Get it on Google Play
Download on the App Store

आम्ही दोघी

संपदा देशपांडे

कल्याणवरून सकाळी ९.४० ची फास्ट ट्रेन. रोजचीच गेली ६ वर्ष म्हणजे माझं लग्न झाल्यापासून पकडत आहे. घरात काही कारणांनी उशीर झाला आणि ती लोकल चुकली कि जाम चीडचीड होते. खरं असं व्हायला कारण काहीच नाही. कल्याणला कर्जत, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणांवरून येणाऱ्या गाड्याही थांबतात. पण मनुष्य स्वभाव ती म्हणजे तीच गाडी. आता म्हणाल, त्या गाडीला माझा मैत्रिणीचा ग्रुप वगैरे आहे तर असं काहीच नाही तरीही. तीच गाडी हवी का? ते माझं मलाच कळत नाही. त्या दिवशीही असच झालं. मॅरेथॉन जिंकल्यावर जितका आनंद होणार नाही तितका आनंद मनात घेऊन अगदी शेवटच्या सेकंदाला गाडी पकडली. मला वाचनाची फार आवड आहे. लहानपणापासून. पूर्वी वेळ काढून वाचायचे पण आता घर, मुलं, नोकरी या सर्व ढिबिडशात वाचायला वेळच मिळत नाही. मग मी ती हौस ट्रेन मध्ये पुरी करते. बसल्यावर जे पुस्तकात डोकं घालते ते दादर आल्यावर उतरायला उठते तेंव्हा वर काढते. आज मात्र सगळी काम ऊरकण्याच्या नादात पुस्तक घरीच विसरले. आता काय करायचं हा प्रश्नच होता. मग उगीच चाळा म्हणून आसपासच्या बायकांचं निरीक्षण करत होते.

आपण बायका जगात कुठेही गेलो तरी आपल्या संसाराला चिकटलेल्याच राहतो. हेच दृश्य आसपास बघत होते. कोणी मुलांसाठी स्वेटर विणत होती, कोणी लसूण सोलून ठेवत होती, तर कोणी फेरीवाल्याकडून मुलींसाठी वस्तू विकत घेत होत्या, तर काहीजणी एकमेकींशी रेसिपी शेअर करत होत्या, तर काहीजणी आज घरी जाऊन काय जेवायला करायचं याच्यावर चर्चा करत होत्या. मला जर कोणी विचारलं कि जगातला सगळ्यात कठीण प्रश्न काय आहे? तर मी सांगीन, "उद्या जेवायला काय करायचं?"स्वतःशीच हसत मी इकडे-तिकडे बघत होते,  गम्मत वाटली बघताना. इतके दिवस मी हे काही पाहिलंच   नव्हतं. मला नेहमी प्रश्न पडतो कि पुरुषांच्या डब्यात पेपर वाचण्याखेरीज ते काही इतर करत असतील का ? करत असले तरी बसून बसून डुलक्या काढत असतील. हा विचार करत असतानाच डोंबिवली आले. जरा सावरून बसले. डोंबिवलीला बायकांचा मोठा लोंढा आत शिरला. सगळ्या कशा पदर वगैरे खोचून लढाईवर निघाल्याच्या आवेशात डब्ब्यात शिरल्या. फक्त तलवार हातात नव्हत्या इतकाच फरक. नाहीतर प्रत्येक स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई वाटत होती.   

या सर्व गोंधळात मला 'ती' दिसली. इकडे तिकडे बघताना अचानक तिच्यावर नजर गेली आणि खिळून राहिली. ती देखणी नव्हती पण आकर्षक होती. कुरळे दाट केस, नाजूक जिवणी टप्पोरे डोळे, गहू-वर्ण, मध्यम उंची, ती समोर उभी होती, म्हणजे डोंबिवलीला चढली होती. तिच्याबरोबरच्या इतर बायका जागा शोधत होत्या, पुढच्या  स्टेशनला उतरणाऱ्या महिलांकडे "आपली जागा ठेवा" सांगत होत्या. हि हे काही करत नव्हती.  या  गर्दीचा भागच नसल्यासारखी अलिप्त होती.  मनात आलं हिला स्वतःच्या सौंदर्याची जाणीव तरी आहे का ? मी स्त्री असून तिच्याकडे बघत राहावंसं वाटतंय. मी दिसायला सुंदर नाही. चार चौघींसारखी आहे. तिचं सौंदर्य अलौकिक होतं. तरीही का कोणास ठाऊक तिचा मत्सर नाही वाटला. ती आवडून गेली.  मग झालं रोज नाद लागला तिच्याकडे पाहत बसायचा. दोन दिवस ती दिसलीच नाही खूप चुकल्या-चुकल्या सारखं वाटायला लागलं. मनात आलं , काय झालं असेल ती आजारी तर नसेल ना? एखाद्या जिव्हाळ्याच्या माणसाबद्दल वाटते तशी काळजी वाटायला लागली. जे काही होतं ते माझ्या हाताबाहेरचं होतं.    

तिची भेट झाली ती पण अचानक. तिचा विचार मनात नसताना. मी दादरला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. रिसेप्शनिस्ट म्हणून. त्या दिवशी साधारण दुपारी बाराचा सुमार कोणीतरी घाईघाईने मला हाक मारली," एक्सक्यूझ मी!" मी वर बघितलं तर तीच होती. घामेघूम झालेली, बावरलेली. मला मात्र तिला पाहून फारच आनंद झाला. तिने अर्थातच मला ओळखलं नव्हतं. ती कोणीतरी "मिस्टर पाटील" यांची चौकशी करत होती. मला आठवलं रात्रीचा  रिसेप्शनिस्ट मुलगा जाताना मला "सदानंद पाटील नावाच्या माणसाबद्दल सांगत होता. तो माणूस दारू पिऊन रस्त्यावर पडलेला असताना त्याला एका कारवाल्यानीं उडवला. तो कारवाला चांगला होता त्यांनी त्याला ऍडमिट केला होता".  हिचा असल्या फाटक्या माणसाशी काय संबंध? मनात विचार आला. मी तिला बसवून घेतलं, पाणी प्यायला दिलं. मग सावकाश विचारलं ," हो ते इथेच आहेत. काळजी करू नकोस ते ठीक आहेत. ते तुझे कोण आहेत?" मी इतक्या आपुलकीने विचारताच ती ढसाढसा रडायलाच लागली. रडायचा भर ओसरल्यावर म्हणाली, " ते माझे पती आहेत. काम-धंदा काहीच करत नाही. घरदार  मीच नोकरी करून सांभाळते. हा माणूस मात्र दिवसभर दारू पीत बसतो. पैसे दिले नाहीत तर मारझोड करतो. सासू- सासरे खुप चांगले आहेत.  ते शक्य असेल तितका हातभार लावतात. पण हा माझा नवरा काही सुधारत नाही महिन्यातून एकदा तरी माझ्यावर अशी हॉस्पिटलला यायची वेळ येतेच."     मी तिच्या पाठीवर हात फिरवून तिला धीर दिला. तिला कॅन्टीन मध्ये नेऊन खायला घातलं चहा पाजला. ती दहावेळा आभार मनात होती मग मी तिला तिचा नवरा ऍडमिट होता तिथे सोडलं. संध्याकाळी पाचच्या सुमारास ती माझ्याकडे आली आणि बोलली, " ताई तुम्ही माझ्यासाठी इतकं का केलंत जशी आपली फार जुनी ओळख आहे?" मी म्हटलं, "आहेच ! अगं आपण एकाच ट्रेन नि प्रवास करतो रोज. माझं नाव निशा बापट आणि हे ताई वगैरे प्रकरण बंद कर पाहू. सरळ मला निशा बोल आणि तुझं नाव काय आहे?" मी असं बोलताच ती गोड हसलीम्हणाली," तरीच तुला कधीतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. मी सायली पाटील." तिच्याप्रमाणेच तिचं नावही नाजूक होतं. झालं मग आम्ही मस्त मैत्रिणी झालो. मी रोज तिची जागा पकडून ठेऊ लागले. तीही खुलून माझ्याशी गप्पा मारू लागली. आम्ही एकमेकांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आणू लागलो. इतकंच काय तर वेळात वेळ काढून शॉपिंग, सिनेमा असे प्रोग्रॅमही होऊ लागले.  ती माझ्या घरी खूप वेळा येऊन गेली. माझ्या दोन्ही मुलांना हि गोड मावशी फार आवडू लागली.   लग्नाला चार वर्ष झाली तरी सायलीला मूल झालं नाही हि खंत तिला खात होती. दुसरीकडे आपल्याबरोबर अजून एका जीवाची परवड झाली नाही याचं समाधानही तिला वाटत होत. मुलांची आवड ती माझ्या मुलांचे लाड करून पूर्ण करत होती.तिचा प्रेमविवाह होता. तिचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेवर ती जगत होती.

अशातच एक दिवस रात्री एकच्या सुमारास माझ्या मोबाईल ची रिंग वाजली. उचलला तशी सायली फोनवर जोरजोरात रडून काहीतरी सांगत होती. मला काहीच कळत नव्हत इतक्यात माझ्या आवाजानी माझे पती उठले त्यांनी फोन माझ्या हातातून घेतला आणि सायलीला," बरोबर कोणी असेल तर त्यांना दे असे सांगितले". मग तिच्या चाळीत राहणाऱ्या तिच्या शेजाऱ्यांनी फोन घेतला आणि सांगितले कि," सायलीचे पती सदानंद पाटील नुकतेच एका अपघातात वारले". हे समजताच आम्ही तडक आमच्या गाडीने सायलीकडे जायला निघालो. दोन्ही मुलांना सासूबाईंजवळ झोपवले त्यामुळे चिंता नव्हती. तासाभरात तिकडे गेलो. तिच्या जवळचे असे कोणी नातेवाईक नव्हते. गेल्या गेल्या माझ्या पतींनी सूत्र हातात घेतली. त्यांनी सगळे पोलिसांचे सोपस्कार पुरे केले. सर्व होऊन बॉडी ताब्यात मिळेपर्यंत सकाळ झाली. सर्व आटपून आम्ही निघालो तेंव्हा सायली माझ्या गळ्यात पडून खूप रडली. तिला व तिच्या सासू सासऱ्यांना धीर देऊन निघालो. तेरा दिवस झाले सायली आता खूप सावरली होती. मग मी तिला चार-पाच दिवस घरी घेऊन आले. मुलांच्यात ती तिचं दुःख विसरली. परत घरी गेली. नोकरीवर  हजरही झाली. एक दिवस माझे पती समीर मला बोलले," निशा, आता सायलीने पुढे काय ठरवलंय? अशीच एकटी राहणार का जन्मभर?" "खरं सांगू माझ्या मनात सुद्धा हेच येतंय तिने आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे." मी म्हटलं. "ठीक आहे ","मग तू बोलून बघ तिच्याशी ती काय म्हणते ते? माझ्या मनात तिच्यासाठी काहीतरी आहे." समीर बोलले. त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल.पण ते सध्या मला सांगणार नव्हते. एक दिवस मी तिच्याजवळ हा विषय काढला. तिने स्पष्ट नकार दिला. तिच्यावर सासू-सासऱ्यांची जबाबदारी होती.     

मग आम्ही दोघे तिच्या सासू-सासऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांना सर्व समजावून सांगितलं. ते बिचारे खूपच चांगले होते. तिचे सासरे आम्हाला म्हणाले," निशा, तुम्ही दोघे जे कराल ते तिच्या चांगल्यासाठीच. अहो तरुण, सुंदर, विधवा सून म्हणजे आमच्या जीवाला घोरच. आमच्या मुलानी या गुणी पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं. तुम्ही तिच्यासोबत आहात याचा तिला खूप आधार वाटतो. तिच्याबाबतीत जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आता ती आमची सून नाही मुलगी आहे. फक्त एकच अट आहे. तिचं कन्यादान आम्ही करणार." त्यांचे हे शब्द ऐकून डोळे भरून आले. अशा मोठ्या मनाच्या माणसांमुळेच तर जग चालतंय.  

मग समीर नि मला श्रीधर जोशी विषयी विचारलं आमच्याच बिल्डिंग मध्ये राहणारा अनाथ श्रीधर. चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. बायकोला फुलासारखं जपायचा. लग्नाला वर्ष झालं जेमतेम तर ती कॅन्सरनी आजारी झाली. शेवटच्या स्टेजला लक्षात आलं. त्याने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. काहीच उपयोग झाला नाही ती गेलीच. श्रीधर एकटा पडला. इतर वेळी सगळ्यांसाठी धावून जाणाऱ्या श्रीधरसाठी सगळे शेजारी धावून गेले. त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढले.   मला तर तो माझ्या भावासारखा होता. मला समीरची हि कल्पना आवडली. मग समीरनं श्रीधरशी आणि मी सायलीशी बोलायचं ठरवलं. दोघंही तयार नव्हतेच. आम्हीही हार मानायला तयार नव्हतो. म्हटलं लग्नाचा विषय राहूदे नुसतं भेटून तर घ्या एकमेकांना.

एक दिवस आम्ही ठरवून दोघांना भेटवलं. पहिल्याच भेटीत दोघांचे सूर जमले. मग अजूनही काही भेटी झाल्या. एक दिवस दोघांनीही घरी येऊन आम्हाला ते लग्नाला तयार असल्याची गोड बातमी दिली इतकंच नाही तर श्रीधर सायलीच्या सासू-सासऱ्यांना त्याचे आई-वडील मानून त्यांच्यासोबतच ठेवणार होता.      

मग काय आम्ही सर्व सोसायटी मधल्या लोकांनी तिथेच मांडव घालून दोघांचं लग्न लावून दिलं. आता माझी लाडकी मैत्रीण माझ्याजवळच राहत होती. लवकरच  ती आई होणार असल्याचं मला सांगितलं. माझी नुसती तारांबळ उडाली. तिचे सगळे डोहाळे मी आणि माझ्या सासूबाई हौसेने पुरवत होतो. नऊ महिन्यांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला तिचं नावही मीच ठेवलं 'मैत्री'.

आताही मी ९.४० च्या ट्रेनने जाते. आणि तिचे आभारही मानते. इतकी गोड मैत्रीण मिळवून दिल्याबद्दल. निशा आणि सायली आम्ही दोघी.

*****