Get it on Google Play
Download on the App Store

दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण सात

  
दॅट्स ऑल युअर ऑनर
 प्रकरण सात.
 
पाणिनी पटवर्धन ठीक दहा वाजून पस्तीस मिनिटांनी त्याची गाडी चालू करून पार्किंग लॉट च्या बाहेर पडण्याच्या दारात तयार होता.ती येई पर्यंत वेळ काढायचा  म्हणून गाडी चालू करण्यात काहीतरी अडचण आल्याचा बहाणा त्याने केला. दहा चाळीस होऊन पंचवीस सेकंद झाली आणि मैथिली ची गाडी रोरावत आत आली. ती अक्षरशः उडी मारूनच पाणिनीच्या गाडीत बसली. “ एवढे केले तरी जरा उशीर झालाच.” ती दिलगिरी व्यक्त करीत म्हणाली.
“ काही हरकत नाही, तू बऱ्यापैकी जमवलस.”
“ वेळेबाबत इतका आग्रह का होता ” तिने उत्सुकतेने विचारले.
“ मला माझी बाहेर जायची वेळ सहज आणि स्वाभाविक वाटेल आणि ती पार्किग मधल्या रजिस्टर वर नोंदवली जाईल याची काळजी घ्यायची होती.तसेच आपला पाठलाग होणार नाही याची पण दक्षता घ्यायची होती.”
“ पाठलाग का होऊ शकतो आपला?”
“ आजचा पेपर वाचला नाहीस का तू ? ” पाणिनीने विचारले.
तिने काहीतरी उत्तर दिले पण पाणिनीचे लक्ष नव्हते.तो गाडी चालवण्याकडेच लक्ष देत होता. पहिल्या चौकात तो उजवी कडे वळला. त्या नंतर च्या सिग्नल ला डावी कडे वळला. हिरव्या दिव्याचा पिवळा होण्यापूर्वीच पुढच्या सिग्नल ला  त्याने  गाडी पुढे दामटली. ती एकाग्र होऊन त्याचे गाडी चालवणे पाहत होती.
“ तुम्हाला पाठलाग चुकवायचा असेल तर तुम्ही इंग्रजी आठ च्या आकड्या नुसार वळणे का घेत नाही? म्हणजे मी कुठेसं वाचलं होतं.”
पाणिनीला हसायला आले. “ तू म्हणत्येस ते काही बाबतीत खरे आहे.पण मला इथे त्यांना गुंगारा द्यायचाच नाहीये.उलट मला संशय आलेला नाही असे त्यांना भासवायचे आहे.”
त्याने पुढे एका रुंद रस्याच्या कडेला  गाडी लावली. “ आपण चालत चालत जाऊ पुढच्या चौकात. आकृती कशी आहे? ”
“ आज सकाळी बरी आहे.तिला मी काल रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या.तिला सांगितलं मी ,की तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा.”
अचानक पाणिनीने विचारले, “ तुला संगीत ऐकण्यात रस आहे? ”
“ मला स्टिरिओ म्युझिक ऐकण्यात प्रचंड रस आहे, मी वेडीच होते.”
 
“ चल तर मग आत जाऊन बघू ” शेजारच्या एका मॉल कडे निर्देश करत पाणिनी म्हणाला. “ या इमारतीत अत्यंत आधुनिक अशा वाय फाय सिस्टिम्स आणि जुन्या रेकॉर्ड्स मिळतात.” पाणिनी म्हणाला.
ते दोघे आत गेले. एका मोठ्या काउंटर जवळ च्या एका विक्रेत्या जवळ आले.
“ मला संपूर्ण हाय फाय स्टिरीओ सिस्टीम  बद्दल बोलायचं आहे.तुम्ही इथले प्रमुख आहात का? ” पाणिनीने विचारले.
“ प्रमुख विक्रेता आहे.”
“ इथे हिर्लेकर म्हणून कोणीतरी आहे ना? ” पाणिनीने माहित नसल्याचा अविर्भाव करत विचारले.
“ ते मालक आहेत.”
“ ते आत केबिन मध्ये आहेत ते?”
“ हो तेच .”
“ मला या स्टिरिओ सिस्टीम बद्दल त्यांच्याशी बोलायचं आहे. तुमची काही हरकत नाही ना?”
“ अजिबात नाही.हिर्लेकर ना मी इकडे बाहेर बोलावून आणतो.”
“  त्यापेक्षा आपणच आत जाऊन बोलू त्यांच्याशी. तुम्हाला इथे जे काही कमिशन मिळत असेल ते तुम्हाला मिळावे अशीच माझी इच्छा आहे त्यामुळे मी परस्पर मालकांना जाऊन भेटत नाही.तुम्हीच आत जाऊन सांगा की एक ग्राहक आला आहे आणि तो तुमच्या मार्फत आहे. हिर्लेकर ना विचार की त्यांना तेजस बालगुडे माहिती आहे का ? त्याने तुमच्याच कडून मला हव्ये तशी सिस्टीम विकत घेतली आहे काही दिवसापूर्वी.” पाणिनी म्हणाला.
तो विक्रेता केबिन मध्ये जाऊन हिर्लेकर शी काहीतरी बोलायला लागला.पाणिनी पटवर्धन त्याच्या पाठोपाठ केबिन च्या दाराबाहेर उभा राहिला.विक्रेत्याचे बोलणे ऐकल्या नंतर हिर्लेकर ने पाणिनीकडे पहिले.त्याच्या कपाळावर आठ्या दिसत होत्या.तो दारात आला “बालगुडे चे नाव मला आठवत नाही.काही अडचण आहे का त्यांना? पण आम्ही एक खात्री देतो तुम्हाला की आमच्या दर्जा बद्दल आणि सेवे बद्दल ...”
मागून एक रुक्ष आवाज आला आणि त्यामुळे हिर्लेकर चे बोलणे अर्धवट राहिले.
“ मिस्टर हिर्लेकर, इथून पुढे तुम्ही या माणसाशी बोलू नका.आम्ही बघतो काय ते.”
पाणिनीने आवाजाच्या दिशेने पहिले. “ अरे तारकर तू? तू काय करतो आहेस इथे? म्युझिक सिस्टीम वगैरे घ्यायची आहे की काय? ”
“ मी इथे जवळ आलोच होतो, म्हटले भेटावे हिर्लेकर ला. आम्ही तसे जुने मित्र आहोत.” तारकर म्हणाला.नंतर हिर्लेकर कडे वळून त्याने विचारले, “ हिर्लेकर ,हा कोण  इसम आहे माहिती आहे तुला? हा पाणिनी पटवर्धन आहे.सुप्रसिद्ध फौजदारी वकील.
त्याच्या बरोबर ची तरुणी कोण आहे ते मला माहित नाही पण माझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तू तिला नीट पाहून घे.”
“ पटवर्धन चा हेतू चुकीचा असतो असे मी नाही म्हणणार पण ज्या साक्षीदाराची भविष्यात उलट तपासणी घ्यायची असते त्याला तो त्याच्या विशिष्ट पद्धतीने अडकवून वेडा करून टाकण्यात पटाईत आहे हे लक्षात ठेव.
जर का भविष्यात तुला कोर्टात साक्षीदार म्हणून बोलावले जाण्याची शक्यता असेल आणि तपन च्या अपार्टमेंट समोर असणाऱ्या अग्नी रोधकासमोर गाडी लावणारी तरुणी म्हणजे पटवर्धन बरोबर आत्ता असलेली तरुणी  हे तुला ओळखायचे असेल तर सावध रहा. कारण पटवर्धन सहज गत्या म्हणेल की तुम्ही चुकीचे सांगताय हिर्लेकर, तुम्हाला जी तरुणी गाडीतून उतरलेली वाटत्ये ती म्हणजे माझ्या बरोबर तुमच्या दुकानात आलेली तरुणी आहे.”  तारकर म्हणाला.
“ हिर्लेकर, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ”. पाणिनी म्हणाला. “ तो तुला गोंधळून टाकेल.माझ्या बरोबरची तरुणी वेगळी आहे आणि तुम्ही तपन च्या गाडीतून उतरताना पाहिलेली ......”
 
“ थांबा पटवर्धन मी ठाम पणे सांगतो, तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या तरुणीलाच मी तपन च्या गाडीतून उतरताना पहिले होते.अर्थात तिचे त्या वेळी घातलेले कपडे वेगळे होते, अत्ता चे वेगळे आहेत पण दोन्ही तरुणी एकच आहेत.” हिर्लेकर म्हणाला.
“ खात्री कर हिर्लेकर ! आधी खात्री कर.” तारकर म्हणाला.
“ खात्रीच झाली आहे माझी.” हिर्लेकर म्हणाला.
समाधानाने तारकर  हसला आणि म्हणाला,  “ पटवर्धन माझी त्या तरुणी बरोबर ओळख नाही का करून देणार ? पण जाउ दे तू कशाला, मीच करून देतो माझी ओळख. तर मग मिस आकृती, मी इन्स्पे. तारकर. आणि मला तुम्हाला विचारायचे आहे की तपन ज्या रात्री मारला गेला, त्या रात्री तुम्ही कुठे होतात. ”
मैथिली ने त्याच्या प्रश्नावर चेहेरा पाडला आणि  खचून गेल्याचा अभिनय इतका अस्सल केला की क्षणभर पाणिनी सुद्धा फसला.
“ घाबरून जाऊ नकोस आकृती.” इन्स्पे. तारकर तिला धीर दिल्याचे भासवत म्हणाला. “ तू जर निरपराध असशील तर तुला कोणी हातही लाऊ शकणार नाही.”
“ मिस्टर तारकर तुझी थोडीशी चूक होते आहे तिला ओळखताना.” पाणिनी म्हणाला.. “ मी तुझी ओळख करून देतो. ही देवनार मध्ये राहणारी आणि सेक्रेटरी म्हणून एका ठिकाणी नोकरी करणारी तरुणी आहे.तिचं नाव मैथिली आहुजा अस आहे.तिला पण वाय फाय म्युझिक सिस्टीम मध्ये रस होता म्हणून आम्ही आलो होतो इथे.”
तारकर  च्या मनात अचानक संशय निर्माण झाला. “ हिर्लेकर, परत विचारतो मी तुला, हि तीच तरुणी आहे जिला तू तपन च्या गाडीतून उतरताना पाहिलंस?”
“ खात्रीच आहे माझी तशी.”
“ मला वाटलच होत तसं.” तारकर म्हणाला. “ या पाणिनी पटवर्धन ने काय पटवल असत न्यायाधीशांना, कल्पना आहे तुला? त्याने असा युक्तिवाद केला असता की हिर्लेकर ला  जी तरुणी लक्षात आहे ती म्हणजे गाडीतून उतरणारी तरुणी नसून त्याच्या शो रूम मध्ये आलेली तरुणी म्हणून लक्षात आहे.”
हिर्लेकर ने पुन्हा लक्षपूर्वक  मैथिली आहुजा कडे निरखून पहिले.
“ ती , हीच तरुणी नसेल तर तू स्वतः वर मोठच अरिष्ट ओढवून घेशील.” तारकर म्हणाला.
“ हीच ती मुलगी आहे.” हिर्लेकर ने खात्री दिली.
“ पटवर्धन, तुझ्या माहिती साठी सांगतो, मी आणि मिस आहुजा जरा फिरायला जाऊन येतोय.” तारकर म्हणाला.
“ तुझ्या कडे अटक वॉरंट आहे?” पाणिनीने विचारले.
“ मला गरज नाही त्याची.” तारकर ने बेफिकीर पणे उत्तर दिले.
“ गरज आहे.तू तिला जर कोठडीत ठेवणार असशील तर. जर तू तिला खरच फिरायला नेणार असशील,तर मी तिच्या बरोबर येणार. तुझ्या मनात आल म्हणून तू तिला माझ्या पासून दूर नेऊ शकत नाहीस.” पाणिनी म्हणाला..
“ पाणिनी, साक्षीदाराने तिला ओळखलेले आहे. या आधारे तिच्या कडून मला अधिक माहिती घ्यायची आहे.” तारकर म्हणाला.
“ मी नीट ऐकलं आहे साक्षीदाराने किती ठोस पणे ओळखल आहे ते. जेव्हा आपण कोर्टात भेटू तेव्हा हे लक्षात ठेव.” पाणिनीने तारकर ला समजावले.
“ पाणिनी तू काय गौडबंगाल करायचा प्रयत्न करतो आहेस तुझे तुला माहीत, पण मी तिला नेणारच माझ्या बरोबर.”
“ आणि मी येणारच तुझ्या बरोबर ” पाणिनीने जाणीव करून दिली.
“ ठीक आहे.” त्याला नकार देण्यातला कायदेशीर मुद्दा लक्षात येताच तारकर ने एक पाउल मागे घेतले. “ पण पाणिनी तू मध्ये काहीही बोलायचं नाही.लुडबुड करायची नाही.केलीस तर पीनल कोड चे काही सेक्शन, जर तू विसरला असशील तर ते  तुझ्या तोंडावर फेकून मारावे लागतील मला.”
पाणिनी पटवर्धन अदबशीर पणे हसला.” मला पीनल कोड चे कुठलेच सेक्शन विसरणे वकील या नात्याने परवडण्या सारखे नाही तारकर.”
ते तिघेही बाहेर आले. “ आपण पोलिसांच्या गाडीतून जायचंय ” जीप चे दार उघडतानाच तारकर ने जाहीर केले.गाडीत बसत असतानाच पाणिनीने आहुजा ला डोळ्यांनी शांत बसायची खूण केली. तारकर ने ड्रायव्हर च्या कानात हळू आवाजात काहीतरी सांगितले. त्यांची गाडी साध्या घरांची वसाहत असलेल्या भागात शिरली.एका लहान बंगल्या समोर गाडी उभी राहिली.
“ तुम्ही लोक आताच बसून रहा .” तारकर म्हणाला आणि त्या बंगल्यात गेला.थोडा वेळ तो आत कोणाशी तरी बोलत होता, नंतर एक माणूस त्याच्या बरोबर बाहेर आला आणि तो पोलिसांच्या गाडी कडे आला.गाडी कडे तारकर ची पाठ होती आणि त्या माणसाचे तोंड तारकर कडे म्हणजे गाडी कडे होत.
“ आता दुसरी बाजू बघ.” तारकर त्याला म्हणाला.त्या दोघांनी गाडीची मागची बाजू तपासली.नंतर दोघेही पुन्हा त्या बंगले वजा घरात गेले.थोडा वेळ तारकर आतच बोलत राहिला. मग बाहेर येऊन त्या गाडीच्या ड्रायव्हर ला उद्देशून म्हणाला, “ त्या दोघांना त्या म्युझिक स्टोअर मध्ये सोडून येऊया.”
“ ही काय भानगड आहे मला सांगू शकतोस का?” पाणिनीने तारकर ला विचारले.
“ सांगू शकतो पण सांगणार नाही.त्या ऐवजी तूच अंदाज कर.”
“ कदाचित हि गाडी अपघातात सापडलेली असावी आणि ती या माणसाला तू ओळख पटवायला आणली असावीस.” पाणिनी म्हणाला..
“ शक्य आहे.” तारकर म्हणाला.
“ किंवा पोलिसांकडे जुन्या झालेल्या गाड्या विकायला काढल्या असाव्यात आणि या माणसाला ती घ्यायची असावी.”
“ शक्य आहे.” तारकर म्हणाला.
 ते सर्व पुन्हा त्याच गाडीतून म्युझिक स्टोअर पर्यंत आले.
“ जिथून तुम्हाला घेतले तिथे पुन्हा सोडलय.” तारकर म्हणाला.
“ त्या बद्दल नक्कीच आभारी आहे.पण तारकर तुला कसे कळले की आम्ही त्या स्टोअर मध्ये आहोत.”
“ मी तिथे शेजारी आलोच होतो.तू दिसलास म्हणून आलो तिथे.म्हंटल तू हिर्लेकर ला  गंडवून काहीतरी अस करशील की जेणे करून उलट तपासणीत त्याची अवस्था नाजूक होईल , तसे घडू नये म्हणून मी आलो.”
“ त्याची अवस्था अगोदरच नाजूक झाल्ये ” पाणिनी म्हणाला..
“ मी यावर वाद घालत नाही. मला पगार मिळतो तो प्रकरणांचा छडा लावण्यासाठी, वकीलांबरोबर वाद घालण्याचा नाही. ” तारकर म्हणाला आणि बाहेर पडला.
“ पटवर्धन , तुम्हाला  माहिती आहे की गाडीतून उतरलेली तरुणी म्हणजे  मी नव्हते, मग  त्यांची समजूत तशी झाली तेव्हा तुम्ही बोलला का नाहीत?” आहुजा घाबरून म्हणाली.
“ धीर धर, शांत रहा.अत्ता तारकर इथून गेला खरा पण तो काही फार समाधानाने गेलेला नाही हे नक्की.आपल्याला त्याच्या नाराजीचे कारण शोधून काढायला लागेल.” पाणिनी म्हणाला..
“ काय करायचं आपण त्यासाठी? ” तिने विचारले.
“ एक चक्कर मारायला जाऊ.” पाणिनी म्हणाला..
पाणिनीच्या गाडीतून दोघेही पुन्हा त्याच जागी जायला निघाले जेथे तारकर ने त्यांना नेले होते.त्याच माणसाच्या घरासमोर पाणिनीने गाडी उभी केली.दारावरची घंटा वाजवली.त्याच माणसाने दार उघडले.पटवर्धन ला बघून त्याला आश्चर्यच वाटले.
“ अरे, पोलिसांच्या गाडीत बसलेले तुम्हीच होतात ना, त्या तरुणी बरोबर.?” पाणिनीने मान हलवून होकार दिला.
“ मी सांगितलंय मगाशीच तारकर ना की मला खात्री देता येणार नाही पण या मुली सारखीच दिसते ती. इथे एक माणूस फोटो घेऊन आला होता ,तो मला विचारीत होता की फोटोतली मुलगी ओळखता येईल का म्हणून . मी त्याला सांगितलं की नाही येणार ओळखता. मला वाटत की पोलिसांच्या बरोबर मगाशी जी मुलगी होती तिचाच तो फोटो होता. तपन जेव्हा त्याच्या गाडीतून तरुणीला घेऊन गेला तेव्हा मी ओझरते पहिले होते.मला खात्री नाही की ही तीच आहे.”
“ मी समजू शकतो ” पाणिनीत्याला म्हणाला.
“  मी लुल्ला कंपनीत रखवालदारी करतो त्यांच्या पार्किन मधे. पोलिसांनी मला लौकर उठवले झोपेतून . पुन्हा मला झोप लागलीच नाही.मला पोलिसांना मदत करायची आहे पण मला जो पर्यंत खात्री नाही तो पर्यंत मी कसे म्हणू की ही तीच मुलगी आहे.? नाही का? ” तो म्हणाला.
“ अगदी बरोबर आहे तुझी भूमिका , मिस्टर ...? ” पाणिनीने हेतू पुरस्सर विचारले.
“ तुषार संघवी ”
त्याला पुन्हा धन्यवाद देऊन पाणिनी गाडीत आला.
“ मैथिली, अजिबात गैरसमज करून घ्यायचा नाही ,मी पुन्हा पुन्हा विचारतोय म्हणून, तू कुठल्याही थराला जाऊन आकृती ला मदत करायला तयार आहेस ना?”
“ हो.”
“ मग मी तुला यात खोलवर गोवणार आहे.”
“ किती खोल?”
“ एवढे नाही की तू त्यातून बाहेरच पडू शकणार नाहीस. ते तुला उचलायला जातील आणि गरम बटाटा जसा हाताला भाजतो तसे सोडून देतील ”
“ तुला मी आता पुन्हा तुझी गाडी ज्या ठिकाणी पार्किंग केली आहेस तिथे सोडतो.तिथून तू तुझ्या घरी जा.तू पोचल्यावर थोड्याच वेळात तिथे  वर्तमान पत्राचे फोटोग्राफर येतील. ते तुझे फोटो काढू पाहतील.त्यांना हवे तेवढे फोटो काढायला परवानगी दे.काही  हरकत नाही.”
“ कितपत आकर्षक अशा पोझ  देऊ? ” तिने मिस्कील पणे विचारले.
“ हवे तेवढे असे म्हटले मी . हवे तसे नाही. फोटोग्राफर बहकणार  नाहीत एवढ्या मर्यादेत ! ” पाणिनीने मिस्कीलपणे उत्तर दिले.
 
( प्रकरण सात समाप्त)