दॅटस् ऑल युअर ऑनर
प्रकरण बारा.
ऑफिसात पाणिनी पटवर्धन गोंधळलेल्या अवस्थेत बसला होता.डाव्या हाताच्या बोटाने तो टेबलावर बोट आपटून आवाज करत होता तर उजव्या हातात अर्धवट ओढलेल्या सिगारेट चे थोटूक होते.त्याची राख हळू हळू रक्षापात्रात पडत होती तर धूर सरळ रेघेत हवेत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन पसरत होता. सौम्या सोहोनी ला पाणिनी च्या या सर्व मानसिकतेची सवय होती.ती त्याला काहीही न विचारता टेबलाच्या एका बाजूला हातात पेन्सिल व वही घेऊन तयारीत होती.
“ सौम्या लिहून घे मी सांगतो ते.” अचानक तंद्री मधून बाहेर येत पाणिनी म्हणाला.
“ असे गृहित धरू की आकृती खोटे बोलत आहे.प्रत्यक्ष पुरावा ती सांगत असलेल्या हकीगतीच्या विरुध्द आहे..... ती का खोटे बोलेल?..... ती खरेच दोषी आहे म्हणून?....
तसे असेल तर उपलब्ध असलेल्या पुराव्याला पोषक अशी गोष्ट तिने रचली असती. तेवढे समजण्या इतकी ती हुशार आहे. ....तसे झालेले नाही.”
तो बोलेल ते सौम्या वहीत उतरवत होती.
पाणिनी पुन्हा थांबला.
“ ती कोणाला तरी सांभाळून घेत असावी.कुणाला तरी संरक्षण देत असावी.....पण कोणाला?...... आणि तिची या पद्धतीची गोष्ट कोणाला संरक्षण देणार?........”
पाणिनी ला उत्तरे सुचली नाहीत.त्याने रक्षा पात्रात बाजूला ठेऊन दिलेली सिगारेट चुरगळून विझवली. खुर्ची वरून उठला आणि खिशात हात घालून येरझाऱ्या घालायला सुरुवात केली.ही त्याची नेहेमीची पद्धत होती.एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायचे असेल तर चालता चालता त्याला नवीन कल्पना सुचत असत.
आत्ताही असेच झाले.दोन तीन फेऱ्या मारल्यावर तो थांबला मधेच.
“ जर ती खरे बोलत्ये असे मानले तर ........ तर मग घडलेल्या घटना तिच्या हकीगतीशी जुळत का नाहीत?........ कारण एकच असू शकते की आपल्याला सर्वच्या सर्व घटनांची माहिती मिळाली नसेल.....”
“ माझ्या खुर्ची च्या मागे भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवायला हवंय. तुमच्या अशिलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवा.”
“ ती खरे बोलत्ये?” सौम्या ने विचारले.
“ ती खरेच बोलत्ये.आरोपीच्या वकिलाने सापडू नये अशा सापळ्यात मी अडकलोय.”
“ कसला सापळा?” सौम्या ने काळजी वाटून विचारले.
“ सरकार पक्षाच्या बोलण्याची मोहिनी पडली मला आणि त्याने सांगितले तसेच घडले असावे हे मी मान्य करून बसलो कारण त्याच्या म्हणण्याला पुष्टी देणारा पुरावा त्याच्या बाजूने होता म्हणून.” पाणिनी म्हणाला.
“ सर, याचा अर्थ, उपलब्ध पुराव्याचे दोन अर्थ निघू शकतात?” सौम्या ने विचारले.
“ निघत असलेच पाहिजेत.सौम्या, प्रभाकर लघाटे का पोलीस अधिकारी त्यांचा प्रमुख साक्षीदार होता.त्याला ते कोर्टात येऊ देण्यास का टाळत होते? साक्षीसाठी पण त्यांनी त्याला येऊ दिले नाही आणि उलट तपासणीसाठी सुध्दा ते त्याला आणायचे टाळू पाहताहेत. मला सांग असे काय असेल प्रभाकर लघाटे कडे सांगण्या सारखे की त्यामुळे सरकार पक्ष पालथा पडेल? ते त्याची साक्ष अगदीच किरकोळ आणि कमी महत्वाची आहे असे भासवत आहेत. त्याच्या उलट तपासणी मधून आरोपीला मदत होणारे काहीतरी चव्हाट्यावर येईल अशी त्यांना भीती वाटत असावी.
“ सर, पण प्रभाकर लघाटे भेटत नाहीये असे त्यांचे म्हणणे आहे ना? तो सुट्टी घेऊन बाहेर गेलाय वगैरे.” सौम्या ने विचारले.
“ त्या सर्व थापा आहेत. आरोपीच्या वकिलाने काहीही गृहित धरून जाता कमा नये हेच खरे.” पाणिनी म्हणाला. “ प्रभाकर लघाटे काय साक्ष देणार होता ते आपल्याला माहीत आहे कारण सरकारी वकिलानीच ते आपल्याला सांगितलंय.”
“ पण ते खोटे सांगत असतील तर?” सौम्या ने शंका विचारली.
“ तेवढे साहस दैविक दयाळ करणार नाही कारण तसे केले तर त्याच्यावर कोर्ट कारवाई करू शकते.त्यामुळे त्याला सत्यच सांगावे लागेल. परंतू त्याला संपूर्ण सत्य सांगण्याची गरज नाही.”
“ म्हणजे?” सौम्या ने विचारले.
“म्हणजे सरकारी वकील,दैविक दयाळ असे म्हणाला होता की प्रभाकर लघाटे अशा अशा आशयाची साक्ष देईल की त्याला तपन ची गाडी अग्नी रोधकासमोर लावलेली रात्री नऊ ला दिसली.नियम बाह्य गाडी लावल्या बद्दल त्याने समन्स चिकटवले.आता मला सांग या गोष्टी बद्दल मी उलट तपासणी घेऊ नये असे त्यांना का वाटत असावे?” पाणिनी स्वत:शी बोलल्या सारखा पुटपुटला. सौम्या त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही.ती ही गोंधळली होती. पाणिनी ने पुन्हा येरझऱ्या घालायला सुरुवात केली. “ आकृती सांगत्ये की तिने तपन ची गाडी अग्नी रोधकासमोर लावली.म्हणजे प्रभाकर लघाटे ची साक्ष त्याला अनुसरूनच आहे. पण प्रभाकर लघाटे ने एकदाच समन्स चिकटवले........ अरे बापरे.....मी मूर्खच आहे ! ...” अचानक पाणिनी उद्गारला.
“ मग बरोबरच आहे ते प्रभाकर लघाटे ला माझ्या समोर का आणू इच्छित नाहीत ! तो उलट तपासणीत काय सांगेल याचा त्यांना अंदाज आलाय म्हणून ते घाबरलेत आता !”
“ काय घडलंय असं?” सौम्या ची उत्सुकता वाढली होती.
“ प्रभाकर लघाटे सांगेल की नऊ वाजता समन्स चिकटवल्या नंतर तो जरा दुसरी कडे जाऊन पुन्हा तिथे आला त्याची ड्यूटी संपण्यापूर्वी, तेव्हा ती गाडी तिथून गेलेली होती.”
“ अशी कशी गाडी जाऊ शकते गाडी मधल्या काळात?” सौम्या उद्गारली.
“ जाऊ शकते कारण आकृती ने आपल्याला सांगितल्या प्रमाणे तिने गाडीची किल्ली आतच ठेऊन दिली होती,गाडीच्या इग्निशन ला.” पाणिनी म्हणाला. “ म्हणूनच कोणीतरी ती गाडी रात्री नऊ नंतर म्हणजे पाहिले समन्स लावल्या नंतर , घेऊन गेले आणि रात्री बारा पूर्वी पुन्हा ती गाडी अग्नी रोधकासमोर लाऊन गेले.दरम्यान रात्री बारा ला प्रभाकर लघाटे ची ड्यूटी संपली तेव्हा नवीन पोलिसांची जोडी आली ,त्यांनी आधी प्रभाकर लघाटे ने लावलेले समन्स बघितले, तरीही गाडी तिथेच आहे म्हणून पुन्हा एक समन्स लावले. त्या नंतरही गाडी हलली नाही म्हणून पहाटे ती उचलून जप्त करून नेली.” पाणिनी म्हणाला
“ पण कोणी नेली असेल ती गाडी मधल्या वेळेत ?” सौम्या ने भांबावून विचारले.
“ ते मात्र आपल्याला शोधून काढायला पाहिजे. आणि अशा ठिकाणी शोध घेतला पाहिजे ,जिथे खरे तर सुरवातीलाच बघायला हवे होते.”
“ म्हणजे कोठे नेमके?” सौम्याने विचारले.
“ अभिज्ञा बोरा.. नमन लुल्ला आणि आकृती चा वरिष्ठ जयराज आर्य या दोघांची सेक्रेटरी. तुला आठवतय, आकृती ने आपल्याला सांगितले की लुल्ला कंपनीत नोकरी लागावी म्हणून खूप जणांनी अर्ज दिले होते आणि मुलाखतीसाठी पण खूप उमेदवार हजर होते.पण आकृती ने मैथिली आहुजाला सांगितले, तिने कोणाला तरी लुल्ला कंपनीत फोन केला आणि आकृती ला लगेच नोकरी लागली.इतर सर्व उमेदवारांना बाजुला टाकून तिला घेतले गेले.जयराज आर्य ने पण साक्षीत सांगितलं की आफ्रिकेला जाण्यापूर्वी तपन ने आकृती ला नियुक्त केल्याचे खास पत्र दिले होते. ”
“ खरंच की ! ” सौम्या आठवण होऊन म्हणाली.
“ हा सगळा पुरावा अगदी आपल्या समोर असताना सुध्दा मी मूर्ख पणा केला. चल सौम्या निघू आपण.” पाणिनी म्हणाला.
“ कुणाच्या मागे लागलोय आपण अत्ता? ” सौम्या ने विचारले.
“ सत्य.” पाणिनी ने त्रोटक उत्तर दिले. दोघे जण खाली उतरून पाणिनी च्या गाडीतून लुल्ला कंपनीत जायला निघाले.
कंपनीच्या स्वागत कक्षात आल्यावर तिथल्या स्वागतिकेला पाणिनी म्हणाला, “ मला नमन लुल्ला ची सेक्रेटरी अभिज्ञा बोराला आणि मॅनेजर जयराज आर्य ना भेटायचयं. मी अॅड. पाणिनी पटवर्धन आहे आणि ही भेट फार महत्वाची आहे.”
तिने इंटर कॉम लावला. “अभिज्ञा म्हणताहेत की तुम्हाला भेटलेले सरकारी वकीलांना चालणार नाही.”
“ छान,” पाणिनी हसून म्हणाला. “ तसे असेल तर मी तिला कोर्टाचे समन्स बजावतो आणि साक्षीदार म्हणून हजर राहायला लावतो.मी त्यात दाखवीन की सरकारी वकीलांच्या भावना जपण्यासाठी म्हणून तिने कोणाशी बोलण्यास नकार दिला ”
“ थांबा ,थांबा एक मिनिट.स्वागतिका घाबरून म्हणाली तिने पुन्हा इंटर कॉम लावला. घाई घाईत काहीतरी बोलली. “त्या भेटतील तुम्हाला. लिफ्ट ने तिसऱ्या मजल्यावर जा. त्या दारातच भेटतील. सौम्या आणि पाणिनी तिसऱ्या मजल्यावर उतरले तेव्हा एका तरुणीने दारातच त्यांना गाठले. “ मी मिस बोरा . पटवर्धन, तुम्ही माझ्या ऑफिस मधे याल का ?”
“ मला सांगाल का पटवर्धन काय हवय तुम्हाला?” तिच्या केबिन मधे आल्यावर तिने पाणिनी ला विचारले.
पाणिनी ने तिच्या कडे विचार पूर्वक पाहिले. “ एवढया लहान वयात मोठे पद मिळवलेत तुम्ही.” पाणिनी म्हणाला.
“ थेट मुद्द्याला हात घाला मिस्टर पटवर्धन.” ती म्हणाली.
“ मला हे जाणून घ्यायचय की लुल्ला कंपनीत नोकरीला लागण्यासाठी आकृती ने मैथिली ला का सांगितले आणि त्या नंतर दोनच दिवसात तपन च्या खास आदेशाने ती नोकरीला कशी लागली.” पाणिनी ने विचारले
“ मी नाही सांगू शकत.” ती म्हणाली. “ तुम्हाला जयराज आर्य ला पण भेटायचे आहे ना? भेटा त्याला आणि विचारा हाच प्रश्न. तो देईल उत्तर.”
“ त्याने आधीच साक्षीत सांगितलं आहे की तपन च्या खास आदेशाने ती नोकरीला लागली.यापेक्षा त्याने काहीच सांगितलेले नाही.”
“ मला पण त्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. मला माहिती आहे की कोणीतरी कोणाच्या ओळखीने लागत असते. जयराज आर्य ला मी इथे बोलावून घेते. ” असे म्हणून तिने त्याला इंटर कॉम लावला.
“ इथे मिस्टर पटवर्धन आले आहेत.त्यांच्या बरोबर मिस सोहोनी आहेत. जे काही बोलले जाईल त्याची नोंद त्या वहीत करण्याच्या तयारीने आल्या आहेत. त्यांना हे हवंय की इतर सर्व उमेदवारांना मागे टाकून आकृती थेट तपन च्या वशिल्याने या कंपनीत कशी काय नोकरीला लागली. तेव्हा तुम्ही इथे येऊन पटवर्धन च्या प्रश्नाचे उत्तर द्याल का?”
फोन ठेऊन नंतर पाणिनी कडे वळून ती म्हणाली. “ आता आपल्याला सगळंच चित्र स्पष्ट होईल. तपन गेल्या पासून त्याचे वडील नमन लुल्ला ऑफिस ला आलेले नाहीत पण त्यांची सेक्रेटरी म्हणून मी सांगू शकते की या ऑफिस मधून आकृती ला नोकरीवर घेण्यासाठी कोणताही आदेश निघालेला नव्हता. ”
“ मला जयराज आर्य येई पर्यंत जाणून घ्यायला आवडेल की तपन आणि त्याचे वडील एकत्र राहायचे की वेगळे?” पाणिनीने विचारले.
“ तो वेगळ्या अपार्टमेंट मधे राहायचा.”
“ मग जेवण करायला वेगळा माणूस असेल?”
“ नाही.”
“ तर मग नेहेमी बाहेरच खात असला पाहिजे.”
“ ते मला कळायला मार्ग नाही ”
“ तपन ऑफिस च्या कामात बराच रस घेत असे?”
“ हो.घेत असे.”
“ ऑफिस मध्ये त्याला विशिष्ठ असे पद होते?”
“ कंपनीचा उपाध्यक्ष होता तो.”
“खूप प्रवास करायचा का तो.?”
“ हो”
“ वडलांचे आणि त्याचे एकमेकांशी चांगले सख्ख्य होतं?”
“ हो.”
पाणिनी हसला. “ तुम्ही स्वत:हून फारशी माहिती देण्यात उत्सुक दिसत नाही मिस . जेवढे विचारतोय त्यालाच तुटक उत्तरे देता आहात.” पाणिनी म्हणाला.
“ सविस्तर उत्तरे देण्याचा मला पगार मिळत नाही. आपली ही भेट नमन लुल्ला ना आवडेल की नाही मला शंकाच आहे. ”
पाणिनी काहीतरी खरमरीत उत्तर देणार होता तेवढ्यात मागचे दार उघडले गेले आणि जयराज आर्य आत आला.येता येताच पाणिनी कडे बघून हसला आणि नंतर त्याने मिस बोरा कडे पहिले.
“ पटवर्धन तुम्हाला जयराज आर्य माहिती आहेच. ”मिस बोरा म्हणाली.
“ आम्ही कोर्टात भेटलोय.” पाणिनी म्हणाला. “ ही माझी सेक्रेटरी सौम्या सोहोनी आहे. मला तुमच्याकडून हवं होत की आकृती ला तुमच्या कंपनीत नोकरी कशी मिळाली.”
“ कोर्टात सांगितलंय त्या पेक्षा या बाबतीत मी फार काही सांगू शकेन असे नाही.”
“ तुम्ही सांगू शकता मिस्टर जयराज आर्य. एखाद्याला नोकरीला लावणे ही तपन च्या नेहेमीच्या सवयीचा भाग नक्कीच नव्हता. तुमच्या ऑफिसात पर्सोनेल डिपार्टमेंट आहे त्यांच्या कडे हे काम असते. ”
“ बरोबर.” जयराज आर्य म्हणाला.
“ तरी सुद्धा आकृती ला नेहेमीच्या पद्धतीने नोकरी ला न ठेवता थेट तपन ने मध्ये पडून तिला घ्यायला लावले. ”
“ हो . बरोबर.”
“ असं दिसतंय की आकृती पूर्वी तुमच्या कडे नोकरीला असणाऱ्या मैथिली आहुजाकडे गेली असावी आणि तिच्या मार्फत ही नोकरी मिळाली असावी. ”
“ अशी शक्यता असू शकते”
“असू शकते म्हणजे?”
“ म्हणजे तिने तपन ला फोन केला असेल आणि तिला नोकरीला लाव असे सांगितले असेल.”
“ आणि तिच्या फोन वरून तपन ने ते केले असावे?”
पाणिनी ने विचारले.
“ केले असावे काय? केले ना त्याने.नाही का? ” जयराज आर्य म्हणाला.
“मैथिली आहुजाने तपन ला फोन केल्याचे तुम्हाला माहिती आहे? ” पाणिनी ने विचारले.
“ माहिती नाही.तुम्ही जे सांगितले त्यावरून मी अनुमान काढले. ती तुमचीच अशील आहे.तिने तुम्हाला सांगितले असेल ना तिला कशी मिळाली नोकरी ते.”
“ तिला माहित नाहीये ते.”
जयराज आर्य ने खांदे उडवले. ‘त्याला मी काय करणार’ अशा आशयाचा भाव त्यातून जाणवला.
“ ती एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या मार्फत लागलेली असून सुद्धा तिला रागावताना तुम्हाला संकोच किंवा भीती नाही वाटली?”
“ मी माझ्या ऑफिसात नेहेमी कार्य क्षमता आणि शिस्त टिकवण्याचा प्रयत्न करतो.कोणी कोणत्याही वशिल्याने लागले असले तरी मी फारशी किंमत देत नाही.”
“ आकृती कामावर रुजू होणार आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कधी कळले? ”
“ तपन ने सांगितले. त्याने एक घडी घातलेला कागद मला दिला आणि सांगितले की एक तज्ज्ञ स्टेनोग्राफर म्हणून चांगल्या पगारावर हिला ठेऊन घे. ”
“ म्हणजे कोणतीही परीक्षा वगैरे न देता ती थेट मोठ्या पगारावर रुजू झाली. बरोबर?” पाणिनी ने खात्री करून घेतली.
“ तशीच वस्तुस्थिती आहे खरी ”
“ आणि या पेक्षा तुम्हाला काही माहिती नाही? ”
“ एवढीच आहे.”
“ असे दुसऱ्या एखाद्या व्यक्ती बद्दल घडलय?” पाणिनी ने विचारणा केली.
“ मला माझे रेकोर्ड तपासून सांगावे लागेल.”
“ आखडू नका उगीचच. मी गरज वाटली तर तुम्हाला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुन्हा बोलाऊ शकतो. तुम्ही दोघेही काहीतरी गंमत जंमत करताय.”
“ काय म्हणायचय तुम्हाला.? ”
“” मला काय म्हणायचंय तुम्हाला चांगल कळलंय.तुम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करताय.जेव्हा तिने तुम्हाला बोलावण्यासाठी फोन लावला तेव्हा फोन ऑपरेटर ला असे नाही सांगितलं कि जयराज आर्य ना माझ्या कडे पाठव म्हणून.तिने तुम्हाला थेट इंटर कॉम लावला. तिने एवढेच नाही सांगितलं की माझ्या कडे या.तिने तुम्हाला सविस्तर सांगितलं की मी कशासाठी आलोय, मला काय म्हणायचय. तिने हे हि सांगून तुम्हाला सावध केलं कि सौम्या सोहोनी होणारे बोलणे वहीत लिहून घेणार आहेत. बर नंतर सुद्धा तुम्ही लगेच नाही आलात, तुम्ही बराच वेळ घालवलात ,तुमची उत्तरे तयार ठेवायला.” पाणिनी ने बॉम्ब गोळा टाकला.
“ तेव्हा मिस्टर जयराज आर्य , तुमची खेळी बंद करा आणि मला सांगा ज्या पद्धतीने आकृती थेट लुल्ला च्या संबंधातून लागली, तसे आणखी कोण लागले?” पाणिनी ने पुढे विचारले.
“ माझ्या माहितीत एकच व्यक्ती आहे.” जयराज आर्य म्हणाला.
“ कोण आहे ती?”
“ मैथिली आहुजा” जयराज आर्य म्हणाला.
“ माय गॉड ! ”मिस बोरा उद्गारली. “ डोके ठिकाणावर आहे का तुमचे.जयराज आर्य?” तिने फटकारले
“ काय उपयोग आहे टोलवा टोलवी करून आता.? तुम्ही पटवर्धन ना कोर्टात बघितलेले नाही .मी बघितलय. ते जे बोलतील ते करतील. आत्ता मी जर सांगितले नाही तर ते सगळे कोर्टात सांगायला लाऊन आपले वाभाडे काढेल. ” जयराज आर्य घाबरून म्हणाला.
“ मला हे समजलं नाही की तुम्ही दोघे ही गोष्ट लपवून का ठेवत होतात? ” पाणिनी ने मिस बोरा ला विचारले.
“ मिस्टर पटवर्धन , ” अत्यंत थंड स्वरात मिस बोरा म्हणाली, “ आपण ही मुलाखत इथेच थांबवू. तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळाल्ये तुम्हाला.आम्हाला एवढेच माहित होते आणि तुम्हाला ते सांगितलंय.”
“ तुम्हाला तसे हवे असेल तर तसे.घ्या.” पाणिनी म्हणाला.त्याने खिशातून कोर्टाच्या सही शिक्क्याचे दस्त काढून एक मिस बोरा ला दिले आणि एक जयराज आर्य ला.
“ काय आहे हे?”मिस बोरा ने विचारले.
“ बचाव पक्षाच्या वतीने उद्या सकाळी कोर्टात साक्ष देण्यासाठी हजर राहावे म्हणून हा समन्स आहे. आज अर्धवट राहिलेली माहिती मी उद्या कोर्टात सर्वांसमक्ष घेईन.” पाणिनी म्हणाला आणि सौम्या ला घेऊन तिथून बाहेर पडला.
“ पुढे काय करुया आता? ”
“ सर्वात आधी कनक ला फोन लाऊ या त्याला नव्याने काही माहिती मिळाली आहे का बघू.”
सौम्या ने त्याला फोन लावल्यावर तिचा चेहेरा एकदम खुललेला दिसला पाणिनी ला.
“ ओमकार केसवड बद्दल कनक ला महत्वाची माहिती मिळालेली दिसत्ये. खुनाच्या रात्रीतला त्याचा ठाव ठिकाण काय होता ते त्याने शोधून काढले आहे. ” सौम्या म्हणाली आणि तिने पाणिनी च्या हातात फोन दिला.
“ मी ओमकार केसवड ची खोली आहे तिथे चौकशी केली.तो म्हणतो त्या प्रमाणे तो त्या घर मालकाची सगळी कामे करतो ,भाडे देत नाही. हे त्याने सांगितलेले बरोबर आहे. पाच तारखेला,खुनाच्या दिवशीच्या तारखेला ओमकार केसवड त्या घर मालकिणीच्या घरी टीव्ही बघत बसला होता हे बरोबर आहे पण ती साडे सात नंतर तिथे त्याच्या बरोबर नव्हती. तिचे डोके दुखायला लागले म्हणून ती साडेसात नंतर आत जाऊन झोपली.ती म्हणते मी आत झोपायला गेल्यावर ओमकार केसवड बाहेर गेलेला असू शकतो पण तिला तसे वाटत नाही,कारण टीव्ही चा आवाज येत होता आणि त्यामुळे तिची झोप चाळावली जात होती.गाढ झोपच लागली नाही.साडे दहा वाजता टीव्ही बंद झाल्याचे तिला आठवतंय कारण सर्व कार्यक्रम त्या वेळेला संपतातच.पण ती म्हणते की ती शपथ पूर्वक नाही सांगू शकणार की साडे सात ते साडे दहा या वेळेत ओमकार केसवड तिथेच होता म्हणून. ”
“ अच्छा ! ” पाणिनी पुटपुटला.
“ आणखी एक बातमी.” ओजस म्हणाला. “ त्या मिळकतीच्या शेजारी एक माणूस राहतो ,त्याची छोटीशी खोली आहे तिथे.हिशोब लिहिण्याची वगैरे कामे करतो. लुल्ला कुटुंबाच्या दृष्टीने तो त्यांच्या आसपासही फिरकू शकणारा नाही.थोडक्यात त्यांचे सलोख्याचे संबंध नाहीत. गेल्या वर्षी या माणसाने आपल्या मिळकतीमधून एक रस्ता काढला ,जो लुल्ला च्या त्या आऊट हाऊस ला लगत होता. त्यामुळे पावसाचे पाणी त्या रस्त्यावरून आऊट हाऊस च्या परिसरात घुसले होते त्यामुळे लुल्ला ने त्याच्या वर दावा ठोकण्याची धमकी दिली होती. हे सर्व गेल्या वर्षी घडले. आत्ताच्या पाच तारखेला पुन्हा जेव्हा पाउस आला तेव्हा मागच्या सारखी भांडणे होऊ नयेत म्हणून तो माणूस रस्यावरचे पाणी आऊट हाऊस मध्ये शिरले नाही ना हे बघायला रात्री त्याची गाडी घेऊन बाहेर आला बाहेर आला होता .जेव्हा तो परत निघाला आणि त्याने गाडीचे दिवे बंद केले तेव्हा त्याला दिसले की त्या आऊट हाऊस च्या गेट मधून एक गाडी आत येत होती.त्याने पहिले तर त्यावेळी ते गेट चक्क उघडे होते. आणि ओमकार केसवड ची गाडी अगदी हळू हळू आत आली. त्याला ओमकार केसवड ची गाडी पक्की माहिती आहे कारण त्या गाडीच्या पिस्टन चा एक विशिष्ट आवाज येतो ,तो त्याच्या परिचित आहे.त्याला काही कुजबुज सुद्धा ऐकू आली आणि त्या आवाजात एक आवाज द्रौपदी
मंडलिक चा होता असा त्याला संशय आहे पण हे तो शपथेवर नाही सांगू शकणार. ”
“ या इसमाच नाव काय आहे?” पाणिनी ने विचारले.
“गुरुनाथ उमरजी असे नाव आहे.”
पाणिनी जाम खुश झाला. “ फारच महत्वाची माहिती हाती लागली कनक. त्याच्यावर समन्स काढायचं मला.तो उद्या कोर्टात आपल्या बाजूने साक्षीसाठी उभा राहायला हवा मला.”
“ मी आधीच समन्स पोचवलय त्याच्या पर्यंत.” ओजस म्हणाला. “ एवढेच नाही तर त्याला कोर्टात आणायची पण व्यवस्था केली आहे मी. लुल्ला कुटुंबाकडून तो आधीच दुखावला गेलाय. ”
“ ही आलेली गाडी किती वेळ थांबली होती तिथे? ” पाणिनी ने विचारले.
“ त्याला माहिती नाही ते . तो फक्त पाणी आऊट हाउस मध्ये शिरले नाही ना बघण्यासाठी आला होता ,नंतर तो शहरात गेला निघून.पण त्याचे म्हणणे आहे तो तिथे असे पर्यंत पूर्ण वेळ त्या घरातले दिवे चालू होते.तो निघाला तेव्हा सुद्धा चालू होते.त्याला वाटतय कि ती गाडी आली तेव्हा गेट आधीच उघडे होते कारण गाडी सरळ आत आली , नाहीतर गेट पाशी थांबली असती.तो जेव्हा तिथून निघाला तेव्हा सुद्धा ती गाडी तिथेच होती आणि त्या घरातले दिवे चालू होते. ” ओजस ने माहिती दिली.
“ हे सगळ किती वाजता घडलं? ”
“ साधारण साडे सात ते पावणे आठला संध्याकाळी. पाच तारखेच्या.”
“ आपल्याला खरोखर लॉटरी च लागली ही माहिती मिळून.या वरून सिद्ध होतं कि आपल्याशी ओमकार केसवड खोटे बोलला.तो शेवटचा पाच हजाराचा चेक हा ओमकार केसवड ला च दिला गेला होता. आणि मला वाटत की तपन गेल्यामुळे त्या चेक ला काही किंमत उरली नाही त्यामुळे त्याने तो बँकेत भरलाच नसावा.”
“ ठीक आहे मी पुढची माहिती काढायला सुरु करतोच आहे.”
“ कनक, मी मैथिली आहुजाला आज दुपारी कोर्टात हजर राहा म्हणून सांगितलं होत.पण ती आलीच नाही.मी देवनारला जाऊन तिच्या घरी ती आहे का बघून येणार आहे.तू पण माझी इच्छा आहे कि तू सुद्धा जरा तिचा तपास घे आणि कुठे सापडते का बघ.”
“ आणि सापडली तर काय करू? ” ओजस ने विचारले.
“ तिच्या मागे माणसे लाव.”
“ ठीक आहे. ” असे म्हणून ओजस ने फोन ठेवून दिला.
( प्रकरण बारा समाप्त )