुजा रहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मी व्यवस्थापक आहे. मी तिला ओळखते.”
“ तू पाणिनी पटवर्धन यांना ओळखतेस का?”
“ हो, मी त्यांना भेटल्ये.”
“ कधी भेटलीस तू त्यांना? ”
“ काल दुपारी.”
“ तुमचे दोघांचे संभाषण झाले मैथिली आहुजाच्या घर बद्दल ? ”
“ हो झाले.”
“ त्या संभाषणात पटवर्धन तुला असे म्हणाले का ,की तुझ्या जवळची किल्ली वापरून तू त्यांना तिच्या घरात जायला परवानगी दे ”
“ आमची जोरदार हरकत आहे या प्रश्नाला.” पाणिनी पटवर्धन कडाडला. “ हा प्रश्न महत्वाचा नाही, संदर्भ हीन आहे, साक्षीदाराला सूचक असा अर्थ सुचवणारा आहे.आरोपीच्या गैर हजेरीत जे काही संवाद झाले असतील ते आरोपीवर बंधन कारक नसतात हे माहीत असूनही सरकारी वकिलांनी मुद्दाम हा प्रश्न विचारला आहे ,जेणे करून न्यायाधीशांच्या मनात आरोपी विषयी गैरसमज निर्माण होईल.”
“ पटवर्धन यांची हरकत योग्य आहे. मान्य केली जात आहे.मिस्टर दयाळ तुम्हाला आधीच्या एका प्रश्नाच्या वेळीच सांगितलं होत की आरोपीच्या गैर हजेरीत जे काही संवाद झाले असतील ते आरोपीवर बंधन कारक नसतात त्यामुळे मी अशा प्रश्नांना मान्यता देणार नाही. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ पण पटवर्धन हे आरोपीचे वकील आहेत.तिच्याच वतीने ते काम बघत आहेत.म्हणजे त्यांची उपस्थिती ही आरोपीची उपस्थिती असल्या सारखीच आहे.” दैविक दयाळ म्हणाला.
“ मी माझा आदेश दिलाय. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
अॅड.खांडेकर उठून उभे राहिले. ते एकदम जाड जुड आणि भरदार शरीर यष्टीचे होते. दमदार आवाजात ते म्हणाले, “ कोर्ट माझं म्हणणे ऐकून घेईल का? ”
“ बोला.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ हे गंभीर प्रकरण आहे आणि अचानक उद्भवले आहे त्यामुळे आम्हाला या बाबतीत न्यायालयाने दिलेले निवाडे वानगी दाखल देण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु माझी खात्री आहे की पटवर्धन आणि आरोपीचे परस्पर संबंध हे एजन्सी म्हणजे प्रतिनिधी या व्याख्येत बसणारे आहेत त्यामुळे प्रतिनिधीने केलेली कृत्ये ही ज्याने प्रतिनिधी नेमला त्याच्यावर म्हणजे आरोपीवर बंधनकारक असतात. हवे तर आम्ही आरोपीला सक्ती करून पटवर्धन च्या कृतीला एकतर समर्थन द्यायला लावू किंवा नाकारायला लावू.”
“ मिस्टर .खांडेकर , कोर्टाने आधीच निर्णय दिलाय. मोठ्या कोर्टाने अशाच प्रसंगात जर मी दिलेल्या निर्णयाच्या पेक्षा वेगळा निर्णय दिला असेल तर तो मला लेखी स्वरूपात दाखवा, अन्यथा मी याच आधारावर निर्णय दिला आहे की आरोपीच्या गैर हजेरीत जे काही संवाद झाले असतील ते आरोपीवर बंधन कारक नसतात.मग पटवर्धन तिचे वकील आहेत का किंवा एजंट आहेत का हे मी ऐकायला तयार नाही जो पर्यंत तुम्ही वरिष्ठ कोर्टाचा लेखी निवडा मला दाखवत नाही.” न्या.भाटवडेकर यांनी अॅड.खांडेकर ना सुनावले.
“न्यायमूर्ती महाराज, ही अगदी साधी गोष्ट आहे, या प्रकारणामधील सर्वात मोठा पुरावा म्हणजे बूट आणि पॅण्ट हा त्या गॅरेज मध्ये ठेवला गेला आहे आणि पटवर्धन त्या ठिकाणी रंगे हाथ पकडला गेलाय. आता हे स्वाभाविक पणे गृहीत धरता येते की पाााणिनीला जरी तिथे पुरावा ठेवत असताना कोणी बघितले नसले तरी ” अॅड.खांडेकर यांनी युक्तिवादाचा प्रयत्न केला.
“ सरकारी पक्षाच्या दृष्टीने तुम्ही विचार करताय” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ तुम्ही एक महत्वाची शक्यता गृहित धरलेली नाही.सर्वात जास्त संधी त्या व्यक्तीला होती, जिचे ते गॅरेज आहे.ती म्हणजे मैथिली आहुजा.”
“ पण तिला त्या वस्तू कुठे मिळाल्या होत्या? खुनाच्या रात्री ती त्या आऊट हाऊस वर गेलीच नव्हती. ” अॅड.खांडेकर म्हणाले.
“ तुम्हाला काय माहिती ,की ती तिकडे गेली होती की नव्हती?” पाणिनी ने विचारले.
“ मला माझ्या कामात कोणाची लुडबूड नकोय.” पाणिनी कडे बघत अॅड.खांडेकर म्हणाले.
“ तुम्हाला ज्या प्रश्नामुळे लुडबूड झाली असे वाटतंय, तोच प्रश्न कोर्टाच्या मनात निर्माण झालाय.” न्यायाधीश न्या.भाटवडेकर उत्तरले. “ खुलासा करा की मिस आहुजा त्या रात्री तिकडे गेली नव्हती कशा वरून?”
“ आम्ही ते सिध्द करू.” अॅड.खांडेकर चिडून म्हणाले.
‘ करा सिध्द.” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ तुमचा सगळा पुरावा सादर करून झाल्या नंतर जर तुम्हाला आणखी काही परिस्थितीजन्य पुरावा मिळाला की ज्यामुळे असे सिध्द होणार आहे की त्या वस्तू त्या गॅरेज मधे आरोपीने किंवा तिच्या सांगण्यावरून कोणीतरी ठेवल्या आहेत, तर तुम्हाला त्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून बोलावण्याची मी परवानगी देईन. दरम्यान आधी उल्लेख केल्या प्रमाणे तुमच्याकडे वरिष्ठ कोर्टाचे काही निवाडे सापडले तर द्या.सध्या तुम्ही फक्त तुमचा अंदाजच व्यक्त करताय की त्या वस्तू पटवर्धन ने ठेवल्या असाव्यात म्हणून.”
अॅड.खांडेकर नाईलाजाने खाली बसले.दैविक दयाळ आहुजाच्या अपार्टमेंट मधील व्यवस्थापक मुली कडे पुन्हा वळला आणि म्हणाला “ तू या महिन्याच्या पाच व सहा तारखेला. तिथे व्यवस्थापक म्हणून होतीस का?”
“ हो.”
“ मैथिली ला तू ओळखत होतीस? तिला सह तारखेला तू पाहिलं होतंस? ” दैविक दयाळ ने विचारले.
‘ पाहिले होते.”
“ किती वाजता पाहिलं होतंस?”
“ अनेकदा पाहिलं. दिवस भरात.”
“ मला विचारायचयं होतं संध्याकाळी भेटली होती का , तिच्याही काही संवाद झाला का?” दैविक दयाळ ने विचारले.
“ हो ”
“ सहा तारखेला आरोपीला पाहिलेस का?”
“ हो, पाहिलं.”
“ काय घडलं तेव्हा? ”
“ त्या दिवाही दुपारी मैथिली ने आरोपी, आकृती ला तिच्या बरोबर आणले.ती लिफ्ट च्या दिशेनेच चालली होती तेव्हा माझ्य शी ही तिने ओळख करून दिली.आणि म्हणाली आकृती काही दिवस तिच्या कडे राहणार आहे.येत जात राहील. ”
“ आणि हा संवाद आरोपीच्या समोरच झाला? ”
“ हो,”
“ मी तुला एक ड्रेस दाखवतो जो पुरावा म्हणून ब -८ म्हणून सादर झाला आहे.तुझ्या ओळखीचा आहे का तो ड्रेस?”
“ हो ”
“ कुठे पहिला तुम्ही तो या पूर्वी? ”
“ सहा तारखेला आकृती च्या अंगावर ”
“ त्या नंतर सहा तारखेला च पुन्हा कधी पहिलात ? ”
“ सहा तारखेला संध्याकाळी मैथिली आहुजाने तो घातला होता.”
“पुरावा म्हणून ब -८ म्हणून सादर झाला आहे त्याच ड्रेस बद्दल तू बोलते आहे ना? जो अत्ता माझ्या हातात आहे? ” दैविक दयाळ ने खात्री करून घेण्यासाठी विचारले.
“ हो सर.”
“ आणि ती कुठे होती जेव्हा तू तिला या ड्रेस मधे पाहिलंस ? ”
“ ती बाहेर जायला निघाली होती.”
“ जेव्हा ती परत आली तेव्हा पुन्हा तिला पाहिलंस का? ”
“ हो सर ”
“ कधी आली ती पुन्हा ? ”
“ साधारण तीन तासांनी.”
“ तेव्हा तिने काय घातले होते अंगावर? ”
“ तिने वेगळाच पोषाख घातला होता. माझ्या मनात आलचं की तिला विचारावे पण मी टाळले.”
“ हे सगळे सहा तारखेला घडले , बरोबर? ” दैविक दयाळ ने खुंटा हलवून बळकट करण्यासाठी विचारले.
“ हो.” बीना रुईया म्हणाली.
“ पटवर्धन , विचारा तुमचे प्रश्न.” दैविक दयाळ म्हणाला आणि पाणिनी उठून उभा राहिला.
( प्रकरण पंधरा समाप्त)